लेख

[वाचनकाल : १ मिनिट]
feather pen and ink bottle

समाजमाध्यमांच्या अतिक्रमणामुळे लेख या प्रकाराला कधी नव्हे इतके अटीतटीचे महत्त्व प्राप्त झालेले आहे. हे फक्त सामाजिक किंवा राजकीय लेखांच्या बाबतीतच लागू आहे अशातला भाग नाही. लेखाच्या प्रत्येक उपप्रकारावर हे अरिष्ट ओढावते आहे. अशाने भविष्यात लेख आपली विश्वासार्हता गमावून बसतील हे सांगण्यासाठी कोण्या – पंचवीस वर्षानंतरच्या – अमृतकालीन भविष्यवाणीची गरज नाही, आवश्यकता नाही. संपूर्ण माहितीनिशी लिहिलेला एकच लेख किंवा केवळ प्रचारकी थाटात लिहिलेला ढिसाळ लेख दोन्ही बाबी तीन-पाच मिनिटांत वाचकांची मते (आणि मती) गोलाकार भिंगवू शकतात. मात्र मूळ मुद्द्यावर प्रश्नांवर भाष्य न करता इतर ठिकाणी पाल्हाळ लावत बसणाऱ्या लेखांची मांदियाळी समाजमाध्यमांच्या माध्यमांतून, प्रचार व प्रसार माध्यमांतून वाढत आहे, वाढतंच आहे.

लेख या साहित्य प्रकारावर निर्व्याज प्रेम करणाऱ्या वाचकांस व ते लिहिण्यासाठी अहोरात्र खपणाऱ्या लेखकांस लेखांना लागलेली ही उतरती ‘कळा’ असहनीय होत असणार हे निश्चित. त्यांच्या या असहनियतेवर व असहाय्यतेवर मायेची परखड फुंकर घालणारे ‘टाकबोरू’वरील हे समृद्ध दालन.

लेखाचे मूल्य त्याच्या विचारसरणीवर ठरत नसून ते त्याच्या मजबूत मांडणीवर व प्रभावी नेटक्या समांतर लेखनशैलीतून ठरत असते. त्यामुळे, ठराविक विचारसरणीच्या लेखांचा पुरस्कार ‘टाकबोरू’ करते अशातला भाग नाही. इथे लेखाच्या मुळ मसुद्यास व त्याच्या घोटीव मांडणीस प्राधान्य आहे.

‘संदर्भ’ हा प्रकार हल्ली ‘संदर्भ कोषात’च सापडेल असे दिवस. संदर्भहीन लेखांना येथे स्थान नाही, ठोस लिहिणारे लेखक हवेत. विनोदी, मार्मिक, ललित, सामाजिक, प्रासंगिक, व्यक्तीविषयक, प्रवासवर्णन, विश्लेषणात्मक लेखांची एकाच ठिकाणी गाठभेट घडवून आणणारे हे पृष्ठ.


{fullWidth}

نموذج الاتصال