शांतता! कोर्ट चालू आहे – इतस्ततः (विजय तेंडुलकर)


silence court is adjourned play review
केवळ विरंगुळा म्हणून काढलेल्या खेळात, एका निष्पाप जिवाला सहज रक्तबंबाळ करण्याइतके जे अमानुष क्रौर्य या समाजाच्या ठिकाणी आहे ते अगदी अर्थशून्य, हेतुशून्य आहे.

‘बाईच्या दोन पायांमध्ये समाजाची, घराण्याची, कुटुंबाची किंबहुना माणसाची इज्जत कोणी दडवून ठेवली आहे? तेही आम्हाला नको असताना?’ असा सडेतोड प्रश्न एका बलात्कार पिडीतेने खुलेआम विचारला होता. अगदी तसाच अप्रत्यक्ष सवाल तेंडुलकरांनी ‘शांतता’मधून जवळपास साठ वर्षांपूर्वी विचारला.



‘प्रकाश उजळतो तो एका ओक्याबोक्या दालनावर. याला दोन दारे. एक बाहेरून यायचे. दुसरे बाजूच्या एका खोलीत जायचे. दालनाची एक बाजू डाव्या विंगेत पुढे निघून गेल्यासारखी दिसते. दालनात एक तयार व्यासपीठ, एकदोन जुनाट लाकडी खुर्च्या, एक खोके, एक स्टूल, असे काहीबाही अडगळीसारखे पडलेले आहे. एक बंद घड्याळ भिंतीला दिसते. काही पुढाऱ्यांच्या जुनाट तसबिरी. देणगीदारांची नावे असलेले लाकडी फलक. एखादे गणपतीचे चित्र दारावर लावलेले. दार बंद.

बाहेर चाहूल. दाराची कडी बाहेरून उघडते. एकजण स्वतः जणू नव्यानेच हे दालन पाहत असावा तसा आत सरकून उभा राहतो. हा सामंत, हातात कुलूप-किल्ली. एक खेळण्यांतला हिरवा कापडी पोपट. एक पुस्तक.’

• • •

मुंबईतील ‘जागृतसभा’ कोण्या गावातील सोनार मोती चाळ नामक एका पडक्या वाड्यावजा सभागृहात पोहोचते. निमित्त – नवरात्रीत गावकऱ्यांसमोर न्यायालय कसं असतं याचं प्रात्यक्षिक उभं करणं. गावकऱ्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर छोट्या-छोट्या लघु नाटकांचं प्रदर्शन घडवणारं हे कलामंडळ अणवस्त्रनिर्मितीबद्दल ‘प्रेसिडेंट जॉन्सन’ यांच्यावर अभिरूप न्यायालयात खोटा खटला दाखल करण्याच्या बेताने येथे पोहोचलेलं. यात सगळे मिळून आठेक जण आहेत. पण बाकी सगळे आळशी. ती एकटीच अतिउत्साही आणि अतिकुतूहल स्वतःत दडवून ठेवलेली. स्थानिक वाटाड्याला सोबतीला घेऊन ती सर्वांआधी सभागृहात येऊन पोहोचते. तो दाराची कडी उघडताना बोट चेंबटलेल्या तिला ‘नीट कडी उघडली नाही तर एकतर बोटं कामातून जातं किंवा मग दरवाजा आतून लावल्यावर बाहेरून आपोआप कडी लागते’ हे सांगतो. पुन्हा तिला सभागृह म्हणजे ‘हॉल’ वगैरे बद्दल, गावाबद्दल सांगत राहतो. त्याच्या बोलण्याकडे लक्ष न देता ती सभागृहात भिरभिरत राहते. हलकेच त्याच्याशी लगट करू पाहते. तिच्या मनमोकळ्या स्वभावामुळे लाजरा असणारा तो आणखीनच बुजत जातो. मग ती लगट सोडून आपल्या लोकमंडळाबद्दल व अभिरूप न्यायालयाबद्दल भरभरून सांगायला सुरुवात करते. मध्येच भान सुटून ती शाळेतील शिक्षिकेची नोकरी धोक्यात असल्याचं सांगून जाते, स्वतःवर कसलीशी चौकशी असल्याचं बरळते आणि ओटीपोटावर हात ठेवून व्यक्तीस्वातंत्र्यासारख्या गप्पांनी हवेतले इमले उभारते. जेव्हा वाटाड्याचं अस्तित्व तिच्या लक्षात येतं तेव्हा ती पुन्हा जराशी गप्प-गप्प. कुमारी लीला बेणारे ही अशीच.

समाजसेवेचा वसा उचललेले काशीकर. आदर्शवत, इत्यादी, म्हणण्याइतपत संसारात रमलेल्या सौ. काशीकर. मुल होत नाही म्हणून या दोघांनी बखोटीला धरून सांभाळलेला परका पोऱ्या म्हणजे बाळू रोकडे. रंगमंचावरचा अपयशी नाटकी नट, आणि हे लोकमंडळाचं नाटक बसवणारा, कर्णिक. वकिली करणारा, किंवा असे म्हणता येईल वकिली न करणारा, सुखात्मे. इंटरफेल, घमंडी, स्वतःलाच शहाणा समजणारा शास्त्रज्ञ पोंक्षे. महाविद्यालयात शिकवणारे, पोंक्षे सांगतो त्याप्रमाणे अगदीच हिशेबी असणारे, गैरहजर प्रोफेसर दामले. कुमारी लीला बेणारे जी की लहान मुलींची शिक्षिका.

या सर्वांना सभागृहात पोहोचल्यानंतर, पुस्तकी विश्वात रमलेल्या, सामंततर्फे कळतं की गावात पोहोचण्याची संध्याकाळपर्यंत दुसरी कोणतीही गाडी नाही. मग मागे राहिलेले – आणि अभिरूप न्यायालयात आरोपीचे वकील असणारे – प्रोफेसर दामले नाटकाला येणार नाहीत हेही सर्वांना कळून चुकतं. प्रोफेसर दामलेंची बाजू सुखात्मेने सांभाळून घेण्याची कबुली दिली. म्हणजे कधीकधी खऱ्या खटल्यातही अशील व संभावित आरोपी यांचा वकील एक असतोच की – तक्रार नाही. परंतु, नाटकातला चौथा साक्षीदार, रावते नावाचा कोणी इसम, देखील आजारी पडलेला. रावतेच्या जागी तिथलाच कोणीतरी स्थानिक घ्यायचं ठरवलं जातं. त्यात सर्वांची नजर सामंतवर जाते. तशात सामंत पडला खेडवळ माणूस, कधीही न्यायालय न पाहिलेला. मग त्याला न्यायालय काय असतं ते समजण्यासाठी अभिरूप न्यायालयाची खोटी रंगीत तालीम घ्यायचं ठरतं.

दरवेळी तोचतोचपणा आलेली रटाळ रंगीत तालीम, तेच आरोपी, तेच अशील, तेच वकील, तेच न्यायाधीश सर्वांनाच नको वाटतात. मग याची फेरबांधणी करायचं ठरतं. लगोलग सगळेजण सामंतला बिडी-पान आणायला पाठवतात. तिकडे सामंत यांची सोय करायला गेलेला आणि इकडे बेणारे हातपाय धुवायला गेलेली. तेव्हाच पोंक्षे सर्वांशी काहीतरी गुप्त कुजबूजतो. त्याला बेणारेविषयी काहीतरी माहिती असतं, मात्र फारसं काही नाही. या खोट्या खेळात सर्वानुमते बेणारेला खोटा आरोपी म्हणून एकीकडे बसवलं जातं.

सर्वकाही नकली, बनावट, सुखात्मेच्या शब्दात सांगायचं तर ‘जस्ट अ गेम’ आणि कर्णिकच्या शब्दात ‘विजुअल एनॅक्टमेंट’. मर्जीविरूद्ध आरोपी झालेल्या बेणारेसह मजेमजेत सुरू झालेला हा खेळ हळूहळू हिंसक स्वरूप धारण करू लागतो तो इथेच.


• • •

कलम ३०२ – भ्रूणहत्या. खोट्या न्यायालयात बेणारेवर हा काल्पनिक आणि ‘मामूली’ आरोप ठेवला जातो. नकली साक्षीदार पोंक्षे, कर्णिक येऊन जातात. तोपर्यंत सर्वांचा रोख मंगल असं मातृत्व व अंमगल असा भ्रूणहत्येच्या गुन्हा यावर एकवटलेला असतो. नंतर रोकडे येतो तेव्हा विनोदी चाललेल्या खटल्यात नकळतपणे बेणारेच्या वैयक्तिक आयुष्याचा शिरकाव होतो, हळूहळू विनोद मागे पडतो. थोड्या काळापूर्वी तिऱ्हाईत असणारा सामंतसुद्धा इतरांच्या प्रोत्साहांमुळे बेणारेच्या चारित्र्यावर काल्पनिक शिंतोडे मारतो. सुरुवातीला बेपर्वा वागणारे मात्र तरीही वैयक्तिक शेरेबाजीपासून सर्वांना दूर ठेवणारे काशीकर गंभीर होत जातात. सौ. काशीकर या प्रकरणात भलताच रस घेतात. त्याही बेणारेवर तुटून पडतात. खेळ बिघडत जातो. सुखात्मे मुरत जातो. वारंवार बोलावले गेलेले साक्षीदार वास्तवाचा हात धरून साक्ष देऊ लागतात. त्यावरून बेणारेच्या एकंदरीत व्यक्तीमत्वावर तर्क, कुतर्क उभे राहतात. सुरुवातीला थोडा विनोदी थोडा गंभीर प्रतिसाद देणारी लीला हळूहळू शक्तीहीन बनत जाते. एकटी गिधाडांच्या झुंडीत सापडते. हा नकली न्यायालयात रंगलेला खटल्याचा खेळ, पुढे खेळ न राहता तिच्या वैयक्तिक आयुष्याचे वाभाडे काढणारा चव्हाटा बनतो.

तसं पाहू गेल्यास तिच्या आयुष्याचे वाभाडे निघणं काही गैर ‘नाही’! कारण ती तिशीच्या पलीकडं पोहोचलेली अविवाहित बाई. त्यात ती स्वतः कमावते, नव्या विचारसरणीची आहे, हद्द म्हणजे ती लहान मुलींची शिक्षिका आहे आणि सर्वात शेवटचा घाव म्हणजे तिच्या पोटात बाळ आहे! होय कुमारीका लीला बेणारे गर्भवती आहे! आता हे काही कोणत्याच सामाजिक दृष्ट्या योग्य नाही, निंदनीय आहे. हा समाज, ही नीतिमत्ता बायकांनीच तर पेलायची आहे. मग त्यांनी कमावतं असणं, मनमोकळ्या स्वभावाचं आणि नव्या स्वतंत्र विचारसरणीचं असून कसं चालेल? नाही कदापि स्विकारार्ह नाही! समाजाची ही अधोगती थांबवायची आहे तर उभरत्या बाईला शब्दांनी, नजरांनी बेलाशक फोडून खाणाऱ्या कुत्र्यांचा कळप पाहिजेच – वाद नाही. संस्कृतीरक्षण झालंच पाहिजे, झालंच पाहिजे. आणि हेच नेमकं लीलासोबत घडतंय. त्यामुळे दुःख नाही जर काही असेलच तर अशा संस्कृतीरक्षकांचं कौतुकचं आहे!

वाईट तर या गोष्टीचं वाटतं की लीला एकटी जळत असताना तिथे पुरुषसत्ताक संस्थेला – स्वतःच्याही नकळत – स्वत्व विकून बसलेली सौ. काशीकर आहे. ती या विरोधात बोलायचं तर दूरच; पण या प्रसंगास मनोरंजन म्हणून पाहतेय. सभागृहाच्या बाहेर पडू पाहणाऱ्या लीलाला वारंवार आरोपीच्या खुर्चीवर आणून बसवत आहे. हे तर स्वतःचं घर जळताना त्यावर स्वतःचं हात शेकण्यासारखं आहे. आणि याचीच खंत आहे.

मध्यंतरी या सगळ्याचा उबग येऊन प्रतिकार विसरलेली लीला तिथून बाहेर निघण्याचा प्रयत्न करते. मात्र दाराला तेव्हा बाहेरून कडी लागलेली असते. सामंत येऊन तिला कडी उघडण्यासाठी मदत करतो – उपयोग शून्य – जुनाट दरवाजाची कडी निघत नाही. आता बेणारे कुठेही निघून जाऊ शकत नाही हे कळल्याक्षणीच मग हा कुत्र्यांचा जमाव तिला परत आरोपीच्या पिंजऱ्यात आणून उभं करतो. तेव्हाची प्रत्येकाची मानसिकता इतर कोणाला आपल्या माणूस असण्यावर प्रश्नचिन्ह उठवायला लावेल इतकी नीच पातळीवर घसरलेली. दरवाजात रडणार्‍या लीलाला पुन्हा खेचत खुर्चीवर आणून बसवतात खुद्द सौ. काशीकर . . .


• • •

मजेत, केवळ मजेत, सुरू झालेला खटला अखेरीस आणखी गडद होतो, आणखी गलिच्छ बनतो.

‘हसावं, खेळावं, जमलं आणि नाचू दिलं तर नाचावंसुद्धा. काही कसली लाज नि भीड नि पर्वा ठेवू नये. आपलं आयुष्य संपलं तर काय कोणी स्वतःचं द्यायला येणार आहे?’ असा साधा दृष्टिकोन बाळगणारी आणि याआधी वयाच्या चौदाव्या वर्षी आत्महत्येचा प्रयत्न करून बसलेली लीला. जी आता तिच्या विद्यार्थिनींना सर्वकाही मानते.

दामले. नेमके मोक्याच्या क्षणीच गैरहजर असणारे पाच पोरांचे वडील.

न्यायालय उभ्या जन्मात न पाहिलेला आणि तरीही कादंबरीतील खोटे संवाद वाचून अनोळखी बेणारेचं अनोळखी प्रोफेसर दामलेशी सूत जोडणारा व ‘आई क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता आहे’ सारख्या भंकस तत्त्वज्ञानावर विश्वास ठेवणारा सामंत.

स्वतः इंटरफेल असून पोक्तपणाच्या गप्पा मारणारा व त्याच्या या सोंगावर विश्वास ठेवून जिने सत्य सांगितलं त्या बेणारेचा सर्वांसमक्ष कचरा करणारा पोंक्षे, गोपनीय गोष्टी हसतमुखाने फोडणारा.

‘मी ज्यांच्यासोबत एकटी असते अशा पंचवीस पुरुषांची यादी देऊ शकते’ लीलाच्या या मनमोकळ्या विनोदातून ‘त्या पंचवीस जणांबरोबर बेणारेबाई रत झालेल्या असू शकतात’ असल्या टाकाऊ युक्तिवादाने सडेल बुद्धीचं प्रदर्शन करणारा सुखात्मे.

‘ट्रूथ इज स्ट्रेंजर दॅन फिक्शन’ म्हणत सुतावरून नरक गाठणारा, नाटकी व्यक्तिमत्त्वाचा, माणूस म्हणजे कर्णिक. इतरांच्या गोष्टीत नको तितका हस्तक्षेप ठेवणारा, बाळू रोकडेचा नामर्दपणा उघडकीस आणणारा कर्णिक.

ज्यांच्या तुकड्यांवर जगला त्यांच्याविषयी द्वेष बाळगणारा आणि मर्दुमकीच्या खोट्या कल्पना हाताशी धरलेला भित्रा रोकडे. नेहमीच चुकीच्या, प्रतिगामी, कुचकामी नोंदी वहीत टिपून ठेवणारा, सौ. काशीकरांच्या ताटाखालचं मांजर असणारा बाळू.

स्वतःच्या संसारात बोलण्याची टाप नसणाऱ्या; पण तिशीनंतर अविवाहित असणाऱ्या लीलाचा व तिच्या मनमोकळ्या स्वभावाचा – मत्सरातून – गैरअर्थ काढणाऱ्या सौ. काशीकर. लग्नाशिवाय ‘सर्व’काही मिळालं की समाजात ‘असंच’ घडणार, हे त्यांचं मत.

आणि आगरकर, धोंडो कर्वे यासारख्या लोकांना शिव्या घालत बालविवाहाचा पुरस्कार करणारे, समाजकार्याचा बुरखा घातलेले, दांभिक, प्रतिगामी, संस्कृतीरक्षक काशीकर.


• • •

बाळ आहे हे तर बेणारेच्या रडण्यावरून ठरलेलंच असतं. बाळाच्या बापाचं नाव कळण्याआधी सौ. काशीकर बेणारेवर चिखल उडवतात. तिचा व दामलेचा संबंध जोडतात.

कर्णिक बेणारेच्या पूर्वाआयुषात तिने मामावर केलेल्या प्रेमाचं व त्यातून झालेल्या प्रेमभंगाच्या दुःखात तिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं बिंग फोडतो.

पोंक्षे लीलाने त्यास भेटून लग्नाची गळ कशी घातली, अडचणीत असणारी मैत्रीण म्हणून तिने स्वतःचीच स्थिती कशी सांगितली, गरोदर असणं कसं सांगितलं. तिच्याकडे ‘टीक-ट्वेंटी’ची (विषाची) बाटली कशी आहे या सर्व गोपनीय गोष्टी उतावळेपणे फोडतो. वर पुन्हा बाळाच्या बापाचं नाव सांगून मोकळा.

त्यावरून बाळाचा बाप कोण आहे याविषयी अखंड औत्सुक्यात बुडालेली मंडळी सुखावते. आणि मग बाळाची आई बेणारे असल्याने तिच्या चारित्र्यावर पराकोटीची घृणा करू लागते. मंडळीतील हे दोन्ही बदल सामंत पाहतो आहे. मख्खपणे उभा राहून बेणारेविषयीचं मत क्षणाक्षणाला बदलतो आहे.

काशीकर मध्येच टीका जहरी झाल्यावर न्यायाधीशाची टोपी काय मागवतात, बेणारेला न्यायालयाच्या कामकाजात अडथळा न आणण्याची तंबी काय देतात आणि काहीतरी आठवल्यावर न्यायाधीशांची खुर्ची त्यागून साक्षीदाराच्या पिंजऱ्यात येऊन साक्ष काय देतात – सारंच भन्नाट. शिक्षणमंत्र्यांसोबत बेणारेनं घेतलेल्या भेटीचा, तिच्यावर चालू असणाऱ्या चौकशीचा व तिची नोकरी जाणार असल्याचा गौप्यस्फोट करून काशीकर पुन्हा न्यायाधीशांच्या खुर्चीत!

दोन्हीकडचा वकील म्हणून उभा असणारा सुखात्मे लीलाची बाजू कधीच मांडत नाही. याउलट शेवटी तो जे गैरहजर आहेत (प्रो. दामले) त्यांना लीलाचे बचावात्मक साक्षीदार म्हणून बोलावू पाहतो.

रोकडे कसल्यातरी नकोशा नोंदी घेत राहतो.

आणि त्यावेळी लीला खुर्चीवर आरोपीच्या आसनावर शांत बसून असते. त्यांच्या आपापसातील संवादानं तिचं संपूर्ण चारित्र्य ते लोक उभं करत असताना ती निपचीत पडून असते. अधूनमधून रडत, कधीमधी सत्याला वाचा फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न करत, नकारार्थी मान घुसळत. स्पष्टीकरण मात्र देत नाही. तिला शेवटी तिची बाजू मांडण्यासाठी न्यायालयातर्फे पूर्ण ‘दहा सेकंद’ दिले जातात. तेही ती वापरत नाही. मग न्यायालय तिच्या भ्रूणाला ‘मरेपर्यंत मारण्याची’ शिक्षा सुनावतं. तेव्हा मात्र ती उठून तिचा प्रतिवाद करणाऱ्या वकीलासाठी असणाऱ्या खुर्चीत येऊन कोसळते . . .


• • •

त्याकाळी तेंडुलकरांना लिखाणातून अर्थार्जन होणार नसल्याचा साक्षात्कार – त्यामानाने जरा उशिराच – झालेला. लेखनाशी सुतराम संबंध नसलेली नोकरी करताना ते नैराश्यात बुडत होते. तेव्हा ‘रंगायन’च्या मित्रांनी नाटक लिहून देण्यासाठी त्यांच्याकडे तगादा लावला. कारण होतं – राज्य नाट्य स्पर्धेचं. त्यावेळी ‘विजयाबाई खोटे’ ‘रंगायन’ सोडून काही काळासाठी इंग्लंडला गेल्या होत्या. अपरिहार्यतेने ‘अरविंद देशपांडें’वर दिग्दर्शनाची जबाबदारी होती. शेवटी साम-दाम-दंड-भेद वापरून तेंडुलकरांकडून त्यांनी नाटक लिहून देण्याचं वचन घेतलं. पण तेंडुलकर दररोज शेंडा ना बुडखा असलेली नवीन चार-पाच पाने तीही आधीच्या पानावरील धाग्यांशी काहीएक संबंध नसणारी पाठवून देत असत. दिवस घटत होते, दबाव वाढत होता. स्पर्धेत ‘रंगायन’च्या प्रायोगिक नाट्यभूमीचं नाव राखणं भाग होतं. बँकेत पैसे तीन-चारशेच्या वर खचितच भरले असते. म्हणून दुसरा नाटककार सुद्धा धरता येत नव्हता. आणि सर्वेसर्वा विजयाबाई उपस्थित नसतांना कोण्या नाटककाराने नाटक (किमतीत किंवा साभार कसेही) दिले असते का हाही प्रश्नच होता.

शेवटी तेंडुलकरांनी दिलेल्या कुठल्यातरी नाटकाचा (‘शांतता’चंच सुरुवातीच्या काळातील रूप, जे खुद्द तेंडुलकरांनीच बाद केलं!) एक अंक बसवल्यानंतर तेंडुलकर म्हणाले, पुढचं काही सुचत नाही. रंगकर्मींची आठ दहा दिवसाची मेहनत वाया. एकंदरीत ‘रंगायन’ बुडणार होती आणि त्याचं खापर ‘उपाध्यक्ष’ तेंडुलकरांवर फुटणार होतं.

असंच कधीतरी विर्लेपार्ल्याहून चालत घरी जाताना तिथे उतरलेल्या अनोळखी नाट्यमंडळाने तेंडुलकरांना ‘देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघा’च्या सभागृहाचा पत्ता विचारला. तिथे त्यांचा अभिरूप न्यायमंडळावर काही कार्यक्रम होता. तेंडुलकरांच्या वाटेवरच ते नाट्यगृह पडत असल्याने ते त्यांना सोबत घेऊन निघाले. त्यांच्या नाट्यमंडळात दोन मुली सुद्धा होत्या. त्यांची चर्चा ऐकली तेव्हा तेंडुलकरांच्या मनात ‘शांतता! कोर्ट चालू आहे’ची ठिणगी पडली. आणि बेणारेचं पात्र उभं राहिले ते ‘शिरीष पै’यांच्या एका कवितेतून. ती कविता पहिल्या अंकात बेणारेच्या तोंडी आहे.

लगोलग तेंडुलकरांनी अरविंद देशपांडेंना नाटकाचं नाव कळवलं (हे नाव मिळायला ‘किंचित’ उशिरच झाला. कारण तोपर्यंत स्पर्धेच्या अर्जात ‘तेंडुलकरांच नवं नाटक’ हे नावं लिहून अर्ज जमा झालेला होता!). त्यानंतर एक दिवस झालेली तालिम पाहून तेंडुलकरांनी संतापात पहिला अंक पुन्हा नव्याने लिहून काढला. तो बसवला गेला. पण दहा दिवसांची मेहनत शून्य. त्यातच अरविंद देशपांडे दोन ठिकाणी तेंडुलकरांच्या दोन नाटकांचं दिग्दर्शन करत होते (‘झाला अनंत हनुमंत’ आणि ‘शांतता! कोर्ट चालू आहे’). त्यामुळे नाटकात बेणारेची भूमिका करणाऱ्या ‘सुलभा देशपांडें’नी ‘शांतता’च्या तालमी घेतल्या. पुढचं नाटक येईना. ते मग ‘रंगायन’च्या मित्रांनी तेंडुलकरांच्या मागे लागून लिहून घेतलं. तरीही नाटकाची लांबी त्यावेळी स्पर्धेच्या नियमात बसत नव्हती. तिसऱ्या अंकात बेणारेच्या तोंडी जवळपास एकही संवाद नव्हता. त्यातून तिच्या तोंडी तिसऱ्या अंकात स्वगत द्यायची कल्पना पुढे आली. अरविंद देशपांडेनी तेंडुलकरांकडे लीला बेणारेचं स्वगत लिहून मागितलं. मात्र ‘या मानवी जनावरांसमोर ती बचावाचा शब्दही बोलणे शक्य नाही’ यावर तेंडुलकर ठाम होते. हे बरोबरही होतं. तेव्हा ‘बचावाचं नाही. ती जे बोलेल ते डिफेन्स नव्हे डिफायन्स असेल’ असा शब्दछल अरविंद देशपांडेंनी करून पाहिला – व्यर्थ. पण मग स्पर्धेचं काय? ‘रंगायन’चं काय? इतकी झटापट करूनही नाटक केवळ तांत्रिक कारणांमुळे बाद होणार म्हणजे काय?

स्पर्धेच्या आधीचे ‘पूर्ण’ दोन दिवस. सकाळी मोठ्या भावाचं मर्तिक उरकून तालीम बघायला आलेल्या तेंडुलकरांना सर्वांनी मिळून बेणारेचं स्वगत मागितलं. तेंडुलकर जुमानले नाहीत तर छबीलदास मुलींच्या शाळेत पाचव्या मजल्यावर त्यांना (बेणारेसारखंच) कोंडून ठेवलं! त्यांनी हे स्वगत पूर्ण झाल्याचं सांगितल्यानंतरच दरवाजाची कडी काढली गेली! हे तेंडुलकरांनी अनिच्छेने खरडून दिलेलं स्वगतच ऐतिहासिक ठरलं. इतकं की सुलभा देशपांडेंनी या स्वगताची एक रेकॉर्ड बनवून ठेवली होती!

आठवड्यापूर्वी कोयनेचा भूकंप आला होता. परिणामी विजेच्या तुटवड्यामुळे राज्य नाट्य मंडळात रात्रीचे प्रयोग बंद होते. भर दुपारी दोनच्या उकाड्यात, पंख्याच्या गरगराटात, घामाच्या धारांत हे नाटक पहिल्यांदा सादर झालं. त्यावेळी निम्मे प्रेक्षक तर झोपले होते! मात्र जे जागे होते त्या प्रेक्षकांवर या नाटकांनी अशी काही मोहिनी . . . अजिबात घातली नाही. स्पर्धेतून त्या नाटकाला ‘हे नाटक नसल्याचं’ कारण देऊन बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. ‘रंगायन’च्या मित्रांनी स्वखर्चाने या नाटकाचे साधारण पस्तीस प्रयोग रेटले. तिथून पुढे नाटक चांगलंच ‘बसलं’. ‘शांतता’चा अंत झाला असं सर्वांना वाटलं. इतक्यात कधीतरी ‘कमलादेवी चटोपाध्याय’ पुरस्कार अचानक-भयानक मिळाला आणि नाटकाची गाडी दीडशे प्रयोगापर्यंत धावली.

विजयाबाई परत आल्यावर सत्तेचे विकेंद्रीकरण झाल्याने म्हणा किंवा नाटकाचं यश पाहून म्हणा त्यांनी अरविंद आणि सुलभा या दोघांवर ‘रंगायन’ची इभ्रत धंदेवाईक नाटकांशी जुळवल्याचा आरोप करून दोघांनाही ‘रंगायन’मधून हद्दपार केलं. पुढे मग विजयाबाई स्वत:च धंदेवाईक नाटकात शिरल्या हा भाग वेगळा; पण अरविंद देशपांडेंनी स्थापलेल्या ‘अविष्कार’ संस्थेतून नाटकाचे प्रयोग झाले. ‘शांतता’चा १६ भाषेतून अनुवाद झाला. त्यावर दोन चित्रपट आले. ‘सत्यदेव दुबें’चा मराठी चित्रपट म्हणजे सुलभा देशपांडे, ‘अमोल पालेकर’ आणि ‘अमरीश पुरी’ यांचा आगमनपट! इतर भारतीय भाषांत ‘शांतता’चे अगणित प्रयोग झाले. परदेशात तर सोडाच पाकिस्तानात देखील नाटक गाजलं. आणि केवळ कर्तव्यमुक्ती म्हणून लिहिलेल्या नाटकातून भारतात एक दिग्विजयी नाटककार ‘विजय तेंडुलकर’ यांचा उदय झाला तो असा.

मध्यंतरी ‘बाईच्या दोन पायांमध्ये समाजाची, घराण्याची, कुटुंबाची किंबहुना माणसाची इज्जत कोणी दडवून ठेवली आहे? तेही आम्हाला नको असताना?’ असा सडेतोड प्रश्न एका बलात्कार पिडीतेने खुलेआम विचारला होता. अगदी तसाच अप्रत्यक्ष सवाल तेंडुलकरांनी ‘शांतता’मधून जवळपास साठ वर्षांपूर्वी विचारला. फरक इतकाचं की हा सवाल वाचकांच्या मनात पेरण्यात त्यांना यश आलं. या नाटकाला व्हायचा तो विरोध झालाच. तेंडुलकरांची संपूर्ण नाटकीय कारकिर्दच वादळी आहे. या नाटकाला भारतीय साहित्यातील स्वातंत्र्य विचारसरणीच्या, कमावत्या स्त्रीचा पहिला हुंकार मानलं गेलं. आणि समाज तेव्हा होता त्याहून अधिक कीडत निघालेला असल्याने तो हुंकार आजच्या काळात आणखीनच लागू होतो आहे. या नाटकानंतर तेंडुलकरांवर वाङ्मयचौर्याचा, थोडक्यात साहित्यकृती चोरल्याचा, आरोप झाला. त्यावरून ‘लिहिलेल्या नाटकातून नंतर असे स्वतःला प्रत्यक्ष जाताना पाहणे, हा मला एक अनुभव होता’ असं काहीसं तेंडुलकर लिहितात.

या नाटकात हरेक व्यक्तीरेखा प्रवृत्ती म्हणून पहायला हवी. या प्रवृत्तींचं आणि शेवटी टिक-ट्वेंटीची बाटली रिकामी की भरलेली, शेवटची लीला निश्चेश्ट की निपचीत याचं विश्लेषण करण्याच्या भानगडी ज्याने त्याने कराव्यात. फक्त जुनाट सभागृह म्हणजे आपल्या मोडकळीस आलेली समाजरचनेचं (बाहेरून कडी लागणारं. कोणाला आत येऊ देत नाही. आतल्या कोणाला बाहेर जाता येणं शक्य नाही असं) प्रतिक पकडावं ही माझी वैयक्तिक विनंती म्हणा हवंतर. किंवा सामंतच्या हातात पोपट असणं, शेवटपर्यंत प्रोफेसर दामलेचं गैरहजर असणं जितकं योग्य वाटतं तितकंच ते प्रतिकात्मक आहे. कुठेतरी दामले चित्रपटातील नायक बनून ऐनवेळी येऊन नायिकेचा बचाव करेल हा आपला पूर्वग्रह तोडणारं आहे, वास्तवी आहे.

बेणारे आजही समाजाला पचत, पटत, रुचत नाही. बेणारेविषयी बोलायचं म्हणलं की आजही समाज ‘शांतता’ बाळगतो. तिसऱ्या अंकात लीला बोलत नाही तेव्हाची तिची तगमग, ती चीड हरेक बुद्धीवादी म्हणवून घेणाऱ्याने अनुभवली पाहिजे. नंतर लीलाने एकही शब्द उच्चारला नाही हे उगाचच योग्य वाटायला लागतं. सुरुवातीला विनाकारण हसणारी, खिदळणारी टिवल्याबावल्या करणारी बेणारे सर्वांना दिसते; पण ते ती का करते हे कोणालाच दिसत नाही. त्यासाठी स्वतःच्या अक्षम्य चुकातून उभारी घेतानाचा काळ अनुभवायला हवा. न्यूनगंडाची गर्ता अनुभवायला हवी. तेव्हा तिच्या या लटक्या आनंदाची खोली कळेल. पोंक्षे त्यांची वैयक्तिक भेट उघडी करत असताना ‘पोंक्षे’ या फक्त एका शब्दानिशी उभ्या राहणाऱ्या लीलाची अगतिकता कळण्यासाठी आधी पोंक्षेसारखा मक्कार भेटावा लागतो. तिचा मामा किंवा दामले ही तिची आयुष्यातील दोन्ही चुकीची श्रद्धास्थाने – जगाच्या बाजारात फोल ठरलेली. तिच्या भाषेत ‘मनाच्या भक्तीसाठी देहाचा नैवेद्य झाला आणि तेवढा घेऊन माझा बुद्धिमान देव चालता झाला.’ हे असलं जहाल विष स्वतःत जिरवून आपल्या विद्यार्थिनींना जीवनाची हिरवळ दाखवणारी लीला थोर आहे ती यामुळेच. तिची नोकरी हिसकावली जातानाची कोंदट स्थिती जाणवायला तेवढी संवेदनशीलता हवी तरच याला काही अर्थ आहे.

वाढत्या हिंसाचाराच्या अभ्यासासाठी ‘नेहरू शिष्यवृत्ती’ मिळवून तेंडुलकर भारतभर हिंडले ते फार नंतर; पण त्याआधी झुंडीची मानसिकता (माॅब मेंटॅलिटी) त्यांनी ‘शांतता’त मांडली. वैयक्तिक पातळीवर कोणाची बेणारेवर बोट दाखवण्याची, तिला प्रश्न करण्याची हिंमत अस्तित्वात नव्हती. याउलट जेव्हा हे सर्व एकत्र आले तेव्हा गचाळ मानसिकतेचा जन्म झाला. बेणारेला फोडून, गिळून खाणारी भ्याड मानसिकता. गावकरी सभागृहात येताच स्वतःच्याच कृतीतून झालेल्या ‘मानसिक खूनाला’ घाबरून पळणारी मानसिकता. यात सामंतच काय तो वेगळा पडतो. मात्र त्याची शक्ती किरकोळ आहे.

अशा मानसिकेतून कामाच्या ठिकाणी, राहत्या ठिकाणी, कुटुंबात कितीतरी बेणारे अडकित्त्यात घेतल्या जातात. आपणही त्याच समाजाचा अनैच्छिक का होईना पण सामंत आहोतच.

कथा किंवा नाटकात काही महत्त्वाचे घटक असतात. जसं की कथानक, स्थळ, काळ आणि पात्रे. यातील दोन घटक ‘शांतता! कोर्ट चालू आहे’मध्ये आपसूकच वगळण्यात आलेले आहेत. एक म्हणजे पात्रे, जी की मुळातच नाटकात काम करणारी आहेत. त्यामुळे त्यांच्या तोंडचे संवाद नाटकी वाटण्याचं काही कारण नाही. आणि ते उत्तम अभिनय करतात यातही शंका नाही, हे विश्वसनीय आहे. आणि दुसरं म्हणजे स्थळ. नाटकामधील कंपनी ‘नाटकात एक नाटक’ रचते याहून सर्वोत्तम स्थळाची निर्मिती (सेटिंग) माझ्या वाचण्यात आजपर्यंत तरी आलेली नाही. स्थळाचा आणि पात्रांचा प्रश्न मिटला. तिसरी अधिक जमेची बाजू म्हणजे ही कथा घडताना ती फक्त एका सभागृहात घडते, अवघ्या काही तासात घडते, म्हणजे काळाचाही प्रश्न मिटला. उरलं फक्त कथानक आणि ते तर इतकं मजबूत आहे की कशाही परिस्थितीत खपेल (पण पचणार नाही). त्यावेळी ‘रंगायन’कडे आर्थिक बळ नसल्याने नेपथ्य व नवीन वेषभूषादी खर्च टाळणारंच नाटक लिहायची योजना होती असं तेंडुलकरांनी नंतर उजेडात आणलं. तेंडुलकर यांच्या ‘मास्टरमाइंड’ असण्याचा पुरावा हा असा आहे.


• • •

कित्येक महिन्यांपासून तेंडुलकर यांची ही (अ)शांतता वाचायची होती. बाईंडर वाचला, सामना वाचली, मित्रा वाचली तेव्हापासून तेंडुलकरांच्या प्रेमात मी पडलेलो. पण अर्थकारण ढिंगचांग चाललेलं असल्याने सूर गवसत नव्हता. शेवटी काल पहिल्यांदाच महाविद्यालयाच्या ग्रंथालयात मुसंडी मारली. पाचव्या मिनिटाला (अ)शांतता हातात घेऊन बाहेर. महाविद्यालयाच्या आवारात संपूर्ण वाचून मगच घरी! त्यानंतर त्यातून दाटलेली अस्वस्थता कागदावर उमटवून, तूर्तास तरी, मी मोकळा.


• • •

‘. . . केवळ विरंगुळा म्हणून काढलेल्या खेळात, एका निष्पाप जिवाला सहज रक्तबंबाळ करण्याइतके जे अमानुष क्रौर्य या समाजाच्या ठिकाणी आहे ते अगदी अर्थशून्य, हेतुशून्य आहे. काही प्रचंड महत्त्वाकांक्षेपोटी किंवा सूडापोटीसुद्धा आलेले हे क्रौर्य नाही. किंबहुना, त्या क्रौर्याच्या भयानकतेची जाणीवही त्या समाजाला नाही. केवळ, जिवाची घटकाभर करमणूक एवढाच अर्थ त्या अमानुष क्रौर्याला असला तर आहे आणि ही त्या समाजाची खरी शोकांतिका आहे.’





{fullWidth}

आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال