नव्याने जन्मणारा माणूस

[वाचनकाल : ६ मिनिटे]
बागेसमोरील बाकावर बसलेला म्हातारा माणूस, old man sitting on bench infront of garden
 
आपण दररोज मरतो, क्षणाक्षणाला कमी होत जातो. माणूस ‘जगतो’ म्हणजे नक्की काय करतो? तर तो नव्यानं आठवणी बांधतो, त्या निर्माण करतो. आपण शिळ्या आठवणींवर, चुकांवर, अपराधांवर, अभिमानावर जगतो आणि म्हणूनच आपण दिवसागणिक मरतो. तो मात्र दररोज नव्यानं जगत राहिला दिवसागणिक जीवनाच्या जवळ जात राहिला, त्याचीच ही गोष्ट आहे . . .

कितीही नाही म्हणलं तरी आयुष्य कुठंतरी मागं सुटतंच. वेळेची किंमत न जाणण्याचे हे परिणाम आहेत. या परिणामांना चांगलं किंवा वाईट ठरवता येणार नाही. कोणासाठी नकळत आयुष्य पुढं सरकून जाणं भल्यात जमा आहे तर कोणासाठी वाईट.
     तरुणपणाच्या टोकावर असताना जो भेटेल तो काहीबाही सांगून अकलेत भर पाडण्याचा प्रयत्न करत असायचा. या सर्वांनी सांगितलेल्या वेगवेगळ्या गोष्टींंत एक बाब ती समान होती – वेळेची किंमत जाण. सर्वांचा सूर ‘त्यांनी वेळीच वेळेची किंमत न जाणल्याने त्यांच्या आयुष्यात किती नुकसान झालं’ हे आळवत असायचा. मला तेव्हा गंमत वाटायची – किंबहुना मी मान्य करेन मला ते सर्व लोक मूर्ख वाटायचे – यांच्या नकळत यांचं आयुष्य निसटलं कसं? हे काय गेली इतकी वर्षे कसल्यातरी धुंदीत जगत होते? की स्वप्नात? वेळ धावत गेला . . .
     वेळेची किंमत करणं म्हणजे नक्की काय हे आता – याचा फारसा उपयोग नसला तरीही – मला कळतंय. इतरांना हे कळालं त्याहून मला थोडंसं लवकर कळालं आणि मी थोडासा कमी तोट्यात राहिलो इतकंच. वेळेला डावलून जगत गेल्यानंतर भविष्यात असा एक काळ येतो की तेव्हा वेळ आपल्याला डावलू लागते. हे गणित मला कसं समजलं याची ही कथा आहे. सोबतच आयुष्य भयाण वेगानं निसटून गेल्यावर हाती शून्य उरतो, त्यामुळे असणाऱ्या वेळेतच जगून घ्यायचं हेही मला त्याच दिवशी समजलं होतं. ज्या दिवसापासून वेळेची किंमत राखून मी बदलू लागलो त्या दिवशी मला तो भेटला किंवा याउलट . . .

शालेय, महाविद्यालयीन व त्यापुढील जितकं म्हणून शिक्षण शक्य होतं तितकं घेऊन मी नोकरीच्या शोधात शहर धुंडाळायला सुरुवात केली. आपल्या शहरात काही होत नाही म्हणून मग नातेवाईकांकडे जाऊन त्यांच्या शहरात शोध घेतला, हाती काहीच लागत नव्हतं. जे लागत होतं ते मला नको होतं. अति शिक्षण घेतल्यावर माणूस नकळतपणे त्याची पात्रता जास्त चढवून त्याच पात्रतेच्या नोकरीची नाहक आशा बाळगत हिंडतो. त्यावेळी मला ज्या नोकऱ्यांची अपेक्षा होती त्यांच्या नियम-अटीत मी कमी पडत होतो; पण मला हार मान्य नव्हती. एकंदरीत मी अजूनतरी अधेमधेच लटकून होतो.
     एकीकडं घरचा दबाव, दुसरीकडं गावातील ओळखीचे लोक, नातेवाईक या सर्वांना तोंड दाखवून त्याच त्याच प्रश्नांची उत्तरं देणं . . . दोन्हींचा मला कंटाळा आला होता. माझा संयम विरळ होत निघालेला. शेवटी मग मी घर सोडण्याचा निर्णय घेतला. घरच्यांकडून शेवटचे सहा महिने मागून घेतले आणि शहराच्या टोकावर, थोड्याशा निमशहरी ग्रामीण भागात, जिथं खोली भाडं कमी होतं, सरळपणे खोली भाड्याने घेतली. स्वतःच्या जबाबदारीवर थोडे दिवस राहिलो तर निदान जबाबदारीची जाणीव होईल . . . नसेलच तर डोक्यात अक्कल येईल म्हणून घरच्यांनीही मला सोडलं.
     तिथे सुरूवातीला काही दिवस मला उत्साहानं पछाडलं. सकाळी प्रचंड व्यायाम केल्यानंतर, वर्तमानपत्रातील हरेक जाहिरात हेरुन नोकऱ्यांच्या तीन-तीन मुलाखती काय करायचो, नकार हसत पचवायचो, संध्याकाळी निसर्गाची गंमत पाहत दूरवरून चालत माघारी काय यायचो, हाताने जेवण काय बनवायचो, बरंच काही . . . थोड्या काळानंतर यातून शून्य निष्पन्न झालं तेव्हा पडझड सुरू झाली. आणि मग . . . माझी आणखी पडझड झाली.
     दोन-दोन दिवसांनी – खाण्याचे पदार्थ पूर्ण संपल्यावरच – मी घर सोडायचो. झोपेला वेळापत्रक नव्हतं आणि म्हणूनच धरबंद सुद्धा. वैयक्तिक स्वच्छता ढासळली, वैयक्तिक निगा ढासळली. घर रोगट बनलं. निष्क्रिय रोगी शरीरात राहून हळूहळू मन सुद्धा निष्क्रिय झालं. मेंदू रिकाम्या सैतानांचं घर बनून बसला. या जगातील प्रत्येकच गोष्ट फक्त माझा छळ करण्यासाठी अस्तित्वात आहे की काय असं वाटायच. जगाशी तसा आधीही माझा फारसा संपर्क नव्हता; पण जितका होता तितका संपूर्ण तुटला होता. माणसे नको झाली होती. मी निराशेत गुरफटून आयुष्यात कटू होणार, उदासीन होणार तेवढ्यात शेवटचा महिना सुरू झाला. आणि मी खडबडून जागा झालो.
     व्यसनाधीन होण्याचे बेत रद्द करून सगळ्यात आधी मी घरातला कचरा बाहेर फेकला. घराची स्वच्छता केली, स्वतःची स्वच्छता केली मग ताबडतोब व्यायाम सुरू केला. आळसावलेल्या मनाला पुन्हा चालना द्यायची होती यासाठी शरीराला कष्टच-कष्ट जाणवलं तरीही मी दररोज सकाळ व संध्याकाळ व्यायाम सुरू ठेवला. हा माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णयांपैकी एक होता. दुसरा निर्णय व्यायामानंतर ‘त्या’ बाकावर बसण्याचा . . . तिथंच मला तो भेटला . ‌. .

मी सकाळी ज्या रस्त्यावरून धावत सुटायचो त्या रस्त्याच्या कोपऱ्यावर अंगणात फुलांची भली मोठी बाग असणारं बैठं घर होतं. तऱ्हेतऱ्हेची रंगीबेरंगी टवटवीत फुलं, भरपूर फुलं, तरीही त्या बागेच्या मालकानं – किंवा मी म्हणेन मालकिणीनं – मुद्दाम त्या बागेला कोणतंच कुंपण घातलेलं नव्हतं. कदाचित म्हणूनच चोरून त्या बागेतील फुलं तोडताना मी कधी कोणाला पाहिलं नाही. हीच तर गंमत आहे – तुम्ही जितकं जपाल तितकं हे जग हिसकावून घेत राहील‌. त्या घरासमोरून जाताना मन प्रसन्न व्हायचं. दुनियेच्या त्या सुगंधी तुकड्यात रेंगाळावसं वाटायचं. मालकिणीनं हेही ओळखून त्या बागेशेजारी एक लांबलचक बाक टाकला होता. मी धावून दमल्यावर त्या बाकावर बसायचो. सकाळ-संध्याकाळ-दररोज.
     नेमकं त्याच वेळेस तो झुकलेला अनामिक वयस्कर – म्हातारा म्हणल्यास जास्त योग्य ठरेल – दररोज त्याची तीन पायांची लोखंडी काठी टेकवत, कायम चकाचक आवरून, रस्त्यावर चालत असायचा. आणि नव्यानं काहीतरी पाहिल्याप्रमाणे बागेजवळ थबकायचा. हा त्याच्या ठरलेला नियम होता. मग मला पाहून निवांतपणे बाकावर बसायचा. त्यानंतर आत्ता याक्षणी मला पहिल्यांदा पाहिलंय असं दीर्घ स्मितहास्य. त्याच्या नजरेला मी कोण होतो माहिती नाही; पण त्याच्या ओठांसाठी स्मितहास्याचं कारण . . .
     तो दररोज फुलं नव्यानं पहायचा. मग हळूच कोणाचं लक्ष नाही हे पाहून एखादं फुल तोडायला त्यानं हात पुढं केला की तेवढ्यात दरवाजामागून डोकावून त्याचं परीक्षण करणारा त्याचा छोटा दोस्त धावत यायचा.
     हा बहुधा मालकीणींचा मुलगा. वय दिड-दोन वर्षे फारतर.
     ‘ए बाबा फुल तोडू नको!’ केवळ चड्डीवर धावत घराबाहेर आलेला लहानगा मित्र.
     कदाचित तो येण्यासाठीच म्हातारा फुलांची छेड काढत असावा असं मला वाटायचं. तिथून पुढं मग दोघंजण फुलांवर गप्पा मारत निवांत बसून राहायचे. म्हातारा दररोज पहिल्यापासून सुरुवात करायचा, सर्व फुलांची नावं विचारायचा, काही नावं मुद्दाम चुकवायचा.
     ‘हे काय आहे?’
     ‘गुलाब.’
     ‘नाही हा तर झेंडू!’ म्हाताऱ्याने जाणूनबुजून चुकवलं.
     ‘नाही ए बाबा जास्वंद – हे फुल – जास्वंद! तो झेंडू असतो!’
     छोटा दोस्त झेंडू, जास्वंद, पारिजात, गुलाब हळूहळू इथपासून-तिथपर्यंत त्याच्या बोबड्या भाषेमध्ये आणि मोठ्या आवाजात सांगत बसायचा. म्हातारा मध्येच विसरभोळेपणाची नक्कल करून त्याला चुकवू पहायचा. दरवेळी कोणत्याही फुलाला झेंडू म्हणणं हे म्हाताऱ्याचं वैशिष्ट्य. मात्र छोटा दोस्त त्याची चूक दरवेळी सुधारायचा. दोघं एकमेकांना पुरक होते, दोघं एकमेकांना हार जात नसत. त्याची आई येऊन त्याला नेईपर्यंत दोघांचं हे असंच. मलाही गंमत वाटायची.
     जाताना म्हातारा पुन्हा एकदा माझ्यात नवीन काही पाहिल्याप्रमाणे हसायचा. शेवटपर्यंत तो मीही हसण्याची वाट पाहत होता. मी हसलो नाही.
     व्यायामानं शिणल्यावर मनाला जिवंत करणारी ही बाब होती. म्हातारा हसत होता, एकेक दिवस सरकत होता.
    
एकदा म्हाताऱ्यानं सर्व सीमा पार केल्या. घरून परतीचा सांगावा आला होता. मी चलबिचल होतो. पुन्हा भूतकाळ पहावा लागेल या भीतीनं हादरलो होतो. मला मानसिक शांतीची गरज असताना पलीकडे त्या दोघांचा खेळ सुरू होता. शेवटी ते फुल झेंडूचं की गुलाबाचं यावर त्यांचं भांडण झालं. फुल झेंडूचं आहे या हेक्यावर अडलेल्या म्हाताऱ्याची मस्करी प्रमाण सोडून चालली. आणि खरा गुलाब समजावणाऱ्या दोस्ताचा बांध फुटला‌. डोळे वाहत असताना त्यानं घर गाठलं.
     लहान बाळाला क्षुल्लक कारणावरून रडवून घरी निघालेल्या म्हाताऱ्याकडे मी रागाने पाहत होतो‌‌. तर तो माझ्याकडे पाहून अतिशय शांतपणे हसत होता. फक्त हसण्यानं कोणी बुद्ध होत नसतं, त्यासाठी बुद्धाचं करुणामय काळीज छातीत असावं लागतं. मी हसलो नाही. म्हातारा निघून गेला. दुसऱ्या दिवशी आला नाही. पुन्हा कधीच आला नाही . . .
त्या दिवशी मी नेहमीप्रमाणं बाकावर बसलो. तो छोटा दोस्त दारामागे लपून शेवटी कंटाळला आणि बाहेर रस्त्याला आला. थोडं आजूबाजूला पाहून मग शेवटी नाईलाजाने माझ्याकडे येऊन विचारू लागला.
     ‘बाबा कधी येणार तो?’
    कशामुळे तरी त्यानं माझा आणि म्हाताऱ्याचा संबंध जोडला होता. मी काही बोलण्याआधीच त्याची आई आली आणि त्याला कडेवर घेतलं.
     ‘आई तो बाबा?’
     ‘तुम्हालाही हेच विचारत होता का?’ त्याच्याकडं दुर्लक्ष करून तिनं मला विचारलं. हसताना मोहक दिसते.
     ‘हो.‌’ मी पुढं स्पष्ट केलं. ‘त्याला वाटतंय बाबा माझ्यासोबत यायचे. माहिती नाही कुठं राहतात. मलाही दिसले नाहीत काही दिवस.’
    ‘ते आता येणार नाहीत.’
    ‘का?’
    ‘ते गेले! आज सकाळीच त्यांच्या मुलीचा फोन आला होता. आठवडाभर दवाखान्यात होते. इथे पलीकडेच रहायचे.’ तिनं हातानं दाखवलं. ‘दिवसातून पाच-सहा वेळा तरी यायचे. याच्यासोबत खेळायचे. फुलांची नावं, वगैरे सर्वकाही, विसरायचे. फक्त ही बाग लक्षात होती त्यांच्या . . .’
     ‘सर्वकाही विसरायचे म्हणजे? मला काही समजलं नाही.’
     ‘. . . अल्झायमर होता त्यांना!’
आमचं बोलणं झालं. ती त्याला घेऊन निघून गेली‌. ‘आता याला कसं सांगू बाबा पुन्हा येणार नाहीत ते?’ असं काहीसं म्हणत होती. माझी विचारशक्ती स्थिर झालेली‌ – अल्झायमर, स्मृतिभ्रंश. आता मला म्हाताऱ्याच्या प्रत्येक कृतीमागचा उलगडा झाला होता. नव्यानं बाग पाहणं, फुलांची नावं विसरणं आणि ते अनोळखी अनाम स्मितहास्य.
     एकीकडं सगळं लक्षात ठेऊन आपण भुतकाळाला भितो. दुसरीकडं पूर्वीची कात टाकून हा माणूस नव्यानं जन्म घेतो. नव्यानं शिकतो – सगळ्या चुका, अपराध, गुन्हे सारं काही विसरून. आणि तिसरीकडं तो पुन्हा नव्यानं शिकवायला, समोरच्याला समजवायला तयार आहे. आयुष्य नव्यानं पहायला तयार आहे. दोघांनाही आदल्या दिवशीचं काही आठवत नाही; पण सर्वकाही आठवणाऱ्या आपल्या आयुष्याचा दर्जा त्यांच्याहून हीन आहे. एकदा हातातून निसटलेला काळ पुन्हा येत नाही म्हणूनच झालेले अपराध एका रात्रीत विसरून स्वतःला नवी संधी दिली पाहिजे.
     काहीकाळ रडणारा दोस्त आठवला मग बराच काळ म्हाताऱ्याचं स्मितहास्य. मी त्या रात्री झोपलो नाही . . .

दुसऱ्या दिवशी मी उगाच फुल तोडण्याचं नाटक केलं‌. छोटा दोस्त धावत आला.
     ‘ए फुल तोडू नको.’
     ‘सांग मग हे फुल कोणतं?’ मी त्याच्या कमरेत हात घालत त्याला उचलत विचारलं.
     ‘गुलाब.’
     ‘नाही हा तर झेंडू!’
     गुलाबाला झेंडू म्हणताना आता मिळेल ती संधी स्विकारण्यासाठी मी घरी सहा महिने वाढवून मागणार होतो . . .


• संदर्भ :

• वाचत रहा :


1 टिप्पण्या

आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال