पल भर के लिए : खिडक्यांचं गाणं

[वाचनकाल : ५ मिनिटे] 
देव आनंद, हेमा मालिनी, dev anand, hema malini

कलाकार कधीकधी – म्हणजे खरं तर नेहमीच – विक्षिप्त वागतात! पण याचा अर्थ असा नाही की विक्षिप्त वागणारा हरेक कलाकार असतो! सिनेसृष्टी जितकी बेभरवशाची आहे तितकीच ती कलंदर कलाकारांनी ठासून भरलेली आहे. असाच एक ‘गोल्डी’. दिग्दर्शकाच्या डोक्यात काय आहे हे पडद्यावर येईपर्यंत कोणाला उमजत नाही. पण पडद्यावर आलं की लोकप्रियतेचे आयाम मोडीत निघतात! उगाच का मग ‘खिडक्यांचं गाणं’ आजही मनात रूतून बसतं, घायाळ करतं . . .

असे म्हणतात, की १९७० हे साल हिंदी सिनेसृष्टीसाठी खूप महत्वाचं ठरलं. ‘राज कपूर’चा सर्वात महागडा – तब्बल चार तासांचा – ‘मेरा नाम जोकर’ बारीवर म्हणजे बॉक्स ऑफिसवर साफ आपटला होता, दिग्गज कलाकारांना घेऊन कोसळला होता. आणि त्याच नावाशी साधर्म्य असलेला ‘जॉनी मेरा नाम’ उत्पन्नाचे जुने सर्व विक्रम तोडत नवे विक्रम प्रस्थापित स्थापित करत होता. ‘देव आनंद’, ‘हेमा मालिनी’, ‘प्राण’, ‘प्रेमनाथ’, ‘आय एस जोहर’ अशी तगडी ‘स्टारकास्ट’ होती. संवाद, दिग्दर्शन होते विजय आनंद उर्फ ‘गोल्डी’कडे . . .

निर्माता ‘गुलशन राय’ने दिग्दर्शक गोल्डी पुढे तीन अटी ठेवल्या, त्यातली एक होती, ‘मला फक्त हिट सिनेमा बनवायचा आहे. एक असा सिनेमा, जो या वर्षातला सगळ्यात मोठा सिनेमा असेल.’
     गोल्डी तयार झाला. म्हणाला – ‘मी माझं सर्व कसब पणाला लावेन. आपण असा सिनेमा बनवू जो हिट तर होईलच, पण पुढे लोक लक्षात ठेवतील.’
     गोल्डीचं म्हणणं खरं ठरलं. ‘जॉनी मेरा नाम’ने इतिहास निर्माण केला! सर्वात आश्चर्यकारक सत्यकथा तयार झाली! मोहक, श्रवणीय, प्रेक्षणीय गाणी तयार झाली. ‘जॉनी मेरा नाम’ आजही तितकाच वेड लावतो. गुंतवून ठेवतो. प्रफुल्लित करतो.
     प्रत्येक प्रसंगागणिक उत्कंठा वाढवत नेणारी कथा. गोल्डीने लिहिलेले अत्यंत आक्रमक संवाद. पडद्यावर रूपगर्विता हेमा. राजबिंडा देव. आणि एकापेक्षा एक ‘श्रवणीय आणि तितकीच प्रेक्षणीय’ गाणी. होय, ‘लक्ष्मीकांत प्यारेलाल’ या जोडगोळीने गाणी श्रवणीय केली. आणि गोल्डीने सर्वस्व ओतून, मेहनत घेऊन प्रत्येक गाणे तितकेच ‘प्रेक्षणीय’ बनवले.

पल भर के लिए कोई हमें
प्यार कर ले झूठा ही सही

पडद्यावर पाहिलेत तर ह्याची अनुभूती येईल.

• • •

‘गाइड’ चा संवेदनाशील दिग्दर्शक ते ‘तिसरी मंजिल’, ‘ज्वेल थीफ’ आणि ‘जॉनी मेरा नाम’चा यशस्वी व्यावसायिक चित्रपटनिर्माता (कमर्शिअल सक्सेसफुल फिल्ममेकर) ही गोल्डीची ओळख सिनेजगतातील त्याचे स्थान पक्के करून गेली. गोल्डीने ‘सस्पेन्स थ्रिलर’ची ‘ट्रायलाॅजी’ पुरी केली.

गोल्डीची लाजवाब गाणी बनवायची परंपरा या सिनेमात सुरूच राहिली, किंबहुना थोडी पुढे गेली. ‘पल भर के लिए’ मधला रोमँटिक देव आनंद प्रेक्षकांना भावला आणि ‘खिडक्यांचं गाणं’ म्हणून हे गाणंही अमर होऊन गेलं. मुद्दाम सेट उभारून गोल्डीने ते गीत पडद्यावर आणलं होतं . . .

मेहबूब स्टुडिओमध्ये ‘जॉनी’चं चित्रीकरण सुरू होतं. नेपथ्य/सेट लावायचं काम होतं ‘टी. के. देसाई’ ह्यांच्याकडे. त्यांचे असिस्टंट सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक ‘सुबोध गुरूजी’ या गाण्याची आठवण सांगताना थेट मेहबूब स्टुडिओमध्ये पोहचतात.
     ‘एक दिवस सकाळी गोल्डी साहेब सेटवर आले. ‘रेखा’ या पात्राच्या घराचा सेट उभा राहिला होता. रंग देण्याचं काम सुरू झालं होतं. गोल्डीसाहेब म्हणाले की, ‘यात काही बदल करायचे आहेत.’ त्यांनी जमिनीवर सेटच्या बाहेर एक रेष आखायला सांगितली आणि मग त्या रेषेवर चालत चालत १, २, ३, ४ . . . असं म्हणत त्यांनी कशा प्रकारच्या खिडक्या हव्या आहेत तेही समजावून सांगितलं. हे काहीतरी वेगळं आहे हे सगळ्यांना समजलं. पण या कामाला वेळ लागणार होता.
     ‘गुरुजींनी तसं गोल्डींना सांगितलं – सेट उभा आहे. त्यात खिडक्या काढायच्या आणि त्याही इतक्या म्हणजे पुन्हा काम करावं लागेल. आम्ही ते करणार याची आम्हाला आणि गोल्डीसाहेबांना खात्री होती. किती वेळ लागेल हीच अडचण होती. ‘हवा तेवढा वेळ घ्या. सेट उभा राहिला की मला सांगा’ असं म्हणून गोल्डीसाहेब निघून गेले. सेट पूर्ण उभा झाल्यावरच परत आले आणि एका दिवसात ‘लायटिंग’ पूर्ण करून गाणं शूट करून मोकळे झाले.’
     गुरुजी सांगतात, फक्त १, २, ३, ४ . ‌. . या नंबरावर त्यांनी प्रत्येक खिडकीची जागा ठरवली केली आणि त्यात एकही बदल झाला नाही. सगळ्या खिडक्या त्यांच्या डोक्यात आधीपासून फिट होत्या आणि तसंच गाणं त्यांनी शूट केलं. किती अफाट व्हिजन असेल!
     हे सगळं समजायला, त्यातली गंमत अनुभवायला आधी हे गीत तुम्ही पडद्यावर पहायला हवे . . .


गाणे ऐकले मग पुन्हा इथे येऊन परत एकदा वरचे वाचा आणि मग . . . पुढचे वाचायला घ्या!

हमने बहुत तुझको
छुप छुपके देखा
दिल पे खिची है
तेरे काजल की रेखा

गात गात देव तिच्या असंख्य खिडक्या असलेल्या – आठशे खिडक्या, नऊशे दारं छाप – घरात जायचा प्रयत्न करतोय. तिला ‘फ्लर्ट’ करतोय. बाहेर रात्र आहे. लाल-गुलाबी स्लीव्हलेस साडीत, हेमा कमालीची देखणी दिसतेय.
     गुलाबी गाल, टपोरे डोळे, कपाळावर केसांच्या खोडकर बटा . . . चेहऱ्यावर देवच्या खोड्यांनी आलेलं हसू दाबत ती त्याला प्रत्येक खिडकीतून बाहेर ढकलतीये. कधी मोहक त्रासिक भाव; पण क्षणात हास्यात बदलतायेत. तो आत आलाच, तर त्याच्या हाताला धरून बाहेरचा रस्ता दाखवतीये. तिने एक खिडकी बंद केली, तर ह्या बाबाचे मुंडके दुसरीतून आत येतेय!

ज़रा हाँ कह दे मेरी जान कह दे
मेरी जान कह दे ज़रा हाँ कह दे
जब रैन पड़े नहीं चैन पड़े
नहीं चैन पड़े जब रैन पड़े

म्हणत तो तिला विनवतोय. तिने तिच्या घरात येण्यासाठी तिला सतावतोय! तिच्या चेहऱ्यावरचा लटका राग क्षणाक्षणाला गायब होतोय . . . तिचे मोहक हास्य त्याला वेड लावतेय . ‌. . तो तिला आणखी छेडतोय . . . तिच्या रूपाची तारीफ करतोय. त्याच वेळी, मी ही तुझ्या इतकाच देखणा आहे, हेही तो तिला आवर्जून सांगतोय!

माना तू सारे हसीनो से हसीं हैं
माना तू सारे हसीनो से हसीं हैं
अपनी भी सूरत बुरी तो नहीं है
अपनी भी सूरत बुरी तो नहीं है

ह्यावर ती लाजून हसते. पण तरीही त्याच्या प्रणयाराधनाला जुमानत नाही. तिला आणखी कौतुक ऐकायचे आहे त्याच्याकडून. पुढे तो तिला आणखी आळवतो,

पल भर के प्यार
पे निसार सारा जीवन
पल भर के प्यार
पे निसार सारा जीवन
हम वो नहीं जो
छोड़ दे तेरा दामन

ती अजूनही त्याचे ऐकत नाहीये!
     त्याच्या खोडकरपणाला, तितकेच खोडकर हसू दाबत ती एक एक खिडकी त्याच्या तोंडावर बंद करतेय. तोही हट्ट सोडत नाही. पुढच्या खिडकीतून आत यायचा त्याचा प्रयत्न सुरूच आहे . . ‌.

अपने होठों की हँसी
हम तुजको देंगे
आंसू तेरे अपनी
आँखों में लेंगे
तू हमारी वफ़ा का ऐतबार कर ले
झूठा ही सही
पल भर के लिए कोई हमें

सिनेमामध्ये, पडद्यावर, एका गंभीर संवादावरून गोल्डीने रंग बदलून हे प्रेमगीत लीलया पडद्यावर आणलं. केव्हाही मन ताजेतवाने करायचे असेल तर हे गाणे आवर्जून पहा. भावनांच्या हिंदोळ्यावर गोल्डी आपली परीक्षा घेत राहतो.
     ‘पल भर के लिए’मध्ये सगळ्या खिडक्यांत देवच्या बरोबर डोकावून पाहताना हेमाचे आरस्पानी सौंदर्य आपलेही मन मोहित करते . . . प्रफुल्लित करते . . . त्यांचा रोमान्स चेहेऱ्यावर हसू फुलवतो!

मन आनंदी होते, प्रफुल्लित होते. दिवसातल्या कुठल्याही वेळी, ‘पल भर के लिए’ म्हणजे हे ‘खिडक्यांचं गाणं’ आनंदाचे कारंजे फुलवते . . .

हमने बहुत तुझको
छुप छुपके देखा
दिल पे खिची है
तेरे काजल की रेखा . . .

आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال