ब‘जेट’ – एक वांदा

[वाचनकाल : ४ मिनिटे] 
अर्थसंकल्प पेललेला माणूस, man who carrying budget on his shoulders

यंदाच्या बजेटमध्ये नसणाऱ्या दोन गोष्टी – अर्थ आणि संकल्प! अगदी त्याचप्रमाणे यंदाच्या अर्थसंकल्प विश्लेषणात नसणारी एक गोष्ट – विनोद! सत्ताधारी हे पूर्वीचे अफलातून विरोधक होते. प्रत्येक गंभीर अर्थसंकल्पाचा विनोद बनवायचे! तसे ते सत्ताधारीही मजबूत आहेत कारण प्रत्येक विनोदी अर्थसंकल्पाला ते गंभीर बनवतात. उदाहरणार्थ, माश्टरश्ट्रोक . . .

‘लै बिकट येळ आली गड्या! साधी तंबाकूची पुडी घ्यायची म्हनलं तरी खिशात रुपाया बी न्हाई!’
     पाराच्या कट्ट्याव बसल्याला संतूनाना कळवळत हुता. आजच्या दिवस परत्येकाकडं हात पसरून जोगवा मागितल्यावानी तंबाकू मागून खायाय लागणार हाय. तशी बी संतूनानाला ती खोड हुतीच. तंबाकू दुसऱ्याकडनं मागूनच खायाचा. एकाकडनं तंबाकू घेतली कि दुसऱ्याकडनं चुना मागाय नाना गावभर हिंडायचा. आता हेचं फायदं दोन . . . एक म्हंजी तंबाकूसाठी पैशे घालावं लागत न्हायती आणि दुसरं म्हंजे आपल्याच व्यसनावर आपला ताबा ऱ्हातो उगा तल्लफ ईल तवा खाल्ला तंबाकू असं हुईत न्हाई. तर असा तंबाकूसाठनं नाना गावाला चुना लावाय लागला तवा गावकऱ्यास्नी बी कळलं कि हे बेणं निस्तं फुक्कट मागून खातंय. मग भेटंल त्यो भगत लांबनंच दंडवत घालाय लागला... आनी त्यामुळंच नानाला आत्ता आत्ता सोताची पुडी सोताच बाळगावी अशी गरज पडाय लागली. 
     पर नानाची बायकू राधाक्का म्हंजी महाकजाग बाई. ती कुटं नानाला पैसे देतीया? आता काल नानानं रोजगाराचं दोन अडीचशे रुपय मिळवून आणलं, राधाक्कानं ते बी काढून घेतलं नि दुकानात जाऊन तेल, मीठ, डाळ, साखर असं लागंल त्यो बाजार घिऊन आली. आता दोन अडीचशात एवढा बाजार बसतो कुठं? तर राधाक्काचं एक गणित असतंय, हजारचा बाजार करायचा नि दोनशे रुपये दुकानदाराच्या हातावर ठेवायचं. उरलेलं पैशे उद्या देतो म्हणून सांगायचं. बरं सांगितल्या वायद्यापरमाणं उद्या बी ते पैसे द्यायला जायाचं पर तवा आणि दीड दोन हजार उधारी करून यायचं. त्या दुकानदाराला असा पैशाचा बी रतीब चालू हायाचा आनी तेचा माल बी खपायचा. त्यामुळं ‘उधार मिळणार न्हाई’, असं राधाक्का फुडं बोलायची तेची हिम्मत न्हवती. आनी तसं बी राधाक्का म्होरं बोलायची गावात कुणाचीच हिम्मत न्हवती! सगळं गाव तिच्या तोंडाला लागल्यापरास वाघाच्या तोंडात आपली मान दिऊ म्हनायचे! अशी राधाक्का हळूहळू दुकानदाराची उधारी तुंबवत न्ह्यायची आनी मग हळूच एक दिवस काढता पाय घिऊन दुसरा दुकानदार धरायची. पैल्या दुकानदारानं मग त्या उधारीवर पाणी‘च’ सोडायचं. संतूनाना मिळवायचा तरी ते समदं पैसे राधाक्काच्या हातावर. त्यातला रुपयासुद्धा नानाला तंबाकूच्या पुडीला मिळणार न्हाई. असं असलं तरी दुकानाच्या बाजारात राधाक्काच्या चार-सहा तपकीर पुड्या आवर्जून असायच्या. 
     उधारीचा धोंडा लैच गळ्याला कचायला लागला तसं संतूनानानं राधाक्काला सुचवलं कि एकट्याच्या कमाईनं आता भागत न्हाई. तू बी जरा हातभार लावाय पायजेस. आता असं राधाक्काला कुणी सुचीवणं म्हंजे जाणूनबुजून नवा धोंडा गळ्यात बांधून पाण्यात उडी टाकण्यासारखं हुतं. तरीबी राधाक्कानं नानाचं म्हणणं मान्य केलं. नायतर प्वाट कसं भरणार? संतूनानासंगं आता राधाक्का बी रोजंदारीला जायाला लागली. पैल्याच दिवशी राधाक्कानं पांडू पाटलाच्या रानात राडा केला. संतूनानाला पांडू पाटील तीनशे रुपय हजरी द्यायचा. राधाक्काला तेनं दोनशे रुपयच दिले. ह्यो भेदभाव कशापाई? तर पांडू पाटलाचं म्हणणं असं कि, गड्याची हजरी बाईपेक्षा जास्तच असती. तेला पैसे जास्त. राधाक्काला ह्यो मुद्दा काय पटला न्हाई. तिनं पांडू पाटलाचं सालपाटच काढलं भांडून! दोगांचं काम समान तर हजरी बी समान मिळाली पायजे, असं राधाक्काचं मत. हेचा परिणाम असा झाला कि पांडू पाटलानं संतूनानाची हजरी बी दोनशे रुपय केली! झक मारली नि हिला रोजंदारीच्या कामाव आणली असं संतूनानाला झालं. 
     पारावर बसल्या बसल्या नानाच्या डोक्यात हे इचारांचं मव्हाळ हुतं कि पैसा वाढवावा कसा? ह्या बद्दल वडापवाला पप्याच आपल्याला मदत करील हे नानाला पक्कं म्हायती हुतं. पप्प्या तसा धा गावातनं फिरणारा, शहराचं पाणी लागल्याला आणि वडापच्या धंद्यात अगदी भेटंल त्या ट्राफिकवाल्याला आपल्या खिशात घालणारा हरमुंज्या गडी! पप्या आपल्याला कायतरी मार्ग दावील. आनी तेच्या गाडीचं स्टेरिंग फिरवून त्या मार्गावर आपल्याला बी फिरवून आणील हेची नानाला खात्री हुती.
     नानानं जवा पप्याला ह्या बद्दल इचारलं तवा पप्या आपल्याच आयुश्यातला कसला तरी सिरीयस मॅटर सॉल करीत हुता. आज तेच्या गाडीत कुमार बाबूची गाणी वाजत न्हवती तर कसल्या तरी बजेटवरनं भांडणारं मोठमोठं इद्वान गडी टाहो फोडत हुतंत. जेचा आवाज जास्त टिपेचा तो जास्त इद्वान अशी गत झाली हुती. संतूनानाला हे बजेट म्हंजे काय ते कळंना. पप्याला इचारलं तवा तेनं बी रिजर्व्ह बँकेच्या गवरनरावानी गंभीर चेहरा केला नि फक्त एवढंच म्हनला, 
     “नाना, यंदाचं बजेट ऐक. तुझं सगळं प्रश्न सुटून जातील.”
     नाना कान दिऊन ऐकाय लागला पण तेला तसं बी काय कळंना. पप्याची तर कवाच समाधी लागली हुती. हेला काय इचारायची सोय न्हाई. पर नानाला एक गुपित कळलं. जेनं बजेट जाणलं, तेचाच हितं खरा इकास झाला. संतूनाना आता अगदी हनुमंतावानी उड्या मारतच घराकडं आला. राधाक्काला म्हनला,
     “अगं टीव्ही लाव. बजेट बघूया.” 
      तिला बी काय कळंना. संतूनानानं तिला थोडक्यात इस्कटून सांगितलं कि, आपला रुपया येतो कुटनं नि जातो कुटं हे आपल्याला म्हायती पायजे. त्यासाठी टीव्ही लाव. आपल्या धन्याच्या डोसक्याव नक्कीच परिणाम झालाय हे राधाक्काला कळून चुकलं. कारण आपल्यात येणारा रुप्पाया पांडू पाटलाच्या घरातनं येतो आणि गणू चव्हाणाच्या हातभट्टीव जातो हे काय राधाक्काला म्हायती न्हवतं का? तेच्यासाठी टीव्ही लावून आणि काय येगळी म्हायती काढायची? तरीबी कायतरी जगायेगळं कळंल म्हणून राधाक्कानं टीव्ही लावला. दोगं बी न्हवरा बायकू टीव्ही म्होरं बसून बजेट बगाय लागले. तासभर बगून जवा झॉप यायला लागली तवा नानानं राधाक्काला इचारलं, 
     “काय कळलं व्हय ग बजेटचं?”
      यावर राधाक्काचं उत्तर हुतं, “कळलं तर. ती टीव्हीवर दिसती कनै, तशी सेम साडी मला घ्यायची हाय तुमी. ती बी आजच्या आज!”

ऐनवेळी बजेटमध्ये झालेला ह्यो वांदा बगून संतूनानाच्या नाकाला कांदा लावायची पाळी आली. आता बजेटनुसार कांदा स्वस्त हुनाराय का म्हाग? यावर संतूनानाच्या नाकाला कांदा लावायचा का न्हाई हेचा निर्णय राधाक्का घेणार हाय म्हणं.


• संदर्भ :

• वाचत रहा :


1 टिप्पण्या

आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال