जीवन म्हणजे कर्मांच संचित की निव्वळ विधिलिखित प्रवाह न बदलण्याजोगा, ही घडून आलेली अपूर्व भेट की नियतीची क्रूर चेष्टा असहनीय अशी . . .
“वेदविता? कुणी ठेवलं असलं १८५७ सालातलं नाव? पुराणवस्तू भांडाराला जास्त शोभून दिसेल!”
पंक्या नेहमीच काहीतरी भंकस काढतो. आता ट्रीपमध्ये त्याला दुसरं कोणी सापडू नये? माझा मूड भरकटलेला आहे हे माहीत असूनही? पंक्याला टपली मारुन डोळे वटारत मी तोंडदेखलं हसले. पण नाही! पंक्याची गाडी भरधाव सुटलेली.
मागे बसून तृप्ती, नीरज, मधू आणि स्टिअरींग व्हीलवरचा हात सांभाळत आकाशसुध्दा त्यालाच सामील! सगळेजण टाळया देऊन मनमुराद हसत होते. आचरट नकला करत होते. ट्रीपचा आनंद कदाचित खऱ्या अर्थानं लुटत होते.
पंक्याची नि त्याच्यासकट बाकी साऱ्यांची धडपड लक्षात यायला मला वेळ लागला नाही. त्यांच्या चांगुलपणासमोर नमतं घेणं मला भागच पडलं. मला हसरं ठेवण्यासाठी, त्या धक्क्यातून सावरण्यासाठीच ते झटत नव्हते का?
पण मनावरचा तो ओलसर ओरखडा मी तरी कशी विसरु?
‘तू माझी मुलगी नव्हेस’ हे बाबांचं वाक्य मला असंच जन्मभर फटकारत राहणार आहे.
मी वेदविता. आर्टस् सेकंड इयरला. देशपांडे वकिलांची एकुलती एक मुलगी. लाडाकोडात वाढलेली. बाबांनी मला तळहाताच्या फोडासारखं जपलंय. खरं तर जन्मापासूनच ‘आईवेगळा जीव’ म्हणून मी शेजाऱ्यापाजाऱ्यांच्या कोरड्या कृत्रिम सहानुभूतीचा विषय ठरु नये यासाठी बाबा अक्षरश: झटलेयत. आपली आई कशी दिसते हे आठवायचीदेखील सवड त्यांनी मला दिलेली नाही. ते दुखावले जातील म्हणून मीदेखील कळायला लागल्यापासून त्यांचा प्रत्येक शब्द पाळला आहे.
आणि एका संध्याकाळी त्यांचे ते घणाघाती शब्द . . .
“वेदा, जरा थांब!” कापऱ्या आवाजावर प्रयासानं संयम ठेवत बाबांनी एकवार माझ्याकडे पाहिलं मात्र . . . नेहमी त्यांच्या एकाच हाकेत हजर होणारी मी जरा बावरलेच! बाबांची ती जीवघेणी डोकेदुखी अजूनही त्यांचा जीव नकोसा करुन टाकते. त्याचाच तर त्रास नाही ना? की माझ्याकडून काही . . .
“बरं नाही का बाबा? आज थांबतेच मी घरी.” मी काळजीनं ओथंबून म्हटलं.
“नको. जायलाच हवं तुला.” त्यांची ती आर्त नजर, तो खर्जातला विचित्र आवाज मला विसरताच येत नाहीय.
तसं आजकाल त्यांचं वागणं असंबध्दच वाटायचं.
संध्याकाळी कॉलेजहून नाही म्हटलं तरी लवकरच परतले. दार उघडंच पाहून चरकले. अस्ताव्यस्त सामान. कोणीतरी अत्यंत घाईगर्दीत निघून गेल्यानंतरचा सगळा पसारा . . . सगळयात वाईट म्हणजे बाबांचा पत्ता नाही!
मग गल्लीबोळ शोधून दमले. शेजारच्या काकांनी त्यांना नाक्यावरच्या बसस्टँडवर पाहिलं होतं म्हणे. रडून रडून जीव वरखाली झाला. पोलिसांना फोन फिरवण्यासाठी रिसीव्हरकडे वळले, तोच तिथलं दाणेदार अक्षरांतलं पत्र दृष्टीस पडलं.
तू माझी मुलगी नव्हेस वेदा. तुला कोणीही आई नाही. सतरा-अठरा वर्षांपूर्वी तुझा बाबा फक्त एक व्यसनी, कफल्लक, चोर-लफंगा होता. वकिली चालत नव्हती.
एका गरजणाऱ्या पावसाळी रात्री तू मला भरजरी दुपट्यात गुंडाळलेली सापडलीस. बेंबीच्या देठापासून रडणारा तो गुलाबी गोळा दूर लोटावासा वाटेचना.
तिथून पुढं माझं नवं आयुष्य सुरु झालं. मी पार बदललो, तुला लहानाची मोठी करताना स्वत:ला विसरलो, लग्नाचा विचारही मला शिवला नाही.
हे वाचताना तुझं काळीज थरकून उठेल कदाचित, पण बेटा, त्या कातरवेळी एका कुरुप बाईला जीवे मारुन तिच्याच खोपटातून मी तुला उचलली आहे!
तिच्या जवळच्या गाठोड्यातून मिळालेली पसाभर वितळलेल्या शुध्द सोन्याची नाणी, अतिजुनाट घडणावळीचे उंची दागिने आणि जमेल ती एक न् एक चीजवस्तू मी ओरबाडून नेली – त्याच जिवावर हे घर, ही इभ्रत कमावली. त्याच दस्तऐवजात एक लखोटा सापडला. त्यात मोडीसारख्या क्लिष्ट वळणातली एक प्राचीन कुंडली होती. पुढे एकदा पंडिताकरवी मी ती वाचूनही घेतली. पण ‘हिचा जन्म फार विचित्र मुहूर्तावर फार विचित्र कारणासाठी घडलाय,’ इतकंच पुटपुटत तो भ्रमिष्टासारखा निघून गेला. त्यानंच जुळवलेल्या अक्षरांतून नाव सापडलं – वेदविता! तेच तुला ठेवलं. यातली एकेक मोहोर म्हणजे जणू तुला वाढवण्याची किंमत!
स्वतःच्या क्षुद्र स्वार्थापोटी तुझ्या बाबानं खून केल्याचं इतकी वर्ष मनावर दगड ठेवून तुझ्यापासून लपवलं, पण या वैभवाचं ओझं आता साहवत नाही.
चारच दिवसांपूर्वी मला समजलंय, मला ब्रेन टयुमर आहे बबड्या. आता काही महिनेच जेमतेम! मी कटाक्षानं तुला स्वतंत्र विचारांची घडवली. तुला तुझी स्वप्नं आहेत – त्यात रमण्याचं तुझं वय आहे. तेव्हा तुझी फरफट नको.
कोण कुठल्या अमंगळ कुब्जेच्या झोपडीत इतकं सोनं असावं? अन् ते मिळूनही ती तशीच दरिद्री? तिच्यासारखीच्या पदरात तुझ्याइतकी रुपवान पोर? डोळयांत खून चढलेला असतानाही मन तुला मारताना कचरावं? नियतीच्या या प्रश्नांची उत्त्तरं माझ्यापाशी नव्हती, पण तू ती शोधून काढशील. मला संकेतच मिळाला आहे तसा.
आपले शेवटचे क्षण जिव्हाळ्याच्या सावलीत संपवावेत असं कोणाला वाटत नाही? मी तुझा अपराधी आहे! मात्र हेच अपराधीपण अंगाखांद्यावर वागवत मला मरण नकोगं – माझ्या पापाचं सावट तुझ्या निरागस मनावर नको! शक्य झालं तर माफ कर!
खाली ‘तुझा बाबा’ असं लिहून खोडलं होतं. टेबलाकडे आता माझं प्रथमच लक्ष गेलं. हिरवट निळसर कापडाची पुरचुंडी, एक मळकट लखोटा नि एक लाकडी शिसवी पेटी यांशिवाय तेथे काहीही नव्हतं. इतका वेळ ओढून-ताणून सावरलेला माझा तोल सुटला आणि मला रडू कोसळलं.
दोन दिवसांनंतर बाबा सापडले – कुठल्याशा बसमध्ये त्यांना बेवारशासारखं मरण ओढवलं होतं. अखेरच्या क्षणापर्यंत खिशात ते कायम ठेवत तोच माझा लहानपणीचा फोटो होता. ‘अतिताणानं मेंदूतली रक्तवाहिनी फुटून मृत्यू’ असं डॉक्टरांनी निदान केलं.
प्राण गेला तरी आपल्या जन्मरहस्याची जाहीर वाच्यता करायची नाही, अशी मी मनाशी गाठच बांधली. सख्ख्या बापानंही माझ्यावर इतका जीव शिंपडला नसता. माझ्यासाठी तेच माझे लाडके बाबा राहणार होते.
“वेदा, चाकं बदलून पंक्चर निघायला वेळ आहे चिकार! चल, कुठं मदत मिळते का ते बघू !” मधू चित्कारली. तिचं म्हणणं खरंच होतं. पाहता पाहता तलम अंधाराचं साम्राज्य पसरु लागलं. आम्ही खडकाळ माती तुडवत वाट काढू लागलो. इतक्यात समोर पाटी दिसली.
सारंगपूर - अर्धा किमी
सारंगपुरातल्या माणसांत एक निर्मळ गोडवा होता. त्या रात्री आमची दमली-भागली शहरी मनं त्यांच्या साध्यासुध्या आतिथ्यानंही भारावून गेली. भल्या पहाटेच आमच्या पाच ‘पांडवां’नी मला घेऊन गावात फेरफटका मारायच्या बेतावर शिक्कामोर्तब केलं. तीच तीच कृत्रिेम गर्दीची ठिकाणं काय पाहा?
सारंगपूर भलतंच देखणं होतं. त्यांच्यातला एक हौशी माहीतगार सेकंदाचीही उसंत न घेता गावचा इत्थंभूत उभाआडवा इतिहास-भूगोल सांगत होता.
“त्या तिथं मोठ्ठा पार, पलीकडं घाट, ही श्रावणा नदी ओलांडली की पुढे दाट आमराई, कवठी चाफ्यची बनं, महादेवाचं देऊळ . . .”
“आणि त्यापलीकडं?” मी आपसूक विचारलं आणि दचकले.
तो गावकरी भांबावून म्हणाला, “पेशव्यांची राघवगढी.”
माझ्या अशा अनपेक्षित प्रश्नामुळे आकाश-तृप्तीच्या नजरेतून ओसंडणाऱ्या आश्चर्यादाखल मी फक्त खांदे उडवून हसले . . . कित्येक दिवसांनंतर पहिल्यांदाच.
श्रावणेच्या प्रवाहातच एक अवखळपणा होता. त्यानं मनावरची जळमटं पार धुवून निघाली. माझ्या वागण्यातला बदल पाहून पंकजच्या खोडयांनाही ऊत आला. मी नि मधूनं संधी साधून त्याला उथळ पाण्यात ढकललं. तसा उसळ्या घेत आमच्याही आधी बेटा किनाऱ्यावर धडकला!
मंडळी कैऱ्या पाडत, चाफा खुडत मागेच रेंगाळली. आमचा नावाडी – धीवर – मध्येच थांबून तऱ्हेतऱ्हेच्या दंतकथा सांगू लागला. मी नकळत पुढे चालू लागले. तो रस्ता निःसंशयपणे महादेवाकडेच जात असणार. पण मला कसं माहीत? मघा बेमालूमपणे दाबून टाकलेल्या प्रश्नानं उचल खाल्ली.
हा परिसर पक्का स्मरणातला – अगदी पायाखालचा वाटू लागला. कदाचित कधीतरी मी इथे खेळले, बागडले, वयात आले, जणू इथल्याच मातीचा मी अंकुर; पण कसं शक्य आहे? नियतीच्या प्रश्नांची उत्तरं प्रत्येकाला कुठे मिळतात? बाबांना तरी कुठे मिळाली होती?
इथे फुलणाऱ्या प्रत्येक कळीचं लाजरं गुपित तिच्याआधीच जणू मला ठाऊक असावं, इतक्या सहजरीत्या माझी पावलं झपझप पडत राहिली.
वाट संपत होती तिथेच पश्चिमेला नटराजाचं भव्य पुरातन उपासनामंदिर होतं. एके काळी ही वास्तू आरतीच्या उद्घोषात, समयांच्या मंद प्रकाशात उजळून निघत असली पाहिजे. आता मात्र बरीच पडझड झालेली दिसत होती.
किंचित टाचा उंचावून घंटेला स्पर्श करणार, तोच मागून अचानक कमरेभोवती कणखर मर्दानी बाहूंचा घट्ट विळखा पडला. काही कळायच्या आतच मी वरच्या वर उचलली गेले. माझा हात लागून धुळीचे जाड थर बसलेली घंटा हळूच किणकिणली. पाय खाली टेकताक्षणीच मी गर्रकन् वळले आणि जागच्या जागीच गोठून गेले.
संपूर्ण मंदिरात माझ्याशिवाय कोणीही नव्हतं!
काहीशा तिरीमिरीतच मी बाहेर पडले. भासच होता तो; पण किती जिवंत! इतक्या दूर पहाटेच्या आडवेळी कडमडत कोण माझ्यावर पाळत ठेवणार? निर्जन किनाऱ्यापल्याड पोहून कोण पाठलाग करणार? गडबडीत माझी लाल अंजिरी ओढणी मात्र कुठेतरी अडकून जराशी फाटली. जीव हळहळला.
आजूबाजूला माजलेल्या पुरुषभर उंचीच्या गवतातून वाट काढत मी मंदिराला वळसा घातला. मागचा तो भाग तर कमालीचा दुर्लक्षित होता. एक नजर टाकून परत फिरणार, तोच माझा थरकाप उडाला. काही अंतरावरच धुक्यात तुटक्या कुंपणापलीकडे ‘तो’ उभा होता.
उंच, बलाढय, सामर्थ्यशाली. पूर्वेच्या कोवळया केशरी रंगात न्हाऊन निघाल्यानं त्याच्या करारी चेहऱ्यावर जास्तच तेज चढलं होतं. त्यानं त्याची देखणी मुद्रा अजूनच प्रसन्न भासत होती. एका हातात विजेसारखी तलवार उपसलेल्या त्या मूर्तीकडे पाहून मन आदरयुक्त दराऱ्यानं भारून जाण्याऐवजी विचित्र धास्तीनं शहारलं . . . त्याचं कारण म्हणजे तिच्या दुसऱ्या हातातला, वाऱ्याच्या संथ झोतानुसार हलणारा छोटा कापडाचा तुकडा – लाल अंजिरी!
दूरवरुन हाकांचा सपाटा सुरू झाला. आमचे 'पांडव' काळजीत असतील. भानावर येत मी चटाचट पावलं उचलली.
एकवार मागे वळून पाहिलं. वाटलं –
उभे धुक्यात आपण सारे काही विसरून
उडे मधले अंतर फुलपाखरू होऊन
अशा वेळीच बोलते कधी नाही जे बोलत
अशा वेळी आकळते कधी नाही जे कळत
अशा वेळी जागी होते तार गाढ निजलेली
अशा वेळीच पेट घेते आणि आग विझलेली
मोकळंं पटांगण, मागे अवाढव्य पुरातन गढी आणि समोर उंचावर तो पंचधातूचा तलवारधारी वीर पेशवा! काळाच्या उदास खुणा उमटलेलं एक मोहक चित्र!
परतीच्या वाटेवर माझं लक्ष गप्पांतून उडालंय, हे तृप्तीनं चटकन ताडलं. बाबांच्या तडकाफडकी निधनानंतर माझ्या स्वभावातले हेलकावे त्या साऱ्यांच्या परिचयातले होते. काहीतरी बोलणं भाग म्हणून मी आकाशला पुढचा बेत विचारला.
“बघूया, गाव शहराळलेलं नाहीय, पण माणसं हापूस आंब्याहून गोड. ‘पुण्याम्हमईचं पाव्हणं’ म्हणून हरखून गेलीत भाबडी. गाडी इतक्यात दुरुस्त व्हायची लक्षणं नाहीतच. तशात त्यांच्या राघवगढीबद्दलही बरंच कानावर पडलंय.”
पंकज बॅग सावरत म्हणाला, “इतकं कशाला? दुपार टळल्यावर कामच काय आहे? मी आत्ताच सांगून ठेवतो धीवराला – काय रे धीवर?” धीवर नाव वल्हवत होकारार्थी हसला.
जेवणं उरकली. जळती दुपार मालवली. क्षितिजावर सुंदर हळदमाखला संधिप्रकाश दाटेपर्यंत आम्ही राघवगढी पाहून घेतली.
धीवराच्या म्हणण्यानुसार राघवगढीला सुमारे अडीचशे वर्षांचा ज्वलंत इतिहास होता. मात्र सारंगपूरच्या पेशवाईला घरघर लागण्यापूर्वीच शेवटच्या वंशजाचा अकाली मृत्यू ओढवला. उदयनकुमार पेशवा त्याचं नाव.
“त्या समोरच्या कड्यावरून त्यानं उडी टाकली!” खाली दरीकडं बोट दाखवून धीवर सांगू लागला. त्याची कहाणी ऐकून साऱ्यांचीच मनं हेलावली.
“उदयनराजांचं देवयानीसारख्या नर्तकीवर प्रेम बसलं होतं. दरवर्षी दसऱ्याला तिचे तालबद्ध थिरकणारे केवळ अप्रतिम पदन्यास पाहण्याकरता राघवगढीच्या पटांगणात पंचक्रोशीतील गावं जमा होत. तिच्या नृत्याविष्काराशिवाय नटराजाला अभिषेक होत नसे.
चारचौघींपेक्षा तिच्यात काहीतरी वेगळेपण होतं. सहज बघणाऱ्याला त्यावर नेमकं बोट ठेवता येत नसे. पण ते मर्यादशील सौंदर्य खुळावून टाके, हे नक्की! काव्यातही तिला रस होता.
उदयनकुमारांना देवयानी सहजप्राप्य होती आणि त्यांना त्याबद्दल कोणी वावगा शब्द उच्चारण्याचं धाडसही केलं नसतं. पुरुषमाणसांनी मन मानेल तसं सुख उपभोगण्याचा तो काळ. मात्र उदयनराजांनी आपल्या गुणांनी तिला जिंकलं. महादेवाच्या साक्षीनं विवाहाचं वचनही दिलं.
पण महालातल्या तुळजा नावाच्या दासीला हे खुपलं. सरळ मनाच्या देवयानीला कुठल्याशा निमित्तानं बोलावून तिनं विष खायला घातलं नि गढीच्या बाजूला नेऊन कड्यावरून ढकलून दिलं. आपलं काम साधून तुळजेचा जीव थंडावला असला तरी आपलं कुटिल कारस्थान देवळाच्या महंतांनी पाहिल्याचं तिच्या ध्यानीमनीही नव्हतं.
देवयानीच्या विरहानं वेड्यापिशा झालेल्या उदयनराजांनी पेटून उठून आपल्या लाडक्या देवीच्या क्रूर हत्येचा तपास सुरू केला. रातोरात तुळजा सारंगपुरातून गायब झाली. तिचं पुढं काय झालं, कळलं नाही.
दुसऱ्या दिवशी महंतांचा निष्प्राण देह देवळाच्या गाभाऱ्यात सापडला. तिथल्याच भिंतीवर त्यांनी स्वतःच्या रक्तात तुळजेचं कृष्णकृत्य लिहून ठेवलं होतं. मग मात्र उदयनराजांचं जगण्यातून मनच उडालं.
अष्टमंत्रिमंडळानं तुळजेला पकडून कठोरातलं कठोर शासन ठोठावण्याचं फर्मान काढलं, पण त्यानं त्यांची देवी थोडीच परत येणार होती?
त्याच दिवशी त्याच कड्यावरून भरधाव घोडा सोडत त्यांनी उडी घेतली. पेशव्यांचा वंश संपला. सारंगपूर जणू शापित झालं.
नंतर गावकऱ्यांनी न्यायी सालस उदयनकुमारांच्या आठवणीखातर राघवगढीच्या पटांगणात त्यांचा भव्य पुतळा उभारला. दर दसऱ्याला पुतळ्याच्या पायथ्याशी फुलं वाहण्याची प्रथा अजूनही पाळली जाते,” धीवराची कहाणी संपली.
हवेत गारवा दाटू लागला. चांदण्याची लकेर दवात भिजल्यासारखा उदयनकुमार पेशव्यांचा पुतळा चमकत होता. पावसाची रिपरिप सुरू व्हायच्या आत निघायचा धीवराचा सल्ला किती योग्य होता, याचा गावात पोहोचेपर्यंत पूर्ण प्रत्यय आला. श्रावणेचा तट ओलांडेपर्यंत वादळी सरींनी आम्हाला गाठलंच.
शेकोटीजवळ बसून अंग शेकण्यात मला स्वारस्य वाटेना. बाहेरच्या बेफाम पावसाकडे उगाच नजर हरवल्यासारखी बघत राहिले.
सकाळच्या त्या प्रसंगाच्या आठवणीने अचानक हसू फुटलं.
वाटलं, कुठून तरी वाऱ्यानं वाहत अडकून पडली असेल ती फाटून लोंबकळत असलेली चिंधी . . .
आणि काय नाही नाही ते डोकावून गेलं मनात! कल्पनेनंच माझ्या चेहऱ्यावर लाजेचा रंग चढला.
तशा आवेगात बुडून जगाला विसरावं,
मत्त निशिगंधासारखं मिठीतच उमलावं . . .
आप जब पास न थे घटाएँ बरसी,
मुझको बेवक्त की बरसात पे रोना आया
असे वादळी विचार मनात थैमान घालू लागले.
गालावर आसवांचा गरम स्पर्श जाणवला. साध्याशा पुतळ्यात अशी ती काय जादू असावी? ते आर्त व्याकुळ डोळे, ते वेदना दडवणारं विलक्षण हसू . . .
इतक्यात कानापाशी हातातली घुंगरं वाजवून मधू शेजारी येऊन बसली. मी पटकन मान वळवून डोळ्यांतलं पाणी झटकल्याचं तिच्या नजरेतून सुटलं नाहीच.
“जाणारं माणूस परत येत नसतं वेदा. आणखी किती दिवस अशीच झुरणार आहेस? व्हायचं ते घडून वर्ष होत आलं. आता लग्नाचा विचार कर किंवा छंदात मन रमव. तुझ्या क्लासिकल डान्समधल्या करिअरला अशीही काकांची परवानगी होतीच ना?”
मी काहीच बोलत नाहीसं पाहून, माझ्या हातावर घुंगरं ठेवून, शक्य तितक्या मृदू आवाजात ती म्हणाली, “आकाशच्या मनात तुला विचारावं असं आहे. पण मला नाही वाटत तुझं करिअर त्याला मानवेलसं . . . म्हणून म्हणते, आताच हौस पुरी करून घे! खरंतर, त्यासाठीच आम्ही तुला बाहेर . . . तुला समजतंय ना?”
मी बधीरपणे मान डोलवत घुंगरं शबनममध्ये टाकली.
लवकरच निजानीज झाली. मी अस्वस्थपणे कूस बदलत राहिले. दुसऱ्या दिवशी निघायचं, तर या जागेबद्दल अनावर ओढ वाटत होती. असं का व्हावं, याचं उत्तर नव्हतं. मी माझे हक्क अजून कुणाच्या स्वाधीन केले नव्हते, करणारही नव्हते. प्रवाहपतिताचं तत्त्वज्ञान मला मंजूर नव्हतं.
‘माझी कला ही माझी ‘तहान’ आहे आणि ती कलाच नाकारायला लावणारा कोणी मला काय स्वीकारणार राजे?’
ओळखीचं वाक्य! कोण म्हणालं हे? कोणाला म्हणालं?
‘अशा बळजबरीनं एका स्त्रीचं मन काय समजता येणार राजे?’
हळवा स्वर . . . काळजाला हात घालणारा . . . पण कुणाचा आवाज हा? तत्क्षणी मस्तकात तिडीक गेली! शबनम घेऊन मी गावाबाहेर पडले.
श्रावणेचा तट अजूनही प्रक्षुब्ध होता. धक्क्याला बांधलेला दोर सोडवून मी नावेत बसले नि वल्हं हातात घेतलं. बिनघोर निजलेल्या धीवरानं मला पाहण्याचा प्रश्नच नव्हता. पाहिलं असतं तरी त्याची पर्वा नव्हती. दुथडी भरून वाहणाऱ्या श्रावणेत कराल जबड्याचे भोवरे उठत होते. कोसळणाऱ्या जलधारा झोडपून काढत होत्या. मी वल्ही मारतच राहिले . . . किनाऱ्याची चाहूल लागेपर्यंत!
भोवतालचा आसमंत काळोखात झाकोळला होता. रक्त गोठवणाऱ्या गारठयाची तमा न बाळगणाऱ्या अधीर टापांच्या आवाजानं मध्यरात्रीची नीरवता भंगत होती.
भग्न शिवालयाच्या आवारात पोहोचेतोवर माझा ऊर धपापत होता, ठेचकाळून पाय रक्ताळले होते आणि अंगावरच्या वस्त्रांची दशा झाली होती.
“मी आले आहे!”
मी खणखणीत आवाजात म्हटलं. माझ्या दैवाचं गणित मला उलगडायलाच हवं होतं. आदिशक्ती समोरच्या नभात वीज बनून कोसळत तडकली नि दीड-दोन मण वजनाची अवजड घंटा छतापासून तुटून अकस्मात् माझ्या पायाशी घरंगळत आली!
ओलेत्या अंगाने थरथरत मी गाभाऱ्याच्या पायऱ्या उतरले. भर दुपारी काजळी फासल्यासारखा दिसणारा तो गाभारा झळझळीत प्रकाशानं लखलखत होता. आता तिथं धुळीचा मागमूसही नव्हता.
इतक्यात बाहेर पैंजणं वाजली . . . ‘ती’ आली होती.
तिनं भक्तिभावानं हात जोडले होते. देव्हाऱ्यातल्या सात्त्विक प्रकाशात तिचा मूळचा रेखीव चेहरा बाजूला येऊन थांबलेल्या उदयनला अजूनच लोभस वाटू लागला.
नेहमीप्रमाणे महारुद्राला रक्तपुष्पांचा अभिषेक करून होताच ती टाचा उंचावून घंटेला स्पर्श करणार तोच, तिच्या कमनीय बांध्याला त्याच्या बाहूंचा गच्च विळखा पडला.
त्यानं तिला फुलासारखी अलगद उचलली. तिचा हात लागून घंटा नाजूक किणकिणली. पाय खाली टेकताच ती गर्रकन् वळली. गालांवर, मानेवर आदळणारे त्याचे बेताल श्वास रोखणं तिला जड जाऊ लागलं. मन अडखळलं. दोन आसवं पाझरली.
त्याच्या डोळ्यांतल्या सोनेरी प्रकाशात तिची नजर क्षणभर गुंतली . . . आणि त्या घट्ट पकडीतून देह सोडवून घेत, सर्वशक्तीनिशी तिनं त्याला सणसणीत चपराक लगावताच, तो गोंधळला. हा प्रकार त्याला सर्वस्वी नवीन होता.
“आपल्या वासनेला आवर घाला उदयनराजे! तुमच्या कुळाची शपथ आहे तुम्हाला! देवतेसमोर कुळाचार सोडून आपण हे आरंभलंत तरी काय?”
“त्याच देवतेची शपथ आहे तुला देवी. सांग, आमच्या प्रीतीला ‘वासना’ म्हणण्यास जीव धजावला तरी कसा तुझा?” त्याचा आवाज चढला.
“सोनेरी शब्दांचा मुलामा लावून भावना बदलत नाही. आपली भूक शमेल तेव्हा . . .”
“देवी! आमचे प्रेम आहे तुझ्यावर! क्षुद्र लालसेची वखवख असती तर ती भागवणंही कठीण नव्हतं आम्हांस!” तो गरजला.
“मग फेडा हौस – अशा बळजबरीनं एका स्त्रीचं मन काय समजणार तुम्हाला राजे? तुमच्यासारख्यांकरता आम्ही दरबाराच्या कवडीमोल नर्तकीच!”
“. . . मग सोडून दे हे पायातले चाळ! म्हणजे तुझं खरंच स्थान कुठं आहे ते . . .”
“माझी कला ही माझी ‘तहान’ आहे आणि ती कलाच नाकारायला लावणारा कोणी मला काय स्वीकारणार राजे? असेल हिंमत तर जगासमोर मला ‘आपली’ म्हणा . . . नाही जमायचं उदयना – कारण आपलंही काळीज कचकड्याचंच . . .”
बोलता-बोलता ती चरकली. आपण नाही नाही ते बोलून गेल्याची बोच तिच्या चेहऱ्यावर दाटली. पण तिच्याही नकळत तिच्या एकेरीतल्या ‘उदयना’तली आच त्याला समजली.
“ठीक तर मग. हेच वाक्य आमच्या नावाचं कुंकू लावशील तेव्हा म्हण!”
ती डोळे फाडफाडून अविश्वासानं पाहू लागली. किंचित पुढे होऊन त्यानं गाभाऱ्यातल्या वीणेवर हात ठेवला.
“या नटराजाच्या वीणेस स्पर्शून सांगतो – रूढीचा विटाळ धिक्कारुन आम्ही तुला वरणार आहोत. श्वासात श्वास असेतोवर आणि तो संपल्यावरही हा उदयन तुझ्याचसाठी जळत राहील!”
श्वास रोखून ती फक्त पाहत राहिली.
मंदिराचा अवकाश अचानक विरघळू लागला. त्याची जागा झपाट्याने राघवगढीच्या वाड्यानं घेतली. महालाच्या सज्जात भारदस्त व्यक्तिमत्त्वाचे वृद्ध महंत कोणाचीतरी वाट पाहत होते. एका डोळ्यात फुल पडलेली कावेबाज चेहऱ्याची ती सेविका कुठूनशी त्यांच्यासमोर उभी ठाकली.
“आज्ञा, महंत!"
“तुझा डाव साध्य झालाच तर!”
महंतांचा स्वर धारदार झाला. काहीच न कळल्याचा उत्तम अभिनय वठवत तुळजेनं डोळे विस्फारले.
“तिची भेकडासारखी हत्या करून तुला सुखाचं मरण येईल असा केवळ गैरसमज आहे तुझा!
माझं तप सत्कारणी लावून मी तिला नवा जन्म, नवं नाव देईन. पाहाच आता तू – म्हणजे तुझा विश्वास बसेल.” त्यांच्या हातात नुकतीच रक्तवर्णात लिहून काढलेली कुंडली होती. “लवकरच माझी साधना पूर्णत्वास जाईल. मृत्युदंडाला सिद्ध हो नीच स्त्रिये! कारण लक्षात ठेव . . . ‘ती’ पुन्हा जन्म घेईल आणि तुझ्या विनाशाचं कारण होईल!”
महंत निघून गेल्यानंतर तुळजा विषारी हसली. त्या रात्री आरतीनंतर सारे पांगताच महंतांनी गाभाऱ्यात प्रवेश केला. तशी दरवाजाजवळ लपून बसलेली तुळजा त्यांच्या मस्तकावर धोंडा घालीत छद्मी स्वरात फिसकारली.
“साधना ‘पूर्ण’ होईल तेव्हाच ना?”
महंतांना पार ठेचून तुळजेनं सत्वर गढीकडची दिशा पकडली. गाभाऱ्यात रक्त पसरत गेलं . . . पण एक प्राचीन मंत्र अर्धवट उच्चारत आपल्या रक्तानं भिंतीवर काहीतरी लिहून महंतांनी प्राण सोडला.
महालातले चोरदरवाजे तुळजेला रातोरात वेशीपलीकडे घेऊन गेले. खजिन्याच्या तळघरापुढल्या पहारेकऱ्यांची नजर चुकवून, देवयानीला विवाहप्रसंगी घालण्याकरता खास घडवलेल्या अलंकारांची पेटी नि हाताशी लागतील तितक्या सुवर्णमोहरा हस्तगत करण्यात तिला यश आलं होतं.
झालंच तर जाता जाता आपल्याविरुद्धचा एकमेव पुरावाही तिनं नष्ट केला होता. आता घटकाभरानं निजामाची हद्द सुरू झाली की तिला काहीच धोका उरणार नव्हता.
पण स्वतःच्याच धुंदीत धावणाऱ्या तुळजेला एकाएकी काय झालं उमगलंच नाही. तिच्याभोवतीचं जग अचानक गोठलं, पाघळलं, बदललं!
कच्च्या पायवाटेच्या जागी गजबजलेला डांबरी हमरस्ता आला. घनदाट झाडी लुप्त होऊन तिथे विजेचे खांब आले. सिमेंटचं जंगल आलं.
बैलगाडी-टांगे कुठंच दिसेनात. सर्वत्र रणगाड्यासारख्या अजस्त्र गोष्टी दिसू लागल्या.
आजूबाजूला माणसांचा लोंढाच अक्षरशः वाहत होता. त्यातल्या एकाला थांबवून तिनं विचारलं, “हे कुठलं गाव?”
त्यानं सांगितलं ते नाव तर तिनं आजतागायत ऐकलं नव्हतं – मुंबई!
. . .अडीचशे वर्षांचा प्रवास काही क्षणांत पार झाला होता. ते साल होतं १९८०! दुसऱ्याच मितीत वावरत असल्याप्रमाणे तुळजा विमनस्कपणे हिंडू लागली. मुसळधार पावसात धारावीतल्या बकाल वस्तीपाशी कुणा घरमालकाचं भाडेकरूशी भांडण ऐन रंगात आलं होतं. अर्वाच्य शिवी हासडून वळलेल्या त्या माणसाला आसरा मागायचं तिनं ठरवलं नि त्याची वाट अडवली.
“हातावर गांधीबाबा टिकव म्हातारे नि मग बोल काय ते!” तो गुरकावला.गांधीबाबा म्हणजे कायसं तिला समजलंच नाही. पण अंधारात तिच्या हातावरची वस्तू चमकली. जुन्या पेशवाई छापाचं नाणं होतं ते – सोन्याचं!
“काय पाहिजे?” त्यावर झडप घालत त्या निर्बुद्ध प्राण्यानं विचारलं. लोभ . . . मानवप्राण्यासह युगानुयुगं चालत आलेली भावना . . . काळ कितीही बदलला तरी कायमच राहणार – तुळजा खुलली. या गोंधळात अंधारात कुण्या फाटक्या अंगाच्या चष्मेवाल्यानं तिला हेरल्याचं तिच्या ध्यानात यायचं कारणच नव्हतं.
खांद्यावरचं गाठोडं उलगडत तुळजेनं खोपटात अंग टाकलं. त्यातल्या जन्मकुंडलीकडं नजर फेकत ती बेफिकीरपणे हसली. तशातही आपल्याला होणाऱ्या भासाचं तिला नवल वाटलं. नुकतंच जन्मलेलं तान्हं अर्भक रडत असल्याचा आवाज! सहज मागे वळून पाहताच तुळजा भीतीनं वितळली.
देवयानी! लाल मखमलीत गुंडाळलेली कुरळ्या जावळाची गोंडस देवयानी!
‘ती पुनर्जन्म घेईल,’ तो थेरडा महंत म्हणाला होता, ‘तुझ्या विनाशाचं कारण होईल!’
तिच्या आश्चर्याचा-वैफल्याचा भर पुरता ओसरण्यापूर्वीच खोपटाचं दार उचकटून तोच फाटका, चष्मेवाला, गांजलेल्या राठ चेहऱ्याचा माणूस आत घुसला आणि क्षणार्धात त्याच्या हातातला ‘रामपुरी’ तिच्या काळजात खोलवर रुतला!
त्या अंगांग कापवणाऱ्या किंकाळीनं मी डोळे मिटून घेतले. पापण्या उघडल्या तसं समोरचं ते दृश्य गायब झालं होतं. इतका वेळ काळाची पानं सरसर उलटवणाऱ्या त्या गाभाऱ्यात मी स्तब्ध उभी होते.
काळजाच्या ठोक्यांची बेताल गती जशी ठिकाणावर आली, तसे धुळीने भरलेल्या गंजक्या वीणेतून अवीट गोडीचे सूर निघाले नि विरले.
ट्रीपभर अंगावर असलेले त्या शिसवी पेटीतले अलंकार उतरवत, शबनम तिथंच टाकून, सैलावलेल्या हताश मनानं मी गाभाऱ्याबाहेर पडले. तिथे आता कुंद अंधाराशिवाय काहीच नव्हतं. शबनममधल्या पुरचुंडीत ठेवलेल्या सुवर्णमुद्रांची मला कधीच हाव नव्हती नि गरज तर त्याहूनही नव्हती.
पावसाचा जोर ओसरला होता. मूकपणे पायात घुंगरं चढवून मी राघवगढीच्या रोखानं चालू लागले.
‘श्वासात श्वास असेतोवर आणि तो संपल्यावरही हा उदयन तुझ्याचसाठी जळत राहील . . .’ तो म्हणाला होता.
महंतांच्या अर्धवट–अधुऱ्या तपस्येला अडीचशे वर्षांनी फळ मिळालं होतं! अर्थ स्पष्ट होता . . . त्या तिथे पटांगणात माझा उदयन माझ्यासाठी अडीचशे वर्ष जळत उभा होता . . . त्याच आर्त डोळ्यांनी माझी वाट पाहत, एकटाच! भर पावसात त्याच्या हातातली तलवार तळपत होती.
कळे ज्या क्षणि आभाळाला नक्षत्रांशी अपुले नाते
ज्या क्षणि भेदुनि भूमीचा थर रुजून आले हिरवे पाते
लवूनि घेतले आषाढाने ज्या क्षणी या मातीचे चुंबन
विसरून मीपण आकाशाने दिले धरेला दृढ आलिंगन
गळला घुंगरपट काळाचा प्रियकर होऊन आले जीवन
मरण विरघळे अमरपणातच उमले जेव्हा सृजनाचा क्षण!
सावकाश पायऱ्या चढण्यापूर्वी मनात झरझर उमटून गेलं.
तिसऱ्याच पायरीवर पाय घसरला, तसं मजबूत तलवारधारी हातांनी मला वरच्यावर सावरलं.
“खबरदार असा वेडेपणा केलास तर! आमच्याशी गाठ आहे!” पंचधातूचे ओठ विलगले.
“इतकंच असतं तर मिठीत सावरलं नसतंत मला!”
“तुझ्या एका भेटीसाठी किती थांबावं लागलं कल्पना आहे?” उदयनचा स्वर विकल झाला.
त्याच्या श्वासात, त्याच्या मिठीत गुरफटत असता त्यानं हातानंच मला अडवलं,
“नाही देवी, हट्ट धरु नकोस, पहाटेच्या पहिल्या किरणासोबतच आमचं शापित आयुष्य संपेल. आता नवा पाश निर्माण करू नकोस. आम्हाला आवर घालता येणार नाही! अजूनही अवकाश आहे. परत फिर आणि आपलं आयुष्य जग . . .”
पण मी ऐकलं नाही. मला ऐकायचंच नव्हतं. उदयनाच्या ओठांची धग अनुभवत मी समाधानानं डोळे मिटून घेतले.
वरून विजेचा लोळ कोसळेपर्यंत माझं आयुष्य मी पूर्ण जगले होते!
पहाटे राघवगढीच्या पायथ्याशी गावगर्दी जमली. सर्वात पुढे पाचजण उभे होते. पावसाच्या संततझडीनं उदयनकुमारचा निर्जीव पुतळा सबंध उचकटला गेला होता. त्याखाली पार चिरडल्या गेलेल्या त्या सुकुमार देहाकडे पाहवतही नव्हतं.
चेहरा मात्र संपूर्णत: विसंगत – समाधानी, ज्याच्यासाठी आसुसून जावं, ते गवसल्यावर होईल तसा!
जमाव हळहळत होता. काय तर म्हणे अपघात हा!
‘पण अपघातात सापडून मेलेल्यांच्या मुद्रेवर असे भाव चुकून तरी उमटतील का?’ हवेत पुरतं विरण्यापूर्वी माझ्या मनात इतकाच विचार डोकावला.
{fullWidth}