माणूस आत्मकेंद्री कशाने होतो याची बरीच कारणे आहेत; पण याचा परिणाम एकसमान होतो – माणूस बोलायचा थांबतो. अशा बोलणं विसरलेल्या माणसाला बोलतं करण्यासाठी मग ठराविक परिस्थिती निर्माण व्हावी लागते, त्याचा संताप किंवा एकलकोंडेपण अवजड व्हावं लागतं किंवा मग सरळपणे हक्काचं प्रेमळ माणूस एकांतात भेटावं लागतं . . .
एकटक समुद्राच्या लाटांकडे बघताना अचानक मागून तिचा आवाज आला.
“हं हे घे.” हातातली भेळ त्याच्याकडे देत ती म्हणाली. “अरे जरा हात दे.” खडकांवरून उतरताना हात पुढे करत पुन्हा ती.
ती बाजूला येऊन बसल्यावर तो तिच्याकडे बघत म्हणाला, “नेमकं याच वेळेला बरं तुझं येणं असतं?”
“अरे, तू म्हणतोयस तर जाऊ का?”
“म्हणजे मला तसं नव्हतं बोलायचं; पण तुला बरं समजतं मी कुठे आहे?” थोडंसं आश्चर्याने तिच्याकडे बघत तो म्हणाला.
“माणसांची थोडीफार ओळख आहे मला आणि तुला ओळखणं एवढं कठीणही नाही. हे शहर पायाखालच्या वाटेसारखं झालंय, तसं या शहरात हरवलेल्या माणसाला एकांत या समुद्रकिनारीच सापडतो.”
हे ऐकून तो पुन्हा समुद्राच्या क्षितिजावर मावळतीला जाणाऱ्या त्या जर्द लाल रंगाच्या गोळ्याला बघत बसला.
पुन्हा एकदा शांतता पसरली. हवेत हळूहळू गारवा वाढत होता. वाऱ्याने उडणारे केस हात फिरवून मानेमागे नेत, त्याच अस्थिर समुद्राकडे पाहत, ती म्हणाली.
“रोज इथे येऊन शून्यात बघितल्यासारखं समुद्राला एकटक बघत का बसतोस? असं वाटतं की कुणाची वाट बघतोस. आजही रिजेक्शन मिळालं वाटतं. ओय स्टोरी टेलर! कुठल्या विचारांत आहेस?”
तंद्रीतून बाहेर येत तिच्याकडे बघत, हसत तो म्हणाला, “वा ज्योतिष, तुम्हाला तर संपूर्ण ज्ञान आहे विश्वाचं!”
“अरे म्हणजे काय? माणसं ओळखायला वेळ नाही लागत आम्हाला!” तिच्या बोलण्यावर दोघेही हसले.
“हा आता बस झाली स्वतःची आणि या शहराची तारीफ, आणि तसंही तुला काय माहीत मला काय वाटतं? नुसती जज करत फिरते लोकांना. बरेच गैरसमज आहेत तुझे.” तिच्या नजरेला नजर न देता तो दूर कुठेतरी क्षितिजाकडे, हळूहळू विझत निघालेला प्रकाश, बघत बसला.
ती हसत “बरं” म्हणाली. दोन सेकंद विचार करत ती पुढे म्हणाली, “मग तू जायचा विचार केलास तर?”
“अरे मी कुठे असं म्हणालो” तिच्याकडे बघत, हसत तो म्हणाला.
“बरं या शहराबद्दल काय वाटतं तुला?”
“बडा अजीब है यार तेरा शहर!”
“म्हणजे?”
“म्हणजे प्रत्येक जण बिझी. हर प्रकारचे नमुने भरलेत इथे. या शहराला ऋतू फक्त एकच पावसाळा! ऊन, थंडी – यांना फरकच पडत नाही. या शहराला झोपच नाही असं म्हणतात; पण थकलेले लोक वीकेंडला लोणावळा गाठतात. उरलेले आठवड्याची झोप रविवारी पूर्ण करायला बघतात. चुकून एखाद्या नातेवाईकाकडे कार्यक्रम किंवा सिनेमाला गेले तर एसीमध्ये झोपायचं, बस आणि ट्रेनमध्ये झोपायचं, बिल्डींगखाली वॉचमन झोपलेला! झोपही जागीच असते यांची. बस् चोवीस तासात जेमतेम चार-पाच तास झोप.” एवढं बोलून हसायला लागला.
“हम्म म्हणजे आजही कथा ऐकून प्रोड्यूसर झोपला तर?”
“आता सवय झाली.” निराशेने पायाकडे बघत तो म्हणाला.
“एकटं वाटतं ना इथे?”
“ही गर्दी असते की सोबत. कुणीच नसलं तर तू असतेस. आणि कुणाला वेळ असतो इथे एखाद्याला ऐकून घ्यायला? हे शहर फक्त धावतंय लोकलसारखं. स्टेशन आलं की प्रवासी उतरतात. तेही चालत नाहीत, धावतात. एकटं बसायला इथे जागा तरी कुठे आहे?”
“म्हणून आतल्या वादळांना शांत करायला समुद्र किनारा शोधत येतोस रोज.”
“नाही,” दोन सेकंद थांबत तो म्हणाला, “असं ऐकलंय की या शहराच्या समुद्रात प्रत्येकाच्या नावाची एक लाट येते. मी माझ्या नावाच्या लाटेची वाट बघतोय.”
त्याचं उत्तर ऐकून तीही मग असाच कितीतरी वेळ त्याच्यासोबत बसून होती – समुद्राच्या किनार्यावर येणार्या लाटांकडे बघत . . .
{fullWidth}