आवर्त


ouroboros dragon eating his own tail
विचारांचा गुंता वाढत जायचा. आपण एका आवर्तामध्ये गरगरतोय असं वाटू लागायचं. क्रूर व्यवस्था आपल्याला भोवळ आणेल अशी भीतीही वाटायची.


भीतीलाच आपण नीती म्हणतो. आपल्या रक्तपेशींमधली खुमखुमी हळूहळू कमी होतेय हे त्याला जाणवलं. कुणाला थोपवण्याची हिम्मतही नव्हती. कोकणात ही दहशत प्रचंड आहे. महाराष्ट्रात आता कशासाठी राहायचं?


नदीकाठी उघड्या अंगावर कोवळी उन्हं घेणाऱ्या चंद्रहासला कळत नव्हतं की, आपण नक्की कसं स्थिर व्हायचं? आपली पदवी हा एक निरर्थक कागद आहे की, धनकुंडली आहे? चंद्रहास ‘मास मीडिया’चा पदवीधर होता. स्थानिक दैनिक त्याला दरमहा चार हजार रुपयांवर बोलवत होतं. पण एकदा असं कमी वेतनाचं काम करत गेलो की, तीच फाटकी जीवनशैली बनते हा सावधगिरीचा इशारा त्या मुलांना मुंबईच्या पाहुण्याने दिला होता. मुख्य अतिथी म्हणून प्रसन्न दामले आले होते. त्यांचं भाषण चंदूने कानांत, मनात भरून घेतलं. रोज शिकवणाऱ्या माईणकर बाईंपेक्षा प्रसन्न, खूपच वेगळं, नवं काही सांगत होते. त्यांना काही पुस्तकी पोर्शन पूर्ण करायचा नव्हता. ते व्यवसायातला व्यवहार सांगून गेले.

बहरत गेलेली चमकदार मुंबई चंद्रहासला गाठायची होती. कपाळ कोरलेलं असतं, सगळं आधीच ठरलेलं असतं हे त्याला अजिबात मान्य नव्हतं. घरातल्यांचा ‘डिग्री मिळवलीस आणि तरी घरी बसून आहेस,’ असा तक्रारीचा सूर होता. ते खोटं नव्हतं, पण किडलेल्या व्यवस्थेतून वाट काढणं अवघड आहे हे कॉलेजचं तोंड कधीही न पाहिलेल्या घरच्या मंडळींना कसं सांगायचं, कोणत्या शब्दात पटवायचं ते चंद्रहासला कळत नसे. तो तसा मोठा नव्हता! आपलं लहानपण परिस्थितीने मारून टाकलं, याची जाणीव त्याचं मन कुरतडत राहायची. चिंता-काळजीचे काही उंदीर स्वप्नात चावायचे. मग चंद्रहास झोपेतून दचकून उठायचा! काही स्वप्नं तो डायरीत लिहूनही ठेवायचा. सगळीच स्वप्नं लेखी मांडावीत अशी नसत. काही मोहोर गळतो, तशी नुसतीच गळून जात. देहाचं म्हणून एक जंगल असतं. तिथं त्या स्वप्नांचा उग्र तरीही मोहक गंध त्याला जाणवत राहायचा. चंद्रहासच्या आसपास, शेजारीपाजारी वाचनसंस्कृती हा शब्द कुणाच्या गावीही नव्हता. दूरदर्शनवर चंदू बातम्या वाचायचा, पण तो तिथे रमला नाही. तिथे मानधन मिळायलाही खूप वेळ लागला. मालक टाळाटाळच करत होता. खरं तर त्या स्थानिक वाहिनीला बातम्या दिल्यामुळे पोरींचे बरेच फोन चंद्रहासला आले. पण ‘इतक्या पोरी काय करायच्या आहेत!’ असं मनात म्हणत चंदू हसला. गालाला खळी पडली. लीलाला त्याच्या गाली पडणारी खळी जाम आवडायची. ‘पुरुषाच्या गालालाही खळी शोभते बरं का!’ असं तिचं मत होतं.

ही पोरं वृत्तपत्रातही वाचकांच्या पत्रव्यवहारात त्यांची मतं ठामपणे मांडू लागली होती. इंदुलकर तर आठवड्याला एखादं तरी पत्र वृत्तपत्रात लिहायचा. “फक्त पत्रांवर थांबून नकोस” असं त्याला कार्यकारी संपादक मानकर म्हणाले. मग तो काही ‘ऑफ बीट’ बातम्याही पाठवू लागला. मानकरांचा मेसेज आला. “सोबत फोटो असेल तरच बातमी पाठव! विषयाचा पुरावा हवा.” काल्पनिक लेखनाला तर मानकरांचा विरोधच होता. “आम्ही वर्तमानपत्र चालवतो. साहित्यपरिषद नाही.” असं ते तोंडावर सांगायचे. ‘कृपया कविता पाठवू नये’ची सूचना रविवार पुरवणीत छापलेली असायची. त्यामुळे कवडे लोक ते वर्तमानपत्र घेत नसत. “हे लोक कवी आहेत असं फक्त त्यांना स्वत:ला वाटतं,” असं म्हणत मानकर गडगडाटी हसायचे. त्यांचं बोलणं ऐकायलां चंदूलाही आवडायचं, पण नोकरीचा विषय निघाला की ते विषय बदलत.

मोडक म्हणाला, “मानकर जॉब देण्यासाठी भरपूर मलाई घेतो. आपल्याकडे पैसे नाहीत हे तो ओळखून आहे.” त्याचा हा शोध चंद्रहासला पटला नाही, पण त्याने वादही घातला नाही. आपल्या रक्तपेशींमधली खुमखुमी हळूहळू कमी होतेय हे त्याला जाणवलं.

‘वाळू उपसा करणाऱ्याला धमकी देऊन पाटकरने ५० हजारांचं पाकीट घेतलं’ असल्या वाऱ्यावरच्या वार्तावर चंदूचा विश्वास नव्हता, पण हळूहळू त्याला वाटू लागलं, अशा बातम्या खऱ्या असतील? असंच काही आपल्यालाही करावं लागेल का? पिवळ्या पत्रकारितेला भवितव्य ते काय? विचारांचा गुंता वाढत जायचा. आपण एका आवर्तामध्ये गरगरतोय असं वाटू लागायचं. क्रूर व्यवस्था आपल्याला भोवळ आणेल अशी भीतीही वाटायची. ‘भीतीलाच आपण नीती म्हणतो’ असंही वहीत त्याने नोंदवलं होतं. आपला हा भयाचा फील कुणाला सांगावा, असा प्रश्न त्याला पडायचा.

‘सौरभ’ नावाचं साप्ताहिक संपादकाने स्वत:च्याच नावाचा उपयोग करून सुरू केलं होतं. सौरभ भुवड त्याला म्हणाले, “चंदू, तू एक प्रश्न, एक उत्तर असा वाचकांना सल्ला देणारा कॉलम ठोकत राहशील काय? चहापाणी देईन तुला. ‘दादाचा सल्ला’ म्हणू सदराला!” मग हातखर्चाला पैसे सुटावेत म्हणून भुवडसाठी चंदू ‘दादाचा सल्ला’ तयार करून पुरवू लागला. चहा-पाण्याची सोय झाली.

तो अजून सायकलच वापरत होता. मैदानातून जाताना तर वाळवंटातून जातोय असं वाटत होतं. झाडांचे इतके ‘खून’ झाले होते की, जिकडेतिकडे रखरखाट होता. सपाटीकरण, वाळवंटीकरण हे विषय अभ्यासक्रमातही होते, पण अभ्यासू माणसाला किंमत नव्हती. कुणाला थोपवण्याची हिम्मतही नव्हती. कोकणात ही दहशत प्रचंड आहे. मोठ्या विचारवंतांचे खून मोठ्या शहरांत झाल्यावरही चंदूने ‘महाराष्ट्रात आता कशासाठी राहायचं?’ अशा आशयाचं पत्र दोन दैनिकांना पाठवलं, पण दोघांनाही दहशत असते का, असं त्याला वाटत राहिलं.


– क्रमशः




{fullWidth}

आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال