नुसतेच क्रूरकर्मा हुकूमशहा म्हणून हिटलरकडे पाहणे हा किंबहुना त्याचा अपमानच ठरेल! ब्रेनवाॅशची आदर्श पद्धत म्हणावी अशा रीतीने हिटलरने समस्त देशवासीयांत द्वेष आणि हिंसेची पेरणी केली! अनेक देशातले सत्ताधारी, आपापल्या प्रचारासाठी, हिंसेच्या पेरणीसाठी हेच टप्पे आणि मार्ग आजही अवलंबतात. सामान्य मेंदूंना फशी पाडणारा हा नाझी हातखंडा नेमका आहे तरी काय?
- भावनिक जाळे
- शिक्षणावर आघात
- प्रचार (प्रपोगंडा)
- भीतीचा प्रसार
- प्रसारमाध्यमांवर ताबा
- स्वतःचे देवदूतीकरण
- बनावट भूतकाळ
- पैसा
- उपसंहार
३० एप्रिल १९४५ रोजी हिटलरने आत्महत्या केली!
होय. ज्या जर्मन देशावर तो राज्य करत होता, त्याच जर्मन नागरिकांची दिशाभूल करत, त्यांचे मेंदू आणि विचार विषबाधित करून त्याने आत्महत्या करेपर्यंत सुखनैव सत्ता उपभोगली. पण त्यासाठी त्याने ज्याप्रकारे आपल्याच देशवासीयांना चक्क बनवले, त्यांची फसवणूक केली आणि त्याच आधारे त्यांच्यावर राज्यही केले.
हे हिटलरने कसे केले? त्यासाठी आधी हे समजून घेणे आवश्यक, आहे की . . . ‘हिटलरने कसे केले करोडो लोकांचे ‘मती’परिवर्तन (ब्रेनवॉश), त्यांना आपले अंधभक्त बनवण्यासाठी?’
१) भावनिक जाळे
‘तुम्ही देशावर प्रेम करता, तर मला मत द्या. तुम्ही देशाच्या सैन्यावर प्रेम करता, तर मला मत द्या!’
अतिशय योजनाबद्धरीत्या हे आवाहन करून हिटलरने जर्मन नागरिकांना भावनिक जाळ्यात फसवायला सुरुवात केली.
भावनिक लोक ह्यात काहीही तार्किक बुद्धीवाद नसताना पण केवळ भावनाविवश होऊन, संमोहित झाल्याप्रमाणे मग हिटलरच्या मागे जाऊ लागले. तो म्हणेल त्या अतार्किक गोष्टींवर माना डोलावू लागले. लोकांना भावनेत गुरफटून समूह-संमोहन करता येते हे उमगून, हिटलर नवनव्या क्लृप्त्यांच्या सहाय्याने त्याच्या मुळ योजनेबरहुकूम टप्प्याटप्प्याने पुढे जात राहिला.
२) शिक्षणावर आघात
हिटलरने १० मे १९३३ रोजी पंचवीस हजारांहून जास्त पुस्तके जाळून टाकली!
ही जाळली गेलेली पुस्तके कुठल्या विषयावरची होती?
मार्क्सवाद, मानसशास्त्र, स्वातंत्र्यवाद, लोकशाहीवाद ,परदेशी लेखकांनी लिहिलेली कला-विज्ञान-नाट्यशास्त्र अशी विशिष्ट पुस्तके – जी नाझी पक्षाच्या दृष्टीने त्यांच्या नाझी विचारसरणीस व त्यांच्या हुकूमशाहीस आव्हान देऊ शकतील – जाळून टाकण्यात आली.
इतकेच नाही तर वेळोवेळी, रस्त्या-रस्त्यांवर ‘बॉनफायर’ (भव्य होळी) आयोजित करून पुस्तके सार्वजनिकरीत्या जाळण्याचे कार्यक्रम नाझी पक्षाकडून आयोजित केले जाऊ लागले! त्यापूर्वी या पुस्तकांवर बहिष्कार टाकण्याचाही प्रयत्न केला गेला.
बुद्धिवाद पूर्ण संपविल्याशिवाय आपण पुढे येऊ शकत नाही हे ओळखून हिटलरतर्फे जनतेला सांगितले गेले की पुस्तके देशविरोधी आहेत.
३) प्रचार (प्रपोगंडा)
‘यापुढे कोणताही जर्मन म्हणजे पुस्तक वाचणारी व्यक्ती नसेल, तर ती चारित्र्यवान असेल.’
नाझी प्रचारपोपट (प्रपोगंडा मिनिस्टर) ‘जोसेफ गोबेल्स’ याने ह्या पुस्तक दहनाचे समर्थन करताना म्हटले, ‘यापुढे कोणताही जर्मन म्हणजे पुस्तक वाचणारी व्यक्ती नसेल, तर ती चारित्र्यवान असेल.’
नाझींकडून असे लेख, साहित्य, भाषणे प्रसारित केली जाऊ लागली, ज्यात तार्किक बुद्धिवादाला (लॉजिक) संपूर्ण मूठमाती देऊन बुद्धिवादाची संपूर्ण रेवडी उडवण्यात येऊ लागली.
‘रक्त व वंश हे शुद्ध राखा’सारखी बकवास भाषा आता लोकांच्या मेंदूत भरली जाऊ लागली. हाच तो भोंदू ‘आर्यन-वंशवाद!’
छद्म-विज्ञानाच्या सहाय्याने, खोटारडेपणा करून अतिशय लबाडीने, खूप मोठे संशोधन केल्याचा आव आणत बोगस प्रबंध प्रकाशित केले जाऊ लागले. हे सर्व नाझी सरकारच्या पाठिंब्याने होत होते.
ह्या बोगस प्रबंधांमध्ये, भाबड्या व भावनिक जनतेला सांगितले जाऊ लागले कि ‘आम्ही जर्मन शुद्ध रक्ताचे व सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहोत! आपला वंश केवळ शुद्ध आहे, इतर वंश कमअस्सल आहेत, आपल्यापेक्षा खालच्या दर्जाचे आहेत!’
एक स्व-घोषित शोधक होता ऑस्ट्रियाचा ‘हान्स होबिगर’. ह्याने एक सिद्धांत मांडला, कशावर आधारित तर, त्याला तसे स्वप्न पडले होते. ‘चंद्र बर्फाचा बनला आहे. कारण काय तर चंद्र पांढरा आहे म्हणून पूर्ण विश्वपण बर्फाचे बनलेले आहे!’ ह्या थिअरीला त्याने नाव दिले, ‘वर्ल्ड आईस थिअरी’. हिटलरने तात्काळ ही भोंगळ थिअरी उचलून धरली. आणि ह्या तथाकथित भोंदू संशोधकाला नाझी सरकारने आचार्य पदवीसुद्धा बहाल केली!
हे सगळे का? कशासाठी?
तर देशातील खरे विद्वान, शास्त्रज्ञ, इतिहासकार, अर्थतज्ज्ञ ह्यांचे खच्चीकरण करण्याची ही योजना होती.
विद्यापीठे, महाविद्यालये, जिथे सर्वाधिक महत्त्व शास्त्रीय बुद्धिवादास असते, त्यावर नाझी पक्षाकडून संपूर्ण ताबा मिळवला गेला. जेणेकरून त्यांनी बुद्धिवाद, खरे विज्ञान लोकांपर्यंत पोहोचवू नये.
ह्या संस्थांचे प्राध्यापक, व्याख्याते वेचून त्यांना जबाबदारी दिली गेली की त्यांनी त्यांच्या अध्यापनात, प्रत्येक गोष्टीत पद्धतशीरपणे नाझी विचारसरणी शिकवावी, तिचा प्रचार करावा, प्रसार करावा. जे हे करणार नाहीत, विरोध करतील, त्यांना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागतील असे धमकावले जाऊ लागले. खूप कमी प्राध्यापकांनी विरोध करण्याची हिंमत दाखवली, त्यांच्या नोकऱ्या गेल्या. असेच एक विरोध करणारे शास्त्रज्ञ होते ‘अल्बर्ट आईन्स्टाईन’!
नाझी पक्ष सत्तेवर येताच निषेध म्हणून आईन्स्टाईनने ‘प्रशियन अकादमी ऑफ सायन्स, बर्लिन’ मधून आपला राजीनामा दिला. निषेध म्हणून जर्मन देश व जर्मनीचे नागरिकत्वपण सोडण्याची जाहीर इच्छा बोलून दाखवली. ‘ज्या देशात समानता नाही, तिथे राहण्यात आपल्याला स्वारस्य नसल्याचे’ आईन्स्टाईनने धीटपणे नाझी राजवटीस ठणकावून सांगितले.
हे होताच, नाझी पक्षास पूर्णपणे विकला गेलेली तिथली बिनकण्याची प्रसारमाध्यमे तात्काळ हिटलरच्या मदतीस धावून आली. त्यांच्या नेहेमीच्या नाझी पद्धतीने आईन्स्टाईनची वाईट पद्धतीने वैयक्तिक बदनामी करणे सुरू झाले. त्याच्या विरोधात कपोलकल्पित बातम्या तयार केल्या जाऊ लागल्या. त्याच्या विरोधात हिणकस व्यंगचित्रे प्रसारित होऊ लागली. त्यात आईन्स्टाईनचे नाक ज्यू व्यक्ती प्रमाणे रेखाटून आईन्स्टाईनला ज्यू म्हणून हिणवले जाऊ लागले. त्याला मूर्ख, बावळट संबोधले जाऊ लागले. इतकेच काय, बर्लिनमध्ये तर नाझी पक्षाच्या अधिकाऱ्यांनी आईन्स्टाईनचे शोधनिबंधपण जाळून टाकले.
मग काही वर्तमानपत्रांनी आईन्स्टाईनला कम्युनिस्ट ठरवले; तो कम्युनिस्टांसह देशद्रोही कारवाया करत असल्याची आवई उठवली गेली. आता प्रसारमाध्यमांकडून आईन्स्टाईनला ‘देशाचा शत्रू क्रमांक १’ म्हणून घोषित केले गेले.
प्रचारपोपट गोबेल्सने तर आईन्स्टाईनचा फोटो प्रसिद्ध त्यावर लिहिले, ‘NOT YET HANGED’ (अद्याप फाशी दिली गेलेली नाही)! ही उघड उघड जीवाला धोका असल्याची धमकी होती, दहशत निर्माण करण्याची अमानुष चाल होती! शेवटी आईन्स्टाईनला जर्मनी सोडून बेल्जिअममध्ये आश्रय घ्यावा लागला. पण हे प्रकरण इथेच थांबलं नाही.
३० ऑगस्ट १९३३ रोजी नाझी कट्टरवाद्यांनी आईन्स्टाईनला पाठिंबा देणाऱ्या ज्यूईश विचारवंत ‘थिओदर लेसिंग’ची अमानुष हत्या केली. ह्याच्याही फोटोवर, तो जिवंत असतानाच, दहशत निर्माण करण्यासाठी ‘NOT YET HANGED’ लिहिले गेले होते. आणि ह्या नाझी मारेकऱ्यांची जर्मनीत मिरवणूक काढून त्यांचा जाहीर सत्कार केला गेला.
दुसऱ्याच दिवशीच्या वर्तमानपत्रांचे मथळे होते, ‘काय आता पुढचा क्रमांक आईन्स्टाईनचा आहे?’ आईन्स्टाईनची हत्या करण्यासाठी भरघोस रोख रकमेचे बक्षीस पण जाहीर केले गेले. ह्या भीतीपाई मग आईन्स्टाईनला बेल्जियम सोडून आता इंग्लडला पळून जावे लागले.
तिथेआईन्स्टाईनला गुप्तपणे एका गावात राहून (ठावठिकाणा किंवा गावाचे नाव जाहीर न करता) नाझी मारेकऱ्यांकडून दगाफटका होऊ नये म्हणून चोवीस तास पहारा देणारे शरीररक्षक नेमावे लागले. परंतु ह्या जगाच्या व मानवजातीच्या सुदैवाने आईन्स्टाईन जगला आणि आईन्स्टाईनने त्याच इंग्लंड मुक्कामात, ह्याच अनामिक गावात जगप्रसिद्ध सिद्धांत लिहिला, ‘युनिफाईड फिल्ड थिअरी’. हा तोच सिद्धांत, ज्याचा आजपण प्रत्येक विद्यापीठात अभ्यास केला जातो.
४) भीतीचा प्रसार
देशातील सामान्य जनतेत भीती तयार करणे व भीतीचा प्रसार करणे.
देशातील सामान्य लोकांत भीती तयार करणे व भीतीचा प्रसार करणे हा पुढचा नाझी हातखंडा होता. त्यासाठी एक बनावट शत्रू उभा करायचा होता, त्याची भीती जनसामान्यांना दाखवायची होती, जो शत्रू मुळात अस्तित्वातच नसेल. आणि मग हिटलरला पुढे करून, ‘आता हिटलरच तुम्हाला व देशाला ह्या शत्रूपासून वाचवू शकतो’ हे गृहीतक लोकांच्या मनावर बिंबवायचे होते! हा बोगस शत्रू म्हणून निवडले गेले – ज्यू नागरिक.
आता पद्धतशीरपणे प्रसारमाध्यमांत, भाषणांत कपोलकल्पित कथा प्रसारित केल्या जाऊ लागल्या की जर्मनीच्या पहिल्या महायुद्धातील पराभवास ज्यू नागरिकच जबाबदार होते.
५) प्रसारमाध्यमांवर ताबा
‘ज्यू हे देशाचे शत्रू आहेत. आपल्याच देशात बसलेले हे देशांतर्गत शत्रू आहेत, जे देश आतून पोखरून काढतायत’ असे प्रचारकी फलक छापले जाऊ लागले, ठिकठिकाणी उल्लेखले जाऊ लागले.
आता तुम्ही विचाराल, पण मग ह्या सगळ्या खोटारडेपणावर, ‘कु’प्रचारावर जर्मन लोकांनी विश्वास कसा ठेवला?
जर्मन प्रसारमाध्यमे (मीडिया) पूर्णतः विकली गेलेली होती. ती दिवसरात्र हाच नाझी प्रचारवाद प्रसारित करत होती. लोकांच्या कानावर फक्त हा प्रचार पडत होता, इतर माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचू दिली जात नव्हती. शिवाय जर्मनीत बेरोजगारी वाढली होती, गरिबी वाढत होती. लोकांना सत्य काय आहे हे शोधण्यात आर्थिक हातघाईमुळे रस नव्हता, उसंतही नव्हती.
६) स्वतःचे देवदूतीकरण
‘मी देश वाचवण्यासाठी अवतार घेतला असून, आता देश वाचवण्यासाठी मी आणि मीच आहे.’ हिटलरकरवी हे जर्मन नागरिकांच्या मनात ठसवले गेले!
हिटलरची त्यापुढची रणनीती (स्ट्रॅटेजी) होती, ‘स्वतःला देवदूत-अवतार म्हणून लोकांपुढे स्थापित करणे’!
‘हे ज्यू देशात वाढून त्यांनी देशाचा ताबा घेतल्यास विनाश अटळ आहे म्हणून देवानेच मला ज्यूंचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवले आहे’ असे हिटलर आता बिनदिक्कतपणे सांगू लागला. १९३३ मध्ये ह्याच प्रचारकी कटाचा (प्रपोगंडा) भाग म्हणून हिटलरचे एक चरित्र प्रसिद्ध केले गेले, ज्यात हिटलरला येशू ख्रिस्त म्हणून संबोधले गेले, त्याची येशूशी तुलना केली गेली. ह्या चरित्रात असेही लिहिले गेले कि ‘आता हिटलरच देशाला वाचवणार!’
हास्यास्पद भाग असा, पुढे हे उघड झाले, की हिटलरचे हे कपोलकल्पित चरित्र, स्वतः हिटलरनेच लिहिले होते, टोपणनावाने! त्याने स्वतःच स्वतःची तुलना येशू ख्रिस्ताशी केली होती. पुस्तकाचा लेखक म्हणून एका अप्रसिद्ध मित्राचे नाव टाकून, स्वतःचीच वाहवा केली होती हिटलरने.
७) बनावट भूतकाळ
बालपणी मी खूप गरीब होतो. गरिबीमुळे मला बालपणी अंगमेहनतीची कामे करावी लागली! – हिटलर.
या नंतर दोनच वर्षांनी, १९२५ मध्ये, हिटलरने आत्मचरित्र प्रसिद्ध केले ‘माईन काम्फ’(माझा लढा).
ह्या पुस्तकात हिटलरने बिनदिक्कतपणे अगदी सराईतपणे अनेक लोणकढी थापा मारल्या. जसे की, ‘बालपणी मी खूप गरीब होतो. गरिबीमुळे मला बालपणी अंगमेहनतीची कामे करावी लागली’ इत्यादी. पुढे यथावकाश हेही सिद्ध झालं, की हिटलरने कधीच अंगमेहनतीचं काम केलेलं नाही. बालपणीचे तर सोडूनच द्या.
पण मग हे धादांत असत्य कशासाठी?
तर भाबड्या इमोशनल जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी, चर्चेत राहण्यासाठी हा सगळा खटाटोप! अर्थात हिटलर त्यात वेळोवेळी यशस्वी होत गेला.
प्रसारमाध्यमे पण आता इमानेइतबारे हिटलरला देवदूत (मसिहा) म्हणून संबोधू लागला होती. त्याची प्रतिमा आता देवदूत म्हणून रंगवण्यात सर्व गर्क होते.
१९३० ला झालेल्या निवडणुकीत, आता मतपत्रिकेवर (बॅलट कार्ड्स) नाझी पक्षाचे नाव नव्हते, तर चक्क ‘हिटलर मूव्हमेंट’ असा उल्लेख होता. नाझी सरकारचा उल्लेख आता 'हिटलर सरकार' असा होऊ लागला आणि कोणालाच त्यात काही वावगे वाटणे बंद झाले. म्हणजे आता पक्षाचे नाव मागे पडून, हिटलरने तिथेपण अधिकृतपणे अतिक्रमण केले होते. पक्षाचे नाव हटवून, हिटलरने पद्धतशीरपणे स्वतःचे नाव तिथे घुसवले होते.
८) पैसा
पैशांसाठी उपयोगी आली कॉर्पोरेट फंडिंग – होय, कॉर्पोरेट फंडिंग तेव्हाही होती!
आता इतकी सारी प्रसारमाध्यमे (वर्तमानपत्रे, नियतकालिके, रेडिओ स्टेशन्स, भाषण-चर्चासत्रे ओयोजित करणाऱ्या संघटना) खरेदी करायची, त्यांना पैशाची लालूच दाखवायची तर प्रचंड पैसा लागणार होता. इतका सगळा पैसा आणायचा कुठून?
अर्थात हे अर्धसत्य होते. प्रसारमाध्यमे आपल्या बाजूने करण्यासाठी त्यांना धमकावणे, त्यांच्यावर दबाव आणणे, पत्रकार-संपादकांना अटक करणे, त्यांच्यावर खटले दाखल करणे ह्यानेच निम्मेअधिक गारद होत. मग कमरेत झुकत, गुडघ्यांवर रांगत नाझी पक्षाचा प्रपोगंडा खुषीखुशी रंगवत. पण उरलेल्या निम्म्यांना झुकवायला पैसा हेच साधन होते.
इथे उपयोगी आली कॉर्पोरेट फंडिंग – होय, कॉर्पोरेट फंडिंग (मोठमोठ्या भांडवली कारखानदारीतून पक्षाला निधीपुरवठा करणे ही पद्धत) तेव्हाही होती!
वोक्सवॅगन, बीएमडब्लू, कोडॅक, सीमेन्स, नेस्ले, फँटा, फोर्ड अशा अनेक जर्मन कम्पन्या हिटलरला इमानेइतबारे कॉर्पोरेट फंडिंग करत होत्या (पुढे, आता काही वर्षांपूर्वी उपरती होऊन लोकांच्या दबावामुळे ह्या कंपन्यांनी हिटलरने छळलेल्या ज्यू लोकांच्या वारसांसाठी एका निधीची निर्मिती करून त्यांना, भरपाई म्हणून पैसे दिले).
अशा वेगवेगळ्या मार्गाने हिटलरने त्याच्या देशाला, जर्मनीला, कह्यात घेतले. मानसिक हातचलाखी व नजरबंदीचे खेळ खेळून लोकांची विचार करण्याची, प्रश्न विचारण्याची क्षमता व सवय पूर्णपणे संपवली. आता हे नागरिक हिटलर म्हणेल तेव्हा व म्हणेल त्या गोष्टीला माना डोलवणारे अंध समर्थक बनले होते, अंधभक्त बनले होते. ह्यातूनच हिटलर बेबंद झाला, त्याच्यावरचा जनतेचा अंकुश संपून तो एक मदमस्त सत्ताधारी झाला. आणि ज्या जनतेने त्याला अनिर्बंध सत्ता दिली, त्यांच्यावरच वरवंटा फिरवायला तो मोकळा झाला.
उपसंहार
अनेक देशातले सत्ताधारी, आपापल्या प्रचारासाठी हेच टप्पे आणि मार्ग आजही अवलंबतात.
जिथे चूक दिसेल तिथे विचार व्हायला हवा. छुपे किंवा उघड होणारे खोटे प्रचार, राजकीय नजरबंदी व हातचलाखीचे खेळ ओळखून हुशारीने त्यावर व्यक्त होता आले पाहिजे.
अन्यथा नवे, आधुनिक काळातले आणखी भेसूर हुकूमशहा हिटलर आपणच जन्माला घालत राहू.
{fullWidth}