अनवट येसुदास

[वाचनकाल : ३ मिनिटे] 
संगीतात हरवलेल्या लहान मुलाची मुर्ती, Statue of boy lost in music

काही जण संगीतात जन्म घेतात. संगीतासाठी कठोर परीश्रम उपसून आयुष्यभर ते संगीताचा पाठलाग करत राहतात. संगीताची ही धुंद त्यांच्यातून कधी नष्ट होत नाही. संगीत म्हणजे गायन, वादन किंवा श्रवण . . . सर्वकाही! काही माणसांतून मात्र संगीत जन्माला येतं! काही झालं तरी संगीत जीवनभर त्यांचा हात सोडत नाही. आणि जर ज्यातून संगीत जन्म घेतं अशा माणसाने उभी हयात संगीताची कठोर तपश्चर्या करण्यात घालवली तर?
 
संध्याकाळचे ठोके पडतात. ‘सरगम संगीत अकादमी’तून ती बाहेर पडते. बसस्टॉपवर आपल्याच नादात हातवारे करत मनातल्या मनात धुन गुणगुणणारी ती आणि डोळ्यांच्या कोपऱ्यातून तिला तऱ्हेतऱ्हेनं निरखत थांबलेल्या पाचपन्नास आश्चर्यभरल्या नजरा. काही नोकरदार वर्गाचे पुरूष, एखादी प्रौढा, चार-दोन शाळकरी पोरं. अचानक वाऱ्यासारखी पळणारी एक काळी मोटरबाईक रस्त्यावर ब्रेक मारत थबकते. कॅमेरा खालून वर रोल होतो तशी गोऱ्यापान फारूख शेखची देखणी, ऐटबाज, हसतमुख मूर्ती डोळे दिपवते. क्षणार्धात आपल्यामागं दीप्ती नवलला बसवून तंबोरा-तबल्याच्या एका उत्फुल्ल वेगवान लयीसह तो काळ्या मोटरबाईकला टाच मारतो नि बघ्यांचा घोळका नवलानं बघतच राहतो!

काली घोडीपे गोरा सैया चमके,
कजरारे मेघामें बिजुरी दमके,
सुधबुध बिसरी गई हमरी!
बरजोरी सैंया ले जावे,
चकित भई सगरी नगरी, ध ध ध!
लाज चुनरिया उड उड जावे,
अंग अंग पी रंग रचावे,
उनके कांधे लट बिखरी!
काली घोडी दौड पडी!

‘चष्मेबद्दूर’ सिनेमातल्या फारूख-दीप्ती यांच्या गुलजार अभिनयासह ‘काली घोडी द्वार खडी’ ही विलोभनीय स्वररचना म्हणजे संध्याकाळचा सगळा थकवा दूर फेकून देणारी ‘ऑल टाईम फ्रेश ब्रिझ् ऑफ एअर’! आणि हे संगीत गळ्यातून स्त्रवलेल्या गायकानं २००१ मध्ये ‘रेडिफ डॉट कॉम’ला मुलाखत देताना काहीसं संकोचून म्हटलं होतं, “आय डोन्ट सिंग ट्रेन्डी म्युझिक”!
     त्याला आपल्या संगीतात ‘कल्ट म्युझिक’ निर्माण करण्याची क्षमता आहे याची कदाचित पुरेपूर जाणीव होती, त्याच्या चाहत्यांना वर्षानुवर्षं होती तशीच. या घटनेच्या आदल्याच वर्षीपासून या गायकाच्या नावे सुरू झालेला ‘स्वरालय येसुदास पुरस्कार’ पुढं २००६ साली खुद्द त्याच्याचकडून स्वीकारताना ‘ए.आर. रहमान’नं जणू स्वप्नातल्या परीच्या जादूच्या छडीला हात लावायला मिळाल्यावर आनंदलेल्या लहान मुलासारखे उद्गार काढले होते, “तीन वर्षांचा असल्यापासून मी त्यांची गाणी ऐकत मोठा झालोय . . .”
     ‘अ नेम दॅट स्पेल्स मेलडी’ या शब्दांत ‘द हिंदू’ सारख्या प्रख्यात वर्तमानपत्रानं जिला गौरवलं, तब्बल ५ राज्यांनी अमाप मानसन्मान देत जिच्यावर ४३ राज्य पुरस्कारांचा वर्षाव केला, भारत सरकारनं १९७३ पासून २०१७ पर्यंत ५ वेळा फिल्मफेअर, ८ वेळा राष्ट्रीय पुरस्कार पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण यांसह जिला अविरत नावाजलं, जिच्या आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय संगीत प्रसाराच्या भरीव कामगिरीला युनेस्को-सीएनएननंही मानवंदना दिली ती ही व्यक्ती म्हणजे ‘डॉक्टर कट्टासरी जोसेफ’ ऊर्फ ‘के. जे. येसुदास.’
     येसुदास . . . यशाचं एक चकाकतं शिखर. ‘दासेत्तन’, ‘गानगंधर्वन्’, ‘अस्थान गायकन्’, ‘कल्चरल आयकॉन ऑफ केरला’ अशा नानाविध उपाध्या-बिरूदांना ज्या नावानं शृंगारलं, ते नाव. २००६ मध्ये चेन्नईच्या एव्हीएम स्टुडिओत एकाच दिवशी १६ भिन्न भाषांमध्ये गायल्याचं रेकॉर्ड आजही ज्याच्या नावावर अबाधित आहे, ते नाव.
     शाळेत असताना वर्गातल्या तुमच्या आवडत्या मुलीला तुम्ही कधी तुमच्या स्वप्नात हाक मारलीय का? येसुदासची गाणी म्हणजे या अमूर्त हळुवार प्रेमभावनेचं मूर्त व्यक्तिमत्त्व . . .

सुनयना, सुनयना!
इन नजारोंको तुम देखो
और मैं बस् तुम्हे देखते हुए देखूं . . .
ऊंचे महलके झरोकेसे तुम, अंबरकी शोभा निहारो जरा,
रंगोंसे रंगोंका यह मेल जो, आंखोंसे मनमें उतारो जरा, सुनयना, सुनयना!
दूर आसमानको तुम देखो
और मैं बस् तुम्हे देखते हुए देखूं . . .

हृदयाच्या गाभ्याला स्पर्शणाऱ्या या हाकेमागं आस कसली? तर फुलांच्या पाकळ्यांहून सुंदर पापण्यांनी झगमगत्या ताऱ्यांची आरास न्याहाळत गोड स्वप्नांत गुंतलेल्या तिला ‘पाहण्याची’, फक्त मन भरून पाहण्याची!
     कसलीही उत्तान अश्लीलता नाही, उच्छृंखल शृंगारिकता नाही. धिस् इज् येसुदास.

सब तिथियनका चंद्रमा जो देखा चाहो आज,
धीरे धीरे घुंगटा उठाओ सरताज!
चांदजैसे मुखडेपे बिंदिया सितारा!
सागर सागर मोती मिलते, परबत परबत पारस . . .
तनमन ऐसे भिजे जैसे, बरसे महुवे का रस!
कस्तुरीको खोजता है फिरता यह बंजारा . . .!

अशी ‘ती’ कुणी रूपगर्विता नाही, रूढ अर्थानं चंद्रमुखी लावण्यखणीही नाही. आपल्या सौंदर्याची मुळी जाणीवच नसणारा तो एक कोरीव कस्तुरीमृग आहे!

तुझे देख कर जगवालेपर यकीन नहीं क्यों कर होगा?
जितकी रचना इतनी सुंदर, वह कितना सुंदर होगा . . .

अशी आहे येसुदासनं आपल्या सुरावटींतून उभारलेली ‘ती’! जिची एक छबी कैद करण्यासाठी दर्पणानेही तळमळावे अशी ती अंगणातली तुळस. तिच्या रूपाच्या रसगंगेला सामावून घेणारा सागर भाग्यशालीच. तिचं अस्तित्व म्हणजे त्याच्या रेताड भावविश्वात हळुवारपणे झिरपत जाणारा अल्लड झरा. आपल्याला हळव्या स्वरात ‘संगेमरमरपे लिखी शोख गजल’ संबोधून जाणाऱ्या नायकाला शरमेनं भिजून तिनं काय उत्तर द्यायचं? सौंदर्य बघणाऱ्याच्या नजरेत असतं आणि सच्च्या प्रेमाचा रंग शरीरमनावर चढतो हे आजवर ऐकत आलेली ती त्याच्या भाविकतेपुढं शरण जाते आणि,

आपकी महकी हुई जुल्फको कहते हैं घटा,
आपकी मदभरी आंखोको कमल कहते हैं

हे तिचं रूप त्याच्या ‘चाहतभरी नजरोंका अंमल’च आहे असं हळुचकन् बोलून जाते. तिची ती लाज पाहून आवरता येईल ते मन कसलं? प्रीतीच्या कैफात त्याचं अस्तित्व तिच्या मोहरलेल्या चर्येभोवती अलगद फिरणारी एक समईच बनून जातं आणि मग तो अधीरपणे जणू तिच्या कानात गुंजतच राहतो ‌. . .

महकी फिजाने, चंचल हवाने,
तुझहीसे सीखे है नाजोअंदाज नये . . . जानम, जानम!


– क्रमश: 




आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال