
काळीभोर, तांबडी, लाल, रेताड, मुरमाड, सुपीक, नापीक, चिकट, खडकाळ, भुरी, खारी, कसदार, पाणथळ कितीतरी जमिनी. त्या त्या जमिनीत फुटणारी बीजं. हरेक बीजाला जमीन गवसतेच असं नाही. गवसली तरी बीज नुसतं बीजचं राहतं, काळाच्या अंतापर्यंत किंवा जमीन अनुकूल होईपर्यंत, जमिनीचा कौल येईपर्यंत . . .
मला स्वप्न पडलंय. तुझ्या विस्तीर्ण पाठीवर मी उन्हात एकटा उभाय. बिंदूमात्र.
तेव्हा कळतं तुझा रंग जमिनीसारखाय. जमिनीच्या रंगाची पोर तू. तुझ्या विस्तीर्ण पाठीवर उन्हात मी दुष्काळासारखा उभा. आणि स्वप्नात समजतं मला तुझ्यात रुजायचंय. आणि भेगाळलेल्या जमिनीत मी शांतपणे उभा.
माझ्या इतकीही जवळ येऊ नकोस. त्रासदायक आहे माझ्यासाठी.
काळीशार, लालभोर, मुरमाड, रेताड, भुरकट, फुफाटा कितीतरी जमिनी. तुझी – ज्यात मी उभाय ती – गव्हाळ. उन्हात रापलेली. ज्यात तुझा गंध भरतोय फुफ्फुसात वाऱ्यावरचा. मी प्रवासास निघालेलो, तुझ्या खोल डोळ्यांतल्या, सावलीच्या शोधात; पण इथं एकही झाड नाही. परिणामी मलाच उगायचंय तुझ्यात. मी ठरवतो.
मी ठरवून न ठरवून काय होतं? पण एक सांगतो मी ठरवून मशागत करायला जाणार नाही आणि पाट पाडायला राबणार नाही, तुझ्या डोळ्यांत मी स्वप्न का पेरु? तू उगमस्थान आहेस. तू ठरव.
मी नको म्हणताना तू आणलंस ना तुझ्यात मला? मी जातो म्हणताना थांबवलस ना मला डोळ्यांच्या आर्जवांनी? मला अंकुर फुटू द्यायचा की नाही याचा निर्णय तुझ्या हातात ठेवलास ना माझे आई? सगळं तुझंच आहे ना तर आता फक्त एकदा मी म्हणतोय म्हणून मल्हार गा. एकदा पाऊस बरसव . . . तुझी धूप होईल असा सोसाट्याचा नको, माझी नासाडी होईल असा गारपीटीचा नको. निवांत संततधारेचा, अक्राळ-विक्राळ वळीव मागव.
त्यात मी भिजेन तू शांत, गार हो. तुझी शीतलता, तुझं असणं माझ्या पायातून डोक्यापर्यंत चढत येऊ दे. माझे पाय काय संपूर्ण मीच धसेन इतकी ओल आहे तुझ्या गव्हाळ जमिनीत, मी जाणतो. मला ओल दिसू दे ती तुझ्यातली. कारण, मला स्वप्नात कळतंय मला झोप लागत नाहीये. मी तसाच उभा आहे. मला मातीत झोपायचंय. रंध्रारंध्रातून ती धमण्यांत वाहिली पाहिजे इतपत रूजायचंय.
नंतर असं वाटतं चंद्रप्रकाशात माती ओढून मी झोपलोय ढगातल्या चांदण्या पाहत गारव्यातल्या मग अचानक पुनः तुझ्या विस्तीर्ण पाठीवर मी उन्हात एकटा उभाय.
पण पाऊस येत नाही.
आणि कधी येणारही नाही तो जर हे आत्ताच माहीत असेल तुला तर, इतकी जवळ येऊ नकोस. भिनू नकोस माझ्यात. त्रासदायक आहे माझ्यासाठी.
मला जाग आल्यासारखं होतं, मला जागं व्हायचंय कळतं मात्र जाग येत नाही. अस्वस्थता. अस्वस्थता.
हे सगळं मी माझ्या विचारात उभं केलेलं जग कोसळताना कोसळेल माझ्यावरच. या जमिनीत भूकंप झाला तर ती पोटात घेणार मलाच. परंतु, तसं पोटात जाणं घडणं नको. तू यातलं काही रोखणार नाहीस, मलाही माहीत आहे. तरी वास्तव खाडकन मुस्काट फोडून उठवणार या आधी तू हलकेच गाऊन जागं करशील? दिशांचा अंदाज येत नाहीये मला इथे तो मिळवून देशील? मी निघेल नक्की तू बांधापर्यंत तरी सोडायला येशील?
येणार नाहीस. आपला भूतकाळ हा तुझ्या वर्तमानातील हट्टीपणाची तशीच माझ्या मानसिक कोंडीच्या परतीची पूर्वसूचना.
मीही तसाच घट्ट उभा, तुझ्या मातीचा गंध पसरताना. तेव्हा कळतं तुझा रंग जमिनीसारखाय . . .
जागेपणी मी ठरवतो – आज लिहायचं नाही. त्यानंतर मी पुस्तकात डोकं घालतो का उखळात डोकं घालतो? घराबाहेर निघतो का बेघर होतो? पुलाखाली गणपतीच्या सरावाचे ताशे ऐकतो का ताशाच्या काड्यांचे मेंदूवर आघात करतो? रेल्वे स्टेशनावर जातो का गर्दीत एकटेपण घेऊन उभा राहतो? मित्राकडे जातो का तुझ्याकडे येतो? त्या समोसावाल्याच्या भट्ट्या बाहेर पेटल्याहेत का माझ्या आत? मी बँकेबाहेरच्या तळघरातील पायऱ्यांवर फाटक्या कागदावर उसनवारीच्या पेनने तुझ्यावर लिहितो का मल्हाराची पूर्वतयारी करतो? काही काही कळत नाही. संभ्रम संभ्रम संभ्रम.
इतकं कळतंय फक्त, मी जागा झालोय तरी ऊन तसंच आहे अजूनही तुझ्या विस्तीर्ण रुंद पाठीवर. तुझा रंग अजूनही जमिनीसारखा आहे. मी एकटा उभा आहे अजूनही. माझं लिहून होत आलंय तुझ्या पाठीवरचं सुक्त. फक्त पाऊस अजूनही आलेला नाही.
मी नक्की जमिनीवर आहे का जमिनीच्या पोटात? संभ्रम संभ्रम संभ्रम.
मी तुला जमीन म्हणालो तुझ्यात रुजायला मला बीज म्हणालो, अंकुर फुटणे हे स्वप्न म्हणालो यात अश्लील काही आहे? काय आहे? आणि नव्याने जन्म घेणं अश्लील असल्यानंतर श्लील काय उरलं या जगात?
या दूर दूर पसरलेल्या जमिनीवर मी कधीपर्यंत राहीन? एकतर बरस किंवा मला पाण्याची आशा दाखवणं सोड तू आता. मला कळतं पण वळत नाही म्हणून झगडतोय तुझ्याशी, तोपर्यंत ठीक आहे, मला ज्या दिवशी वळेल त्या दिवशी काय होईल? विचार केलाहेस? मी निघेन इथून तेव्हा तुझ्या पायाखालची जमीन जागेवर राहील?
राहणार असेल तर मी इथं थांबण्यात मजा नाही. पण घसरणार असेल तर निश्चित राहीन असाच, तुझी पर्वा करत मी उभा उन्हात. कारण, तू माझी जमीन आहेस. तुला बीजं काय खूप मिळतील इथंतिथंकुठंही अशीतशीकशीही आतानंतरकधीही पण मी जमीन कुठून आणू माझी जमीन एकदा हरवली तर?
{fullwidth}