अनवट येसुदास – भाग २

[वाचनकाल : ४ मिनिटे] 
संगीतात हरपलेल्या मुलाचा पुतळा, Statue of a boy lost in music

ते वसंतातल्या प्रथमभेटीचं रानभूल हरखलेपण असो की हृदयातून फुटलेला मदनार्त हाकारा, वीट वीट करून एकत्र रचलेलं स्वप्नमहालांचं बांधकाम असो की वीणेच्या चढत्या सुरांसोबतचे थरथरते कबुलीजबाब किंवा मग वाटेवर वाजणाऱ्या पावलांच्या चिरंतन प्रतीक्षेत फत्तर झालेले डोळे . . . येसुदासच्या आवाजात यत्किंचितही भग्नता आढळत नाही! इच्छांची कलेवरं वेचतानाही हा आवाज मृदू-ऋजू कसा राहू शकत असेल? या स्वरांचा एकेक पापुद्रा उलगडून पाहताना जे जाणवतं ते मोहमयीच.

ऐन वसंतॠतूत समागमाची नशा चढून साथीदाराला पुकारणाऱ्या एखाद्या पक्ष्याचा किलबिलाट ऐकत राहावासा वाटतो तशाच येसुदासच्या गीतांतले हाकारेसुध्दा भुलीत पाडतात.

तेरे बिन सूना मेरे मन का मंदिर, आ रे आ रे आ
ओ सजना आ रे आ, आ रे आ!
ओसकी बुंदे, अंखिया मुंदे, कलियोंका शृंगार करे . . .
फूल चमनसे, महक पवनसे, लहरे पटसे प्यार करे . . .
मैं अकेला पंछी जैसा, धुंडू तेरे मनका बसेरा,
ओ सजना आ रे आ, आ रे आ!

यातली ‘आ रे आ’ ही पुनरूक्ती अक्षरशः मोहिनी घालणारी आहे. हे ऐकून तर फत्तरदिलाच्या प्रेयसीलाही पाठ वळवून चालू पडणं निव्वळ अशक्य!

समयका आंचल, थामके पल पल,
उमर चली है जाने कहां . . .
पर मैं ठहरा, एक जगहपर,
बाट निहारू तेरी यहां . . ‌.

या त्याच्या चिरंतन प्रतीक्षेची धग तिच्या काळजाला हात घालणार नाही?      
     वीणेच्या चढत्या सुरांसोबतचे काही थरथरते कबुलीजबाब तर येसुदासच्या युगुलगीतांमधूनच ऐकले पाहिजेत.

साजन यह मत जानियो, तुमबिछुरे मोहे चैन,
जैसे बनकी लाकडी, सुलगत हो दिनरैन,
कजरेकी बांती असुअनके तेलमें,
आली मैं हार गयी अंखियोंके खेलमें . . .

या नायिकेच्या मृदू विनवणीवर नायकाचं मिष्किल उत्तर पाहा,

चंचलसे नैनोंमें काजलको आंजकर,
बिखरी इन पलकोंमें रजनीको बांधकर,
सिंदुरी आंचलमें तारोंको टांककर,
अधरोंके प्यालोंमें चुंबनको ढालकर,
अटकाकर सबके मन, प्रीतकी गुलेलमें,
मारी न जाओ कहीं अपने इस खेलमें!

१० जानेवारी १९४०ला केरळच्या फोर्ट कोचीनमध्ये प्रसिद्ध मल्याळम संगीतनाटक अभिनेता आणि शास्त्रीय संगीतकार ‘ऑगस्टिन जोसेफ’ यांच्या पोटी जन्मलेल्या येसुदासनं सुरांचं ग म भ न गिरवलं ते घरातच. वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी त्रिवेंद्रम संगीत अकादमीत सुवर्णपदक पटकावणारा येसुदास पुढे ‘श्रीवेचुर हरिहरा’, सुब्रमण्यम अय्यर’, ‘कुंजन वेलू भागवतार’ आणि ‘चेंबई वैद्यनाथ भागवतार’ यांच्या हाताखाली कर्नाटकी संगीत तर शिकलाच, पण त्याहीपुढं जात त्यानं शास्त्रीय हिंदुस्थानी संगीतही आत्मसात केलं.

आई हो जो मनमें, आ जाओ जीवनमें,
जीवनको जीवन मिले!

किंवा

चलना तुझे होगा . . . रूकेंगे न तेरे लिए ये समयके तरंग!

किंवा

जाने ना तू गमकी गहराईयां,
आजा खटखटा ले मेरी तनहाईयां . . .

अशा अगणित सुरेल मौक्तिकमाला त्याच्या गीतांमध्ये विखुरलेल्या सहज सापडतील. ‘पोथी पढ पढ जगमुआ पंडित भया न कोय, ढाई अक्षर प्रेमका पढे सो पंडित होय' असे रेखीव आरंभचरण असोत की ‘नि स ग म प नि सा रे ग!’ सारखी एखादी लांबलचक सुरेल तान, येसुदासचा एकही सूर वरखाली होत नाही आणि दाक्षिणात्य हेल तर अजिबात जाणवत नाही.
     येसुदासच्या आवाजात यत्किंचितही भग्नता नाही. त्याच्या एकेक सुरातून कमालीची आत्मसंतुष्टी पाझरते आणि ती आपल्या हृदयात घर करून तासंतास रेंगाळत राहते.

तू जो मेरे सूरमें, सूर मिला ले, संग गा ले,
तो जिंदगी हो जाये सफल . . .

या गीतात बासरीच्या सुरांत मिसळणारे येसुदासचे आलाप एक अवीट गोडीचा शांतरस निर्माण करतात. चांदण्या रात्री हातात हात गुंफून एकमेकांच्या डोळ्यांत बुडून गेलेल्या दोन प्रेमी जीवांचं हे आदर्श युगुलगीत. परस्परांच्या नजरेत बुडलेले हे दोघे मिळून सुखी संसाराची स्वप्नं रचतात. एकत्र मिळून करायच्या कष्ट-त्यागांच्या हसत हसत आणाभाका घेतात. या दोघांसाठी एकमेकांचा स्पर्श, एकमेकांचा सहवास हेच परमोच्च कोटीचं सौख्य. त्यामुळे त्यांच्या स्वरातही ‘क्यों हम बहारोंसे खुशिया उधार ले?’ हा नाचरा आशावाद आहे.

आजसे पहले, आजसे ज्यादा,
खुशी आज तक नहीं मिली!
इतनी सुहानी, ऐसी मिठी,
घडी आजतक नहीं मिली!
इसको संजोग कहे या किस्मत का लेखा . . .
हम जो अचानक मिले हैं?

अशा प्रथमभेटीचं हरखलेपण असो की,

जीवनपथपे एक रथके दो पहिये बन चलते जाए,
प्रीतके बंधनमें बंधके हम दोनों एक नजर आए . . .

अशा स्वप्नमहालांचं बांधकाम. हे सारं येसुदासच्या निरागस आवाजात ऐकणं हा एक निर्भेळ आनंद आहे.

खुशियांही खुशियां हो दामनमें जिसके,
क्यों ना खुशीसे वह दीवाना-हो-जाए?

अशी प्रेयसीचे हात पकडत साधलेली सुंदर अवखळ लय असो की,

उंची-नीची लहरोंके कांधेपर चढके,
नैय्या मेरी चली, सबसे आगे बढके, है हो!

ही तुफानांशी बाजी लावून जिंकण्याची जबरदस्त जिद्द! किंवा मग,

जी करता है मोरके पांवमें पायलिया पहना दूं . . .
कुहू कुहू गाती कोयलियाको फुलोंका गहना दूं!
गोरी तेरा गांव बडा प्यारा, मैं तो गया मारा, आके यहा रे! उसपर रूप तेरा साधा, चंद्रमा जो आधा आधा जवां रे!

असं एखाद्या चंचलेच्या गावरान माधुर्याचं नवख्या शहरी नजरेला वाटणारं अप्रूप, येसुदास साऱ्या तरल भावभावनांचे हिंदोळे लीलया सुरांत पकडतो. मात्र त्याच्या आर्जवी स्वरात क्वचितच पाहायला लाभणारी सालस शृंगारिकता शब्दशः झपाटून टाकणारी आहे!

जिद ना करो, अब तो रूको, यह रात नहीं आएगी . . . माना अगर, कहना मेरा, तुमको वफा आ जाएगी!
सजदा करू, पूजा करू, तूही बता क्या करू?
लगता है यह, तेरी नजर, मेरा धरम ले जायेगी . . .
ऋतभी अगन, तपता बदन, बढने लगी बेखुदी
अब जो गए, सारी उमर, दिलमें कसक रह जाएगी!

या रचनेची सर फक्त आणि फक्त फरिदा खानमचं ‘आज जानेकी जिद ना करो’ आणि श्रेया घोषालचं ‘सिंगारको रहने दो’ या दोनच गीतांना गाठता येऊ शकेल.

तेरी तस्वीरको सीनेसे लगा रखा है,
हमने दुनियासे अलग गांव बसा रखा है . . .
तुझे दिन रात खयालोमें है पूजा मैंने,
तेरे पैरोंके निशांपर किया सजदा मैंने,
बंदगीमें तेरी सर अभी झुका रखा है,
हमने दुनियासे अलग गांव बसा रखा है . . ‌.

बोल वाचताच अशा रचना किशोरकुमारच्या खड्या मनमोकळ्या आवाजाकरता रचल्या असाव्यात असं भासून जातं, पण तबल्यावर चक्क भजनाचा ताल नि वीणेची साथ घेऊन येसुदास ह्या गीताचा बाजच बदलून टाकतो. ‘नाचीज’ला ‘फनकार’ बनवून जाणारी ती त्याची केवळ प्रेयसीच नाही तर प्रेरणा आहे. आपल्या फक्त ‘असण्या’नं आपण त्याच्या नशिबाच्या रेषा पालटवून गेल्याचं तिच्या कदाचित ध्यानीमनीही नाही. त्यानं मात्र तिचा एकेक बोल हृदयात साठवलाय, आपल्या एकेक गीतात तो तिचीच प्रतिमा विणत गेलाय, दूरवरून वर्षानुवर्ष तिलाच हाका मारत राहिलाय,

किसलिए तुने मुझे गैर बना रखा है?
तेरी तस्वीरको सीनेसे लगा रखा है . . .

– क्रमश:


• संदर्भ :

• वाचत रहा :


आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال