स्त्रीस्वास्थ्य भाग-२ (‘थायराॅईड’चे विकार)


Your Image Alt Text
थायरॉइडची एक समस्या ही की, हा आजार झालेल्या एकतृतियांश व्यक्तींना ‘त्यांना हा आजार झाल्याची’ कल्पनाच नाही!

आईमध्ये थायराॅइडचे प्रमाण कमी असेल तर ते बाळालाही मिळणार नाही, परिणामी बाळ मतिमंद होऊ शकते. गर्भावस्थेत दर महिन्याला थायराॅईडचे प्रमाण वेगवेगळे असते. ते डाॅक्टरांनी सांगितल्याप्रमाणे असायला हवे. त्यासाठी ‘थायराॅईड अँटीबाॅडी’ नावाची तपासणी करून घ्यावी लागते.महिलांमधील संप्रेरक बदल (Hormonal changes) भाग – २


थायराॅईड :

‘थायराॅईड’ ही एक लहान ग्रंथी मानेच्या खालच्या भागात स्थित असते. चयापचय क्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही ग्रंथी ‘थायराॅक्झिन’ या संप्रेरकाचे उत्सर्जन करते. हे संप्रेरक शरीरातील पेशींना किती उर्जा वापरायची ते सांगते. शरीराची चयापचय क्रिया (Metabolism) समाधानकारक गतीने सुरू ठेवण्यासाठी आवश्यक प्रमाणात संप्रेरक तयार करण्याचे व जसजसे ते वापरले जाईल तसतशी त्याची भरपाई करण्याचे काम थायराॅईड ग्रंथी करते.

मात्र संप्रेरकाचे हे प्रमाण संतुलित रहायला हवे, तसे न झाल्यास मेंदूच्या खालच्या भागात स्थित असलेली ‘पिट्यूटरी’ ग्रंथी (Pituitary gland) संप्रेरकाचे अतिप्रमाण किंवा कमीप्रमाण याची जाणीव करून घेते आणि ती आपले संप्रेरक टिएसएच (TSH – Thyroid Stimulating Hormone) तयार करून थायराॅईड ग्रंथीला पाठवते.

महिलांमध्ये चाळीशीनंतर संप्रेरकांच्या असंतुलनामुळे थायराॅईड ग्रंथीचा आजार जास्त बळावू शकतो. त्यामुळे मासिक पाळी अनियमित होणे, बद्धकोष्ठता, केस गळती, नैराश्य वाटणे, थकवा, थंडीचा त्रास, हृदयाची गती मंदावणे, वजन कमी किंवा जास्त होणे, गळ्याखाली सूज येणे असे परीणाम शरीरावर होताना दिसतात. असे झाल्यास हे थायराॅईड संप्रेरकाचे असंतुलन आहे असे समजावे आणि वैद्यकीय सल्ला घ्यावा.

अशावेळी टीएफटी ही चाचणी केली जाते, ज्यात टी३, टी४ व टीएसएच (थायराॅईड संप्रेरकाचा एक प्रकार) या तीन चाचण्यांचा समावेश होतो. चाचणीत संप्रेरकांची पातळी कमी किंवा जास्त झालेली आढळल्यास औषधोपचार केला जातो.

थायराॅईडचा आजार हा गर्भवती महिलांना देखील मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता असते. कारण पहिल्या तीन महिन्यात बाळाला आईकडूनच आवश्यक सर्व थायराॅईड संप्रेरक मिळत असते. जर आईमध्ये त्याचे प्रमाण कमी असेल तर ते बाळालाही मिळणार नाही, परिणामी बाळ मतिमंद होऊ शकते.

गर्भावस्थेत दर महिन्याला थायराॅईडचे प्रमाण वेगवेगळे असते. ते डाॅक्टरांनी सांगितल्याप्रमाणे असायला हवे. त्यासाठी ‘थायराॅईड अँटीबाॅडी’ नावाची तपासणी करून घ्यावी लागते. या तपासणीत जर संप्रेरकाचे प्रमाण कमी किंवा जास्त आढळून आले तर शक्य तितक्या लवकर उपचार करून घ्यावेत अन्यथा गर्भपात होणे, रक्तक्षय (TB), गर्भाशयात अडचणी तयार होणे, रक्तदाब (BP) किंवा प्रसुतीनंतर खूप रक्तस्त्राव होणे असे दुष्परिणाम होऊ शकतात.


खालील कारणांमुळे महिलांना थायराॅईडचा आजार होऊ शकतो :

 • तिशीच्या पुढील वयोमान
 • आयोडिनची कमतरता
 • अनुवांशिक असणारी थायराॅईडची समस्या
 • ‘टाईप-१’ मधुमेह (Type-1 Diabetes)
 • वंध्यत्व (Infertility)
 • वारंवार गर्भपात होणे (Miscarriages)
 • अती-लठ्ठपणा
 • काही औषधांचे दुष्परिणाम
 • कमी दिवसांची प्रसुती

अशा समस्त कारणांमुळे होणार्‍या थायराॅईड संप्रेरकाच्या असंतुलनामुळे शरीरावर जास्त वाईट परिणाम होऊ नये म्हणून नियमित थायराॅईडची तपासणी करून घेत जाणे इष्ट ठरते.


थायरॉइडचे प्रकार :

थायरॉइडची एक समस्या ही आहे की, हा आजार झालेल्या एकतृतियांश (१/३) व्यक्तींना ‘त्यांना हा आजार झाल्याची’ कल्पनाच नाही. हा आजार महिलांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो.

गरोदर महिलांमध्ये आणि प्रसूतीनंतर पहिल्या तीन महिन्यांच्या कालावधीत थायरॉइडची समस्या साधारणतः पंचेचाळीस टक्के (४४.३%) महिलांमध्ये आढळते.

थायरॉइडमुळे शरीर ऊर्जेचा वापर करते आणि त्याला उबदार ठेवते. म्हणजे, थायरॉइड शरीरासाठी एक प्रकारे उर्जा-पुरवठाधारक ‘बॅटरी’सारखे काम करते. या ग्रंथीमधून स्त्रवणारी संप्रेरके प्रमाणापेक्षा कमी किंवा जास्त प्रमाणात स्त्रवली तर थायराॅईडच्या आजाराची लक्षणे दिसून येतात.

थायरॉइड ग्रंथी शरीरासाठी आवश्यक असलेल्या संप्रेरकांची निर्मिती करू शकली नाही तर त्याला ‘हायपोथायरॉइडिझम’ असे म्हणतात. यात शरीराच्या इष्टतम कार्यक्षमतेपेक्षा कमी क्षमतेने शरीराचे कार्य सुरू असते. अशा रुग्णांना थकवा लवकर जाणवतो.

थायरॉइड ग्रंथी अति-क्रियाशील असेल तर ‘हायपर थायरॉइडिझम’ होतो. अति प्रमाणात ‘कॅफिन’चे सेवन केले असता व्यक्तीची जी परिस्थिती होईल, तशीच परिस्थिती ‘हायपर थायरॉइडिझम’च्या रुग्णांची होते.

तिसरा प्रकार म्हणजे थायरॉइड ग्रंथीला सूज येणे. याला गलगंड (गॉयटर) म्हणतात. हा आजार औषधांनी बरा झाला नाही तर शस्त्रक्रिया करावी लागते.


‘हायपो-थायरॉइड’ची लक्षणे :

 • वजन वाढणे
 • चेहरा, पाय यांना सूज येणे
 • अशक्तपणा जाणवणेया
 • आळस येणे, जास्त झोप येणे, जास्त थंडी जाणवणे
 • भूक मंदावणे
 • पाळीमध्ये बदल होणे
 • गर्भधारणेमध्ये समस्या उद्भवणे

‘हायपर-थायरॉइड’ची लक्षणे :

यात शरीराच्या आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात थायरॉइड संप्रेरके स्त्रवली जातात. परिणामी;

 • आहार सामान्य असूनही वजन कमी होते
 • अतिसार होतो, चिंतातुरता निर्माण होते
 • हात व पाय थरथरतातया
 • उष्णतेचा खूप त्रास होतो
 • स्वभावात तीव्र चढ-उतार होतात
 • झोपेत श्वसन बंद होणे (स्लीप ॲप्निया), हृदयाच्या ठोक्यांची गती कमी-अधिक होणे, दृष्टी धुसर होणे, विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम होणे (मेंटल फॉग)

इत्यादी लक्षणे दिसू शकतात.

‘हायपो-थायरॉइडिझम’ बहुतेक व्यक्तींमध्ये अस्तित्वात असतो. अनेकांसाठी या आजारावरील उपचार उशीरा सुरू होतात. थायरॉइडचा आजार असलेल्यापैकी दहा टक्के व्यक्तींना ‘हायपो-थायरॉइडिझम’ झालेला असतो. पण त्यांच्यापैकी निम्म्या व्यक्तींना याची कल्पनाच नसते. पुरुष आणि महिलांमध्ये थायरॉइडच्या आजाराची लक्षणे सारखी असली तरी महिलांमध्ये या आजाराचे निदान लवकर होते. तब्बल ऐंशी टक्के (८०%) महिलांना थायरॉइडचा आजार असू शकतो.

सामान्यपणे थायरॉइडचा आजार असलेले ८०% ते ९०% रुग्ण उपचारांनंतर पूर्ण बरे होतात. पण काहींच्या बाबतीत, ‘आजार पूर्णपणे बरा होत नाही’. काही रुग्णांच्या बाबतीत गुंतागुंत निर्माण होते. ‘हायपो-थायरॉइडिझम’च्या बाबतीत ‘ऑटो-इम्यून सिस्टिम’ (शरीरातील सुदृढ उतींवर आक्रमण करणारी शरीरातील प्रतिकारयंत्रणा) राहते. उपचार घेतल्यानंतरही इतर अवयवांवर ‘ऑटो-इम्यूनिटी’चे परिणाम दिसून येतात.

थायरॉइडच्या पातळीवर निश्चित उपचार करता येत नाहीत. ‘हायपो-थायरॉइडिझम’ म्हणजे टी३, टी४ची पातळी कमी होते. त्याच वेळी, थायरॉइडला चालना देणाऱ्या संप्रेरकाची पातळी वाढते. त्याचप्रमाणे ‘हायपर थायरॉइडिझ’मध्ये टी३, टी४ पातळी वाढते. सामान्य प्रकरणांमध्येही टीएसएच पातळी खाली जाते.

एक लिटर रक्तामध्ये ‘थायरॉइड युनिट्स’ची पातळी ०.५ मिली ते ५ मिली इतकी असावी. थायरॉइड ग्रंथीचे कार्य व्यवस्थित सुरू आहे की नाही हे टीएसएच पातळीवरून समजते. पण हे प्रमाण मुले, प्रौढ व्यक्ती आणि गरोदर महिलांमध्ये वेगवेगळे असते आणि वयानुसार बदलते.


अलीकडे असेही म्हणतात की, कुटुंबातील एका सदस्याला थायरॉइडचा आजार असेल तर त्या कुटुंबातील मुलांनाही तो आजार होण्याची शक्यता असते. दुर्दैवाने, या आजाराला रोखण्यासाठी कोणत्याही प्रतिबंधात्मक उपाययोजना अस्तित्वात नाहीत. आजार झाल्यावरच उपचार घेता येतात.

{fullWidth}

आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال