भारतातील पारंपरिक समाजव्यवस्थेमध्ये वेश्या वा कलावंतीण ही ‘अखंड सौभाग्यवती’ म्हणून संबोधली जाई. दक्षिण भारतात नववधूचे मंगळसूत्र कलावंतीण ओवून देत असे. मात्र काळाच्या ओघात वारांगना व गणिका हा भेद नष्ट होऊन त्यांची निर्भर्त्सना व अवहेलना होऊन त्यांना अमीर-उमरावांकडून उपमर्द सोसावा लागला.
चरितार्थासाठी तसेच अधिक धनाच्या वा मौल्यवान वस्तूंच्या मोबदल्यात प्रस्थापित झालेले दोन परक्या व्यक्तींमधील लैंगिक संबंध म्हणजे वेश्यावृत्ती वा वेश्याव्यवसाय, असे स्थूलमानाने म्हणता येईल. पैशाच्या आमिषाने, कमीअधिक प्रमाणात अनिर्बंधित स्वैर स्वरूपाचे कायमचे अथवा तात्पुरते लैंगिक संबंध ठेवण्याची पद्धत म्हणजे वेश्याव्यवसाय होय.
वासना ही मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मग ती वासना काही खाण्याबद्दलची असो, पैसा मिळवण्याबद्दलची असो किंवा देहाबद्दलची असो. ‘राहुल सांकृत्यायन’ यांच्या ‘व्होल्गा ते गंगा’ या पुस्तकामध्ये आदिमानव काळातील आपल्या वासनेचा स्पष्टपणे उल्लेख केला आहे. ज्यामध्ये प्रत्येक स्त्री आणि पुरुष एकमेकांसोबत समागम करत होते. त्यावेळी नाती पाहिली जात नसत. त्यानंतर मात्र संस्कृती आली आणि मानवाने आपल्या वासनेवर निर्बंध लावायला सुरुवात केली. परंतु, हे निर्बंध जेवढ्या मोठ्या प्रमाणात लावले गेले, तेवढ्याच मोठ्या प्रमाणात वासनेने उग्र रूप धारण केले. वेश्याव्यवसाय हा त्यापैकीच एक परिणाम.
फक्त स्त्रियांनी पुरुषांसाठी चालवलेला वेश्याव्यवसाय हाच आपल्याला बहुतेक करून माहिती असतो. परंतु काहीवेळा पुरुष सुद्धा या व्यवसायात ओढले जातात. त्यामध्ये समलैंगिक संबंधांसाठी असलेले वेश्याव्यवसाय जास्त असतात. तसेच, काही प्रमाणात उच्चभ्रू समुदायातील स्त्रियांकडून या प्रकारची मागणी असतेे, तेव्हा पुरुषांद्वारे हा व्यवसाय चालवला जातो.
शेतीने माणसाला स्थिर होण्यास भाग पाडले. या स्थिरतेमध्ये काही नवीन संकल्पना उदयास आल्या. जसे की लग्न. याआधी निसर्गनियमाप्रमाणे प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र होती व तिचे हक्क निर्विवाद होते. तिला हव्या त्या गोष्टी करता येत होत्या. मात्र लग्न या संकल्पनेने दोन व्यक्तींना एकमेकांशी असे बांधले की, त्यामुळे ते हक्क एकमेकांवर आधारभूत असे ठरू लागले आणि त्या व्यक्तींचे कामवासनेचे स्वातंत्र्य संपुष्टात आले. काही नात्यांमध्ये कामवासना ही निशिद्ध ठरवली जाऊ लागली. जसे की आई – मुलगा, वडील – मुलगी, भाऊ – बहीण. कारण, मानव कळपामध्ये राहत असताना या आजूबाजूच्या व्यक्तींसोबतच तो समागम करायचा. मग त्या दोन व्यक्ती एकमेकांसोबत कोणत्या नात्यात आहेत, हे पाहिले जायचे नाही. दुसऱ्या कळपातील परकीय व्यक्तीसोबत त्याचा फारसा संबंध येत नसे, त्यामुळे या नात्यांना पवित्र ठरवून महत्त्व दिले गेले. ज्याने मानवाची ही कामवासना नष्ट होईल. त्यानंतर हे निर्बंध आणखी वाढवून, नात्यांमधील भाऊ – बहिणीत प्रस्थापित कामवासना संपुष्टात आणण्यात आल्या. परंतु आज जर आपण सत्य परिस्थिती पाहिली, तर या नात्यांमध्ये, या भावना जास्त खुललेल्या आढळतात. मात्र त्या उघड होत नाहीत. याप्रकारे मानवामध्ये कामवासना निर्माण तर होत राहिल्या परंतु त्यांचा उपभोग घेण्यासाठी पर्याय कमी होत गेले आणि त्याचे मन असंतुष्ट राहू लागले. त्यातूनच हा वेश्या व्यवसाय सुरू झाला. हा व्यवसाय प्रत्येक समाजाची गरज म्हणून पुढे आला व प्रत्येक समाजामध्ये त्याचे अस्तित्व दिसून येते. परंतु या व्यवसायामध्ये असणाऱ्या स्त्रीला मात्र अत्यंत हीन वागणूक मिळते.
वेश्याव्यवसाय जगातील सगळ्यात पुरातन व्यवसाय मानला जातो. ग्रीक व रोमन काळांतील ग्रंथांमध्ये वेश्यावृत्तीचे उल्लेख आढळतात. प्राचीन काळातील ग्रीक व सायप्रसमधील संस्कृतींमध्ये विवाहयोग्य स्त्रियांना हुंड्याची रक्कम जमविण्यासाठी वेश्याव्यवसाय पत्करावा लागे. बॅबिलोनियन संस्कृतीमध्ये विवाहापर्वी मुलींना ‘इश्तार’ या देवतेला अर्पण करीत व तेथील राजपुरोहिताबरोबर संबंध आल्यानंतर ती विवाहयोग्य समजली जाई. ‘इश्तार’ ही सुफलतेची देवता मानली होती व तिच्या मंदिरात धार्मिक मान्यतेने वेश्याव्यवसाय चाले.
प्राचीन काळात चीनमध्ये वेश्यांची वस्ती वेगळी व विशिष्ट ठिकाणी असे. त्यांना विवाह समारंभात विशेष महत्त्व असे व नवविवाहित दांपत्याबरोबर अनेक रखेल्या पाठवल्या जात. रूढी व परंपरेमुळे ही प्रथा समाजात दृढमूल झाली. जपानी संस्कृतीमध्ये कुटुंबसंस्थेच्या संवर्धनाला अतिशय महत्त्व होते. आपल्या मातापित्याचे व भावंडांचे पालनपोषण करण्यासाठी जी स्त्री शरीरविक्रय करी, तिला ‘जोरो’ असे संबोधले जाई व तिची प्रतिष्ठा कमी होत नसे.
प्राचीन ग्रीक समाजात ‘हेटीअरी’ (चांगल्या मैत्रिणी) हा उच्चवर्गीय वेश्यांचा प्रकार होता. त्यांची राहणी विलासी असे. ‘डिमॉस्थिनीझ’ (इ.स.पू. ३८४-३२२) ह्या अथेनियन वक्त्याचे उद्गार असे काहीसे होते ‘हेटीअरी ह्या आपण सुखाच्या अपेक्षेने पदरी बाळगतो, रखेल्या ह्या आपल्या दैनंदिन व्यक्तिगत देखभालीसाठी असतात, तर पत्नी वैध संतती देण्यासाठी व इमानेइतबारे कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी असते’. रोममध्ये वेश्याव्यवसायाला प्रतिष्ठा होती; पण त्यांना विशिष्ट कपडे वापरावे लागत आणि केस तांबूस, पिंगट रंगात रंगवावे लागत. तसेच वेश्यांना गावातील विशिष्ट भागात वास्तव्य करावे लागे, वेश्याव्यवसायासाठी परवना घ्यावा लागे व वेश्यांच्या उत्पन्नावर कर आकारला जाई.
भारतीय समाजात वेश्याव्यवसाय फार प्राचीन काळापासून प्रचलित असल्याचे उल्लेख प्राचीन ग्रंथांत आढळतात. ऋग्वेदात अशा स्त्रीला ‘साधारिणी’ म्हणून संबोधले जाई. पुरुषांना, विशेषत: धनिकांना, अमीर-उमरावांना कामवासनेच्या पूर्तीसाठी रखेल्या ठेवण्याची किंवा वेश्यांकडे जाण्याची मुभा होती. ‘धर्मसूत्रा’त वेश्यांसंबंधी अनेक विचार प्रकट केलेले आहेत. गौतम धर्मसूत्रात वेश्याव्यवसायाबद्दल माहिती आहे. अशा स्त्रियांच्या दयनीय अवस्थेबद्दल उल्लेख करून त्यांच्या विविध स्तरांची कल्पना धर्मशास्त्रात दिलेली आहे. गौतम ऋषींनी ‘दासी’, ‘गणिका’ व ‘पण्य स्त्री’ असे वेश्यांचे वर्गीकरण दिले आहे. दासी ही एकाच पुरुषाची सेवा करणारी, तर पण्य स्त्री सामान्य श्रेणीची वेश्या मानली जाई. नृत्य-गायनात व इतर कलांमध्ये कुशल असणारी गणिका उच्च श्रेणीची मानली जाई. ‘मृच्छकटिक’ या संस्कृत नाटकातील नायिका ‘वसंतसेना’ ही गणिका सुसंस्कृत व कलावती म्हणून वर्णिली आहे.
बौद्ध काळात (इ.स.पू. ७००-५००) अनेक धार्मिक व सामाजिक स्थित्यंतरे घडली. बौद्ध मठांमध्ये गणिकांना प्रवेश दिला जात असे. जातककथांमध्ये तसेच अन्य बौद्ध वाङ्मयातही ‘आम्रपाली’ या नृत्यनिपूण गणिकेसंबंधीचे उल्लेख आढळतात. सुमारे पाचशे वर्षे बौद्ध धर्माचा अंमल भारतीय समाजावर राहिला, त्या काळात वेश्येला बहिष्कृत केले जात नसावे. गणिकेला सामाजिक प्रतिष्ठा होती. गणिकेला राजाकडून सन्मान व गुणीजनांकडून प्रशंसा लाभत असे, असा उल्लेख नाट्यशास्त्रात आढळतो. ती अभिगमनास व चिंतन करण्यास योग्य अशी असावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.
कौटिलीय अर्थशास्त्रात (इ.स.पू. चौथे शतक) वेश्यांचे नऊ वर्ग वर्णिले आहेत. तसेच वेश्याव्यवसायाचे नियंत्रण करण्यासाठी नियमावली दिली आहे. वेश्यांच्या उत्पन्नावर करवसुलीचा अधिकार राजाला असल्याचे नमूद केलेले आहे. वात्स्यायनाने रचलेल्या कामसूत्र (इ.स. तिसरे वा चौथे शतक) ग्रंथातील ‘वैशिक’ या अधिकरणामध्ये विविध प्रकारच्या वेश्यांसंबंधी माहिती आली आहे. या काळात वेश्यागमन जरी समाजमान्य असले, तरी विविध जातींच्या वेश्यांना वेगवेगळे स्थान असावे. कामसूत्रामध्ये कुंभदासी, परिचारिका, स्वैरिणी, कुलटा, नटी, शिल्पकारिका, रूपाजीवा व गणिका असे वर्ग नमूद केले आहेत. ज्या वेश्येला चौसष्ट कला अवगत आहेत. ती ‘गणिका’ होय. या काळातील समाजव्यवस्थेत वेश्याव्यवसायाला विशिष्ट स्थान व दर्जा दिलेला आहे. समाजाचे ते एक अविभाज्य अंग असावे.
जैन राजांच्या कारकीर्दीमध्ये (इ.स. दुसरे शतक) राजदरबारातील कलावंतीण ही राजाची रखेल असे व तिने इतर पुरुषांबरोबर संबंध ठेवणे निषिद्ध होते. मात्र सामान्यजनांना रिझविणाऱ्या ‘सामान्य’ वेश्या इतर वर्गांतील पुरुषांबरोबर संबंध ठेवू शकत.
मात्र काळाच्या ओघात वारांगना व गणिका हा भेद नष्ट होऊन त्यांची निर्भर्त्सना व अवहेलना होऊन त्यांना अमीर-उमरावांकडून उपमर्द सोसावा लागला. ‘चाणक्यनीतिसार’ या ग्रंथात सामान्य वेश्यांची दयनीय अवस्था वर्णिली आहे.
भारतातील पारंपरिक समाजव्यवस्थेमध्ये वेश्या वा कलावंतीण ही ‘अखंड सौभाग्यवती’ म्हणून संबोधली जाई. दक्षिण भारतात नववधूचे मंगळसूत्र कलावंतीण ओवून देत असे. दुर्गापूजेसाठी देवीच्या मूर्तीसाठी शुभशकुन म्हणून वेश्येच्या घरातील माती आणून सुरुवात करीत. लैंगिक संबंधाचे नियमन करताना पारंपरिक समाजात विविध रूढी-परंपरेमुळे काही प्रमाणात विवाहबाह्य संबंधांना मान्यता होती. भारतातील रूढी-परंपरांनुसार काही धार्मिक भावना आणि अंधश्रद्धा, देवदासी प्रथेला पोषक ठरल्या. तिसऱ्या शतकातील धार्मिक ग्रंथांत व साहित्यामध्ये या प्रथेचा उल्लेख आढळतो. अथर्ववेदामध्ये देवदासींना ‘गंधर्व गृहिता’ असे म्हटले आहे. कालिदासाच्या मेघदूतामध्ये देवदासींचे काव्यात्म वर्णन आढळते. कल्हणाच्या ‘राजतरंगिणी’ ग्रंथात सातव्या शतकापासून ही प्रथा उत्तर भारतात रूढ असल्याचे म्हटले आहे. वाराणसीच्या विश्वनाथ मंदिरात नृत्यनिपुण देवदासी होत्या. महाराष्ट्रातही खंडोबाला ‘मुरळी’ म्हणून मुली वाहिल्या जातात. काही मुरळ्याही वेश्याजीवन पत्करतात.
वेश्याव्यवसायावर सामाजिक प्रतिबंध घालण्याविषयी बायबलच्या ‘जुन्या करारा’त निर्देश आढळतात. पेगन वेश्या ज्यू समाजाला धोकादायक असल्याची समजूत होती. ज्यू पित्यांनी आपल्या मुलींना वेश्याव्यवसायापासून परावृत्त करावे, असे निर्बंध होते. आद्य ख्रिस्ती लेखकांनी वेश्याव्यवसाय हे अनिवार्य असे दुष्कृत्य मानले. सेंट ऑगस्टीनने (इ.स. ३५४-४३०) म्हटले आहे, की ‘मानवी वासनेला वेश्यांनी वाट काढून दिली नाही, तर समाजात बलात्कारासारख्या दुर्घटना घडतील’. मध्ययुगात युरोपमध्ये सर्वच मोठ्या नगरांतून सार्वजनिक वेश्यागृहे मोठ्या प्रमाणात निर्माण झाली. त्यांना कायद्याचे संरक्षण व आधार होता आणि वेश्याव्यवसायाला परवानाही दिला जात असे. सार्वजनिक वित्तव्यवस्थेमध्ये वेश्याव्यवसायापासूनच्या उत्पन्नाचा वाटा मोठा होता. सोळाव्या शतकात गुप्तरोगाची संसर्गजन्य साथ सर्वत्र पसरली; तेव्हा वेश्याव्यवसायावर कडक नियंत्रणे लादली गेली. धर्मसुधारणा आंदोलनामुळे (सोळावे शतक) लैंगिक वर्तनासंबंधीचे नवे नीतिनियम प्रस्थापित झाले व त्यातूनही वेश्याव्यवसायाला पायबंद बसला. परिणामी युरोपमधील अनेक वेश्यागृहे बंद पडली. गुप्तरोगाच्या बळींची संख्या जशी वाढत गेली, तसे या व्यवसायावरचे निर्बंध जास्तच कडक झाले. स्त्रियांच्या व मुलींच्या अनैतिक व्यापाराला आळा घालण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कायदे करण्यात आले. दुसऱ्या महायुद्धापर्यंत युरोप व अमेरिकेत कुंटणखाणे व वेश्यावस्ती प्रत्येक मोठ्या शहरात होती. युद्धकाळात वेश्याव्यवसायाला चालना मिळाली. मात्र युद्धोत्तर काळात बदलत्या नीतिमूल्यांमुळे तेथील समाजांतील लैंगिक निर्बंध हळूहळू सैल होत गेले आणि स्वैर, अनिर्बंध व मुक्त लैंगिक संबंधांचे प्रमाण खूपच वाढले. विवाहपूर्व तसेच विवाहबाह्य संबंध, कुमारी मातांचे वाढते प्रमाण, कुटुंबसंस्थेचे विघटन या सर्व घडामोडींमुळे वेश्यावृत्तीचे स्वरूप पालटले. उच्चवर्गीय, नोकरदार स्त्रियांमध्येही ‘कॉलगर्ल’ म्हणून पैसे कमावण्याची प्रवृत्ती काही प्रमाणत वाढीस लागली.
पश्चिमी जगातल्या बहुतेक मोठ्या शहरांतून वेश्याव्यवसाय खपवून घेतला जात असला, तरी या व्यवसायाशी निगडित असलेल्या गुन्हेगारीवर मात्र कायद्याने कडक कारवाई केली जाते. ब्रिटिश संसदेने १९५९ मध्ये केलेल्या कायद्यानुसार वेश्यांना उघडपणे खुल्या जागी गिऱ्हाईके पटवण्यावर मनाई आहे; मात्र त्यांना घरबसल्या हा व्यवसाय चालवता येतो. तथापि ज्यांना या व्यवसायातून बाहेर पडावयाचे आहे, त्यांना पुनर्वसनासंबंधी योग्य प्रशिक्षण दिले जाते. स्कॅंडिनेव्हियन देशांतले (मुख्यत: डेन्मार्क, नॉर्वे व स्वीडन) या व्यवसायावरचे निर्बंध हे मुख्यत्वे आरोग्यविषयक बाबींसंबंधी आहेत. अमेरिकेत सर्व राज्यांत कायद्याने वेश्याव्यवसाय निषिद्ध ठरविला असला, तरीदेखील वेश्यावृत्तीला बांध घालणे तेथेही अशक्य ठरले आहे.
वेश्या व्यवसाय सुरू होण्याचे मुख्य कारण हे आर्थिकच आहे. ज्या स्त्रियांना आर्थिक चणचण भासत भासते, दारिद्र्य पदरी पडते, त्यांच्याकडे हा एक पर्याय असतो व अनेक स्त्रिया हा पर्याय स्वीकारतात. चंगळवादी संस्कृतीमुळे काही स्त्रियांना पैशाची हाव असल्याने सुद्धा त्या स्वतःहून वेश्याव्यवसाय पत्करण्यास तयार झालेल्या आढळतात. मात्र दुर्दैवाची गोष्ट अशी ठरली की, मागणी वाढत गेली व पुरवठा मात्र त्या प्रमाणात झाला नाही. यातून वेश्या व्यवसायाचे मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीकरण झाले. आज भारतामध्ये लाखो मुली बेपत्ता होतात, ‘किडनॅप्ड’ केल्या जातात व त्यांना वेश्याव्यवसायात ढकलले जाते. अगदी दवाखान्यातून लहान बाळांना सुद्धा चोरले जाते, ते यासाठी की त्या मोठ्या झाल्यावर त्यांना वेश्याव्यवसायात ढकलता येईल. ही आपल्या समाजाची शोकांतिका आहे की, समाजाकडून या प्रकारची मागणी होत असल्याने ज्यांच्या मनी सुद्धा या गोष्टी नसतील, अशांना हा व्यवसाय करण्यास भाग पाडले जाते. मग तुम्हीच सांगा की, ‘खरे दोषी कोण? ज्यांकडून पुरवठा केला जातो ते, की जे या व्यवसायाची जास्तीत जास्त मागणी करतात ते? ही पुरुषप्रधान, स्त्रियांना उपभोग म्हणून पाहणारी संस्कृती, या व्यवसायास कारणीभूत ठरते आणि दोष मात्र स्त्रियांवरच लावला जातो.
‘तलाश’ या सिनेमामध्ये ‘करीना कपूर’च्या तोंडी खुप छान वाक्य आहे, ‘आम्ही अशा प्रकारच्या व्यक्ती आहोत, ज्यांना समाजाने व्यक्ती म्हणूनच पाहणेच सोडून दिले आहे. आमच्या सोबत काहीही झाले तरी कोणाच्या मनाला काहीही वाटत नाही.’
या व्यवसायातून पुढे अनेक प्रकारची गुन्हेगारी उदयास येते. त्यामध्ये अंमली पदार्थांचा व्यापार असो किंवा अजून काही. या व्यवसायातील सर्वात मोठा धोका हा आहे की, यामुळे एड्स फैलावतो. एड्स झालेल्या समाजातील सामान्य व्यक्तीला समाज कशा प्रकारची वागणूक देतो, हे आपल्याला माहीतच आहे. वेश्याव्यवसायात तर त्यांना अजून जास्त हीन प्रकारची वागणूक मिळते. तिचे जीवन असह्य करून टाकले जाते. या व्यवसायामध्ये तरुणपणापर्यंत जरी लाभ मिळत असेल, तरी जसजसे वय जास्त होत जाते; तसतसे त्यांचे हाल होत जातात व शेवटी या स्त्रिया एकमेकांचा आधार बनून आयुष्याचे अंतिम दिवस काढतात.
हे झाले उघड वेश्याव्यवसायाबद्दलचे. परंतु, सुरुवातीला दिलेल्या व्याख्येप्रमाणे जर आपण विचार केला, तर हा वेश्याव्यवसाय फक्त आज आपण ज्यांना खरेच वेश्या बोलतो त्यापुरताच मर्यादित आहे का?
आपणास ठाऊकच आहे, अनेक क्षेत्रांमध्ये आपल्या लाभासाठी शरीराचा व्यवहार केला जातो. मग ते नोकरीमध्ये बडतर्फी मिळवण्यासाठी असो, एखादे ‘कॉन्ट्रॅक्ट’ मिळवण्यासाठी असो, निवडणुकीत तिकीट मिळवण्यासाठी असो किंवा अजून कोणत्या गोष्टी. असं काहीतरी लाभासाठी शरीराचा सौदा करणे हे समाजामध्ये मोठ्या प्रमाणात घडते. मात्र ते लपवून ठेवले जाते.
अगदी प्रेमाच्या नात्यांमध्ये सुद्धा, जर पुरूष स्त्रीला काही भेटवस्तू देत असेल किंवा काही आनंद मिळवून देत असेल, तो शारीरिक सुखाची अपेक्षा ठेवतो व तिच्या मनात सुध्दा आपसूकच स्वतःच्या शरीराने त्याला आनंद द्यायचा हे येते. ही एक प्रकारची देवाणघेवाण या व्यवसायासारखीच नाही वाटत का? समागमात कोणत्याही प्रकारचा व्यवहार नसेल, तेव्हाच ते प्रेम ठरते. शारीरिक सुखासाठी व्यवहार करणारा, मानव हा एकमेव प्राणी असावा.
मुंबई वेश्याव्यवसाय प्रतिबंधक कायद्यान्वये (१९२३) ‘वेश्येच्या उत्पन्नावर जगणे’, हा गुन्हा ठरविण्यात आला आहे. संपूर्ण भारतासाठी १ मे १९५६ रोजी स्त्रिया व मुली यांच्या अनैतिक व्यापारास बंदी करणारा कायदा लागू करण्यात आला. आज भारतामध्ये नोंदणीकृत अशा सात लाख वेश्या आढळतात. ज्यांचे सर्वात जास्त प्रमाण दिल्लीमध्ये आहे, तर राज्यांमध्ये पहिला क्रमांक आंध्रप्रदेशचा येतो व महाराष्ट्राचा चौथा क्रमांक येतो. सर्वात कमी वेश्या या जम्मू-काश्मीर या राज्यात आढळतात. मात्र हे सर्व नोंदणीकृत गोष्टींबद्दल झाले. बेकायदेशीररित्या हा व्यवसाय जास्त मोठ्या प्रमाणात चालतो व त्याचे नक्की प्रमाण कोणासही माहिती नाही.
मुंबई शहरातील कुंटणखान्यांमधील बळजबरीने डांबलेल्या मुलींसाठी अनेक स्वयंसेवी संस्था कार्य करतात. ‘संवेदना’ व ‘समर्थन’ या संस्थांतर्फे नेपाळ व इतर राज्यांतून फसवून आणलेल्या मुलींना साहाय्य केले जाते. त्याचप्रमाणे ‘प्रयास’ ही संस्था महिलांच्या लैंगिक शोषणासंबंधी कार्यरत आहे. ‘लालबत्ती’ विभागात काम करणाऱ्या विविध संघटनांनी मुंबईच्या ‘प्रेरणा’ या संघटनेमार्फत ‘नॅकसेट’ कार्यजाळे सक्रिय केले आहे. कुंटणखान्यातील शोषित महिला व मुलींसाठी पुनर्वसनाचे काम यांद्वारे चालते. महाराष्ट्र राज्याच्या सर्व विभागांत ‘नॅकसेट’च्या सहयोगी संस्था आहेत. नगर जिल्ह्यातील ‘स्नेहालय’ ही अशीच एक सदस्य-संस्था आहे.
महात्मा फुले प्रतिष्ठानच्या माध्यमातून ‘संवेदना’ ही संस्था १९८० सालापासून मुंबईतील कामाठीपुरा परिसरात अनेक उपक्रम राबविते. वेश्यांना आरोग्य, कायदेविषयक साहाय्य व पर्यायी रोजगाराबाबत मदत केली जाते. ‘नारी संघर्ष पंचायत’ या नावाने येथील वेश्यांनी स्वत:च संघटित होऊन स्वत:चे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न चालविले आहेत. ‘आशा’ हा प्रकल्प मुंबई महापालिकेतर्फे, एडस् व इतर यौन कर्माशी संबंधित आजारांबाबत जागरूकता वाढविणे व उपचार करणेबाबत ठोस काम करीत आहे. वरील प्रकल्पाशी संलग्न अशा ३० संस्था वेश्यांमध्ये एडस्बाबत जागृती आणणे, ऐच्छिक रक्ततपासणी मोहिमा व निरोध (कंडोम) वापराबाबत माहिती देणे. इ. कामे करतात.
स्पेनसारख्या काही देशांनी या व्यवसायास पूर्णपणे बंदी घालण्याचे जाहीर केले आहे. मात्र जरी हा व्यवसाय उघडपणे चालवला गेला नाही, तरी जोपर्यंत मानवी मनात कामवासना आहे, तोपर्यंत हा व्यवसाय कायम राहील. जरी आज ज्या स्वरूपात आपल्यास दिसतो; त्या स्वरुपात नसेल, तरी वर सांगितल्याप्रमाणे काही लाभ मिळवण्यासाठी स्वतःचे शरीर देण्याचा व्यवहार करण्याची वृत्ती मानवी मनामध्ये कायम राहील. कारण ही वासना नैसर्गिक आहे व त्याला आपण संस्कृतीने जे निर्बंध घातले आहेत; ते निर्बंध या प्रकारच्या गोष्टी करण्यास भाग पाडतात.
मग नेमके करायचे काय? तर करायचे हे आहे की, आपली चूक सुधारायची. मुलगा असो वा मुलगी असो, नवरा असो, बायको असो किंवा अजून कोणते नाते असो; त्या व्यक्तीने कोणाशी शारीरिक संबंध ठेवले, ठेवल्याचे आपणास कळले, तर आपण त्यांच्याकडे काहीतरी गुन्हा केल्यासारखे पाहतो.
लग्न न झालेल्या मुला-मुलींचे एक कामविश्व असते व त्यामध्ये त्यांना त्या प्रकारचा आनंद मिळवण्याची उत्सुकता असते. त्यांच्यावर जेवढे निर्बंध लावले जातील, तेवढे ते या गोष्टींकडे जास्त वळतील. त्यापेक्षा या गोष्टी नेमक्या काय आहेत व कशाप्रकारे व्हायला हव्यात, हे जर त्यांना नीट समजावून दिले तर ते काही चुकीचा निर्णय घेण्यापासून परावृत्त होतील. वासना ही त्यांच्या शरीराची गरज असते व तिला तुम्ही पूर्णपणे थांबवू शकत नाही. त्यापेक्षा, तिला योग्य मार्ग उपलब्ध करून देणे हा उत्तम पर्याय ठरतो.
नवरा किंवा बायकोने इतर कोणाशी शारीरिक संबंध ठेवले, तर सरळ-सरळ नाते तोडले जाते. मात्र, ही स्थिती का आली, या मागचे कारण काय, हे जाणून घेणे खरे प्रेम. जर असं काही समोरच्या व्यक्तीने केलंच, तर त्याला आपल्यासमोर बसवून हे विचारणे की, माझ्याकडून काय कमी पडले किंवा जर असे जाणवत असेल की आपली व्यक्ती आपल्यापासून दूर होतेय, तर आपल्यामधील मतभेद कमी करणे, याद्वारे आपण अशा काही गोष्टी होण्यापासून टाळू शकतो.
ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो किंवा जी व्यक्ती आपल्यासोबत नात्यामध्ये बांधली गेली आहे, त्या व्यक्तीला आपल्या मालकीहक्काची म्हणून न पाहता; त्यांच्या इच्छांना समजून घेणे महत्त्वाचे. यातून कदाचित नात्यांचे उत्तम संगोपन केले जाऊ शकते.
संस्कृती तर तयार झाली परंतु व्यक्तींच्या हक्कांचा आदर करणे, इच्छांचा आदर करणे, आपण विसरलो आहोत. व्यक्तींचे स्वातंत्र्य कमी होत चालले आहे. जर या गोष्टी घडल्या, तर वेश्याव्यवसाय हा आपोआप संपुष्टात येईल.
{fullwidth}