[वाचनकाल : १३
मिनिटे]
|
The loss of mental and physical freedom which a girl experiences the moment she steps into the house of her husband cannot be accurately realised by Englishmen. |
आज महिला दिन, चहुबाजूंनी खडतर परिस्थितीत कर्तृत्वाने उंच वाढलेल्या महिलांचं भरपूर, जयजयकार म्हणावं, असं कौतुक केलं
जाईल. पण सणाला 'देवी'
तशी ही महिला दिनाची 'महिला' बेगडी वाटते! कारण, देशातील सद्यस्थिती वेगळंच
सत्य बोलते आहे. हळूहळू पुन्हा वैचारिक मागासतेकडे जात असलेलो आपण हा महिला दिन
भारतात साजरा व्हावा यासाठी आजन्म झगडलेल्या स्त्रियांना विसरत आहोत. त्यांपैकी एक
रखमाबाई राऊत . . .
३ मार्च, १८८७.
मुंबई हायकोर्ट.
वातावरण तापलेले. मुंबईचा उन्हाळा. १८८४ साली दाखल करून
घेतलेल्या हिंदू विवाहविषयक खटल्याची जणू काही अंतिम फेरी चालू असते.
ह्या खटल्यातील प्रतिवादी – रखमाबाई नावाची बावीस वर्षे
वयाची, विवाहित, महाराष्ट्रीय मुलगी.
इरकली लुगडे नेसलेली. केस घट्ट आवळलेले. पदर अंगभर लपेटून घेतलेला. खुर्चीच्या दोन
हातांना घट्ट पकडून धरलेले. डोळ्यांत अतीव उत्सुकता. मुद्रा करारी. आत्मविश्वासाचे
तेज मुखावर. जजसाहेबांच्या तोंडून निकाल ऐकण्यासाठी आपल्या कानात प्राण आणून वाट
पाहत आहे.
खटल्यातील वादी – दादाजी भिकाजी. रखमाबाईचा पती, वय तीस वर्षे. अकरा
वर्षांपूर्वी मंगलाष्टकांच्या गजरात ज्याने तिच्या गळ्यात वरमाला घातली होती तो.
त्या क्षणापासून आतापर्यंत पत्नी म्हणून त्याला तिचा सहवास घडला नव्हता. तो
भेदरलेला. अनिश्चित. आपल्या भिरभिरत्या डोळ्यांनी आजूबाजूला बसलेल्या आपल्या
माणसांचा आधार शोधणारा. आणि अशा परिस्थितीत रखमाबाईने पतीच्या घरी नांदायला यावे
म्हणून त्याच्या वतीने कायदेशीर नोटीस बजावलेली. ती येण्यास तयार नव्हती म्हणून
फिर्याद!
न्यायासनावर विराजमान असलेल्या सरन्यायाधीश फॅरनसाहेबांनी
हुकूमनामा जाहीर केला;
मी
असा हुकूम देतो की, आजपासून एका महिन्याच्या आत प्रतिवादीने वादीच्या घरी पत्नी म्हणून
नांदायला जावे व तिच्या वकिलांनी तशा अर्थाचे माहितीपत्रक सादर करावे. प्रतिवादीने
निमूटपणे आमच्या म्हणण्याला सुरूवातीपासून रुकार दिला असता तर आम्ही खटल्याच्या
खर्चाच्या संदर्भात तिच्या बाजूने सहानुभूतीने विचार केला असता. आहे त्या
परिस्थितीत खालच्या कोर्टाचा सर्व खर्च प्रतिवादीने करावा व अपील कोर्टाचा खर्च
दोघांनी वाटून घ्यावा.
दादाजीच्या मनात लढाई जिंकल्याच्या आनंदाचा चित्कार उठतो. सनातन्यांच्या
बाजूने विजयाच्या दुंदुभी गर्जू लागतात. तरी दादाजीचा निकालपत्रावर विश्वास बसत
नाही. अचानक काहूर माजतं. अनामिक अथांग भीतीची चाहूल लागते. हे पेलणार कसे? ह्या तेजस्वी मुलीला
घेऊन संसार करायचा? खरंच ती येईल का राहायला? आणि ती आली तर आपल्याला मामाच्या पांगुळगाड्याशिवाय
जगावे लागणार . . . अचानक खऱ्याखोट्याच्या, अप्रामाणिकतेच्या, आळशीपणाच्या, कर्तव्यशून्यतेच्या, परावलंबित्वाच्या
लाटा पसरत येतात. गुदमरल्यासारखं वाटतं. तो पुन्हा आधार शोधतो.
जजसाहेबांनी प्रत्यक्ष न उच्चारलेले शब्द रखमाबाईच्या मनात
घुमू लागतात. वादीच्या वकिलांनी कोर्टात हे स्पष्टपणे सांगितले होते. गुन्हेगाराला
शिक्षा कोणती? कोर्टाची अवज्ञा केल्यास सहा महिन्यांची कैद . . . आपल्या अजाण वयात हिंदू
धर्माने आपल्यावर लादलेल्या विवाहाची हीच परिणती? जन्म-जन्मांतरीच्या गाठीची
सोडवणूक कधीच का होणार नाही? प्रत्येकाच्या वाटणीला येते फक्त एक आयुष्य. परलोक
कुणी पाहिला आहे? हे एकमेव मौल्यवान आयुष्य मातीमोल करायचे? तिच्या डोळ्यांत प्रखर तेज उफाळून
येते. एक नवा निश्चय, नवे युद्ध, नवी विजिगीषा तिच्या चित्तवृत्तीचा ताबा घेते. मी तुरूंगवास पत्करेन, पण हे होणे नाही.
पाऊल मागे पडणार नाही . . .
ही गोष्ट शंभर वर्षांपूर्वीची. एक वैवाहिक समस्येचा खटला गाजला, त्याचे रामायण कसे
घडले याची. डॉ. रखमाबाई स्त्रीमुक्तीसाठी एकट्या संपूर्ण समाजाविरुद्ध झगडल्या
याची. धर्मबंधनांनी, विधिनिषेधांनी आणि संकेतांनी जखडलेल्या समाजाला, ‘माझ्या स्वातंत्र्यासाठी मी
लढणार’, असे आव्हान त्यांनी
दिले याची.
‘दादाजी विरुद्ध रखमाबाई’ हा खटला सन १८८४ मध्ये दाखल केला गेला. त्या खटल्याची
पहिली फेरी पूर्ण झाली तो २२ सप्टेंबर १८८५ हा दिवस मोठा नाट्यपूर्ण ठरला. जनरल
पोस्ट ऑफिसची दगडी इमारत उजव्या बाजूला आणि विद्यापीठाचे राजाबाई टॉवर डाव्या.
यांच्या मधोमध असलेल्या हायकोर्टाच्या इमारतीत पहिल्या मजल्यावर मधल्या हॉलमध्ये
खटला चालू होता. या हॉलमध्ये उंच छताखाली जज पिन्हेसाहेबांचे कोर्ट भरले होते. हॉल
मुंबईतील प्रतिष्ठित सुधारकांनी आणि सनातन्यांनी गच्च भरलेला होता.
जजसाहेब पश्चिमेच्या भिंतीकडे पाठ करून उंच मंचावर बसले
होते. साक्षीदारांचे पिंजरे या दिवशी रिकामे राहिले. दोन्ही पक्षांचा अपेक्षाभंग
झाला. जजसाहेबांना साक्षीदारांची गरज भासली नाही. त्याकाळी लांब साखळीला टांगलेले
गॅसचे दिवे लागत. दिवे लावायची वेळ झाली. समोरच्या बाजूची वकीलमंडळी अस्वस्थ झाली.
त्यांनाही बोलण्याची संधी देण्याचा जजसाहेबांचा विचार दिसत नव्हता. दादाजीने स्वतः
कोर्टात हजर राहून आपली कहाणी सांगितली. रखमाबाईंचे लेखी निवेदन वाचून दाखवण्यात
आले. त्यांनी आपल्यावरील आरोपाचा इन्कार केला व आपण आपल्या पतीकडे, दादाजीकडे काही
विशिष्ट कारणासाठी राहायला जात नाही आणि हा खटला जज्जसाहेबांनी रद्दबातल करावा, अशी विनंती केली.
दादाजीच्या वकिलांनी त्यांची बाजू शुद्ध वकिली थाटात मांडली. पुरावे सादर केले.
दादाजीचे म्हणणे असे होते की, ‘त्यांचे प्रतिवादी रखमाबाईशी
दहा वर्षांपूर्वी विधिपूर्वक लग्न झाले होते. त्या वेळी रखमाबाई तेरा वर्षांच्या
होत्या व दादाजीचे वय एकोणीस होते. रखमाबाई आपल्या सावत्र वडिलांकडे म्हणजे सखाराम
अर्जुनांच्या घरी राहत होत्या. दादाजींचे त्यांच्या घरी जाणे-येणे होते. पण
वैवाहिक संबंध प्रस्थापित झाले नव्हते. पुढे रखमाबाईंनी सासरी रहायला यावे म्हणून
दादाजींनी आपल्या मामाबरोबर निरोप पाठवल्यावर त्यांच्या वडिलांनी रखमाबाईला
धाडावयास नकार दिला.’
२५ मार्चला वकिलामार्फत नोटीस पाठवावी लागली. ‘रखमाबाईला आपल्या घरात योग्य
प्रतिष्ठेने राहता येणार नाही,’ असे पत्रोत्तर सखाराम अर्जुनांनी वकिलांना पाठवले
आणि ‘आपली प्रकृती
खालावलेली असल्यामुळे आपल्याबरोबरचे साहचर्य हितावह होणार नाही’ असेही आणखी एक कारण
दिले गेले असल्याचे दादाजीने सांगितले. काही झाले तरी कायद्याची मदत घेऊन आपल्या
पत्नीला आपल्या घरी राहायला भाग पाडावे, अशी त्यांची कोर्टाला विनंती होती. रखमाबाईच्या
वतीने ॲड्. लॅथम आपली बाजू मांडावयास उभे राहिले. परंतु जजसाहेबांनी खूण करून
त्यांना थांबायला सांगितले.
ते म्हणाले, ‘आपल्याला जर काही वेगळे आणि महत्त्वाचे सांगायचे
असेल तर आपण सांगू शकता. एरव्ही मला वाटते, आपल्याला तसदी घेण्याची गरज
नाही. मी ताबडतोब हा खटला संपवू इच्छितो. गेल्या शनिवारी हा खटला जेव्हा
कोर्टासमोर प्रत्यक्ष आला तेव्हापासून मी यावर सांगोपांग विचार केलेला आहे. माझ्या
अधिकाराच्या कक्षेत मी ह्या निर्णयाप्रत येऊन पोहोचली आहे की वादीला अशा प्रकारची
बळजबरी करता येणार नाही.’ याचा अर्थ स्पष्ट होता, की रखमाबाईला तिच्या
मनाविरुद्ध तिच्या पतीच्या घरी राहायला जाण्याची सक्ती करण्यात येणार नाही. हा
निर्णय झाडून साऱ्या वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाला. निर्णयाने एकच खळबळ माजली.
ह्या अर्जावरचे जजसाहेबांचे निवेदन एका मूलभूत मानवी
दृष्टिकोनातून पाहिले असता पटण्यासारखे होते. परंतु कायद्याच्या कक्षेत आलेला
कोणताही प्रश्न खाजगी, सामाजिक अथवा राजकीय असला तरी त्याला कायद्याच्या चौकटीत वावरण्याइतपतच
स्वातंत्र्य असते. जजसाहेबांच्या निकालपत्राच्या सुरूवातीचे वाक्य असे आहे;
हा खटला चुकीच्या
कलमावर आधारित आहे. ज्या वेळी विवाहित दांपत्य विवाहानंतर एकत्र राहिलेले असते व
काही कालावधीनंतर त्यांच्यातील पती किंवा पत्नी वेगळी राहू लागते, त्या वेळी पतीला किंवा पत्नीला वैवाहिक
संबंध पुनर्स्थापित करण्यासाठी कायद्याची मदत मागता येते. ही परिस्थिती
इंग्लंडमध्ये असू शकते, जेथे प्रगल्भ वयात एकमेकांच्या संमतीने विवाह होतात. या खटल्यात वैवाहिक
संबंध प्रस्थापिताना ते पुनर्स्थापित करण्याचा प्रश्न संभवतः नाही. अल्पवयात आई
वडिलांनी लग्न लावून दिल्यानंतर त्यांचा शब्द पाळण्यासाठी अशा स्त्रीला समज
आल्यानंतर ज्या माणसाकडे त्याची पत्नी म्हणून राहायला जाण्याची तिची अजिबात इच्छा
नाही, त्याच्याकडे
जाण्याची तिच्यावर सक्ती करणे हा अत्यंत क्रूरपणा व रानटीपणा आहे असे मी मानतो.
इतकेच नव्हे तर वादीला दावा करण्याचा कायद्याने अधिकार नाही असे माझे प्रामाणिक मत
आहे.
पिन्हेसाहेबांचे सुसूत्र, लांबलचक निकालपत्र दुसऱ्या दिवशी दि. २३
सप्टेंबरच्या टाइम्स व इतर वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले. हिंदुस्थानच्या अनेक प्रांतांत
ज्याच्या त्याच्या तोंडी हा विषय होता.
‘ज्या दिवशी दादाजी भिकाजी नावाच्या एका विवाहित हिंदू पुरुषाने आपली
विवाहित पत्नी सासरी नांदायला येत नाही म्हणून वकिलामार्फत नोटीस बजावली त्या
दिवशी म्हणजे १४ एप्रिल १८८४ रोजी ह्या वाग्युद्धाची पहिली ठिणगी उडाली होती.
त्यानंतर अपील आरोप प्रत्यारोप पुढे प्रायव्ही कौन्सिलात जाण्याची तयारी यामध्ये
जवळजवळ चार वर्षांचा काळ लोटला. खटल्याचा निर्णय लागला नाही. जून १८८७ मध्ये
वादीने खटला काढून घेतला व तडजोड होऊन हे हायकोर्टात पुष्कळ दिवस भिजत पडलेले
प्रकरण एकदाचे पार पडले.’ (इंदुप्रकाश ९-७-८७)
असे असले तरी एकोणिसाव्या शतकातील सामाजिक सुधारणांची गरज
वाटू लागलेल्या ह्या समाजाला ह्या खटल्यामुळे सामाजिक प्रश्न समजून घेण्याच्या
संदर्भात एक नवे भान आले हे निर्विवाद.
गिरगावात आपल्या राहत्या घरात डोळयांपुढे सतत एक
प्रश्नचिन्ह घेऊन रखमाबाई वावरत होत्या. आपल्या आजूबाजूच्या आपल्याप्रमाणे बालवयात
विवाह झालेल्या, कुणी विधवा होऊन परत आलेल्या, सासरी पोतेऱ्याप्रमाणे आयुष्य जगणाऱ्या मुली त्या
पाहत होत्या. कुणी शाळेत पहिला नंबर असणारी, कुणी गोड आवाजात कविता
म्हणणारी,
एखादी नर्म विनोदाने हसवणारी, एखादी सदाप्रसन्न, एखादी चंद्रकलेवर
चांदण्यांचा कशिदा काढणारी, एखादी फुगडी खेळण्यात, खो-खो खेळण्यात तरबेज, चटपटीत, चंचल. एखादी तळपत्या
विजेसारखी तरल. एखादी पुस्तकातच सतत डोळे खुपसून बसणारी. ह्या सगळ्या चिमण्या
लग्नानंतर पंख मिटून घेऊन आपल्या घरट्यात स्वतःला कोंडून घेतात. फुलणाऱ्या कळ्या
म्लान होतात. त्यांवर चार सहानुभूतीचे थेंब शिंपडून त्यांना फुलवण्याचा कोणी
प्रयत्न करीत नाही. अकाली प्रौढ बनलेल्या; कोळपलेल्या भग्नहृदयी बालिका
रखमाबाईंना दिसल्या. आपल्या आणि त्यांच्या बाह्य परिस्थितीत फारसा फरक नाही हे
जाणवलं. पण रखमाबाईंच्या अंतःकरणाच्या अंधारात प्रकाशाची दारे किलकिली झाली होती.
वाट शोधून काढायलाच हवी होती. कोंडी फुटायलाच हवी होती. मार्ग सापडायला हवा होता.
ते सोपं नव्हतं.
‘तिळा उघड’ म्हणून एखादा मंतरलेला परवलीचा शब्द त्यांच्याजवळ नव्हता. माझे जे व्हायचे
ते होईल. होणारे होणार आहे. ते अपरिहार्य आहे. पण त्याअगोदर मी प्रयत्न का करू नये? नाकातोंडात पाणी
शिरणार असेल तर निदान पृष्ठभागावर येण्यासाठी धडपड का करू नये? दादाजीचे मन वळवणे
अशक्य कोटीतली गोष्ट; पण म्हणून नशिबी आलेले विनतक्रार स्वीकारणेही अशक्य. डोक्यावर खटल्याची
टांगती तलवार तळपत होती. निर्णय काय लागेल? अस्वस्थ बेचैनी . . . ह्या
माझ्या हिंदू समाजाला गदागदा हलवले पाहिजे. रत्नाकराचे मंथन करणाऱ्या देवांप्रमाणे
आपल्या हातात एखादी मेरू पर्वताची रवी असती तर घुसळण केली असती. निर्जीव दुष्ट
रूढींचा गाळ काढून टाकला असता. आमचा हिंदू समाज निर्मळ केला असता. पण सद्य
परिस्थितीत त्यावर उपाय कोणता? जमिनीवर पाय घट्ट रोवून व्यवहार्य तोडगा त्यांनी
काढला. आपल्या मनातील दबलेले कढ भावनाविवश न होता शब्दांतून उतरवले. सौम्य, कोमल, पण मर्मग्राही
शब्दांत त्यांनी टाईम्समध्ये स्वतःची पत्रे प्रसिद्ध केली. पण सही करायला मन
कचरले.
आपण नाव देऊन बसलो तर . . . आपले काय होईल ते होवो, पण आपल्या माहेरच्या, आजोळच्या आपल्या
वयाच्या माहेरवाशिणींना, सासुरवाशिणींना काही विपरीत भोग भोगावे लागले तर? नाव अगोदर जाहीर
झाले तर कदाचित तोंडच बांधून ठेवले जाईल. इतक्या प्रारंभी नाळ कापली जाईल. नकोच .
. . ! ‘हिंदू लेडी’ या नावाने पत्रे
प्रसिद्ध होऊ देत.
रखमाबाईंनी दोन पत्रे लिहिली. या पत्रांत;
Excepting the two
principal difficulties resulting from infant marriage, they (men) enjoy full
mental and physical freedom. Religion or social custom does not, in any way,
interfere with their liberty. Marriage does not interpose any insuperable
obstacle in the course of their studies. They are not called upon to go to the
house and to submit to the tender mercies of a mother-in-law; nor is any
restraint put upon their action because of their marriage. But the case with
women is the very reverse of this.
ही नेमकी स्त्रीलाच आकलणारी भूमिका त्यांनी घेतलेली दिसते.
‘Infant Marriage and Enforced Widowhood’ ही पत्रे लिहून स्वतःवरील व
स्त्रीजातीवरील अन्याय दूर करण्याचा लोकशाही मार्ग त्यांनी स्वीकारला होता.
रखमाबाईंच्या ह्या पत्रांवर बरीच चर्चा झाली. का लिहिली, कोणी लिहिली, यात स्वार्थ कोणाचा, यांतील विधाने खरी
की खोटी, सत्यस्थितिनिदर्शक
की अतिशयोक्त, अशा स्वरूपाची चर्चा काही काळ चालू राहिली.
रखमाबाई म्हणतात,
If the girl is
married at the age of eight (as most of them are) her parents are at liberty to
send her to school till she is ten-year old; but if they wish to continue her
at school longer, they must obtain the express permission of the girl's
mother-in-law. But even in these advance times, and even in Bombay - the chief
centre of civilization - how many mothers-in-law are there who send their
daughters-in-law to school after they are ten years old!
रखमाबाईंनी इंग्रजी राजवटीच्या बळावर आपले विचार निर्भयपणे टाईम्समध्ये
मांडले. त्यांनी विचारस्वातंत्र्याचा संपूर्ण हक्क बजावला आणि ह्या गुन्ह्याची
फळेही भोगली. ‘ही बाई हिंदू नाही, ही स्त्रीच नाही.’ अशा तऱ्हेचे आरोप
त्यांच्यावर जाहीररीत्या केले गेले. ‘स्वातंत्र्य’ या शब्दाचा अर्थ रखमाबाईंनी
आपल्या पुढल्या आयुष्यातील घवघवीत यशाने खरा करून दाखवला. स्त्रीला
स्वातंत्र्याच्या कल्पनेचा वाराही समाज लागू देत नाही हे त्यांनी सांगितले.
The loss of mental
and physical freedom which a girl experiences the moment she steps into the
house of her husband cannot be accurately realised by Englishmen. She must
never think of sitting or speaking in the presence of her father-in-law or
mother-in-law, nay, even in the presence of any other member of their family.
She must get up early and go to bed late. Must work with the servants. (I don't
say ‘like the servants’, for they have the option of refusing to work which she
has not).
एक स्त्री म्हणून धर्मशास्त्र पुरुषाधार्जिणे आहे हे त्यांनी त्यांच्या
स्वतःच्या भविष्यातील लढाईच्या रूपात एखाद्या द्रष्ट्याच्या मर्मभेदी दृष्टीने
पाहिले. त्या म्हणतात,
The treatment which
even servants receive from their European masters is far better than falls to
the share of us as Hindu women. We are treated worse than beasts. We are
regarded as playthings - objects of enjoyment to be unceremoniously thrown away
when the temporary use is over. Our law-givers (i. e. the writers of Shastras)
being men have painted themselves (like Aesop's man and lion) noble and pure,
and have laid every conceivable sin and impurity at our door.
खटला चालू असतानाच टाईम्स ऑफ इंडियासाठी 'हिंदू लेडी' या टोपणनावानं
रखमाबाईंनी ही अशी पत्रं लिहून आपली बाजू चिवटपणे समाजासमोर मांडली. ही पत्रे
त्यांना कायद्याची मदत घ्यायची होती म्हणून प्रामुख्याने इंग्रज राज्यकर्त्यांना
डोळ्यांसमोर ठेवून लिहिली होती. त्यांनी वर्णन केलेल्या गोष्टी हिंदू समाजाला
नव्याने सांगण्याची गरज नव्हती. शास्त्री-पंडितांना जाब विचारण्याचाही त्यांचा
हेतू नव्हता. व्हिक्टोरिया राणीला एक स्त्री म्हणून आव्हान करायचे तर त्याकरता
मध्यस्थ हवे होते. टाईम्स व टाईम्सचे संपादक आणि इंग्रज वाचक यांद्वारे हे साधणार
होते.
लंडन टाईम्स व इथल्या वृत्तपत्रांत ह्या पत्रांचा आशय
प्रसिद्ध झाला. शिक्षणाने स्वतंत्र होऊ पाहणारी एक नवी स्त्री रखमाबाईंना अभिप्रेत
होती. ही स्त्री खऱ्या अर्थाने स्वतःच्या तंत्राने जगणारी असावी असे त्यांना वाटत होते.
त्या मनाने अशा स्त्रीशी एकरूप झालेल्या होत्या. म्हणून ‘हिंदू लेडी’च्या प्रतिमेतून स्वतःला
सोडवून घेऊन रखमाबाई म्हणून त्यांना बंड करणे भाग होते. त्या काळात वैचारिक
पातळीवर समाजसुधारणांचा विचार करणाऱ्यांनी शास्त्रार्थाकडे धाव घेतली. त्यांच्या
पत्रावरील प्रतिक्रियांचा रोख 'पतीच्या संदर्भातील स्त्रीचे जीवन' असा होता. 'पतीव्यतिरिक्त स्वयंपूर्ण
स्त्रीजीवन'
हा विचार त्या काळातील समाज-सुधारणांबद्दल सहानूभूती बाळगणाऱ्यांना नीटसा
कळलेला दिसत नव्हता.
या पत्रांनी १९व्या शतकातील भारतीय समाजाला हादरवून सोडले.
त्यांच्या विरुद्ध बाजूने लोकमान्य टिळक त्यांच्या ‘मराठा’ वृत्तपत्रात लिहीत
होते की,
‘भारतीयांच्या स्त्रियांचं नांदायला जाण्याचं वय काय असावं हे इंग्रजी
कायद्यानुसार ठरवणं अयोग्य आहे.’ ‘नेटिव्ह ओपिनियन’ या वृत्तपत्रातून विश्वनाथ
नारायण मंडलिक रखमाबाईंवर टीका करत होते. दादाजीनेही वृत्तपत्रांत आपली बाजू
मांडली. दुसरीकडे मॅक्स म्युलर, पंडिता रमाबाई यांनी उघडपणे रखमाबाईंच्या
स्वातंत्र्याची भलावण केली. परंतु शेवटी २००० रुपयांच्या तडजोडीवर दादाजीने
रखमाबाईंना काडीमोड दिला. रखमाबाईंनी आपल्या हक्कांसाठी, व्यक्तिस्वातंत्र्यासाठी
दिलेल्या लढ्याची परिणती या वैयक्तिक सुटकेमध्ये होते असे म्हणता येईल.
या खटल्यातून मुक्त झाल्यानंतर रखमाबाई वैद्यकीय शिक्षण
घेण्यासाठी इंग्लंडला गेल्या. तिथल्या ‘लंडन स्कूल ऑफ मेडिसिन फॉर विमेन’ या कॉलेजात प्रवेश
घेतला. १८९१ व १८९२ मध्ये अनुक्रमे पहिली व दुसरी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर ‘रॉयल फ्री हॉस्पिटल’मध्ये प्रॅक्टिकल
ट्रेनिंगसाठी प्रवेश घेतला. तिथे त्यांनी शवविच्छेदन व भूलतंत्र (ॲनेस्थेशिया) या
विषयांचा अभ्यास केला. त्यानंतर डब्लिन येथील ‘रोटांडो’ या हॉस्पिटलमध्ये
स्त्रीरोगतज्ञाचा शिक्षणक्रम पूर्ण केला. ‘नॅशनल डेंटल हॉस्पिटल’मध्ये दंतचिकित्सेचं शिक्षण
घेतलं. त्याशिवाय ‘मूरफिल्ड ऑपथॅल्मिक हॉस्पिटल’ येथे नेत्ररोगांवरील उपचारांचा अनुभव घेतला. तसंच ‘बाळंतपणातील शस्त्रक्रिया’ या विषयात ‘लंडन कॉलेज ऑफ मेडिसिन फॉर
विमेन’ येथे त्यांनी
परीक्षेत ऑनर्स मिळवले. अशा विविध विषयांचा अभ्यास केल्यानंतर १८९४ मध्ये त्या
शेवटची वैद्यकीय परीक्षा उत्तीर्ण झाल्या.
‘लंडन स्कूल ऑफ मेडिसिन फॉर विमेन’ येथून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पदवी
प्रदान करणे लंडन विद्यापीठाच्या कायद्यात बसत नव्हते. शेवटच्या पदवीपरीक्षेकरिता
स्कॉटलंडच्या ‘जॉईंट बोर्ड ऑफ द कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जन ऑफ एडिनबर अँड् ग्लास्गो’ या संस्थेत जावे
लागे. लंडनमधील तथाकथित बुद्धिनिष्ठ समाजाच्या निष्ठा आणि व्यवहार यांतील
अंर्तविरोध अजून मिटला नव्हता. स्त्री म्हणून, इतिहासाचा ओघ बदलायला
निघणाऱ्या हिंदुस्थानातील स्त्रियांना जे प्राक्तन भोगावे लागले, त्याची सुधारित
आवृत्ती इंग्लंडमधील स्त्रियांच्याही वाटणीला आली. लंडनमधून शिक्षण घेऊन
पदवीपरीक्षेकरिता स्कॉटलंडला जावे लागे. पण रखमाबाई ही शेवटची पदवीपरीक्षाही उत्तम
तऱ्हेने उत्तीर्ण झाल्या.
‘ए. आर. सी. पी. अँड् एस.’ ह्या पदव्यांची बिरुदावली नावापुढे लागल्यावर
सनदशीरपणे इंग्लंडच्या मेडिकल रजिस्टरमध्ये त्यांचे नाव दाखल झाले. तेथून ७
सप्टेंबर १८९५ रोजी त्यांनी मुंबईच्या डफरिन फंडाच्या मदतीवर उभारल्या गेलेल्या ‘कामा हॉस्पिटल’च्या मेडिकल ऑफिसरच्या
पदाकरिता अर्ज केला. या अर्जातील शेवटचे वाक्य त्यांच्या ध्यासावर ढळढळीत प्रकाश
टाकते. ‘माझ्या
जन्मभूमीमध्ये वैद्यकीय व्यवसायात काम करण्याची माझी तीव्र इच्छा आहे. हे आपण
मुंबईच्या माननीय गव्हर्नरसाहेबांना कृपया कळवावे.’ डॉ. रखमाबाईंचा जगण्याचा
हेतू इंग्लंडने साध्य करून दिला. त्यांच्या आयुष्याचा कायाकल्प घडवला. ज्ञानाच्या
अमृताचे वरदान दिले. स्वदेशप्रेमाला कर्तृत्वाची बैठक मिळाली. स्वतःची अस्मिता
शेवटपर्यंत धगधगीत ठेवली.
पुढे डिसेंबर १८९५ मध्ये डॉ. रखमाबाई सुरतेला आल्या.
त्याकाळी स्त्रिया प्रसूतीसाठी कुठल्याच दवाखान्यात जायला तयार नसायच्या. त्यात
ह्यांच्या ‘माळवी हॉस्पिटल’ची इमारत झपाटलेली
असल्याच्या वदंता पसरल्या होत्या. तेव्हा इमारतीत शेळीचं सुखरूप बाळंतपण करून
खात्री देण्यापासून ते दवाखान्यात प्रसूतीसाठी न येणाऱ्या स्त्रियांचं समुपदेशन
करण्यापर्यंत आणि कायम स्त्रियांना उपचारासाठी रुग्णालयात येण्याचं आवाहन त्या करत
राहिल्या. त्या काळी स्त्रियांना बाळंतपणानंतर ४० दिवस उपचारांसाठी ठेवलं जात असे.
या स्त्रियांसोबतच्या आलेल्या मुलांसाठी ‘माळवी बालक मंदिर’ स्थापन केलं.
स्त्रियांनी घराबाहेर पडून काही करावं म्हटलं तर
सर्वसाधारणतः घरांतल्यांकडून विरोध होतो, पण तोच विरोध त्या धार्मिक कार्यासाठी बाहेर पडत
असतील तर तितकासा तीव्र राहत नाही. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन रखमाबाईंनी प्रथमतः
स्त्रियांना धार्मिक पुस्तकवाचनासाठी एकत्र केलं व नंतर त्यातून ‘वनिता आश्रम’ची स्थापना केली. समाजाकडून
अव्हेरलेल्या विधवा व त्यांच्या मुलांचं त्या आश्रयस्थान बनल्या. इतकंच नव्हे तर
आसपासच्या स्त्रियांना लिहिता-वाचता यावं म्हणून त्या त्यांचे खास वर्गही घेत. इतर
उपक्रमांसोबत विधवा आश्रम आणि अनाथाश्रम हे वनिताश्रमाचं मुख्य कार्य होतं. एकीकडे
दिवसाचे अठरा तास काम, दर शनिवारी ‘आयरिश मिशन’च्या दवाखान्यात मोफत सेवा तर दुसरीकडे समाजिक कार्य, हे शिवधनुष्य
त्यांनी सहज पेललं होतं. १८९६ मध्ये सुरतमध्ये प्लेगची साथ आली तेव्हा त्यांनी
मोलाची कामगिरी केली. त्याची दखल घेऊन इंग्रज सरकारने त्यांना ‘कैसर ए हिंद’ हा बहुमान दिला.
सुरतला असताना रमाबाई रानडेंनी अध्यक्षपद भूषवलेल्या १९०७
च्या सुरतेच्या ‘अखिल भारतीय महिला परिषदे’च्या स्वागत समितीच्या चिटणीसपदी त्यांनी काम केलं, तर पुढे १९१८ साली
राजकोटला गेल्यावर ‘रेडक्रॉस सोसायटी’ची शाखा उघडली. पहिल्या महायुद्धादरम्यानच त्यांचं कार्य
लक्षात घेऊन १९१८ साली त्यांना रेडक्रॉसतर्फे सन्मानपदक देण्यात आलं.
स्त्रियांसाठी खास विज्ञान स्त्रीशिक्षकांच्या व्याख्यानमाला चालवल्या आणि अगदी
किती स्त्रिया तिथे हजर होत्या, इथपासूनची नोंद ठेवली. इतकंच नव्हे, तर कामाठीपुरामधल्या
स्त्रियांसाठी आरोग्यविषयक व्याख्यानं घडवून आणली. १९३२ मध्ये स्वतःच्या
आजोबांच्या मालकीचं गावदेवीचं मंदिर सर्वांसाठी खुलं केलं. अस्पृश्यांना, त्यांच्या
स्त्रियांना हक्क आहेत ही त्यांची धारणा होती. ‘असमर्थांना आपण समर्थ
बनवण्याचा प्रयत्न केला, परंतु जे दुर्लक्षित आहेत त्यांच्या प्रश्नांचं काय,’ ही भावना त्यांना
छळत असे. त्यातूनच त्यांनी प्रत्येक ज्ञातिचे काय हक्क आहेत त्यांच्या याद्या
लिहून काढल्या.
अगदी ऐंशीच्या घरात वय असतानादेखील कुणा एकाकी मुलीला आसरा
देणं, तिला लिहायलावाचायला
शिकवणं, ‘मिडवाईफरी’ची परीक्षा द्यायला लावणं
अशी कामं त्या करत राहिल्या. स्त्रियांना बँकांमध्ये खातं काढायला लावून बचतीचं
महत्त्व कृतीतून तेव्हाही शिकवत राहिल्या. पुढे १९१७ मध्ये नोकरीतून निवृत्त
झाल्यानंतर त्यांनी स्त्रियांमधील अंधश्रद्धानिर्मूलनाचं काम हाती घेतलं.
शेवटपर्यंत महिलांच्या हक्कांसाठी, त्यांच्या न्यायासाठी डॉ. रखमाबाई झटत राहिल्या, लढत राहिल्या.
रखमाबाईंना प्रदीर्घ आयुष्याचे दान मिळाले. त्या दानाचे
त्यांनी वरदान केले. त्यांची मुद्रा पूर्वायुष्यातील प्रश्नचिन्हांनी काळवंडली
नाही. खडतर काळात जबरदस्त आघात पेलणारे मन अंतर्यामी कोमल, अथांग करुणेने भरलेले होते.
त्यांचे मन त्यांच्या व्यक्तित्वाला सुंदर घाट देऊन गेले. कदाचित म्हणूनच
उत्तरार्धात त्यांच्या सहवासाचा लाभ मिळालेल्या शेकडो व्यक्तींपैकी एखादीलाही
त्यांच्या जिद्दी कणखरपणाची चुणूक दिसली नाही, ओळखता आली नाही. त्यांच्या
शांत सोशिकपणाचे, दयेचे, औदार्याचे, प्रेमळपणाचे, मायेचे दर्शन घडले. इतरांसाठी सतत झटत राहणे हे त्यांच्या स्वभावधर्माचे
बीज. त्यांच्या पूर्वायुष्याने त्याला खतपाणी घातले. त्याला मानवतेचे धुमारे
फुटले. त्याची कोवळीक नव्वद पावसाळे सरले तरी वठली नाही.
पाच फूट दोन इंच अशी सर्वसामान्य स्त्रीची उंची. सडपातळ बांधा. किंचित
एकसुरी आणि थरथरणारा आवाज. चेहऱ्यावर मनोनिग्रह. वयाच्या विसाव्या वर्षापासून
जपलेला ताठ कणा नव्वदाव्या वर्षीही वाकला नाही. तारुण्याची नव्हाळी त्यांच्या
चेहऱ्यावर न कधी उमटली, न स्वप्नाळू बनण्याचा तो काळ होता. त्यांचा रंग
सावळा, केस सरळ, त्या काळाप्रमाणे
मध्ये भांग आणि पाठी बुचडा. वृद्धपणी संपूर्ण रुपेरी केसांचा मुकुट मस्तकावर होता.
पाणी न गाळता सतत ध्यासात मग्न असणारे, किंचित मिटलेले वृद्धापकाळचे म्लान डोळे.
आयुष्याच्या शेवटी दृष्टी अधू झाली. ज्या डोळ्यांनी फार पाहिले होते, भोगले होते, ते जाड चष्म्याच्या
भिंगांआड गेले. वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात आयुष्यभर स्वत:ला वाहून घेत १९५५
साली वयाच्या ९२व्या वर्षी डॉ. रखमाबाई अनंतात विलीन झाल्या.
L. Martinnel डॉ. रखमाबाईंच्या मृत्यूलेखात म्हणतात,
Unlike some pioneers
she was never aggressive or tactless. On the contrary she was gentle, had great
charm and keen sense of humour. But what I think we shall most remember her
for, were her selflessnes, goodness and absolute integrity. A pioneer of whom
her beloved country must be justly proud.
• संदर्भ :
१) डॉ. रखमाबाई : एक आर्त -
मोहिनी वर्दे.
२) Research Article in Indian Law
Review - Dadaji Bhikaji vs Rukhmabai (1886) ILR 10 Bom 301: rewriting
consent and conjugal relations in colonial India.
• वाचत रहा :
महिलांना उस्फूर्त व प्रेरणादायी.
उत्तर द्याहटवारखमाबाईंचं कार्य खरंच खूप प्रेरणादायी आहे.
हटवाम्हणूनच, २०१७ मध्ये त्यांच्या १५३ व्या जयंतीनिमित्त गुगलने खास डूडल तयार करून त्यांच्या कार्याला सलाम केला होता.
धन्यवाद! 🌼🦋
✨😇✨
उत्तर द्याहटवा