सावित्रीच्या लेकी?


superstitious girl forgotten teachings of savitribai phule
स्त्री देवी‌; पण फक्त तीच जी त्यांचा धर्म कोणतीही शंका, प्रश्न न विचारता आचरणात आणेल ती!

‘सर्व धर्मांचा एक समान दुर्गुण म्हणजे स्त्रियांना त्यांनी दिलेलं दुय्यम स्थान’ स्त्री देवी‌; पण फक्त तीच जी त्यांचा धर्म कोणतीही शंका, प्रश्न न विचारता आचरणात आणेल ती! हिंदू धर्मकर्त्यांना, जी स्त्री स्वतःच्या व्यक्तित्त्वाचे पूर्णपणे विसर्जन करील, तीच स्त्री आदर्श वाटते.


भारतात स्त्रीमुक्ती चळवळीची सुरूवात १८५२ साली ‘सावित्रीबाई जोतिबा फुले’ यांनी मुलीच्या शाळेत शिक्षिका म्हणून प्रवेश केला तेव्हाच झाली. आधुनिक स्त्रीमुक्ती चळवळी उदयास येण्यास त्यानंतर बराच कालावधी लागला. त्या सर्वांचा उद्देश एकच होता, तो म्हणजे स्त्रीला तिचं हक्काचं स्थान मिळवून देणं, तिला माणूस म्हणून स्वतंत्रपणे जगण्याची संधी मिळवून देणं. त्यांत बऱ्यापैकी यशही आलं. पण आपल्या देशात सर्वच काही साधं सोपं नसतं. इथं धर्माची व्यक्तिगत जीवनात नको तितकी लुडबूड असते. कोणताही धर्म त्याला अपवाद नाही. या ‘सर्व धर्मांचा एक समान दुर्गुण म्हणजे स्त्रियांना त्यांनी दिलेलं दुय्यम स्थान’.

त्याचवेळी तिच्या डोक्यावर त्यांनी सर्व परंपरा, रूढींचं पालन करण्याची जबाबदारी देखील टाकली आहे. त्यासाठी हुशारीने धर्म तिला देवी म्हणून गौरवत असतात; पण कोणती स्त्री देवी‌? तर फक्त तीच जी त्यांचा धर्म कोणतीही शंका, प्रश्न न विचारता आचरणात आणेल ती! जी त्यांच्या पुरुषांसमोर कायम मान खाली घालून जगेल ती! हिंदू धर्माची स्थिती पाहिली तर इथंही काही वेगळा प्रकार नाही. शेकडो वर्षांपासून ही अदृश्य गुलामगिरी राजरोसपणे सुरू आहे. पण त्याची आम्हा स्त्रियांना जराही जाण नाही. या गुलामगिरीचं एक उदाहरण म्हणजे आम्हा स्त्रियांची व्रतवैकल्ये. कधी मुलांसाठी, कधी नवऱ्यासाठी, कधी घरासाठी म्हणून ही व्रते आम्ही करत असतो. त्यांची ढिगाने उदाहरणे आहेत. या व्रतांचे खरे उद्देश काय आहेत, याचा आम्हाला पत्ताच नसतो. या व्रतांच्या कथा खऱ्या की खोट्या तेही आम्हाला माहित नसतं. पण केवळ पारंपारिकता मिरवण्यासाठी आम्ही आंधळेपणाने या गोष्टी करत रहातो.

अलीकडे सर्वांनाच आपली हिंदू अस्मिता अधिक टोकदारपणे जाणवू लागली आहे. त्यामुळे आपले हिंदुत्व टिकवून ठेवणाऱ्या या व्रताच्या गोष्टी करण्यात आम्हा स्त्रियांना मोठा परमानंद भेटत असतो. वटसावित्रीव्रत, सत्यनारायणाची पूजा, मंगळागौर, तुळशी विवाह, सोळा सोमवार ही याची प्रातिनिधिक उदाहरणे आहेत.

हिंदू धर्माच्या उज्ज्वल परंपरा म्हणून मिरवण्यात येणाऱ्या या व्रतांचा आधार ज्या धर्मग्रथांमुळे आहे त्यात आम्हा स्त्रियांचं स्थान कुठे आहे? हिंदूंचं धार्मिक आणि सामाजिक वर्तन ज्या ग्रंथामुळे नियमबद्ध झालं आहे तो ग्रंथ म्हणजे ‘मनुस्मृति’. ‘मनु’ हा खरंतर स्त्रियांचाच नव्हे, तर पुरूषांचाही शत्रू आहे. त्याचे सर्व नियम हे ब्राम्हण पुरुषांसाठीच आहेत. ज्यात कोणत्याही वर्णाच्या स्त्रियांना आणि त्यांच्यासोबतच तथाकथित शुद्र व अस्पृश्य ठरवण्यात आलेल्या पुरुषांना कोणतेही मानाचे स्थान नाही.

आपल्यासमोर स्त्रिच्या संदर्भात मनुचं कोणतं वाक्य सांगितलं जातं, तर ‘जिथे नारी पूजिली जाते, तिथे देवता रमतात’ हे. पण कधी? तर जेव्हा ती नारी मनुच्या उपरोल्लेखित सर्व गोष्टींचं मुकाट पालन करेल तेव्हाच. एरवी मनु स्त्रिला जनावरांच्या संगतीत नेऊन सोडतो. मनुच्या मते,


नवरा स्वेच्छाचारी व दुष्ट असला तरी स्त्रीने त्याची निष्ठापूर्वक सेवा केली पाहिजे. हा पती जेव्हा मृत होतो, तेव्हा स्त्रीने व्रतस्थ रहावे, फळे खावी, शरीर कृश कुरावे पण कधीही परपुरुषाचा विचार मनात आणू नये. (पुरूषांना मात्र पुन्हा लग्न करण्याची परवानगी आहे!) कोणतेही कार्य स्वतंत्रपणे करण्याचा स्त्रियांना अधिकार नाही. स्त्रिच्या जीवनाची इतिकर्तव्यता परवश रहाण्यात आहे. पती हा तिचा मुख्य मालक. त्यापूर्वी पिता आणि पतीच्या नंतर पुत्र. तिने स्वतंत्रता स्विकारू नये. स्त्री म्हणजे असत्य.

स्त्रियांविषयी मनूने उधळलेली ही काही मुक्ताफळे. शेकडो वर्ष उलटली तरीही मनुच्या याच गोष्टी आजही प्रत्यक्ष/अप्रत्यक्षपणे आपल्या इथं पाळल्या जातात. ज्याला ‘परंपरेचं’ नाव दिलं जातं. ज्याचा पुन्हा एकदा हिंदूत्ववादी शहाणे अभिमानाने उल्लेख करू लागले आहेत. या लोकांना स्त्रिला देवतेचं रुप चढवून आजन्म पुरुषी वर्चस्वाच्या पिंजऱ्यात कोंडून ठेवायचं आहे. त्यासाठी त्यांनी ज्या ज्या करामती केल्या आहेत, त्यांतील सवाधिक प्रभावी करामत म्हणाजे व्रत-उपवास, सण-उत्सवाचे सोहळे. ज्यांची संपूर्ण, जबाबदारी केवळ आणि केवळ स्त्रियांवर टाकलेली आहे. पुरुषांची कोणती व्रते आहेत याचा विचार केला, तर एकही व्रत सापडत नाही.

ही इतकी व्रते आली तरी कोठून? याला जबाबदार आहे तेराव्या शतकातील देवगिरी यादवचा प्रधानमंत्री, ‘हिमाद्री’. यानं ‘चतुर्वर्गचिन्तामणी’ नावाचा एक ग्रंथ लिहिला.

मध्ययुगीन महाराष्ट्र आणि ज्ञानेश्वरांचे युगप्रवर्तन’ या ग्रंथात ‘डॉ. स.रा. गाडगीळ’ याविषयी लिहितात,


हेमाद्रीच्या या ग्रंथात जवळजवळ दोन हजार व्रते सांगितली आहेत. व्रते आणि त्यानिमित्ताने ब्राम्हण भोजने ह्यांचा इतका सुकाळ अन्यत्र क्वचितच आढळेल. वर्षाचे ३६५ दिवस, रोज पाच-पाच, सहा-सहा व्रते केली तरी सर्व व्रतांना पुरणार नाहीत. वरिष्ठ वर्णियांच्या विकृत परमार्थवादाचे आणि सुखलोलूपतेचे प्रत्यंतर या व्रतखंडावरून येते. परिणाम काय झाला? तर एकेकाळचं अजिंक्य असं यादवांचं साम्राज्य या व्रतवैकल्यांमध्ये अडकलं. रणांगणात शत्रूंवर तलवारीचे वार घालणारे पराक्रमी मराठे पुजाऱ्यांच्या सांगण्यावरून आता आचमणे वाहण्यात धन्यता मानू लागले. त्यामुळे अवघ्या पन्नास वर्षांनंतर अल्लाउद्दीन खिलजीने आपल्या केवळ आठ हजार सैन्यानिशी यादवांचं लाखभर परंतु सत्व हरवलेल्या सैन्याची दाणादाण उडवली आणि महाराष्ट्र गुलामगिरीत जखडला गेला. पुढची तीनशे वर्षे महाराष्ट्राने या गुलामगिरीचे भोग भोगले. पण आपले डोळे अजूनही उघडत नाहीत.

या व्रतांना खरंच काही अर्थ आहे का? उत्सुकता म्हणून तुळशी विवाह आणि वटसावित्रीच्या कथा नेमक्या काय आहेत ते पाहिलं. वाचल्यावर वाटलं की या कथा वाचून कोणत्याही सुबुद्ध सुविचारी व्यक्तीला शिसारी आल्याशिवाय राहणार नाही.

‘वृंदा’ ही जालंधर नावाच्या असुराची पत्नी. थोर पतिव्रता. शिवाय तिची विष्णुवरही खूप श्रद्धा होती. तिच्या पातिव्रत्यामुळे जालंधर देवांना अजिंक्य झाला होता. तेव्हा विष्णुने नेहमीप्रमाणे लबाडी करत वृंदेची फसवणूक केली आणि जालंधरचं रूप धरून तिचा भोग घेतला. (थोडक्यात तिच्यावर बलात्कार केला) तिचे पातिव्रत्य खंड पावले(?) व परिणामी जालंधर युद्धात मारला गेला. वृंदेला हे कळल्यानंतर तिने स्वत:ला जाळून घेत जीव दिला. तिच्या राखेतून तुळस निर्माण झाली आणि याच तुळशीचं दरवर्षी विष्णूसोबत लग्न लावण्यात येतं! ही कथा वाचल्यावर शेजारच्या काकूंच्या सांगण्यावरून रांगोळीत नवरा-नवरी म्हणून तुळस आणि विष्णूचं नाव लिहिलेल्या मला स्वतःचीच चीड आली. हा त्या मानी स्त्रीचा किती घोर अपमान आहे याचा विचार करा. म्हणजे, ज्या विष्णूने वृंदेला फसवून तिच्यावर बलात्कार केला, त्याच्याशीच तिचं लग्न लावलं जातं. तोच कित्ता नंतरही गिरवण्यात आला आहे. बलात्कारित स्त्री जर अविवाहीत असेल तर तिचं त्या बलात्काऱ्याशीच लग्न लावून दिलं जातं. अगदी न्यायालयेही हाच निकाल देतात. ती मुलगी नाईलाजानेच त्याला तयार होत असेल हे विशेष सांगायला नको. कारण इतर कोणीही या मुलीचा स्वीकार करायला तयारचं नसतं.

वटसावित्रीची कथाही काही वेगळी नाही. तीदेखील स्त्रीचा अपमान करणारीच आहे. तिची अगतिकता दर्शवणारी आहे. असं म्हणतात की, तिचा विवाह होत नव्हता म्हणून शेवटी तिने रोगट, गरीब सत्यवानाशी नाईलाजाने विवाह केला. आपल्या सेवावृत्तीने तिने त्याच्या रोग घालवला आणि त्याच्या संसारही संभाळला. पण आपल्या वडीलांची एकुलती एक मुलगी असताना तिचा बाप स्वतःला ‘अनपत्य’ म्हणजे ‘अपत्य नसलेला’ म्हणवून घ्यायचा. म्हणजे मुलगी हे अपत्यच नसतं? आजच्या बायकांना चालणार आहे का हे?

हिंदू धर्मकर्त्यांना, जी स्त्री स्वतःच्या व्यक्तित्त्वाचे पूर्णपणे विसर्जन करील, तीच स्त्री आदर्श वाटते. आत्मविसर्जन करणारे सावित्रीचे हे व्यक्तित्व हा पुरुषप्रधान समाजव्यवस्थेने स्वतःला अनुकूल म्हणून निर्माण केलेला खुजा व खुरटलेला आदर्श आहे. मानवी स्वातंत्र्याच्या व विकासाच्या दिशेने झेपावणारा आदर्श नव्हे. यांचाच आदर्श जर ठेवायचा, तर सावित्रीच्या नावावर आजच्या पोरी कोणाशीही लग्न करायला तयार होणार आहेत का? सावित्री ही आपल्याकडे पाच पवित्र स्त्रियांपैकी एक मानली जाते. अन्य स्त्रियांमध्ये अनुसूया, सुलोचना, मंदोदरी, आणि द्रौपदीचा समावेश होतो. या ‘आदर्श भारतीय स्त्रिया’ आहेत, अशी आपल्याकडे समजूत आहे.

यांतील अनुसूया पवित्र होती म्हणून पार्वती, लक्ष्मी, सरस्वती (सरस्वती ही ब्रह्माची मुलगी होती. अतिशय सुंदर व बुद्धिमती अशा आपल्या मुलीवरच ब्रह्माची नजर पडली आणि तिनं त्याच्याशी लग्न करावं म्हणून तो तिच्या मागे लागला. तिने त्याच्या तावडीतून सूटण्यासाठी बरीच धडपड केली पण शेवटी नाईलाजानं तिला त्याच्याशी लग्न करावं लागलं. जेव्हा शंकराला हे कळालं तेव्हा त्याने ब्रह्मास शाप दिला की यापुढे कोणी त्याची पुजा करणार नाही. असा हा ब्रह्मदेव!) तर झालं असं की पार्वती, लक्ष्मी, सरस्वती यांना तिची असूया वाटायची. तिचं पावित्र्य खरं आहे की नाही हे बघण्यासाठी त्यांनी त्यांच्या नवऱ्यांना म्हणजे शंकर, विष्णु आणि ब्रह्मदेवांना तिच्याकडे पाठवलं. या शहाण्यांनी साधूचं रूप घेऊन अनुसूयेकडे जाऊन कोणती भिक्षा मागितली? तर तिने नग्न होऊन त्यांना भिक्षा घालावी ही! हे यांचं दैवपण! अनूसूयेनं म्हणे त्यांना आपल्या पातिव्रत्याच्या बळावर लहान मूल केलं आणि त्यांना दूध पाजलं.

द्रौपदीचे पाच पती होते. तिचा आदर्श घेऊन आज एखाद्या स्त्रीने पाच पती केले तर चालणार आहे का आपल्या समाजाला? मंदोदरी आणि सुलोचना या रावण आणि त्याचा मुलगा मेघनाद यांच्या बायका, पण नवऱ्यासमोर कधी त्यांचं काही चाललं नाही. तरीही त्याची सेवा करीत राहिल्या. अशा गुलाम मनोवृत्तीचा आदर्श ठेवणार का आजच्या स्त्रिया? आणि या सगळयात सीतेचं नाव मात्र नाही. का? कदाचित ती अत्यंत स्वाभिमानी स्त्री होती म्हणून असेल. रामाने तिच्यावर संशय घेतला तेव्हा तिने अग्नीपरिक्षा दिली. मुलं झाल्यावरही रामाचा संशय फिटला नाही तेव्हा सीतेनं त्याची खरडपट्टी काढली आणि सरळ आत्महत्या केली. अर्थात रामायणात तसं काही लिहिलेलं नाही. तिथे सीतेनं भूमातेची प्रार्थना केली आणि तिने तिला आपल्या पोटात घेतलं असा प्रसंग रंगवला आहे. कारण, सत्य लिहिणं त्यांना परवडणारं नव्हतं. सीतेचा आदर्श हिंदू स्त्रियांनी ठेवावा असं त्यांना वाटत नाही म्हणून ती आदर्श पतिव्रता स्त्रियांमध्ये मोडत नाही. त्याहीपेक्षा रामाने तिच्यावर संशय घेतला होता हे प्रमुख कारण आहे. राम मात्र सारं करून-सवरून ‘एकपत्नीव्रती’ म्हणून मिरवतो. सीतेच्या नशिबात मात्र वनवासच येतो. कारण समाजाला सीतेसारख्या तेजस्वी स्त्रिया जन्माला यायला नको आहेत. त्यासाठी तो हुशारीने सारी जबाबदारी स्त्रियांवर टाकून मोकळा होतो. एका लेखामध्ये एक मजकूर वाचला होता,


स्त्री का पतिव्रता होना आज के युग में दुर्लभ हो चला है। एक ही पति या पत्नीधर्म का पालन करना हिंदू धर्म के कर्तव्यों में शामिल है। धर्म, समाज और सभ्यता को बचाएं रखने के लिए स्त्री का पवित्र रहना जरुरी है, क्योंकी स्त्री इन सभी के केंद्र में है।

म्हणजे पवित्र राहण्याची जबाबदारी कोणाची? तर फक्त स्त्रियांची! पुरुष गावचे उकीरडे फुंकायला मोकळे!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एक वाक्य प्रसिद्ध आहे, की ‘गुलामाला तो गुलाम असल्याची जाणीव करून द्या तरच तो बंड करून उठेल.’ या वाक्यातील ‘जाणीव’ हा शब्द फार महत्त्वाचा आहे. अनेक स्त्रियांना ही जाणीवच नसते. त्यामुळे आपलं काही चुकतंय हेच त्यांना मान्य नसतं.

सध्याच्या पिढीतील स्त्रियांच्या बाबतीत ही कसोटी लावून काही उदाहरणे बघितली तरी हे खरं स्वातंत्र्य आहे की छुपी गुलामी हे लक्षात येईल. स्त्री-पुरुष समानतेचा नारा आज आपण देतो – व तसं आपण वागतोही असं अनेकांचं म्हणणं असतं – ही समानता लग्नाच्या दृष्टीने पाहिली तर असं दिसून येईल की यात वर्चस्व पुरूषाचंच आहे. बायकोनं गळ्यात मंगळसूत्र घालावं, हातात बांगड्या घालाव्या कपाळावर टिकली लावावी, ते तिच्या सौभाग्याचं लक्षण आहे असं सातत्यानं ठसवलं जातं. सात जन्म एकच नवरा मिळावा म्हणून बायकांनीच पूजा करायची, एखादीनं म्हंटलं ‘मला नाही करायची पूजा, मला नकोय तू पुढच्या जन्मी नवरा’ तर किती नवऱ्यांना आवडणार आहे ते? किती बायकांना या सर्व गोष्टीत काहीच वावगं वाटत नाही? ‘लग्नाच्या बाजारात मुलींच्या दिसण्याला फार महत्त्व दिलं जात नाही’ असं काहींचं म्हणणं असतं पण ते महत्त्व आता तिच्या कमाईला आलं आहे हे विसरून चालणार नाही. त्यातही तिचा पगार आपल्यापेक्षा कमीच हवा, ती जिथे नोकरी करते तिथल्या पुरुष सहकाऱ्यांशी तिनं फार मिळून मिसळून वागू नये अशी तिच्यावर बंधनं नसतात का? या सर्व प्रश्नांच्या मागे आपल्या बायकोनं आपलंच ऐकावं ही पुरुषी मानसिकता तर असतेच; पण त्या बाईला देखील तिच्या नवऱ्याचं असं वागणं सहसा खटकत नाही, कारण तो आपला नवरा आहे, त्यानं अशा अपेक्षा बाळगण्यात काही चूक नाही, तेव्हा आपणच तडजोड करावी, हे सतत तिच्यावर ठसवलं गेलेलं असतं आणि तिलाही तेच योग्य वाटायला लागतं. निदान ती विरोध तरी करत नाही. सोसत राहते. कधी तिच्या संसारासाठी, कधी मुलांसाठी, कधी आपल्या माहेरच्यांसाठी, कधी समाजासाठी. पण मग ही काय फक्त स्त्रीचीच जबाबदारी असते का? संसार, घर हे काय फक्त बाईचंच असतं का? त्यामुळे पहिला मुद्दा ‘तिला आपल्या गुलामीची जाणीव आहे का’ हा आहे. दुसरं म्हणजे ती ज्याला आपलं स्वातंत्र्य समजते आहे ते खरं स्वातंत्र्य आहे का हा.

आपल्या देशांत मनुस्मृतीच्या नावाखाली करोडो लोकांना जाच सहन करावा लागला आहे. पण दुःखाची गोष्ट अशी की हा जाच नसून धर्म आहे असं इथल्या लोकांचं ठाम मत आहे. त्याचे संस्कार इतके गडद आहेत की ते जणू आपल्या रक्तातच भिनले गेले आहेत आणि त्यात कोणालाच काही चूक वाटत नाही. मनुला स्त्रीविषयी काय वाटतं ते आधी सांगितलं आहेच. पुढे तो असंही सांगतो की ‘स्त्रीला स्वातंत्र्य नाही, मुलगी असेल तर पिता, बहीण असेल तर भाऊ, पत्नी असेल तर पती, आई असली की मुलगा हे सारे पुरुषच तिचं रक्षण करतील, तिच्या जगण्याचे निर्णय घेतील आणि तिनं ते पाळायचे. त्याविरूद्ध वागायचं नाही. कारण तिला स्वतःचं असं स्वतंत्र अस्तित्त्व नाही.’

ही गोष्ट आपण अगदी आजही घरोघरी पाहू शकतो की नवरा बायकोवर डाफरतो, पोरगा आईवर ओरडतो, भाऊ आपल्या बहिणीवर हक्क गाजवतो आणि पिता आपल्या पोरीच्या आयुष्याचे निर्णय घेतो. या सर्वांना त्या बाईला काय वाटतं हे विचारण्याची गरज वाटत नाही. त्यांनाही दुर्दैवानं आपण आपलं काही मत द्यावं असं वाटत नाही. आता नक्कीच परिस्थिती बदलत आहे; पण पूर्णपणे बदलली आहे असं मात्र नाही. कारण कुठे ना कुठे जेव्हा कसोटीची वेळ येते तेव्हा पुरुषच नव्हे तर स्त्री देखील त्यात अपयशीच होते. पुरुषाला आपला अहंकार सोडवत नाही आणि स्त्रीला बंड करणं जमत नाही.

या सर्व गोष्टींना व्रत उपवासांचा भक्कम आधार देण्यात आला आहे. सोळा सोमवार का करायचे तर चांगला पती मिळावा म्हणून. चांगली पत्नी मिळावी म्हणून व्रत आहे का? मंगळागौर का करायची तर पतीला सौख्य लाभावं म्हणून. पत्नीच्या सुखासाठी आहे का असं व्रत? वटसावित्री का करायची तर हाच पती जन्मोजन्मी मिळावा म्हणून. हीच पत्नी मिळावी म्हणून आहे का व्रत? श्रावण सुरू झाला की या व्रतांची जी त्सुनामी लाट येते ती दिवाळी होईपर्यंत काही ओसरत नाही. बरं या व्रतांच्या साऱ्या तयारीची जबाबदारीही स्त्रियांवरचं. पुरूष काय करणार तर खिरापत, प्रसाद खाऊन ढेकरा देणार?

आजच्या काळात तरी यात बदल व्हावा अशी अपेक्षा असताना घडतंय वेगळंच. आता तर एखादी नोकरदार स्त्री घर आणि नोकरी सांभाळूनही अशी व्रते करत असेल तर तिचा आणखी गौरव केला जातो. पण असं करताना स्त्रियांना हे समजत नाही की त्या पुरुषी वर्चस्वाच्या विळख्यातच अधिकाधिक अडकल्या जात आहेत. वडाची पुजा करणाऱ्या कोणत्या स्त्रिया पर्यावरणाची काळजी घेतात का? किती जणींनी वडाची रोपं रोवली आहेत? रस्ता रुंदीकरणात शेकडो वर्षांचे हजारो डेरेदार वड कापले गेले तेव्हा किती स्त्रियांनी त्याचा विरोध केला? हे वड राहिले नाहीत तर त्या उद्या प्लास्टिकचे वड पुजणार आहेत का? म्हणजे त्याची सुरूवात झालीच आहे म्हणा. पण मग त्यासाठी असल्या उपवासांची खरंच गरज असते का ज्यांत अजूनही भेदभाव पाळले जातात? वटसावित्रीची पुजा करून नवऱ्याचं सुख मिळत असतं तर कोणतीही स्त्री विधवा झाली नसती. पण ही साधी गोष्टही यांना समजत नाही.

आज सोशल मीडियावर बाईनं ब्रा घालावी की नाही याची चर्चा रंगते; पण या बायका सामाजिक, पर्यावरणीय, धार्मिक अन्यायाविरोधात काही बोलल्याचं दिसत नाही. एकोणिसाव्या शतकात जेव्हा महात्मा फुले स्त्रियांच्या शिक्षणासाठी जीवाचं रान करत होते तेव्हा त्या काळचे उच्चवर्णीय सुधारकही असेच, बायकांनी जाकिट घालावे की नाही, तिने गोल कुंकू लावावे की आडवी चिर काढावी, केस मोकळे ठेवावे की अंबाडा घालावा अशा ‘गहण’ विषयांवर काथ्याकुट करत होते. बिनबुडाची, स्त्रीघातकी, पुरुषीवर्चस्वाची व्रते, उपासना या बायका निर्बुद्धपणे करतात व त्या सणसमारंभात मिरवून आपण किती धार्मिक आहोत हे दाखवतात. मात्र ज्या लोकांनी या स्त्रियांच्या उद्धारासाठी स्वतः आयुष्यभर आपलं जीवन जाळलं त्यांची आठवण देखील यांना येऊ नये याची किंचीत तरी लाज या बायकांना वाटते का?

महात्मा जोतीबा फुले’ या चरित्रग्रंथांत ‘धनंजय कीर’ लिहितात,


हिंदी स्त्रिया सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यस्मृतीलाही जागत नाहीत. ज्या साध्वीने भारतातील तमोयुगात शिक्षिकेचा पेशा पत्करण्याचे अलौकिक धैर्य दाखवून हिंदी स्त्रीवर लादलेली अन्यायी बंधने झुगारून दिली आणि मुलींना शिकवून हिंदी स्त्रियांचा उद्धार साधण्यासाठी पतीबरोबर सासऱ्याचे घर सोडले, पतीसंगे हालअपेष्टा भोगल्या, शिव्याशाप सहन केले, त्या स्त्रीशिक्षणाच्या अग्रदूतीची हिंदी स्त्रियांनी स्मृती बाळगू नये, ही कृतघ्नपणाची परमावधीच नव्हे काय? आज कोणत्याही स्त्रीने काही कर्तृत्त्व गाजवलं तर तिचा ‘सावित्रीची लेक’ म्हणून सार्थ उल्लेख केला जातो अशा काळात हे घडत आहे याची आपल्याला लाज वाटणार की नाही? हे केवळ फुले पति-पत्नीचं दूर्दैव नाही. भारतात सर्वप्रथम कुटुंब नियोजन राबविणे किती महत्त्वाचे आहे हे डॉ. आंबेडकरांनी या संबंधातले विधेयक सादर करून पटवून देण्याचा प्रयत्न केला होता. पण या विधेयकाला सर्व धर्मिय सदस्यांनी विरोध करून ते हाणून पाडले. र. धों. कर्वे यांनी लैंगिक विषय, लैंगिक आरोग्य यावर कायम जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे वडील, धोंडो केशव कर्वे यांनी स्त्री शिक्षणासाठी आयुष्य वेचलं. या सर्वांची किती बायकांना आज आठवण येते? सर्वज्ञ चक्रधरांनी या उपवासांचा फोलपणा तेराव्या शतकातच उघड केला होता. त्यांची एक शिष्या बोणेबाई गोकुळ अष्टमीच्या दिवशी उपवासाचे व्रत करायची. त्या व्रताचा त्यांनी त्याग करावा म्हणून स्वामी म्हणाले, ‘बाई! श्रीकृष्णाचा जन्म झाला तेव्हा देवकी देवीने उपवास केला होता काय? एवढीशी पेज तर त्या मातेने खाल्ली असेलच ना? देवकी देवीला महान पुत्ररत्न प्राप्त झाल्याचे आनंदाप्रीत्यर्थ क्लेश कशाला?’

या असल्या आचरट व्रतांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या चक्रधरांचं काय झालं? तर तत्कालिन ब्राह्मण वर्गाने, ज्यांची पोटं व्रतांमुळे फुटेपर्यंत फुगली होती, त्यांनी चक्रधरांच्या विरोधात कलह माजवला आणि त्यांचा वध करवला. ज्यांत हेमाद्रीने पुढाकार घेतला होता.

परंपरा पाळाव्यात; पण कोणत्या? ज्या तुम्हाला जगायला ताकद देतात त्या. सणउत्सव साजरे नक्कीच करावेत; पण कोणते? ज्यामुळे तुमच्या जगण्यात आनंद निर्माण होतो ते. व्रत करावे; पण कोणते? ज्यामुळे तुमची आणि समाजाचीही उन्नती होईल. त्यागमूर्ती होऊन, प्रेमाच्या नावाखाली गुलामी करून, परंपरांची जोखडं पेलून, स्वतःचं स्वतंत्र व्यक्तित्त्व स्वतःच नष्ट करून ‘गृहलक्ष्मी’ होण्याची मनीषा बाळगणाऱ्या आपण स्त्रिया आपला केवळ आत्मघात करून घेत आहोत. स्त्री असो वा पुरुष आपण फक्त माणूस आहोत. माणूस होऊन जगण्यातंच आपलं खरं सुख आहे. एरव्ही अजूनही जर का आपल्याला धर्माची जोखडं वाहण्यातच भूषण वाटत असेल तर आपल्याला ‘सावित्रीच्या लेकी’ म्हणवून घेण्याचा काही एक अधिकार उरत नाही.

{fullWidth}

आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال