चौथी मिती

[वाचनकाल : २ मिनिटे] 
 
दोन व्यक्तिमत्वे अनुभवणारा माणूस, male with identity desorder
चौथी मिती. कॅनव्हासवर मारलेल्या तीव्र फटकाऱ्यांतून उमटलेल्या प्रतीकात्मक चित्रांतून उलगडत जाणारी‌‌.

 
प्रत्येक माणसाची वेगळी मिती असते. त्याच्या मितीतून तो जग पाहत असतो. या मितीतून जेव्हा तो स्वतःकडे पाहतो तेव्हा त्याला काय दिसत असेल? कोणीही दुसऱ्या व्यक्तीला कधी जाणून घेऊ शकत नाही इथपर्यंत ठीक आहे; पण तो स्वतःलाही जाणू शकत नाही हे गैर. कलाकार या वेगळ्या मितीत फसत नाहीत अशातला भाग नाही. याउलट ही चौथी मिती त्यांच्याभोवती जास्त करकचून आवळली जाते . . .

एक दगड असतो, एका चित्रात. मोठा, अगदी मोठा, आणखी मोठा . . . तरीही तो दगडच असतो. चित्रातला. पर्वत नसतो तो; कारण त्यावर नव्या पालवीने बहरलेली टुमदार हिरवीगार झाडं नसतात, खळखळ वाहणारे झरे नसतात की काटेरी बाभळी नसतात, सडलेल्या पाण्याची डबकी नसतात. अशा त्या सामान्य माणसाला पार करताच न येणाऱ्या मोठ्या दगडावर एक माणूस, उभा असलेला, असतो . . .
 
एक दगड असतो, एका चित्रात. काळा-कभिन्न कातळ. ते चित्र एका वेगळ्या प्रकारच्या खरखरीत कागदावर उमटलेलं असतं. अशा प्रकारच्या कागदाला 'कॅनव्हास' म्हणतात. छोटे-छोटे जाळीदार धागे असावेत असा हा, पांढऱ्याच्या अलीकडचा आणि काळ्याच्या पलीकडचा, जाडा-भरडा कागद. या कागदाचे इतर काही होणे शक्य नाही. त्याची होडी बनवून कोण्या लहानग्यातील खलाशी सफरीवर निघू शकत नाही की त्याचं विमान बनवून कोणी वाऱ्यावर सोपवू शकत नाही. तो कागद ज्याच्या वाट्याला आलेला असतो त्याने त्यावर काढलेला एक दगड असतो आणि त्या दगडावर एक, उभा असलेला, माणूस . . .
 
एक दगड असतो, चित्रातला, उन्हात तापणारा, थंडीत गोठणारा. त्या दगडाच्या भोवती मोकळ्या ढगात पक्षी उडत असतात काही त्या दगडावरच्या माणसाकडे पाहत. त्यांना त्याचा हेवा वाटत असतो की नाही माहिती नाही, की दया, की भीती, निश्चित सांगता येणार नाही; पण ते पक्षी त्या दगडावरच्या माणसावर उतरत नसतात, निदान चित्रात तरी, बाकी फारसं काही नाही त्या दगडाशिवाय . . .
 
एक दगड असतो आणि त्यावर एक माणूस, एका चित्रात. त्या माणसाला चेहरा आहे की नाही . . . आहे, अंधुक आहे. जास्त ओळखीचा वाटत नाही, अतिपरिचयातला नसावा. त्रयस्थ वाटावा असा फारशा रंगांनी न भरलेला हा सामान्य माणूस. त्याचे हात-पायसुद्धा हवेत विरघळल्यासारखे थोडेफार. कान-नाक-हनुवटी-केस सर्व दिसत असतं, त्याच्या डोळ्यांच्या जागी मात्र रिकामी जागा. भलीमोठी. कपाळ खाली खेचल्यासारखी. बाकी तो आणि त्याचा दगड . . .
 
एक माणूस असतो, चित्रातला. आणि याच चित्राच्या बाहेर रंग ओले असताना एक घामेजलेला चित्रकार त्याकडे पाहत असतो. तो पुन्हा-पुन्हा चित्र तपासतो. असलेले दगड-पक्षी, नसलेली झाडे-झुडपे, जाणवलेले सूर्य-पाऊस सगळ्या गोष्टी; मात्र त्या माणसाचा चेहरा थोडा जास्तच वेळ. त्याच्या लक्षात येत नसतं, स्वतःचं म्हणून त्याने कोणाचं चित्र काढलंय . . .


✒  लेखन – रंगारी
    मेल


संदर्भ :
१) छायाचित्र : टाकबोरू 
 
वाचत रहा :
 


आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال