झुंजार – मनिषा रोपेटा

[वाचनकाल : २ मिनिटे] 

मनिषा रोपेटा, manisha ropeta
पाकिस्तानात महिलांनी एकटीने पोलीस ठाण्यात किंवा कोर्टात जाऊ नये हा समज आहे. तो समज तिला बदलायचा होता.

पुरुषसत्ताक समाजकारण भेदणे ही बाब वाटते तितकी सोपी नाही. एकविसाव्या शतकातील मुला-मुलींना वहिवाट सोडून चालायचं म्हणलं, की या सत्तेशी दोन हात करावेच लागतात, त्यातही मुलींना जास्त. अशावेळी आपल्या कर्तृत्वाने, संघर्षाने जे जिंकतात ते दिपस्तंभ बनून पुढच्या स्वप्नवेड्यांना प्रोत्साहीत करत राहतात. अशाच जुलै २०२२ मध्ये स्त्रीसशक्तिकरण आणि जिद्दीचा दिपस्तंभ बनलेल्या मुलीची ही कहाणी आहे . . .

पुरुषप्रधान पाकिस्तानात सर्वाधिक अत्याचारग्रस्त जर कोणी असतील तर त्या महिला आहेत. अशा परिस्थितीत अडकलेल्या पाकिस्तानात एक महिला – तीही हिंदू महिला – पुरुषांची मक्तेदारी समजल्या जाणार्‍या पोलिस खात्यात भरती होते तेव्हा ही निश्चितच वेगळी व गौरवास्पद गोष्ट वाटते!
ही झुंजार महिला आहे पाकिस्तानातील सिंध प्रांतातील जेकोकाबाद येथील सव्वीस वर्षीय ‘मनीषा रोपेटा’ ही तरूणी. मध्यमवर्गीय हिंदू कुटुंबातील या तरूणीने पाकिस्तानात इतिहास रचलाय! मनिषाने गेल्या वर्षी सिंध लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाली होती. त्या उत्तीर्ण यादीतील १५२ यशस्वी उमेदवारांपैकी मनिषा १६व्या क्रमांकावर आहे (हे आणखी कौतुकास्पद) व प्रशिक्षण घेते आहे. त्यानंतर तिला ‘लियारी’मध्ये ‘डिसीपी’ म्हणून नियुक्त केले जाईल.
मनिषाने पाकिस्तान देशातील ‘पहिली हिंदू महिला डिसीपी’ होण्याचा पराक्रम केलाय. मात्र तिचा हा मार्ग अजिबात सोपा नव्हता. त्यासाठी तिला, ‘चांगल्या घरातील मुली पोलीस सेवेत जात नाहीत’ या नातेवाईकांच्या आणि समाजाच्या विचारसरणीशी लढावं लागलं. ती प्रसारमाध्यमांना सांगते;
‘पाकिस्तानात महिलांनी एकटीने पोलीस ठाण्यात किंवा कोर्टात जाऊ नये हा समज आहे. तो समज तिला बदलायचा होता म्हणून तिच्या तीन बहिणी डाॅक्टर असतानाही तिने हे वेगळे करीअर निवडले.’
शारीरिक आणि लैंगिक हिंसाचार, कौटुंबिक हत्या (ऑनर किलींग), जबरदस्तीने विवाह यांसारख्या समस्यांनी ग्रस्त असलेल्या, स्त्रियांसाठी सर्वात वाईट देशांपैकी एक असलेल्या पाकिस्तानमध्ये मनिषाला स्त्रीवादाच्या मोहिमेचे नेतृत्व करायचे आहे. येथे स्त्रियांना रक्षकांची सगळ्यात जास्त गरज आहे, आणि या गरजेनेच तिला पोलीस खात्यात सामील होण्याची प्रेरणा मिळाली.
कवितांची आवड असलेल्या मनिषाच्या वडिलांचे ती तेरा वर्षांची असतानाच निधन झाले. त्यानंतर मुलांच्या भविष्यासाठी तिची आई कराचीला आली. आपल्या संघर्षमय जीवनाची आठवण करताना ती सांगते की, जेकोकाबादचे वातावरण तिच्या अभ्यासातला सगळ्यात मोठा अडथळा होता, कारण तिथे मुलींना अभ्यास करण्याची देखील परवानगी नव्हती. अशा परिस्थितीत शिकून एका मोठ्या हुद्द्यावर कार्यरत होणे ही सोपी बाब नव्हती. परंतु जिथे बहुतांश पिडीत महिला आहेत, तिथे संरक्षक देखील महिलाच असायला हवी ह्या विचाराने नेहमीच प्रेरीत असल्याने ती हे यश मिळवू शकली.
गुन्हेगारीने ग्रस्त असलेल्या लियारीमध्ये मैदानी प्रशिक्षणासोबतच मनिषा एका खाजगी अकादमीतही शिकवते, मार्गदर्शन करते. तिच्या या कामामुळे इतर मुलीही प्रेरणा घेऊन पुढे जाव्यात, असे तिला प्रकर्षाने वाटते. मुलींच्या शिक्षणाबाबत उदासीनता, सामाजिक रूढीप्रियतेपासून ते तिच्या कुटुंबातील नातेवाईकांचाच तिच्यावर विश्वास नसणे या सर्व अडचणींच्या विरोधात जाऊन त्यावर यशस्वीपणे मात करणार्‍या मनिषा रोपेटा हिचे जितके कौतुक करावे तितके कमीच आहे.

पाकिस्तानात होऊ घातलेला हा लहानसा बदल देखील पुढे जाऊन तिथल्या महिलांसाठी राजमार्ग होऊ शकतो. त्याची प्रेरणास्रोत झाल्याबद्दल मनिषा रोपेटा हिचे हार्दिक अभिनंदन!


✒ लेखन - जुईली
मेल

संदर्भ :
१) छायाचित्र : टाकबोरू

वाचत रहा :
१) झुंजार ती (सर्व भाग)
२) वर्चस्वनादी (लेख)
३) कोरडा वसंत
{fullWidth}

आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال