भाजप – अंधारातून अंधाराकडे

[वाचनकाल : ५ मिनिटे] 

भाजपचे कमळ, lotus of bjp
भारतीय जनता पार्टी या नव्या पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली त्यावेळी व्यासपीठावरील मुख्य फलकावर तिघांचेच फोटो होते. ते तिघेजण म्हणजे, दिनदयाळ उपाध्याय, जयप्रकाश नारायण आणि तिसरे होते महात्मा गांधी!

काटाही आमचा आणि छापाही आमचाच! यातील काटा काढण्यासाठी छापा टाकणारा सत्तापिपासू पक्ष कोणता हे देशाच्या तमाम नागरिकांना वेगळे सांगण्याची गरज उरू नये अशी सोयच सत्तासुरींनी केलेली पहायला मिळते. निश्चितच आज देशात आनंदी-आनंद असेल कारण आज भाजपचा स्थापना दिन. स्थापनेच्या वेळी मात्र या पक्षाची धोरणे वेगळी होती ती नेमकी काय . . . ?

६ एप्रिल १९८० रोजी भाजप या पक्षाची स्थापना झाली. आज भाजप हा जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे. अचानक एखाद्या घटनेवरून स्थापन झालेला हा पक्ष नाही. त्याची स्थापना पूर्वीच्या ‘जनसंघ’ या राजकीय पक्षामधून झाली. ही स्थापना का झाली, कशी झाली व या स्थापनेमागचा उद्देश काय होता, हे या लेखात जाणून घेऊ.
२७ सप्टेंबर १९२५ रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) स्थापना झाली. मात्र ५ मे १९५१ रोजी जनसंघाची स्थापना होईपर्यंत संघाची कुठलीच राजकीय शाखा नव्हती. नारायण हर्डीकर आणि तत्कालीन हिंदू महासभेचे नेते विनायक दामोदर सावरकर या दोघांनी संघाला राजकीय पक्ष म्हणून समोर येण्याची विनंती केली होती. मात्र, संघ सामाजिक-सांस्कृतिक विषयांवरच काम करेल, असं म्हणत पहिले सरसंघचालक केशव बळीराम हेडगेवारांनी राजकीय पक्ष स्थापनेला विरोध केला.
३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसेनं महात्मा गांधींची हत्या केली. या घटनेनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी बंदी घातली. या काळात माधवराव सदाशिवराव गोळवलकर सरसंघचालक होते. संघावरील बंदीमुळे राजकीय पक्षाची आवश्यकता अधिक भासू लागली. संघाची बाजू मांडणारे शासनामध्ये व संसदेमध्ये कोणीतरी असावे असा विचार समोर येऊ लागला. गोळवलकरांनाही स्वत:ला असं वाटत होतं. मात्र, संघाला पूर्णपणे राजकीय पक्षात रूपांतरित करण्यास त्यांचा विरोध होता. राजकीय पक्षाची स्वतः स्थापना करणे शक्य नव्हते; पण राजकीय पक्षाचा पाठिंबा आवश्यक होता. त्यामुळे गोळवलकरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांना हव्या त्या पक्षात प्रवेश करून रा. स्व. संघाला त्यांचा पाठिंबा मिळावा यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
श्यामाप्रसाद मुखर्जी हे कट्टर हिंदू नेते नेहरूंच्या मंत्रिमंडळात होते. सरदार पटेल यांनी संघावर घातलेल्या बंदीवर ते नाखुश होते. त्यातच पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांक हिंदूंवर अत्याचार होत असल्याच्या बातम्या पुढे येऊ लागल्या. यावर उपाय म्हणून नेहरूंनी पाकिस्तानचे प्रधानमंत्री लियाकत अलींसोबत चर्चा करून अल्पसंख्यांकाच्या संरक्षणार्थ करार केला. ज्यानुसार पाकिस्तानमध्ये हिंदू व भारतामध्ये मुस्लिम सुरक्षित राहतील याची जबाबदारी त्या-त्या देशाच्या शासनाने घ्यावी असे ठरवण्यात आले.
श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासाठी हा करार पुरेसा नव्हता. संघावर बंदी असली तरी त्यांच्या मनात संघाबद्दल विशेष स्थान होते. त्यामुळे श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी काँग्रेस सोबत काडीमोड घेत गोळवलकर गुरुजींसोबत नवीन पक्षाची स्थापना करण्यासंबंधीच्या चर्चा सुरू केल्या. या नवीन पक्षाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पूर्ण पाठिंबा असेल व या पक्षाच्या वाढीसाठी संघ काम करत राहील, हे गोळवलकरांनी मान्य केले.
अखेर एका बैठकीत गोळवलकर आणि डॉ. मुखर्जी राजकीय पक्षाच्या स्थापनेच्या मुद्द्यावर सहमत झाले आणि त्यातूनच ५ मे १९५१ रोजी ‘जनसंघाची’ स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढे २१ ऑक्टोबर १९५१ रोजी दिल्लीतल्या ‘रघुमल आर्य कन्या हायर सेकंडरी स्कूल’च्या आवारात पहिलं अधिवेशन झालं आणि त्यात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची जनसंघाचे पहिले अध्यक्ष म्हणून निवड झाली.
जनसंघाचा दिवा घरोघरी लावा, असे कार्यकर्ते म्हणायचे. कारण पूर्वीच्या जनसंघाची निशाणी दिवा (पणती) होती. त्यावेळी विरोधक (काँग्रेस), जनसंघ व दिव्याची खिल्ली उडवायचे. त्यावेळी विजय दूरच परंतु, उमेदवार मिळणेही कठीण जायचे. आता निवडणूक जिंकल्यानंतर कार्यकर्त्यांना जसा आनंद होतो, तसाच आनंद तेव्हा जनसंघाला उमेदवार मिळाल्यानंतर व्हायचा. महाराष्ट्रात त्यावेळी स्व. उत्तमराव पाटील, स्व. रामभाऊ म्हाळगी , स्व. रामभाऊ गोडबोले, स्व. मोतीराम लाहने यांनी खूप कष्ट करून जनसंघ वाढवला.
लेखक विनय सीतापती त्यांच्या ‘जुगलबंदी’ या पुस्तकात म्हणतात की, नंतरच्या काळात मात्र जनसंघ भारतीयांसाठी एक प्रभावी पक्ष म्हणून कामगिरी बजावण्यात कमी पडला. आणीबाणीच्या काळात जनसंघाने इंदिरा गांधी शासनाविरुद्ध मोठ्या प्रमाणात मोर्चेबांधणी करून प्रखर विरोध नोंदविला होता. परंतु, लोकांमध्ये त्यांच्याविषयी फारशी नसलेली लोकप्रियता हे पुढील निवडणुकांमध्ये जनसंघाचा प्रधानमंत्री न होण्यामागचे कारण ठरले. आणीबाणीनंतर झालेल्या या निवडणुकांमध्ये जनसंघ व इतर पक्ष मिळून लढले व विजयी झाले. जनसंघाच्या अटल बिहारी वाजपेयींना परराष्ट्र मंत्रीपद व लालकृष्ण अडवाणींना माहिती व दूरसंचार मंत्रालय मिळाले.
जनता पक्षाच्या या शासनामध्ये अनेक विचारधारा एकत्र आल्याने प्रत्येकाचे एकमेकांसोबत कलह होते. त्यामुळेच, जनता पक्षाचे संस्थापक जयप्रकाश नारायण या शासनाला ‘खिचडी सरकार’ म्हणायचे. पार्टीमध्ये असलेल्या अनेक विचारधारा धर्मनिरपेक्ष होत्या. रा.स्व.संघासारख्या संघटनांशी संबंध असणे त्यांना गैरसोयीचे वाटत होते. त्यामुळे जनता पार्टीच्या कोणीही संघासोबत संबंध ठेवणे योग्य नाही हे मधु लिमये सारख्या काही नेत्यांनी सुचवले. मात्र अटलबिहारी वाजपेयी व अडवाणींसारख्या नेत्यांनी यास नकार दिला.
४ एप्रिल १९८० ला जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारणीमध्ये या मुद्द्यावर पुन्हा चर्चा करण्यात आली. तिथे हा वाद विकोपाला गेला. या कार्यकारणीमध्ये जनता पक्ष फुटून त्याचे तीन वेगवेगळ्या पक्षांमध्ये विभाजन झाले. पहिला पक्ष – जनता दल, दुसरा पक्ष – जनता पार्टी सेक्युलर आणि तिसरा पक्ष – म्हणजेच ६ एप्रिल १९८०ला स्थापन झालेला – भारतीय जनता पक्ष.
जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर म्हणजे ५ आणि ६ एप्रिल १९८० असे दोन दिवस वाजपेयी-अडवाणींच्या नेतृत्वात दिल्लीतल्या फिरोझशाह कोटला मैदानात राष्ट्रीय संमेलन बोलावण्यात आलं. या संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ६ एप्रिल १९८० रोजी लालकृष्ण अडवाणींनी ‘भारतीय जनता पार्टी’ या नव्या पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली. विशेष म्हणजे, यावेळी व्यासपीठावरील मुख्य फलकावर तिघांचेच फोटो होते. ते तिघेजण म्हणजे, दिनदयाळ उपाध्याय, जयप्रकाश नारायण आणि तिसरे होते महात्मा गांधी!
भाजपाच्या अध्यक्षपदी अटलबिहारी वाजपेयी यांची निवड करण्यात आली. यावेळी भाजपाच्या स्थापनेच्या वेळी अटलबिहारी म्हणाले होते, ‘अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा’. पक्षाचं नाव ‘भारतीय जनता पार्टी’ असं ठेवायचं, हे अटलबिहारी वाजपेयींनीच सुचवलं होतं.
भाजपच्या स्थापनेनंतरचं पहिलं अधिवेशन मुंबईतल्या वांद्रे येथील समता नगरमध्ये झालं. याच अधिवेशनात अटलबिहारी वाजपेयी यांची पक्षाचे अध्यक्ष म्हणून अधिकृतपणे निवड झाली. वाजपेयींच्या अध्यक्षपदाची घोषणा लालकृष्ण अडवाणींनी केली. तर लालकृष्ण अडवाणी, सूरज भान आणि सिकंदर बख्त हे तीन सरचिटणीस म्हणून निवडले गेले.
भाजपच्या या पहिल्या अधिवेशनात प्रमुख पाहुणे होते ‘मोहम्मद अली करीम छगला’. छगला हे इस्माईली खोजा कुटुंबातील होते. छगला हे मोहम्मद अली जिनांना आदर्श मानत आणि जवळपास ७ वर्षे त्यांनी सोबत कामही केलं. किंबहुना, ते मुस्लीम लीगचे सदस्यही होते. पुढे त्यांनी मुंबईत मुस्लीम नॅशनलिस्ट पार्टीची स्थापनाही केली होती. स्वातंत्र्यावेळी छागलांनी द्विराष्ट्रवादाचा व पाकिस्तानचा विरोध केला. नंतर नेहरू आणि इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणूनही काम केलं. मात्र, आणीबाणीला त्यांनी तीव्र विरोध केला. यातूनच ते जनसंघाच्या नेत्यांच्या संपर्कात आले आणि पुढे भाजपच्याही जवळ गेले.
भाजपनं स्थापनेनंतर पक्षाचे ध्येय-धोरणेही जाहीर केली. त्यांना भाजपनं ‘पंच निष्ठा’ असं म्हटलं. भूपेंद्र यादव आणि इला पटनाईक यांच्या ‘राईज ऑफ बीजेपी’ या पुस्तकातील माहितीनुसार, या ‘पंच निष्ठा’मध्ये;
दिनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेला ‘एकात्म समाजवाद’, लोकशाही आणि मुलभूत हक्कांसाठी वचनबद्धता, सर्वधर्म समभाव (आयडिया ऑफ पॉझिटिव्ह सेक्युलॅरिझम), गांधावादी समाजवाद आणि मूल्यांवर आधारित राजकारण या पाच मुद्द्यांचा समावेश होता.

स्थापनेनंतरच्या पहिल्या निवडणुकीत भाजपची वाटचाल अतिशय वाईट ठरली. नंतर मात्र रा.स्व.संघाच्या मदतीने हिंदू समाजाच्या मनावर प्रभाव टाकत त्यांनी आपल्या मतदारांचे गुणोत्तर वाढवत नेले. सर्वधर्मसमभाव ही पंचनिष्ठा जरी असली, तरी राजकारणात प्रगती करण्यासाठी हिंदू मतांना जागृत करण्याची आवश्यकता लालकृष्ण अडवाणींनी हेरून रथयात्रा सुरू केल्या. त्याचा फायदा होत पुढे भाजपचे निवडणुकांमधील महत्त्व वाढत गेले आणि तो काँग्रेस समोर एक प्रभावी पक्ष म्हणून उभा राहिला.
नंतर काही काळाने अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री सुद्धा झाले. निवडणुका जिंकल्यानंतर मात्र भाजपने आपल्या पंचनिष्ठेचा आदर ठेवत, सर्वधर्मसमभाव, समाजवाद व मूल्यांवर आधारित राजकारण यांवर विशेष भर दिला. अटलबिहारी वाजपेयी व राजीव गांधी यांमध्ये कितीही मतभेद असले तरी अटलबिहारींनी राजीव गांधींवर कधीही व्यक्तिगत पातळीवर जाऊन टीका केली नाही. लोकशाही मूल्यांना महत्त्व दिल्याने संविधानात्मक संस्था अटलबिहारींच्या काळात कायम स्वतंत्र व निष्पक्ष कार्य करत राहिल्या.
२००२ च्या गुजरात दंगलीनंतर आपल्याच पक्षाचे सरकार गुजरात मध्ये असून, अशा गोष्टी घडणे ही अटलबिहारींसाठी अतिशय वेदना देणारी बाब होती. गुजरातचे त्यावेळचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा या मतावर सुद्धा अटलबिहारी आले होते. मात्र लालकृष्ण अडवाणी व प्रमोद महाजन यांसारख्या नेत्यांनी नरेंद्र मोदींना पाठिंबा देत या गोष्टीचा राजकारणात योग्य वापर करण्याविषयीची निती ठेवली.
याप्रकारच्या राजकारणाला कंटाळून व वृद्धापकाळामुळे वाजपेयींनी राजकारणातून संन्यास घेतला. हिंदू धर्माला व त्यामुळेच रा.स्व.संघाला महत्त्व देण्याचे जरी उद्दिष्ट असले; तरीही भारताची संस्कृती ध्यानात घेत भाजपने आपली तोपर्यंतची धोरणे ठरवली होती. त्यामुळे अगदी पाकिस्तानसोबत मैत्री वाढवणे हा त्यावेळच्या भाजप शासनाचा हेतू होता. समाजवादाला दिलेल्या महत्त्वामुळे ‘उद्योगपतीधार्जिणा’ असा तो भाजप नव्हता.
अटल बिहारी वाजपेयींचा काळ सुशासनाचा काळ म्हणून ओळखला जातो. तरीही, त्यांच्यावर पत्रकारांकडून किंवा इतर माध्यमांतून झालेल्या टीकेला त्यांनी कायम खिलाडू वृत्तीने स्वीकारले व जर आपल्या काही चुका होत असतील तर त्या सुधारण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक राज्यात निवडणूक जिंकलीच पाहिजे हा अट्टाहास न धरता, भारतासाठी योग्य काय याची चाचपणी करत, लोकशाही टिकवण्यात हातभार लावला.

आज मात्र या पक्षाचे अतिशय वेगळे रूप आपल्यासमोर उभे आहे. एखाद्या राज्यात सत्ता मिळवण्यासाठी घोडेबाजार करणे ही भाजपसाठी अतिशय सामान्य बाब झाली आहे. लोकशाही मुल्यांना दूर सारत, व्यक्तिगत पातळीवरील घाणेरडे राजकारण हा आज पक्षाच्या राजकारणाचा मुख्य मापदंड बनला आहे. या शासनाच्या काळात आज संवैधानिक संस्थांच्या पारदर्शकतेवरील लोकांचा विश्वास उडाला आहे. हिंडनबर्गसारखे अहवाल आज भाजपने समाजवादापासून पूर्णपणे फारकत घेतल्याचे दर्शवतात.
या सर्व गोष्टींनी भाजपला सत्ता मिळविण्यासाठी किंवा ती टिकवण्यासाठी जरी मदत केली असली, तरी याच सर्व गोष्टींमुळे एकेकाळी काँग्रेसची नाचक्की झाली होती; हे भाजप पूर्णपणे विसरला आहे. काँग्रेसच्या प्रभावी काळात, भाजपने एक विरोधी पक्ष म्हणून उत्तम कार्य करत देशाला योग्य दिशा दाखवली व शासनावर नियंत्रण ठेवले. आज एका कणखर विरोधी पक्षाचा अभाव भाजपने त्या काळात केलेले उत्तम कार्य प्रकर्षित करतो.
मात्र आज या पक्षाची तयार झालेली सत्तालोलूप अशी प्रतिमा त्यास त्याच्या पंचनिष्ठांपासून दूर नेणारी आहे. कोणतीही गोष्ट तिच्या मूळ तत्वांपासून दुरावली की तिची अधोगती होते, हे निश्चित आहे. त्यामुळे वेळीच सावध होत, पक्षाने सत्तेची हाव सोडत, लोकांचा जो विश्वास संपादन केला आहे; त्याचा देश निर्मितीच्या कार्यात योग्य वापर करून घेतला, तर सत्तेसाठी कष्ट घेण्याची भाजपला गरज उरणार नाही.


✒ लेखन - अमित
मेल

संदर्भ :
१) द राईज ऑफ द बीजेपी – भूपेंद्र यादव आणि इला पटनाईक
२) भारतीय जनता पार्टी : पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर – शंतनू गुप्ता
३) जुगलबंदी : द बीजेपी बिफोर मोदी – विनय सीतापती
४) छायाचित्र : टाकबोरू

वाचत रहा :
१) कार्ल मार्क्स : साम्यवादाच्या पलीकडून (लेख)
२) द्वेषाची दुकाने (लेख)
३) झुंजार मनिषा रोपेटा (लेख)
{fullWidth}

आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال