[वाचनकाल : ३ मिनिटे]
या ‘मी’पणानं बरबटलेल्या मर्त्य जगात लहानगं मन काळवंडून जाईल म्हणून जीवापाड जपताना आपण थोडे घाबरलेल्या सशासारखे दिसत असू का? |
ज्याचा जन्म एकाकी झाला त्याचा विषय वेगळा; पण या जगाशी फारकत घेण्याच्या ध्यासाने झपाटलेल्या माणसाने एकटेपणा स्वतःत इतका मुरवू नये की त्याची स्वप्नेही भकास, उजाड होऊन जावीत! कठीण काळात त्याने आदर्शवादाचा पाठलाग करत रहावा. आयुष्य कधीतरी त्याच्या वाट्याला सुख आणेलच – हेच शिकलात ना; जे की वास्तवात – साफ खोटं आहे. . .
आज अचानक मला सकाळी उठून भास झाला. माझे पाय समुद्राच्या पाण्यात भिजत असल्याचा . . . पाहिलं तर खरोखरच माझे पाय किनाऱ्याच्या मऊ वाळूवर होते! माझ्या मनात विचार चालू होता. इतक्या माणसांवर प्रेम करायला प्रेम आणायचं कुठून?
नकार, अपमान, कुचाळक्या, किडक्या विचारवृत्ती अंगावरून निथळून न जाता आत झिरपत विषारी रसायन तयार होतं, तेव्हा ते बाहेर पडताना जळजळीत ॲसिडचा चटका लावून जाईल – आपल्या जवळच्यांना. आणि आत कुजवत तर ठेवायचं नाही . . .
रोज-रोज-रोज विद्रुपतेची अळी वेचायची, आपला स्पर्श लाभला की तिचा शिंपला होणार. तो उघडला की हिडीस अळीचा लकाकता मोती झालेला असणार. जगात रोज-रोज-रोज ट्रकच्या ट्रक भरून ओंगळता ओतली जाते. आपण सांदीकपारीतून ठेचकाळत एकेक कप निर्मळता त्यात ओतून ते गटार स्वच्छ होणार आहे का? आपण नेमके कुठल्या वेडगळ जगात राहतोय? कुठल्या पुस्तकी आदर्शवत तत्त्वांचा उद्घोष करू पाहतोय? हा उद्घोष ऐकायला आजूबाजूला आहे तरी कोण? कुणाला सवड आहे?
बिनचेहऱ्यांच्या पुळचट कणाहीन माणसांची गर्दी, आपण थांबलो तर आपल्यावरून निर्दयपणे पाय देत पुढं सरकणारी. इथं, जगाच्या या भर समुद्रात किती काही वर्ष आपण वावरलो, झगडलो, धडपडलो, हिरीरीनं वादंग घातला, याचं फलित काय? याचा अंत काय? याचा वारसा कोण आणि काय म्हणून जपणार?
आपण इतरांसाठी कष्टलो, झिजलो, कुणाला फरक पडला असेलही . . . पण अचानक एक दिवस नाहीसे झालो तर . . . असा काय चटका पडणार आहे? रोज घराची बंद कुलुपं उघडताना, कुंद खोलीत पाय टाकताना, खिडकीवरची धूळ झटकताना वाटतं की आपणही धुळीत जमा होऊ तेव्हा आपल्या फोटोवरची धूळ झटकून कोण पाणावेल? काल ज्या घोळक्यात बसून मनमुराद हसलो, त्या घोळक्यातले कितीजण आपण दिसेनासे झालो म्हणून अस्वस्थ नजरांनी आपला वेड्यासारखा शोध घेत फिरतील? मग कुठंतरी आपण सापडलो म्हणून घट्ट पकडून दोनचार फटके लगावत धपापत्या उरानं आपल्याला जवळ ओढून घेतील?
आपण हाकेच्या पलीकडं जाऊन चंदेरी क्षितिजाला हात लावायची स्वप्नं रोज-रोज-रोज पाहतो हे आपल्याला कधी कुणाला सांगता येईल का? या ‘मी’पणानं बरबटलेल्या मर्त्य जगात लहानगं मन काळवंडून जाईल म्हणून जीवापाड जपताना आपण थोडे घाबरलेल्या सशासारखे दिसत असू का? म्हणून तर जग आपल्याला ओरबाडत, लाथाडत, झिडकारत नसेल? आपण या वाटेवर का, कधी, कसे चालू पडलो? यातून नेमकं काय साधणार आहे? आपल्यानंतर केवळ आपल्या आस्थेनं भिजून आपला काटेरी मुकुट उचलून कुणीतरी कधीतरी घालून पाहील का? आपण आशीर्वाद घेतले म्हणजे काय केलं?
आपल्याला कालपरवा कुणीतरी देवमाणूस म्हणालं. मन सुखावलं.
पण आपल्यासारखं देवमाणूस मिळावं म्हणून मनोमन प्रार्थना करणारं एक तरी माणूस दुसऱ्यासाठी तसंच किंवा त्याहून सरस देवमाणूस बनून धावेल का? आपल्या रिकाम्या जागी बसून तो खळगा भरून काढण्यासाठी टाचा घासत जगेल का? की आपली धाव व्यर्थ राहिली? समोरचं चंदेरी क्षितिज इतकं मातकट, निस्तेज का भासतंय?
पायाखालची वाळू एकाएकी कोरडी पडलीयेसं जाणवतंय. आपण मात्र रेताड नाही. आपण आहोत ओलसर. पाण्यासारखे. क्षितिजापार काहीतरी आहे, तिथून हाक आली की आपण खरंच उठून जाणार. मातीत उमटलेली आपली पावलं कुणीतरी पाहील. कुणीतरी काहीतरी वाटून-दाटून त्या ठशांवर आपली पावलं ठेवून पाहील. शक्य आहे. पण ते पाहून हरखून जायला आपण असू? आपलं असणं ही गरज मुळात होती? आपले शेष कुणी उरात ठेव म्हणून जपून ठेवेल ही अपेक्षाच फोल नव्हती का? माणसाला चिरंतनाचा, विराटाचा ध्यास असतोच. हव्यास बरा नाही. हाक आली की रसरसत्या मनानं जगलो त्याच रसरसत्या मनानं निघायचं हे ठरलंय ना आपलं?
मग अचानक सुरू झालेली ही पानगळ बरी नाही. आपण वसंत आहोत. म्हणजे लोकांना तरी आपण वसंतच द्यायचा. समुद्रच द्यायचा. आपला वैशाख आपल्यापाशी. कोरडा किनारा आपल्यापाशी . . .
✒ लेखन - सायली
✆ मेल
संदर्भ :
१) छायाचित्र : टाकबोरू
वाचत रहा :
१) जगण्यातला राम : तुकाराम
२) स्पर्श मनाचा (लेख)
३) एका पक्ष्याचा मृत्यू (स्फुट)
{fullWidth}
✆ मेल
संदर्भ :
१) छायाचित्र : टाकबोरू
वाचत रहा :
१) जगण्यातला राम : तुकाराम
२) स्पर्श मनाचा (लेख)
३) एका पक्ष्याचा मृत्यू (स्फुट)