मानवी उत्क्रांतीवादात जन्मास आलेल्या मूलभूत सीमावाद, विस्तारवाद यांसारख्या नैसर्गिक प्रवृत्तीतच वर्चस्ववाद निर्माण झाला, इतकी सोपी व्याख्या वर्चस्ववादाला लागू होऊ शकत नाही. ही हिंसेला जन्म घालणारी मानसिक विकृती आहे! वर्चस्ववाद इतर वादांहून टाकाऊ असूनही फोफावतो याचा अर्थ समाज बरबटत आहे असाच नाही का? आणि वर्चस्ववाद जर कवटीत भिनलेला कैफ असेल तर वर्चस्व‘नाद’ काय असेल?
मानवी मनातील भावनांचे वर्गीकरण करण्यासाठी सर्वोत्तम पद्धत जर कोणती असेल तर ती षडरिपू पद्धत. याबद्दल माझे दुमत अजिबात नाही. मानवी मनात उठणारे हरेक तरंग, हेलकावे अथवा लाटा कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या रिपूत पकडता येतात. काही भावना या एकाहून अधिक रिपूंत बसतात. काम, क्रोध, मोह, लोभ, द्वेष आणि मत्सर हे ते रिपू. या सहाही रिपूंचं निरीक्षण केले तर एक बाब लक्षात येईल की या सर्व भावना नकारात्मक आहेत किंबहुना म्हणूनच त्या शत्रू आहेत. या भावना नकारात्मक असतील तरीही त्या जेव्हा मनाला ग्रासतात तेव्हा कुठेतरी आल्हाद उत्पन्न करतात. या आल्हादास आपण ‘नकारात्मक आल्हाद’ असे म्हणू शकतोच की! तर मुळात आता नकारात्मक आल्हाद हे प्रकरण - अर्थातच माझ्या परीने – समजावून झाले आहे. तेव्हा आता आपण मूळ लेखाकडे वळूयात.
मानवी मनाला नकारात्मक आल्हाद देणाऱ्या भावना म्हणजे रिपू असतील खऱ्या, मात्र एक अशी भावना आहे जी या सहा रिपूंचं मिश्रण वाटते. जी अहंकाराला खतपाणी घालते सोबतंच माणसाला आपण ‘कोणीतरी’ असल्याची जाणीव करून देते व सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याच्या मनमानीस भीक घालते – एकूणंच स्खलनशील मानवी मनाची ही अत्यंत प्रिय भावना आहे – ती म्हणजे ‘वर्चस्व’!
कोणीतरी आपल्या अखत्यारीत आहे हे कळाले की त्याच्या अपेक्षांकडे दुर्लक्ष करून आपल्या अपेक्षा त्याच्यावर लादणे म्हणजे वर्चस्व गाजवणे असे ढोबळमानाने म्हणता येईल. आजच्या युगात वर्चस्वाची जी भावना आहे ती प्रचंड वाढीस लागलेली आहे व जोमानं फोफावत आहे यामागची कारणे भिन्न असली तरी परिणाम एकसारखेच पाहायला मिळत आहेत.
कोणत्याही एखाद्या ठराविक जमातीने, वयोगटाने या भावनेची मक्तेदारी घेतलेली नाही. हरेक व्यक्तीस लिंग, वय, वर्ण, शिक्षण, साक्षरता, इत्यादी अशा सर्व भेदांपलीकडे जाऊन या भावनेने विळख्यात धरलेले आहे. आणि त्यामुळे हे जग वरचेवर भेसूर होत निघालेय.
शालेय जीवनात शैक्षणिक प्रगतीची उणीव भासली की न्यूनगंड निर्माण होतो. असे न्यूनगंडाने पछाडलेले विद्यार्थी मग घरात थोडी मनमर्जी गाजवू पाहतात. लहान भावंडे किंवा मग मोठी भावंडे आणि आपली ‘हक्काची’ आई यांच्यावर ते वर्चस्व गाजवतात. व्यसनाधीनतेकडे झुकलेले प्राणी समाजातून अप्रत्यक्षरीत्या बहिष्कृत केले जातात याचा प्रत्यक्ष परिणाम म्हणून मग ते घरात वर्चस्व गाजवतात. बायको, बहिण, आई कोणतीही स्त्री यांना जमून जाते. कारखानदारी चालवणारा भांडवली किंवा त्यात राबणारा नोकरदार हे दोन्ही वर्ग कामाने पिचलेले असतात. वरिष्ठांच्या कालव्याला थकलेले असतात. अशाही वेळेस मग आत्मविश्वासाच्या चिंधड्या होतात. वर्चस्व गाजवताना तात्पुरता आत्मविश्वास वाटत असल्याने इथेही मग घरातील बायको, आई, बहीण डावास लागतात. प्रेयसी ही वर्चस्ववाद गाजवण्याचे आणखी एक हक्काचे ठिकाण म्हणता येईल.
समाजातील कोणत्याही वर्गातील व पातळीवरील नोकरदार, धंदेवाईक अथवा बेरोजगार व्यक्तीची मानसिक फरफट ही ठरलेली आहे, अटळ आहे. अशातून मग आपणही कोणावर तरी अधिकार गाजवावा ही मानसिकता मूळ धरते. या मानसिकतेचा पहिला बळी म्हणजे स्त्रिया हाच होय.
महिला वारंवार मोठमोठ्या बाजारपेठा धुंडाळून खरेदी का करतात? वारंवार बाहेर फिरायला किंवा जेवायला का जातात? जरी त्यांना काही खरेदी करायचे नसेल तरीही एखाद्या दुकानाची सैर का घडवून आणतात? यामागेही वर्चस्व ही भावना सुप्तावस्थेत आहे. यावर तुमचा विश्वास बसणार नाही मात्र असं नुकताच प्रसिद्ध झालेला अहवाल सांगतो आहे (मी नाही!).
दुकानातील कामगार अदबीने बोलतात, त्यांचे ऐकतात किंबहुना त्यांचा हरेक शब्द झेलतात तेव्हा त्यांना मनातून कुठेतरी वर्चस्व गाजवल्याची भावना सुखावते. मिळालेल्या मानातून आणि त्यांनी विक्रेत्यांना दिलेल्या आज्ञांतून क्षणिक आत्मविश्वास निर्माण होतो. स्वतंत्र्य असल्याची व स्वमतावर जगल्याची अनुभूती मिळते आणि म्हणूनच . . . त्या वारंवार खरेदी वगैरे करत राहतात. अप्रत्यक्षरीत्या हा अहवाल स्त्रियांची वाढती घुसमट आणि हतबलता दाखवणारा अहवाल आहे.
दूरदर्शन संचासमोर बसून दर सेकंदाला तुम्ही रिमोटवरून झपाझप वाहिन्या बदलत आहात, चारचाकीत प्रवास करताना सटासट गाणी न ऐकताच बदलत आहात, मायाजालावर ‘स्क्रोल डाऊन’ संस्कृतीचे पाईक आहात, समाजमाध्यमांवर जगाला ज्ञान पाजळत आहात (याचे उदाहरण न दिलेलेच बरे! तरी याचे उदाहरण कोण हे सुज्ञास सांगणे न लागे!), आंतरजालावर निरुद्देश भटकत आहात, आजूबाजूच्या लहान मुलांना विनाकारण दंड देत आहात, शिस्तीत जखडत आहात, हाताखालील व्यक्तींना आज्ञा देऊन त्यांना अनावश्यक कामांत गुंतवत आहात, इतरांना बळजबरीने नेहमी स्वतःचंच गाणं गायला लावत आहात किंवा साधं तुमच्या पाळीव प्राण्याला शीळेच्या जोरावर कसरती करायला भाग पाडत आहात . . . हे सर्व का? कशासाठी? याचा कधी विचार केला आहे का? नसेल केला तर ते उत्तम राहील!
वर्चस्ववादी असण्याचा नकारात्मक आल्हाद सुरुवातीला मस्त वाटत असला तरी पुढे तो अक्राळ रूप धारण करतो. घराच्या चार भिंतीत जन्मलेला हा वर्चस्ववाद वर्चस्व‘नाद’ बनून उंबऱ्याबाहेर सुद्धा डोकावू लागतो त्यावेळी हे ‘वर्चस्वनादी’ लोक जगाकडून लाथाडले जातात. परिणामी पुन्हा घरातील वर्चस्व‘नाद’ वाढीस लागतो असे ते विचित्र चक्र आहे. हे चक्र चालू राहीले की घरगुती हिंसाचार घडतो. आई, बायको, बहीण, प्रेयसी यांच्यानंतर काही वर्चस्वनाद्यांडून मुले व वडील यांना सुद्धा पक्षी मारझोड केली जाते.
पुरुषाचा वर्चस्ववाद तो मनगटाच्या बळावर सोडवू पाहतो. आणि स्त्रीचे मन त्याला समजून घेण्याच्या नादात स्वतःचा होम करून घेते. तिच्या निसर्गदत्त वात्सल्याची पावती याहून मोठी ती काय द्यावी? द्यावी का? मात्र कालांतराने तिच्या या वात्सल्यास मातीहून कमी भाव येत जातो, येत जातो.
वर्चस्व‘नाद’ कोणत्याही माणसाला व्यसनाधीन बनवतो. एकेकाळीचा नकारात्मक आल्हाद नकारात्मक दाह बनतो व तो व्यक्ती दिसेल त्या मनाला, भावनेला जाळत सुटतो. त्यातूनच मग स्त्रियांवर अत्याचार करण्याचे शेण मेंदूत साचू लागते. घरातील स्त्रीप्रमाणेच समाजातीत सर्व स्त्रियांवर आपली टाप असावी असा पोकळ समज निर्माण होतो. समाजमाध्यमांवर अनोळखी मुखवट्याखाली लपून ‘तिच्या’ चारित्र्यावर हाणलेल्या गप्पा मग चव्हाट्यावर मोठ्याने ओकलेल्या गरळीचे स्वरूप घेतात.
हा वर्चस्व‘नाद’ आणखी वाढला की माणूस माणसातून उठतो, गुन्हेगार ठरतो, स्वतःच्याच नजरेत घसरून लागतो. गुंडगिरी, मवालीगिरी ही त्याचीच रूपे. ज्या कृतीने त्याची अधोगती झालेली असते त्यातूनच तो पुन्हा प्रगती करू पाहतो! कारण, तिथे त्याची आभासी ‘मर्दुमकी' आड येत असते. करारी, धाडसी आणि रोखठोक असण्याच्या चुकीच्या कल्पना बाळगून तो आला दिवस वर्चस्व‘नाद’ पुरा करण्यात घालवतो. याचा निकाल शेवटी कोणत्यातरी गंभीर गुन्ह्याने लागतो.
निदान स्त्रियांनी तरी वर्चस्ववाद सहन न करता तो वर्चस्व‘नाद’ होण्यासाठी ठेचून ठेचून काढायला हवा – म्हणजे थोडक्यात इथेही भिस्त तिच्यावरंच!
वर्चस्व‘नादी’ असण्याचा माझा काळा १०-१८ वर्षांचा. या आठवर्षांत मी मनसोक्तपणे वर्चस्व‘नाद’ भोगला. नशीबाने आता हा नाद सुटला मात्र तरीही वर्चस्ववाद अजून काहीसा बाकी आहे. तोही लवकरच निघेल ही आशा बाळगायला तरी हरकत नसावी. किंबहुना आशा आहे म्हणूनच मी हा लेख लिहू शकतो इतकंच.
वर्चस्व सिद्ध करण्यासाठी शारिरीक किंवा मानसिक बळ लागत नाही. केवळ हिंसाचार पुरून उरतो. मुळात ‘वर्चस्व’ ही भावनाचं जगण्यासाठी लागत नाही हे ज्याला समजेल तो त्याचा सुदिन.
{fullwidth}