मनोरंजन स्पाॅट!


sticker featuring a classic director's camera
मनोरंजनातून घेता आलं तर तंत्रसामर्थ्याचा वापर, संगीत, कथानक यांची रचना अशा पडद्यामागच्या बाबी समजून घेण्याचा प्रयत्न करा.

मनोरंजन विश्वाचा आकार महाभयानक आहे इतकी जाणीव जरी वाचकांपर्यंत देऊ शकलो तरी पुष्कळ आहे. एकदा का मनोरंजनाच्या गुटख्याचे व्यसन लागले की सोडायला खूप त्रास होतो हा स्वानुभव आहे. तेव्हा यापासून शक्य तेवढे दूर राहण्यातच शहाणपण आहे.


मनोरंजन विश्वात झालेला बदल हा गेल्या काही वर्षातील महत्त्वाचा बदल आहे. ‘हा बदल महत्त्वाचा कोणत्या दृष्टीने आहे’ हा मुद्दा थोडासा बाजूला ठेवला तर याच बदलाच्या दुष्परिणामांची रांग उभी राहते. आणि कुठंतरी असं वाटू लागतं की मनोरंजन विश्वाच्या फायद्यापेक्षा तोटेच भरमसाठ आहेत. परिणामी मनोरंजन विश्वाच्या बाबतीत भीक नको; पण कुत्रा आवर हा प्रकार सर्रास अनुभवास येतो. मनोरंजन विश्वाचा संबंध शेकडा नव्वद टक्के येतो तो अठरा ते पंचवीस या तरुण पिढीसोबत. नुकत्याच फोफावणाऱ्या कल्पकतेला खाद्य पुरवण्यासाठी मनोरंजन विश्वासारखं दुसरं साधन सध्या उपलब्ध नाहीये. मनोरंजन विश्व म्हणजे नेमकं काय? इथं मनोरंजन विश्व या शब्दांमागून नक्की कोणता अर्थ अभिप्रेत आहे? मनोरंजन विश्वात अनेक छंद घुसवता येतील. अगदी मोकाट फिरणे हे सुद्धा मनोरंजन असू शकतं! त्यामुळे इथं मी पडद्यावर दिसणाऱ्या मनोरंजनाच्या साधनांवर बोलतो आहे हे स्पष्ट करून पुढे सरकू.

५०-६० रुपयांचा ‘मॉर्निंग शो’ गाठून दर पंधरा दिवसाला एक चित्रपट ‘काढणे’ ही माझी मनोरंजनाची फार पूर्वीपासूनची कल्पना राहिली आहे. गेल्या काही वर्षांतील चित्रपट पाहता (खरं तर न पाहता) मात्र हे मनोरंजन नसून मनोभंजन आहे असं वाटत राहतं. दर्जाचा सुमार अतिशय बेसुमार झालाय. चित्रपटांतून किंवा तत्सम माध्यमातून आपण समाजाला काही देऊ शकतो किंबहुना – सामाजिक उत्तरदायित्व इत्यादी प्रकार नाकारले तरी – आपण समाजाचं काही देणं लागतो हेच चित्रपट सृष्टी विसरत निघाली आहे. परिणाम स्पष्ट आहेत – जनमानसात ओटीटी माध्यमांचा शिरकाव. करोना काळातील लाॅकडाऊन ओटीटी माध्यमांचा सुवर्णकाळ म्हणता येईल. तत्पूर्वी देशश्रेष्ठींच्या ‘क्रिपेने’ वर्षभर फुकटात मिळालेल्या इंटरनेटच्या काळात वाढलेला नेटचा तुफान वापर लोकांना नेटचं व्यसन लावून गेला आणि ओटीटीने भारतात आपली मुळे रोवली. यामागे आणखी एक कारण आहे ज्याचा विचार फारसा होत नाही. ते म्हणजे – भारतीय चित्रपटांचा खालवता दर्जा.

सुरुवातीला पडद्यावर नाविन्यपूर्ण काहीतरी घडवून ओटीटी माध्यमांनी ‘इडियट बॉक्स’ सोडवून त्यांना लोकांना ‘बींजींग’ करायला भाग पाडलं मात्र आता तेही दर्जेदार म्हणून असं काही निर्माण करताना दिसत नाहीत. पहिले पाढे पंचावन्न बाकी काय! केवळ प्रमाणाबाहेर विकृत लैंगिकतेचा आणि सवंगतेचा मारा. कॅमेऱ्यांची हातचलाखी व इतर तंत्रांची भेळ आणि अमर्याद हिंसा हेच ओटीटीच्या मोठ्या तुकड्यावर पाहायला मिळतंय. चित्रपट आणि ओटीटी यांनी सध्या भारताच्या मनोरंजन विश्वाचा निम्म्याहून अधिक भाग व्यापला आहे. उरला मग युट्यूब आणि टिकटाॅक सदृश इतर काही प्रकारांचा वाटा. हळूहळू या इतर प्रकारातही विकृत लैंगिकता, हिंसा येत आहेत सोबतच वर्णद्वेष, जातीयता, असमानता या सारख्या गोष्टी नकळतपणे मजबूत केल्या जात आहेत. मग मनोरंजनावर लिहिण्यासारखं उरलं तरी काय? आणि हे जे आहे त्यावर लिहायचं तर ते न लिहिलेलं बरं! कारण, यापेक्षा बरं फक्त त्यातील विकृत लैंगिकता, हिंसा व अतार्किकता यांचं प्रमाण कळवा आणि ज्यात या बाबी जास्त सापडतील ते लोक स्वतः बघतीलच!

मनोरंजन विश्वाविषयीच्या भ्रामक कल्पना तोडण्यासाठी मी या विषयात घुसायचं ठरवलंय. चित्रपट व ओटीपी माध्यमे वगळता नाटकं (ही तर हद्दपार होण्याच्या मार्गावर!) ॲनीमे, सीजीआय, जगभरातील विविध कॅमेराच्या कलात्मक वापरांतून निर्माण झालेले लघुपट हे अस्तित्वात आहेतच. अजून सांगायचं तर जगभरातील जुने ‘क्लासिक’ आहेत, जे आजही लागू होतील व निश्चित आजच्या चित्रपटाहून दर्शकाला अधिक काहीतरी देतील.

यातील प्रत्येकाचा स्वतंत्रपणे विचार करणे गरजेचे आहे. स्वतंत्र विचार, तो काळानुरूप करणे, भाषेनुरूप करणे, नवीन प्रयोगशीलतेनुरूप करणे आणि लोकप्रियतेनुरूप करणे तसेच उपयोगी किंवा निरुपयोगी, जीवनावश्यक किंवा भडंग बाबी दर्शकाला पुरवणे यानुरूप करणे गरजेचे आहे. पाहिलंत किती मोठा वेगळाच विभाग तयार झाला, त्यालाच मी ‘मनोरंजन स्पॉट’ म्हणतो. नव्या तयार झालेल्या मोठ्या विभागातील मी किती लिहू शकेन माहिती नाही मात्र – जागतिक पातळीचा विचार केला तर – मनोरंजन विश्वाचा आकार महाभयानक आहे इतकी जाणीव जरी वाचकांपर्यंत देऊ शकलो तरी पुष्कळ आहे.

हे लिहीत असताना आतापर्यंत पाहिलेल्या, मनात साठवलेल्या बऱ्याच सामग्रीवर मला अवलंबून रहावं लागणार आहे. कारण मी मनोरंजनापासून फारकत घेतलेली आहे. मनोरंजनाचं काही शिकण्यायोग्य जरी पाहिलं तरी तो काळ तरुणपणातील काळाचा मोठा अपव्यच असतो. तरी हा विभाग नीट मांडायचा म्हणलं तर काही नवं-जुनं पाहणं होईल. मनोरंजन विश्वातील या साधनांचा खरंतर वास्तविक जीवनात प्रायोगिक तत्त्वावर होणारा फायदा नगण्य (शून्य) आहे. मात्र, बघितलं आणि सोडून दिलं असं देखील करता येत नाही. त्यावर चिंतन करून जीवन उपयोगी संदेश शोधून काढावा लागतो आणि कृतीत उतरावा लागतो. असं केलं नाही तर वेळ वाया गेल्याची कुणकुण मनाला लागून राहते. तरुणपणातील बहुमूल्य वेळ मनोरंजनावर वाया न घालवता इतर चांगल्या ठिकाणी लावणंच योग्य आहे. तरुणपण उलटल्यावर देखील मनोरंजनाची साधनं राहणारच आहेत, तेव्हा त्यांचा उपभोग घेता येईल!

मनोरंजन विषयावर लिहिणं ही काळाची फॅशन झाल्याने मी लिहितो आहे अशातला भाग नसून या फॅशनच्या नादात नकळत तुम्हाला चुकीच्या बाबी दाखवल्या जात आहेत ही जाणीव पेरणे हा उद्देश आहे. मनोरंजनाचं बघायचचं आहे तर जबरी बघा ना! असं छाटछूट काय बघता? असो.

कितीही नाकारलं तरी शेवटी मी नेहमी जे सांगतो तेच सांगेन. ‘पडद्यामागील वास्तव बघायला शिका’ आणि पडद्यामागचं वास्तव हेच आहे की ‘जो गुटखा विकतो तो गुटखा खात नाही’. मनोरंजनाच्या पराकोटीला पोहोचलेल्या व्यसनाधीनतेतून मी बड्या मुश्किलीने बाहेर आलेलो आहे आणि आता तुम्हालाच मनोरंजनाच्या गोष्टी सांगणार आहे! काय मस्त विरोधाभास आहे. त्या काळात मला न्यूनगंड, मानसिक अस्थिरता अशा परिस्थितीतून जावं लागलं होतं. तेव्हा तुमच्या वाट्याला हे परिणाम येऊ देऊ नका इतकंच. पुढच्यास ठेच लागली की मागचा शहाणा झाला पाहिजे खरा; पण तसं होणार नाही कारण जित्याची खोड मेल्याशिवाय जात नसते. आणि मी यावर लिहितोय कारण, सुंठ जळला तरी पिळ जात नसतो! ठाऊक आहे सलग म्हणी वाचून तुम्ही लेख किती उरलाय हे पाहत असाल; पण मी निव्वळ विनोदी शैलीने आल्या म्हणून या म्हणी लेखात तुमच्यासाठीच ठेवतो आहे.


एकदा का मनोरंजनाच्या गुटख्याचे व्यसन लागले की सोडायला खूप त्रास होतो हा स्वानुभव आहे. तेव्हा यापासून शक्य तेवढे दूर राहण्यातच शहाणपण आहे. मनोरंजनातून घेता आलं तर तंत्रसामर्थ्याचा वापर, संगीत, कथानक यांची रचना अशा पडद्यामागच्या बाबी समजून घेण्याचा प्रयत्न करा. नसेल तर किमान एक चांगला विचार सोबतीला घेऊन चला. तरच त्याला काहीतरी अर्थ आहे.





{fullWidth}

आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال