आणि तवा हसला


Your Image Alt Text
जेव्हा तापलेला तवा तसा उलटा ठेवला जातो तेव्हा कधीकधी रात्रीच्या अंधारात एक लाल अर्धवर्तुळाकार तेजपुंज चट्टा त्या तव्यावर उमटतो. जर तवा योगायोगाने व्यवस्थित ठेवला गेला असेल तर हा टिमटिमणारा गरम लाल चट्टा कोणाच्यातरी चेहऱ्यावरील उदंड स्मित हास्यासारखा भासतो.

ग्रामीण भागात तवा योगायोगाने व्यवस्थित ठेवला गेला असेल तर हा टिमटिमणारा गरम लाल चट्टा कोणाच्यातरी चेहऱ्यावरील उदंड स्मित हास्यासारखा भासतो. हा प्रकार घडून येण्यासाठी जी काही सामग्री लागते ती गावीच उपलब्ध होते.


काही बाबींमागे शास्त्र असतं. तसं पाहता शास्त्र हे तर प्रत्येक घडणाऱ्या, न घडणाऱ्या बाबीमागं सुप्तपणे कार्यरत असतंच. इथं मी ज्या बाबींच स्पष्टीकरण मानवी तर्क साध्यासोप्या रीतीने देऊ शकत नाही त्यांच्याविषयी बोलतो आहे. कोणतीही बाब जेव्हा डोईजड होते तेव्हा माणूस सरळ हार पत्करतो, कबुली देतो की त्यामागे काहीतरी शास्त्र आहे. आता हे ‘त्यामागचं’ शास्त्र त्याला नेमकेपणानं मांडता येत नसलं तरी आपण ते तिथे नाही असा निष्कर्ष काढू शकत नाही. आणि जर असा निष्कर्ष काढायचा हे ठरवलंच तर मग दैवीशक्ती व चमत्कारांमध्ये घुसावं लागेल. हे काही खास परवडणारं नाही. मी जे मांडतोय ते समजण्यासाठी उदाहरण दिलं तर ते लगोलग लक्षात येईल. उगाच विनाकारण मीही सुरुवातीपासून शास्त्र, बाबी, निष्कर्ष या कोड्यात शिरून बसलो. सध्या वेळ न घालवता उदाहरण.

‘तवा हसणे’ हा प्रकार ग्रामीण भागातच अनुभवायला मिळतो. कारण, हा प्रकार घडून येण्यासाठी जी काही सामग्री लागते ती गावीच उपलब्ध होते. संध्याकाळच्या वेळी जेव्हा बाईच्या भाकऱ्या बनवून – किंवा ‘बडवून’ हे विशेषण जास्त योग्य आहे – होतात तेव्हा ती चुलीवरचा तापलेला तवा चुलीमागे उलटा मांडून ठेवते, हीच अलिखित रीत आहे. जेव्हा तापलेला तवा तसा उलटा ठेवला जातो तेव्हा कधीकधी रात्रीच्या अंधारात एक लाल अर्धवर्तुळाकार तेजपुंज चट्टा त्या तव्यावर उमटतो. जर तवा योगायोगाने व्यवस्थित ठेवला गेला असेल तर हा टिमटिमणारा गरम लाल चट्टा कोणाच्यातरी चेहऱ्यावरील उदंड स्मित हास्यासारखा भासतो. याच प्रकाराला नाव दिले गेलंय – ‘तवा हसणे’.

अर्थात तवा जास्त तापल्यामुळे त्यावर शेणाच्या चुलीचा अर्धवर्तुळाकार चट्टा उमटून राहिलाय. मूस (सोनंचांदी वितळवण्याचं खास मातीचं भांडं) भट्टीत तापवून बाहेर काढल्यावर तळाचा भाग रहावा तसा तव्याचा तो तेवढाच भाग लाल राहिलाय. मग तवा उलटा ठेवल्यावर तो चट्टा स्मितहास्यासारखा दिसतोय. हा झाला सामान्य तार्किक बुद्धीवाद. मात्र तिथे नक्की हेच घडतं याची हमी आहे का? निदान माझ्याजवळ तरी नाही. त्यामुळे ‘तवा हसण्यामागं नक्कीच काहीतरी शास्त्र आहे’, हे सांगून मी हात वर करेन. ग्रामीण भागात लहानग्या कोणी कुतूहलाने याबाबत विचारल्यास सर्वजण हेच करतात, असो.


या सगळ्या प्रसंगाची पार्श्वभूमी अगदी सायंकाळी सुरू व्हायची. ताईची आणि माझी शाळा वेगवेगळ्या वेळी सुटण्याचा तो काळ होता. मी प्राथमिक असल्याने सकाळीच शाळेत जाऊन दुपारी घरी पोहोचायचो, तर ताईची दुपारी शाळा असायची. तोवर इकडं मी (आईच्या इच्छेने) झोपलेलो असायचो. संध्याकाळी ताई येण्याच्या वेळेआधी चहा तयार व्हायचा. मग ताई आल्यावर दोघांचा सायंकाळचा नाश्ता सोबतच व्हायचा. त्यानंतर खेळायला जाणं वगैरे भानगड आमच्यासाठी अस्तित्वात नव्हती. दारात – पायऱ्यांच्या बुडालाच – आई दोन-तीन बारदाण्याची पोती सलग अंथरूण द्यायची. मग आम्हाला त्यावर अभ्यासाला बसवायची. तिथंच पोत्याला टेकवून उलताणं ठेवलेलं असायचं. आमचा अभ्यास नीट चालू आहे की नाही हे पाहण्याची मुख्य जबाबदारी त्या उलताण्याची! आई अशीच कधीमधी तिच्या कामातून सवड मिळाली तर बाहेर चक्कर मारून पुन्हा तिच्या कामाला लागायची. कधीकधी तिचं दळण, भाज्या इत्यादी जिन्नस निवडत तीही बाहेर बसायची. अशावेळी उलताणं आणखी उत्तम ‘पर्यवेक्षक’ बनायचं असं आठवतंय! एकंदरीत आईनं दोघांवर प्रत्येकी दोन-तीन वेळा तरी उलताण्याचे ‘कौशल्यपूर्ण प्रयोग’ केल्याविना आमचा अभ्यास पूर्ण होत नसे.

अंधार दाटला, वहीवरची अक्षरं दिसेनाशी झाली की तेव्हा आई आम्हाला खेळायला सोडायची. आम्ही झटपट सामान आवरून खेळायला जायचो. आमचं खेळणं सुद्धा एका परिघातच सीमित होतं – जिथपर्यंत आईचा आवाज पोहोचतो आहे तिथपर्यंत खेळायचं. कारण, ती फक्त दोन व प्रसंगी जास्तीत जास्त तीन हाका मारत असे, एवढ्यातच आम्ही तिच्यापर्यंत पोहोचलो नाही तर वाईट परिणाम ठरलेले! आमची बऱ्याचदा भांडणंच व्हायची. भांडण्याचा आवाज आम्ही मुद्दाम कमीच ठेवत असू. यामागे सुद्धा काही सुप्त कारणे होती जी आम्ही दोघंच जाणायचो.

त्यानंतर मग कधीतरी आबा कामावरून माघारी घरी यायचे. ते तसे आले की दोन शक्यता ठरलेल्या एकतर आम्ही त्यांच्या गाडीमागे पळून त्यांचा डबा-पिशवी घेऊन घरात घुसायचो किंवा मग आईने आवाज दिल्याबरोबर हातातला खेळ टाकून घर गाठायचो. यानंतर मात्र नेहमी एक प्रसंग हमखास घडायचा – ताईच्या तक्रारींचा सूर लागायचा आणि माझी बचावात्मक युक्तीवादांची माळ सुरू व्हायची. आबा हातपाय धुणार, आवरणार, चहा घेणार तोवर आमचं हे असंच. याच्यामध्ये कधीतरी आई भाजीपाला आणायला जायची, कधी दळण ठेवायला जायची, तर कधी घरातच काहीतरी काम करत असायची. नंतर आबांचा व आमचा ठरलेला परवचा. त्याआधी दिवसभरातील चुकांसाठी शिक्षा. जो समोरच्याची माफी मागेल त्याला एक छडी कमी – मी नेहमीच जास्त छड्या खाल्ल्या. मग भिंतीला टांगलेल्या देव्हाऱ्यासमोर देवाजवळ, आबांनी स्वतः तयार केलेल्या वाक्यरचनांतून, चुकांचे माफीनामे वगैरे सादर व्हायचे. आम्हा दोघांचा हा माफीनामा घोकून घोकून पाठ झालेला. ते झालं की मग भजन करताना पसायदान, शुभंकरोती व अलंकापुरी खासकरून ठरलेलं. एवढ्या वेळात आई बाहेर गेली असेल तर माघारी येऊन स्वयंपाकाला लागलेली असायची. ती तशी फार कमी वेळेस प्रार्थनेत उभी दिसायची. तिची प्रार्थना शेगडीसमोर.

देवाच्या, आईआबांच्या पाया पडल्यावर पुढं फारसं काही घडायचं नाही. रात्र दाटत जाईल तसं मात्र काही ठराविक प्रसंगाना आपोआप चालना मिळायची. अशा प्रसंगांनी नटलेल्या कितीतरी रात्री मला आठवतात. तिकडं बाहेर रात्र झालेली, इकडं दरवाजातून अंधार ताडत आईच्या भाकऱ्या सुरू झालेल्या. भाकरी बडवल्याचा, तांब्यात हात बुचकळल्याचा, भाकरी तव्यावर अंथरल्याचा, उलताण्याचा, भाकरी भाजल्याचा आणि जमीनीवरच्या टोपल्यात पडल्याचा तो एकसुरी आवाज. आईची भाकरी टोपल्यात पडली की सर्वात आधी भूक लागायची मला मग ताईला. आम्हा दोघांनाही त्या वयात भाकरीचा तिटकारा, माझ्या मनात तर भाकरीविषयी मनस्वी राग.

अशावेळी आबा, ताई, मी तेलाची किटली आणि मिठाची बरणी सोबतीला घेऊन रिंगणात बसायचो. आईने टाकलेल्या भाकरीचा वरचा पूर्ण पापुद्रा काढून आबा आतल्या गाभ्याला तेल लावायचे, त्यावर मीठ टाकायचे. या ‘तेल-मीठ-भाकरी’ नामक रहस्यमयी पदार्थाचे मग तीन भाग व्हायचे. एक ताईला, एक मला एक आबांच्या नावचा. कधी दोनच भाग व्हायचे. खूप वेळा मला आठवतंय आम्ही असं बसलोय, आई भाकर्‍या बडवतीये आणि तिची भाजी बनवण्याआधीच आमचं पोट भरलेलं आहे. मग ती चिडचिड करायची. आबांनी तेल-मीठ-भाकरी दिल्याबद्दल रोष व्यक्त करायची. तिचं समाधान न झाल्याचे परिणाम मग वाईट होत असत. आम्हाला भरल्यापोटी परत थोडं जेवण करावं लागे. ते तसं केलं किंवा तिची चिडचिड झाली नाही की आम्ही आबांसोबत शतपावली करायला जात असू.

माघारी येईपर्यंत आईची भांडी झालेली असायची. ती जेवायची कधी हे कळायला मार्ग नाही. त्यानंतर थेट अंथरुणात. सबंध चाळीत रात्री आठ-साडेआठला दिवे विझवून झोपणारे फक्त आम्हीच होतो. चाळीतले लोक नंतर, विनोदात‌ का होईना पण, आमच्या या दिवसांच्या आठवणी सांगायचे.

भविष्य मग वेगवान होत गेलं. आणि त्याच वेगाने आई-आबा संथ होत गेले . . .


भूतकाळातल्या त्या सगळ्या धांधलीत, विझलेल्या दिव्यांनी झालेल्या अंधारात, आईने शेगडीमागे उलटा करून ठेवलेला तवा मात्र पहायचा राहूनच गेला. त्याकाळी तो दररोज हसत असणार याची मला पुरेपुर खात्री आहे.





{fullWidth}

आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال