बकाल


A flock of pigeons soaring summer sky
पारवे मात्र गोल गोल घुटमळत राहतात. खाली कावळे त्यांच्या टिकाव लागू देत नाहीत आणि घारी हवेत.

फक्त वस्त्याचं बकाल नसतात. बकाल मनाची बकाल माणसंही असतात. पारवे, कावळे, आणि घारी . . . पुळचट! उद्या यांची समस्त जमात एका रात्रीत हटली तर कोणाला जाणवणार सुद्धा नाही.


पारवे, कावळे आणि घारी . . . निसर्गाने प्रत्येक प्राण्याला, पक्ष्याला, जीवाला अस्तित्वात आणतानाच काही अद्भुत म्हणता येतील अशा शक्ती प्रदान केलेल्या आहेत. गिधाडाला मढं, हत्तीला पाणी, मुंग्याना भुसभुशीत जमीन, मधमाश्यांना फुलं आणि गाढवाला डोंगरावरून उतरण्याचे रस्ते शोधण्याची कला कोणी शिकवावी लागत नाही. प्राण्यांच्या अशाच निसर्गदत्त देणग्यांची यादी बजरंगाच्या शेपटीसारखी अगणित वाढत जाईल. कारण, प्रत्येकात काहीतरी खास आहेच आहे. पारवे, कावळे आणि घारी यांत काही खास आहे की नाही माहिती नाही मात्र ‘हे तीनही पक्षी बकाल मानवी वस्त्यांचा पटकन शोध घेतात’ हे माझ्या निरीक्षणातून अनुभवून सांगतोय. बकाल मानवी वस्त्या – जिथे अस्वच्छता, अडगळ सोबतीला दुर्गंधी व रोगराई घेऊन फिरतात. हे तिघे पक्षी आकाशात थव्या-थव्यांनी भेंडोळे मारताना दिसले की अस्वच्छता असणारी बकाल वस्ती लागली असं खुशाल समजावं! पंढरीत वारकरी निघून गेल्यावर हे तिघेही महिनाभर मुक्काम हटवत नाहीत इतकी अस्वच्छता दाटते हे फक्त तिथला स्थानिकचं सांगू शकतो, असो.


अशाच रणरणत्या दुपारी आम्ही दरवेळीप्रमाणे टेकडी चढून तिच्या माथ्यावर पोहोचलो. उंचावरून सगळं कसं मस्त दिसतं . . . किंवा मग जमिनीवरच्या समस्यांशी दोन हात करावे लागत नसल्यानं तसं भासतं! टेकडीवरील एक कडा – तसा तो बर्‍यापैकी सपाट असणारा अखंड कातळ आहे – दुपारच्या उन्हातही उरल्यासुरल्या झाडांच्या सावलीत थंडगार पडलेला असतो, हा फायदा पहिला. आणि तिथे कोणीच पर्यटक किंवा फिरायला आलेले स्थानिक येत नाहीत हा फायदा दुसरा. खांद्यावरून डोकावणारं कोणी असलं की मुळात जी विश्रांती शोधायला आपण ‘टेकाड’ चढलेलो असतो ती कदापि मिळत नाही. याउलट मानसिक स्वास्थ्य आणखीनच घसरतं! म्हणून आम्ही दरवेळी त्या टेकडीवर त्याच जागी बसून असतो. आणि तिथे अगदी समोरच बकाल वस्ती भेटते . . .

दुपारी उन्हाने तापलेले पत्रे अधेमधे डोळ्यांवर चमकणं वगळता ती वस्ती रात्रीच्या अंधारात असते तशीच गप्पगार पडलेली असते. कदाचित रात्री ती वस्ती जास्त कार्यरत असावी असाही माझा उगाचंच एक कयास आहे. दुपारी त्या वस्तीवर कुठंच पोराबाळांचा हलकल्लोळ, बायांची भांडण, माणसांचं खिदळणं, यंत्राचा खडखडाट काही काही म्हणून ऐकू येत नाही. जिथे या वस्तीची सीमा – आता अशा बकाल वस्तीला सीमा, आकार अजिबात नसतात. मिळेल तिथे, मिळेल तितक्या जागेत अस्ताव्यस्त धुड पसरणारी ही वस्ती – जिथे संपते तेथूनच एका बाजूला टेकड्याचा सुळका वर येतो आणि दुसऱ्या बाजूला टोलेजंग इमारती, अगदी टेकडीइतक्या उंच असणाऱ्या. दोन्ही ठिकाणचं राहणीमान, तिथली माणसं परस्पर भिन्न असली तरीही विनातक्रार आला दिवस रेटत असतात. पंखा काय किंवा वातानुकूलक काय पर्याय वेगळे असले तरी उन्हाचा सामना दोघांनाही करावाच लागतो.

कितीही ऊन वाढलं तरी या बकाल वस्तीच्या आभाळात दहा-वीस घारी, पन्नासेक कावळे आणि शे-दोनशे कबुतरांचे तीन-चार थवे अथकपणे घिरट्या घालत असतात, कलकलाट करत असतात. कधी हवेत उंच जातील, कधी बुडी मारून खाली येतील, मध्येच क्षणभरासाठी कुठलंतरी बोडक्या झाडावर बसतील व पुन्हा ढगात घुसतील. कावळे तसे फारसे उडत नाहीत. जमिनीवर उड्या मारत उगाचच हिंडत असतात, उष्ट्यावर जगत असतात, किडामुंगीची दुपार जीवघेणी ठरवत असतात. घारी आकाशात उंच, संथपणे पंख न हलवता वाऱ्याच्या जोरावर तरंगत असतात. मधेच काही दिसलं तर बुडी मारून भयाण वेगाने क्षणात खाली येतात व पुन्हा वर जातात – कधी सावज सापडतं कधी नाही. पारवे मात्र गोल गोल घुटमळत राहतात. खाली कावळे त्यांच्या टिकाव लागू देत नाहीत आणि घारी हवेत. सतत थवा चिरत थव्यात घुसणाऱ्या घारी कधी कोणत्या पारव्याचा शेवट करतील याचा नेम नसतो. पारव्यांची ही धडपड पाहताना बरं वाटत नाही, तसंच वाईटही वाटत नाही; पण त्यांचा जीवनाशी, खरंतर मृत्यूशी, संघर्ष यशस्वी झाला तर आत कुठंतरी थोडं सुखावल्याची भावना येते. तेव्हा कोंबड्यांच्या शर्यती खेळून त्यास मनोरंजनाचं नाव देणाऱ्यांत आणि आपल्यात काहीतरी फरक आहे हे कळतं.

यांच्या रामरगाड्यात मग भर दुपारी बकाल वस्तीतील कोणत्यातरी घराच्या छतावर असणारी ढाबळ उघडली जाते आणि कबुतरांचा जथ्था वाऱ्यावर दिसायला लागतो. पारव्यांपेक्षा छोट्या वर्तुळात गोल गोल भेंडोळ्या मारणारे हे जीव पाहिले की भूतकाळ आठवायला लागतो. कबुतरांची ढाबळ आठवते, तिथे असणारा भूतकाळातील मी आठवतो, कधी छर्रा देताना, कधी छापडी मारताना, कधी शिट्ट्या मारताना, तर कधी चित्रविचित्र आवाज काढताना, कधी कबूतर पकडण्यासाठी इमारतीच्या गच्च्या गुंडाळणारा, कधी पारव्यांची अंडी मिळविण्यासाठी दुकानांच्या शटरवर चढणारा, तर कधी नुसताच कबुतरांची पिल्ले बघत बसणारा. जर्दा, तांबड्या, बबरा, शिराजी, रेसर, कागदी, भुर्रा, धुंदी काय काय नावं होती त्यांच्या जातींची आताशा पूर्णतः आठवत सुद्धा नाहीत. कबुतरांची अंडी पारव्यांखाली ठेवायची आणि पारव्यांची अंडी कबुतरांच्या, कधी चित्रविचित्र ‘संगम’ घडवून आणायचे का तर चांगली नवीन संकरित कबूतरे निर्माण व्हावीत म्हणून! उडत्या कबुतरांना खुटाड द्यायलाही शिकलो होतो. जर वडिलांनी वेळीच सुतासारखा सरळ होईपर्यंत बनवला (म्हणजे बडवला) नसता तर त्या मित्रांच्या संगतीत आणि त्या कबुतरांच्या ढाबळीसोबत मी कुठे भरकटलो असतो? गोल गोल मर्यादित वर्तुळ . . .

घारींच्यात जिवाला घाबरून उडणारी ती कबुतरे पारव्यांपेक्षा जास्त केविलवाणी वाटतात. आतापर्यंत पारव्यांसाठी जो हळवा कोपरा निर्माण झालेला असतो त्यात आता कबुतरे ठाण मांडतात. स्वतःच्या बचावाचं सुरक्षा तंत्र शिकायला त्यांनी निसर्ग पाहिलेला नसतो. घारींना हे माहिती असतं परिणामी घार कबुतरांचा पाठलाग सुरू ठेवते – यश मिळेपर्यंत! त्या कबुतरांना खाली सुद्धा उतरता येत नाही. कारण, खालून बकाल वस्तीतील छतावर थांबलेला कोणीतरी पोऱ्या एका काठीला बांधलेलं काळं कापड फडकवत छर्रा देत उभा असतो. कबुतरे जरा घाबरून ढाबळीकडे झुकू लागली की तो शिट्ट्या मारतो, कालवा करतो, काळ्या कापडाचं भय दाखवतो त्याच्याने मग कबुतरांच्या घिरट्यात बेरीज होऊन त्या सुरूच राहतात . . .

कबुतरांची जी ढाबळ असते ती कधीच संपूर्ण ढगात सोडत नाहीत. हवेत उडणाऱ्या प्रत्येक नराची मादी आणि उडणाऱ्या प्रत्येक मादीचा नर खाली ढाबळीत बंद असतात – असहाय्यतेची पराकाष्टाच जणू! जे उत्तम उडतात, जे दुसऱ्या ढाबळीच्या थव्यातून चार-दोन कबुतरे भरकटवून आणू शकतात तेच हवेत असतात आणि त्यांचं कुटुंब खाली . . . जणूकाही उडणाऱ्यांनी बंडखोरी करून परिघाबाहेर न जाण्याची हमी म्हणून वेठीस धरलेलं!

उडणाऱ्या त्या कबुतरांना कोणत्याही साखळदंडाने बांधलेलं नसतं, उडायला सगळं आभाळ मोकळं असतं, उडण्याचं स्वातंत्र्यही असतं मात्र तरी परिघाबाहेर ती पाखरे जात नाहीत. परिघाच्या बाहेर जाण्याची मुभा नाही आणि परिघात उडणं‌ हा नाविलाज! त्यांच्या मनाची घालमेल त्या बापड्यांनाच कळावी आपण त्याविषयी बोलणारे कोण आहोत? त्यांच्याहून मघाचे पारवे आता जास्त सुखी वाटायला लागतात. मुळात निसर्गानेच कबुतरांच्या रक्तात गगनभरारी पेरलेली नसते मग याहून जास्त परिस्थितीची तक्रार त्याच्याकडे काय करायची? अन्याय करणार्‍याकडे अन्यायाची तक्रार भले कधी करतात का?

त्या टेकडीवर हा सगळा खेळ मी दरवेळीच पाहतो. उन्हे उतरणीला लागेपर्यंत पाहतो. तेवढ्याशा आभाळात मला समाज दिसायला लागतो. शेवटी जाताना कुठेतरी मध्यमवर्ग आणि तो कबुतरांचा थवा एकसारखा भासायला लागतो. त्यांच्या परिवाराशी नाळ तोडता न आल्यानं बंदिस्त परिघात जखडलेला. तसं तर सगळं आभाळ मोकळं पडलंय; पण मारायच्या तर घिरट्याच! त्याही नाविलाजाने! हे कमी आहे का काय म्हणून परत उडताना बलवान घारींशी सामना करायचा. काळाच्या वाऱ्याचा फायदा घेत कमी ताकदीत उंचच उंच उडणाऱ्या अशा बलवान घारी, ज्यांना कबुतरांच्या दुबळेपणाची पूर्ण जाणीव असते व त्या दुबळेपणाला कसं चिरडायचं हेही माहिती असतं! जमिनीवरचे स्वार्थी कावळे कबुतरांना कधी जम्यात धरत नाहीत. गलिच्छ म्हणून जगतील; पण सोबतंच स्वतःच्या जगण्याची भ्रांत विनासायास सोडवतील! परीवर्तनाच्या गोष्टी म्हणजे यांच्या लेखी ‘घास से दोस्ती’ त्यामुळे आहे ते आणखी गचाळ बनवता आलं तर जिकंलं! जेव्हा दुनियेत बलवानांना झुकून आणि स्वार्थ्यांना बुजून जगणारे पांढरपेशे पाहतो तेव्हा मला ती कबुतरेच वाटतात . . .

स्वप्न पहावीत, जिद्दीने पेटून उठावं, आकांडतांडव मांडावा आणि जग जिंकावं असलं काही नाही फक्त आपली असणारी व अतृप्त राहिलेली स्वप्ने पुढच्या पिढीत संक्रमित करायची इतकंच. यापेक्षा खुल्या दिलाने भिंगणारे जंगली पारवे बरे, निदान परिस्थिती हाताबाहेर जाईल तेव्हा घारी आणि कावळ्यांविरोधात पेटून उठण्याची रग त्यांच्यात आहे. नामुष्कीचं जगतात मात्र कोणाला मोताद नाहीत! कबुतरं पुळचट, उद्या यांची समस्त जमात एका रात्रीत हटली तर कोणाला जाणवणार सुद्धा नाही.

वारसाहक्कात स्वप्न पाजणारे मला कबुतरांपेक्षा फारसे वेगळे वाटत नाहीत. चाकोरी मोडण्याची हिंमत नाही, फक्त कसल्यातरी अदृश्य साखळदंडाने स्वतःला करकचून घ्यायचं आणि आला दिवस जगून रात्र बंद ढाबळीत घालवायची खुल्या तार्‍यांनी झगमगलेलं आभाळही न पाहता . . .


फक्त वस्त्याचं बकाल नसतात. बकाल मनाची बकाल माणसंही असतात. पारवे, कावळे, आणि घारी . . . आणि कबुतरं!

{fullWidth}

आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال