[वाचनकाल : ४ मिनिटे]
ख्रिस्ती मिशनरी शाळेत जाऊन धर्म बुडवल्याचा कांगावा करणाऱ्या, आनंदीबाईंच्या अंगावर मारेकरी धाडणाऱ्या सनातन्यांना आता त्यांनी चोख प्रत्युत्तर द्यायला सुरूवात केली. |
नुकताच आनंदीबाई जोशी या देशातील प्रथम महिला शल्यविशारदेचा स्मृतिदिन होऊन गेला. वैयक्तिक आयुष्यातील दु:ख बाजूला सारत, त्या काळच्या कर्मठ समाजाला तोंड देत, डाॅक्टर होणं ही काही सोपी बाब नव्हती. स्त्रीसशक्तीकरण नंतरचं. आधी स्त्रियांना परंपरांच्या जोखडातून मुक्त केलं त्या धडाडीच्या स्त्रियांत डॉ. आनंदीबाई जोशी यांचा सिंहिणीचा वाटा आहे. . .
डॉक्टर – हा शब्द ऐकला की आपल्यासमोर एक अतिशय बुद्धिमान व्यक्तिमत्व उभा राहते, जे पैशाने खूपच समृद्ध असेल. आजच्या या काळाची शोकांतिकाच अशी आहे, की डॉक्टर असणे म्हणजे बक्कळ पैसा कमावणे, हेच अनेकांच्या डोक्यात असते. चरक, सुश्रुत आणि वागभट्ट यांची परंपरा सांगणारा आपला देश . . . इकडे वैद्य
कधीच श्रीमंत असे नव्हते. परंतु,
जसजसे
वैद्यकशास्त्र व्यापार होत गेला,
तसतशी त्यातील
माणुसकी कमी होत जाऊन; आज आहेत तेवढे डॉक्टर सुद्धा आपल्याला
पुरत नाहीत. आजही भारतात स्त्री डॉक्टरांची संख्या केवळ १७ टक्के आहे आणि त्यापैकी
केवळ सहा टक्के ग्रामीण भागामध्ये उपचार द्यायला जातात. यातही स्त्री दंतरोग तज्ञ
आहेत फक्त २०% तर स्त्री फार्मासिस्ट्स निव्वळ १०%!
१३६
वर्षांपूर्वी अगदी ब्राह्मण स्त्रियांनासुद्धा शिक्षणाचा हक्क नव्हता. त्या काळात
कल्याणमधील आनंदीबाईंनी फक्त शिक्षण घेतले असे नाही, तर डॉक्टर होऊन दाखवले. डॉक्टर होणे म्हणजे फक्त एक पात्रता धारण करणे
असे नाही; तर समाजाचा चेहरा बदलण्याचे हे मोठे
माध्यम ठरू शकते, हे सत्य त्या जाणून होत्या.
सांसारिक
जबाबदाऱ्या अगदी लहान वयातच पेलण्याची क्षमता या मुलीमध्ये नसूनही, तिच्यावर त्या लादल्या गेल्या. चौदाव्या वर्षीच गर्भधारणा झाली.
‘आर यू सफरिंग फ्रॉम व्हाईट डिस्चार्ज?’ या ब्रिटिश डॉक्टरांच्या प्रश्नानं आणि त्याच्या स्पर्शांनी किती अवघडून
गेली होती ती!
अज्ञान
आणि संकोच हे तत्कालीन स्त्रीजन्माचे राहूकेतू तिच्याही मानसिकतेला पोखरत होते.
त्या काळच्या समाजासाठी ही सामान्य गोष्ट असल्याने, नवऱ्याला दोष देता येत नव्हता. अपरिपक्व शरीरात या गर्भधारणेस नीट वाढ न
मिळाल्याने मूल १० दिवसच जगले. याचा मोठा धक्का आनंदीबाईंना बसला. या घटनेने त्यांना
वैद्यकशास्त्र शिकून घेण्यास प्रवृत्त केले.
आनंदीच्या ध्यासानं थक्क झालेल्या
गोपाळरावांची मनोवृत्तीसुद्धा बदलल्याने, हे लक्ष्य
गाठण्यासाठी त्यांना नवऱ्याची साथ मिळाली. ख्रिस्ती मिशनरी शाळेत जाऊन धर्म
बुडवल्याचा कांगावा करणाऱ्या, आनंदीबाईंच्या अंगावर मारेकरी धाडणाऱ्या
सनातन्यांना आता त्यांनी चोख प्रत्युत्तर द्यायला सुरूवात केली.
थिओडिसिया
कारपेंटर यांच्या मदतीमुळे ‘पेन्सिल्वानिया’ (अमेरिका) येथील ‘वुमन्स मेडिकल कॉलेज’मध्ये त्यांना प्रवेश मिळाला. तिथे जाण्यापूर्वीच त्यांची प्रकृती ढासळत
चाललेली होती. परंतु, काहीतरी करून दाखवण्याची जिद्द त्यांना
तिथे घेऊन गेली. एका दृढनिश्चयानं पेटून अमेरिकेत त्यांनी पहिलं पाऊल ठेवलं तो
दिवस होता चार जून १८८३.
वयाच्या १९व्या
वर्षीच आनंदीबाईंचं वैद्यकीय शिक्षण सुरू झालं. कितीही सुधारकी विचारांचे असले, तरी गोपाळरावही शेवटी जुनाट पुरूषसत्ताक परंपरेला फाटा देऊ शकले नाहीत.
अमेरिकेत विद्यार्थीदशेत फोटो काढून पतीला लिहिलेल्या पत्रासोबत भारतात
पाठवल्यानंतर कडाक्याच्या थंडीतही नऊवारीबाबत दुराग्रही असणारे गोपाळराव फोटोत
डोईवरचा पदर नीट लपेटून घेतल्याबद्दलही पत्नीला चार शब्द सुनावायला कमी करत नसत.
आधीच अशक्त प्रकृती व त्यात अमेरिकेतलं अतिशय थंड वातावरण यामुळे त्यांना क्षयरोग
झाला.
‘आर्य हिंदूंची प्रसुतीविद्या’ हा त्यांचा महत्त्वाचा प्रबंध ठरला. त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर
अगदी राणी व्हिक्टोरियाने त्यांना शुभेच्छा संदेश पाठवला. भारतात परतल्यानंतर
त्यांचं जंगी स्वागत झालं. ‘डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचे हिंदुस्थानात
पुनरागमन!’ अशा मथळ्यांनी वृत्तपत्र भरभरून वाहून
चालली होती. कोल्हापूर संस्थानानं त्यांना अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग
विभागात प्रमुख वैद्य म्हणून नियुक्त केलं.
अमेरिकेमध्ये
त्यांना जडलेला टीबी व मूळची अशक्त प्रवृत्ती यामुळे त्यांची प्रकृती खालावतच
गेली. त्यामुळे अक्षरशः वर्षभरातच त्यांचा खंगून मृत्यू झाला. मरण्यापूर्वी मात्र
आपल्या अतिशय छोट्या आयुष्यात, त्यांनी अनेक स्त्रियांच्या मनात मोठी
स्वप्न पाहण्याचं बीज रोवलं होतं हे निश्चित.
पुढे इंग्लंडने त्यांना ‘द टायग्रेस ऑफ इंडियन मेडिसिन’ हा किताब प्रदान केला. अमेरिकेत आनंदीबाईंच्या नावे खास पुरस्कार जारी
केला गेला. डॉ. आनंदीबाईंच्या कर्तृत्वाला सलाम ठोकत नासाकडून बुध ग्रहावरच्या एका
विवराला ‘द जोशी क्रेटर’ असं नावही दिलं गेलं.
अनेक आजारांची
कारणं आणि उपाय केवळ वैयक्तिक किंवा शारीरिक पातळीवरचे नसतात. आजारांची कारणपरंपरा
सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय, अशा अनेक घटकांमध्ये गुंतलेली असते. उदा. लिंगसांसर्गिक आजारांच्या मागे ‘जंतू’ हे कारण आहे. पण त्यामागे सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक कारण परंपराही आहे. म्हणून लिंगसांसर्गिक आजार
हटवायचे असतील तर या सगळयाच पातळयांवर प्रयत्न करावे लागतील. अशी उपाययोजना केवळ
वैयक्तिक नसते, तर ती सामूहिक स्वरूपाची असते.
गेल्या
शतकात पाश्चात्त्य वैद्यकशास्त्राचा विकास झाला. यातूनच रोगप्रतिबंध करणाऱ्या
अनेकस्तरीय उपायांचा अभ्यास व अंमलबजावणी झाली. जिथे-जिथे ही उपाययोजना परिणामकारक
झाली तिथे-तिथे सार्वजनिक आरोग्यात लक्षणीय सुधारणा झाली. वैयक्तिक व सार्वजनिक
स्वच्छता, आहार सुधारणे, स्वच्छ व मुबलक पाणी, लसटोचणी, प्रतिजैविके निर्जंतुकीकरणाच्या विविध पध्दती या त्यांतल्या प्रमुख बाबी
आहेत.
क्षयरोगाचं
उदाहरण या दृष्टीने फार बोलके आहे. इंग्लंडमध्ये एकेकाळी प्रचंड प्रमाणात असणारा
क्षयरोग सरासरी राहणीमान सुधारताच खूप कमी झाला. क्षयरोगावरची औषधे तर नंतर
निघाली. उलट भारतासारख्या देशात औषधे असूनही अजूनही क्षयरोगाचा प्रादुर्भाव मोठया
प्रमाणावर आहे.
भारतातील
डॉक्टर अव्वल दर्जाचे समजले जातात. भारतात औषधांचा पुरवठा सुद्धा विपुल प्रमाणात
आहे. परंतु, गरज आहे ती भारतातील वैद्यकांनी आपली
जबाबदारी ओळखून त्याप्रमाणे समाजामध्ये स्वच्छतेबद्दलच्या सवयी व उचित
राहणीमानाबद्दल जागरूकता पसरविण्याची. आनंदीबाईंचा विचार हा काळाच्या पलीकडे जाऊन
विज्ञानाच्या क्षेत्रात समाजाने पुरोगामी मनोवृत्ती स्वीकारणं हा होता.
आजच्या
एकविसाव्या शतकात भारतीय समाजाने त्याही पुढे जाऊन विज्ञान हे आपल्या रोजच्या
जीवनाचा भाग म्हणून अंगीकारलं, जर भारतीय समाजाने आपल्या सवयी या
विज्ञानाच्या तराजूमध्ये तोलून त्यानुसार आपल्या जीवनास आकार दिला, तर अनेक रोग औषधाविना हद्दपार होतील. त्यासाठी गरज आहे अशा
शल्यविशारदांची, जे समाजाला ही जाणीव करून देतील.
पाश्चात्य
जगामध्ये ते शक्य झालं. तेथील शासनानं, तसेच वैद्यकांनी या
गोष्टी समाजाकडून करून घेतल्या. आज भारतामध्येसुद्धा या प्रकारचा पुढाकार घेण्याची
अत्यंत गरज आहे.
भारताच्या
आजच्या प्रचंड लोकसंख्येसोबतच, प्रचंड आरोग्याच्या समस्या आपल्यासमोर आ
वासून उभ्या आहेत. आज फक्त रोगांना दूर करणं हे भारताच्या प्रगतीसाठी पुरेसे ठरणार
नाही. हे रोग असण्याचं मुख्य कारण म्हणजे समाजाकडे पुरेशा जागरूकतेचा अभाव. फक्त
रोगालाच नाही तर सामाजिक मागास मनोवृत्तीला समजून, तिला मुळापासून नष्ट करण्यासाठी आज आनंदीबाईंसारख्या धडाडीच्या
डॉक्टर्सची नितांत गरज आहे हे त्रिकालाबाधित सत्यच!
✆ मेल
• संदर्भ :
१) छायाचित्र – टाकबोरू
• वाचत रहा :
३) बकाल (लेख)