काव्याचे खरे उपयोजन विद्रोह! बंडखोरीचा बाज स्वत:त घेऊन उतरलेल्या काव्यातून
जितकी मने हेलावली, पेटली, तावून-सुलाखून निघाली, भविष्यासाठी सज्ज झाली तितकी
इतर कशानेच, अगदी कशानेच झाली नाहीत. त्यामुळे ज्या कालखंडात विद्रोही कवी शिल्लक
आहेत तिथे आशावाद मरू शकत नाही! जिस कवि की कल्पना में, ज़िन्दगी हो प्रेमगीत
उस कवि को आज तुम नकार दो
‘पियूष मिश्रा’च्या या दोन ओळी ही भुमिका मांडण्यासाठी पुरेशा ठरतील . . .
सगळा तो मेळ सत्तेचा,
रचलेला हा खेळ सत्तेचा,
फासे सत्तेचे, ढाचे सत्तेचे,
छापे सत्तेचे, काटे सत्तेचे,
गरम सत्तेचे, गार सत्तेचे,
दंगे सत्तेचे, धोपे सत्तेचे,
डाव सत्तेचे, पट सत्तेचे,
काठ्या सत्तेच्या, सोटे सत्तेचे,
फक्त फुटणारी टाळकी पुरवणे,
हाच या खेळातला आपला सहभाग
बारी जुगाराची, खेळणार सत्ता,
हरणार आपण, जिंकणार सत्ता,
पण भावनांचा, लावणार सत्ता,
जळणार आपण, शेकणार सत्ता,
लाज नीतीची, काढणार सत्ता,
भोंगळे आपण, झाकलेली सत्ता,
मरणार सत्य, जगणार सत्ता,
रडणार आपण, हसणार सत्ता,
सूर्य माणूसकीचा, गिळणार सत्ता,
अंधारात आपण, उजेडात सत्ता,
अन्यायाची बोंब, मारणार सत्ता,
लोळणार आपण, गप्पगार सत्ता,
रक्तातील पाणी, पिळणार सत्ता,
सुकणार आपण, फावणार सत्ता
लढे धर्मांचे, पेटवणार सत्ता,
भडकणार आपण, सडकणार सत्ता,
फक्त फुटणारी टाळकी पुरवणे,
हाच या खेळातला आपला सहभाग
एक्का सत्तेचा, दुक्का सत्तेचा,
लादे जहागीरी, बुक्का सत्तेचा,
तिर्री सत्तेची, चौका सत्तेचा,
पाजतात द्वेष, गुत्ता सत्तेचा,
पंजा सत्तेचा, छक्का सत्तेचा,
विषमतेचा गर्ता, धक्का सत्तेचा,
सत्ता सत्तेचा, अठ्ठा सत्तेचा,
जीव पामरांचे, सट्टा सत्तेचा,
नव्वा सत्तेचा, दस्सा सत्तेचा,
प्रगती देशाची, गुस्सा सत्तेचा,
राणी सत्तेची, गोट्या सत्तेचा,
मतदार झाला, गुलाम सत्तेचा,
बादशहा सत्तेचा, जोकर सत्तेचा,
गल्लीत दंगली, लंगर सत्तेचा,
फक्त फुटणारी टाळकी पुरवणे,
हाच या खेळातला आपला सहभाग
बुद्धी सत्तेची, बळ सत्तेचे,
काळे सत्तेचे, पांढरे सत्तेचे,
बत्तीस सत्तेचे, चौसष्ट सत्तेचे,
सरळ सत्तेचे, आडवे सत्तेचे,
उभे सत्तेचे, तिरपे सत्तेचे,
आठ सत्तेचे, अडीच सत्तेचे,
प्यादे सत्तेचे, गज सत्तेचे,
वझीर सत्तेचे, राजे सत्तेचे,
फक्त फुटणारी टाळकी पुरवणे,
हाच या खेळातला आपला सहभाग
आपले चेहरे, मुखवटे सत्तेचे,
आपली जीभ, शब्द सत्तेचे,
डोळे आपले, दृष्टीकोन सत्तेचे,
नजर आपली, नजारे सत्तेचे,
आपले मेंदू, हक्क सत्तेचे,
आपली पाठ, फटके सत्तेचे,
डोकं आपलं, अक्कल सत्तेची
पाय आपले, चाल सत्तेची,
तोंडे आपली, गोडवे सत्तेचे,
छाती आपली, ढाल सत्तेची,
गळे आपले, घोषणा सत्तेची,
तंटे आपले, योजना सत्तेची
फक्त फुटणारी टाळकी पुरवणे,
हाच या खेळातला आपला सहभाग
नको आता श्वास दुस्वासांचे,
हे जीवन व्यर्थ निर्वासितांचे,
चल सोड ती, धर्मजात,
थांबव तो रक्तपात,
शमेल जेव्हा आत्मघात,
तेव्हा होईल जन्म
एका नव्या एकीचा
चल घडवूया,
सत्तेची सत्तांतरे,
मिळून करूयात,
विद्रोहाची भाषांतरे,
पुष्कळ झाली,
धर्म-धर्मांतरे,
फेकून दे ताईत
तोड गंडे-दोरे,
विझव धूप,
पुस अंगारे,
टाक लेखणी,
उचल वस्तरे,
चल भादरू यांच्या,
दाढ्या आणि मिश्या,
भिवया आणि शेंड्या,
एक होण्याआधी एक दिसू लागलो की,
या गडद रात्री पहाटेचे स्वर छेडूया
चल . . .
{fullwidth}