डोळे


human eye painting creative digital art
दिवस आणखी झुकलाय, अंधार दाट होतोय, पावसाचा जोर वाढलाय


विचारवंतांच्या भर सभेस ‘कोणता प्राणी रडलेला आपल्याला कळू शकत नाही’ असा प्रश्न विचारून भंडावून सोडणाऱ्या लहानग्याची दंतकथा मी ऐकून आहे. याचं उत्तर ‘मासा’! सभोवतालच्या पाण्यामुळे खरोखरीच मासा रडलेला कोणालाच कळू शकत नाही – अगदी दुसऱ्या माशालाही! माणसाच्या मनातील साऱ्या कलागती कळतात त्या डोळ्यांतून; पण कोणी हे डोळेच पावसाच्या पाण्यात दडवले तर?


असंच एका संध्याकाळी
पुढं पसरणाऱ्या गडद अंधाराआधी
रिमझिम रिमझिम बसणाऱ्या धारांत
ओल्या पायरीवर
बसलेला असतो बाप हार्मोनिका वाजवत
त्याच्या गुडघ्यावर हात टेकवून त्यालाच टेकून
खालच्या पायरीवर बसताना आठवतो आपल्याला
‘हार्मोनिका की माऊथ ऑर्गन?’ हा वाद आपणच घातलेला
फुसके बिनबुडाचे वाद हवेत विरून गेलेले
मागे गैरसमजांचा दर्प सोडून
तो त्याचे डोळे दाखवत नाही
आणि आपण बघायलाही जात नाही स्वतःहून
त्याच्याशी उडालेला एकेक खटका हळूहळू द्वंद्व उठवतो मनात
आणि बोलायचं राहूनच जातं
जे कधीकाळी येऊ पाहत असतं पोटातून ओठात
भूतकाळातले निर्णय सगळे चुकलेले बोचत असतात तेव्हा
दरवेळी निर्णय आणि परिणामांमधे सल्ल्याची ढाल घेऊन उभा राहणारा तो
आता बसलेला असतो पाठीमागे बेसावध
बेसावध का मग सगळं काही जाणूनही अनैच्छिक मौनात घुसलेला
माहिती नाही कसा पण तो बापडा शोधत असतो
प्रत्येक सूर कुठंतरी निसटलेला
आपणच गायब केलेले असतात सारेगम
आपल्याच हरेक कृतीनिशी त्याच्या सुरेल दुनियेतून
दुनिया जिथं आपल्याला आणलेलं असतं त्यानं
त्यानेच कधीही न ऐकलेले पधनीसा ऐकवण्यासाठी
त्याला धड ठाऊक नसते एकही रिदम
तरीही गंजक्या हार्मोनिकाला तो छेडत बसलाय वारंवार ओठ कापून घेत
युगांपूर्वींचे त्याच्याच पट्टीतले सूर आठवत
दिवस आणखी झुकलाय
अंधार दाट होतोय
पावसाचा जोर वाढलाय
वाजवायला विसरला रे तो विसरला
मग मधेच कधीतरी अनावधानाने तो
बेसूरातून असा सूर छेडतो
जो भिडतो आत जाऊन
उफाडून टाकतो सगळी बंद कवाडे
आणि मग उघड्यावर आलेला पश्चाताप पाणी बनून वहायला लागतो भळाभळा
त्याचे डोळे मला दिसत नसतात माझे त्याला
आम्ही दोघेही असतो पावसाने चिंब ओले





{fullwidth}

आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال