आम्ही चर्चाळू


bunch of literates discussing like illliterates art
Your Image Caption


चर्चा हल्ली पासष्टावी कला झाली आहे जी इतर चौसष्ट कलांना अस्मान दाखवू शकते! म्हणजे या चर्चेने एकतर तुम्ही खऱ्या कलाकाराला भडंग ठरवू शकता किंवा भडंग कलाकाराला भारतातील सर्वोत्तम गायक वगैरे (सद्यस्थितीवर आधारीत नाही!) या चर्चेत प्राविण्य मिळवण्यासाठी तालमीत जावं लागतं, शरीर कमवावं लागतं! नाहीच झालं तर सरळ सत्तेत घुसावं कारण चर्चेत प्राविण्यपातळी गाठण्याचा तो ‘खुष्कीचा’ मार्ग आहे, मात्र हे दोन्ही जमत नसलेल्या आपल्यासारख्याने काय करावे? तर डोळे झाकून ‘बाबा वाक्य प्रमाणंम’चा जप करावा!


‘काळाचा प्रवाह बदलला की सर्वकाही बदलतं’ असाही एक सिद्धांत कोणीतरी कुठंतरी लिहून ठेवलेला असलाच पाहिजे. खरंतर ‘कोणीतरी पूर्वीच्या काळी कुठंतरी काहीतरी लिहून ठेवलेलं आहे’ ही लोणकढी मारली की आपली मते सटासट खपवता येतात हे या काळाचं वैशिष्ट्य आहे!

म्हणजे कसं आहे की पूर्वी लोक चहाला नाही म्हणत नसत – मधुमेहाचं निदान होण्याच्या आधीची बाब – आता मात्र निम्मे लोक मधुमेहाने चहाला नाही म्हणतात तर उरलेल्यांना ‘आपल्या’ चहाचा प्रकार हवा असतो. कोरा चहा, गवती चहा, बिनसाखरेचा चहा, लिंबाचा चहा, आल्याचा चहा, हिरवा चहा, काळा चहा (हा संध्याकाळी!) आणि कसले-कसले चहा . . . एकंदरीत हळूहळू लोकांची चहावरची श्रद्धा विभागली गेली आहे. आताच्या काळात लोक ज्याला नाही म्हणत नाहीत असा नवाच (निरू)उद्योग उदयास आला आहे त्याला म्हणतात – चर्चा!

नाही म्हणजे जागतिक घडामोडींवर चर्चा करणे – तेही भारतात आपल्या घरात बसून – हे आजकालचं फ्याड आहे; पण काहीही झालं तरी इथल्या राजकारणावर बोलायचं नाही हा यातला अलिखित नियम. जो चर्चेला नाही म्हणतो त्याला अगदीच ‘हे’ ठरवून कालबाह्य वगैरे बिरुदे जोडली जातात किंवा मग जो इथल्या राजकारणावर बोलतो तो अगदीच ‘हा’ वगैरे आहे असं काहीसं!

चाळीतील संडासाबाहेरच्या रांगेत तर चर्चेला उधाण आलेलं असतं. कारण, चर्चेत वेळ कसा जातो हेच कळत नाही! दुसरं वैशिष्ट्य म्हणजे चर्चा ऐकणाऱ्यास उत्सुकतेनं अगदी भारावून टाकते ती इतकी की बऱ्याच वेळा ‘बाहेर’ उत्तम चर्चा ऐकल्याने बरेच महाभाग ‘आतला’ कार्यभाग अपूर्ण सोडून पटकन संडासातून बाहेर निघाल्याचंही पाहण्यात आहे!

असं हे एकंदरीत वातावरण चर्चेला पोषक असल्यानं मग नकळतपणे आम्हीही चर्चाळू झालेलो आहोत. ‘अगदी परवाचीच गोष्ट बघा ना . . .’ या एका वाक्यानंतर अगदी अश्मयुग ते उत्क्रांती ते औद्योगिक क्रांती अशी तासंतास चर्चा पिकवणारी माणसं मी ‘ऐकलेली’ आहेत. परवाचीच गोष्ट या वाक्यापासून जी चर्चा सुरू होते ती अगदी कैक तास लांबणार हे ऐकणाऱ्यानंच गृहीत धरायचं असतं, असो. माझी गोष्ट मात्र खरोखरंच परवाची आहे, तो दिवस बहुदा माझ्या आयुष्यात मी रांगेत थांबण्यासाठीच आला होता!

भल्या सकाळी उठून परीक्षा अर्ज भरण्यासाठी महाविद्यालयात गेलो तर तिथे ही भली मोठी रांग . . . मग काय रांगेतले दोन तास चर्चाच-चर्चा. कधीकधी चर्चा ऐकण्यात सुद्धा खूप मजा असते – किंबहुना चर्चा करणारे आजकालचे ‘चर्चापटू’ पाहता ती ऐकण्यातंच मजा असते. एकेकाळी बौद्धिक असणारी चर्चा भविष्यात कबड्डी किंवा कुस्तीसारखा मर्दानी व मैदानी ताकदीचा खेळ जाहीर झाला तर आश्चर्य वाटायला नको, अशीच चर्चा आज लोक करतात. चर्चा ऐकल्यानं एकतर शिकायला मिळतं किंवा हसायला. चर्चा करून काय मिळतं? यावर आपण नंतर चर्चा करूयात! तूर्तास चर्चेची चर्चा.


रांगेत एकदम अशी बाला आजूबाजूला उभी रहावी की रांग संपूच नये असं वाटावं हे माझं नशीब नव्हे – अगदी आधीपासूनच. आमच्या भोवताली कायम घामानं न्हालेली शिवराळ मंडळीच उभी राहणार – तेही आमच्याच खांद्याच्या आधारानं! यावेळी माझ्यापुढं दोन मस्त शिकलेले, उच्चभ्रू, सुशिक्षित तरुण उभे होते. त्यांचं शिक्षण इतकं उच्च नक्कीच होतं की (मराठी) बोलण्याची सोय नसावी. इंग्रजीत बोलणारा प्रत्येक माणूस हा उच्चशिक्षित असेल एकवेळ मात्र त्याच्या सुशिक्षितपणाविषयी कोणतीच खात्री देता येत नाही, कोणीही देऊ शकत नाही. आणि म्हणूनच इंग्रजी शाळेत विद्यार्थी सुशिक्षित होतात असं निष्कारण समजण्याचं देखील कोणतंच कारण नाही. मराठीस ‘मेरॅटी’ म्हणणारी आणि अधूनमधून बम्बय्या हिंदी व अमेरिकन उच्चारांत भारतीय इंग्रजी घुसडणारी ही पोरं माझ्या महाविद्यालयात आलेली असतानाच त्यांच्या शैक्षणिक स्तराची कल्पना मला कळून चुकलेली असते. वास्तविक पाहता असा कोणाचाही शैक्षणिक स्तर (माझ्यासारख्यानं तरी) ठरवू नये मात्र त्या पोरांचा नक्षाच काही और असतो. बौद्धिक मागासवर्गीयांमध्ये वावरावं तसे ते आम्हा सामान्य विद्यार्थ्यांत वावरत असतात – तक्रार नाही. इतरांना कमी लेखून ते त्यांची प्रगती खुंटवून घेत असतील तर यात मला झोंबण्यासारखं काय आहे?

त्या दोघांनी रांगेचा पुरेपूर फायदा उचलायचा हे मनाशी ठरवलं असल्याने तिथंच उभ्या-उभ्या चर्चेची तान छेडली. चर्चेचा विषय होता ‘अघोरी विद्या – समाजात रूढ असणारे समज, गैरसमज, अफवा-असत्य आणि त्यामागे दडलेली सत्य आणि तथ्य’ हे चर्चेचं विषय शीर्षक अर्थातच माझ्याकडून! मात्र त्यांच्या चर्चेची व्याप्ती आणि खोली आणि त्यांचा अर्ध्या हळकुंडाचा गाढा अभ्यास पाहता छोटं शीर्षक जमणार नाही.

भारतात झालेली सांस्कृतिक जडणघडण व ऋषीमुनींचा काळ इथंपासून कोणतीही चर्चा – अगदी कोणतीही – चर्चा सुरू होऊ शकते (उदाहरणार्थ अरे संडासात पाणी नाहीये यावर ऋषीमुनींच्या काळात पाणी फार कमी आणि दगड फार जास्त वापरत असत! मग पुढे दगड वापरण्याचे आयुर्वेदिक फायदे . . . असं काहीसं)! याच ऋषीमुनींच्या काळात उगम पावलेल्या अघोरी विद्येवर त्यांचं चर्वितचर्वण सुरू होतं. ‘अघोरी विद्या खरी असते’ यावरच त्यांची चर्चा आधारलेली असल्याने हा विषय हळूहळू ‘अघोरी विद्या – मंत्र, तंत्र आणि व त्यातून प्राप्त झालेल्या शक्तींचे व्यवस्थापन’ यावर आली!

यामध्ये वाईट अघोरींचा दैवी पद्धतीने नाश कसा झाला, व चांगल्या अघोरींना अलौकिक शक्ती कशा प्राप्त झाल्या यावर मंथन झालं. मग पाण्यावर चालणं, हवेत उडणं, जमिनीत राहणं यावरून चर्चा हळूहळू मग ‘अघोरी विद्या – भय, धोका व घ्यावयाची काळजी’ यावर आली. मग अघोरी कुठं शोधावा, खरा-खोटा कसा ओळखावा, त्यासी प्रसन्न कसे करून घ्यावे व त्याची खप्पामर्जी ओढवून न घेण्यासाठी कोणकोणते यत्न करावेत हे जगण्यासाठी भाकरीनंतर, व पाण्याच्याआधी, आवश्यक असणारं अमोघ ज्ञान मला त्या रांगेत समजलं! त्यात पुन्हा अघोरीस राग आला तर तो आपला बेडूक न बनवता सुद्धा आपल्याला उड्या मारायला लावू शकतो, साप न बनवता सरपटायला भाग पाडू शकतो व डुक्कर न बनवता लोळायला लावू शकतो, आपल्या शरीरात एकाच मंत्राने विज्ञानाला सुद्धा सापडणार नाहीत असे बिघाड करू शकतो व आपल्या शरीराचे अवयव नियंत्रित करू शकतो हे ऐकून मी सुद्धा घाबरलो. पण तो गाय न बनवता आपल्याला दूध द्यायला लावू शकतो की नाही यावर मी जरासा संभ्रमित आहे! तसं त्या दोघांना विचारणं राहून गेलं! गरुड बनून उडणं, इतर प्राण्यांत आत्मा सोडणं, शरीर बदलणं हे तर अघोरी लोक शौच किंवा लघवीप्रमाणे अगदी विनासायास करतात असंही कळालं (काहींना कष्ट पडतात)! वेळ कधी पुढं सरकत होती समजतंच नव्हतं.

हळूहळू मग ‘अघोरी विद्या – उपासना व अंगीकार’ हे पर्व सुरू झालं. यात मग अघोरी विद्या कशी सुरु करावी, माणसाची कवटी मिळवावी, त्यात अन्न-पाणी घ्यावे, शिवांभू, स्मशानातील चितेवरील मांस खाणे वगैरे वगैरे उपासना एकूण मला धडकी भरली. त्यांनी एकमेकांना तिकडं इंटरनेटवरचे व्हिडिओ दाखवले आणि इकडं अघोरी लोकांविषयी माझ्या मनात अमाप आदर दाटून आला! यानंतर चर्चा ‘अघोरी विद्या - वैयक्तिक अनुभव’ यावर घसरली. वेगवेगळ्या यांत्रिक, तांत्रिक योग्यांनी अघोरी विद्या आत्मसात कशा कराव्यात याचं ‘शास्त्रोक्त’ स्पष्टीकरण युट्युबवर देऊन ठेवलेलं आहे असं कळालं; पण पुढं ते खोटं आहे असंही कळालं. आणि या दोघांनी थापांचा गोळीबार सुरू केला इतका की रांग तर सरलीच मात्र जे विज्ञान ते गेली पंचवीस वर्षे शिकत होते तेही छिन्नविछिन्न झालं.

या समस्त वेळी ते दोघं एकदाही बेरोजगारी, भुकबळी, महागाई, गुन्हेगारी व देशाचं खाजगीकरण यावर बोलले नाहीत हे विशेष, रांग क्षितिजाप्रत असती तरी बोलले असते की नाही कोणास ठाऊक.


हल्ली आपल्याला चर्चेचा रोग झाला आहे. मुळात चर्चा म्हणजे काय हेच आपण विसरून गेलो आहोत. ‘रूमी’ नावाच्या कवीचं एक गोड वाक्य आहे. ‘जेव्हा तुम्ही बरोबर असता तेव्हा तुमचे शब्द वाढवा, आवाज नाही. कारण, फुलं फुलवण्याचं सामर्थ्य पावसात असतं, विजेत नाही.’ (अनुवादक मीच!) मात्र कोणत्याही विचारवंतास गटार दाखवण्याची आजची रीत असल्याने ‘रूमी’ काय बरळला हे कोणाच्याच जम्यात नाही. आज जिथं पहावं तिथं वर्तमान सोडून भूतकाळावर चर्चा सुरू असते हे सर्वात निराशाजनक आहे. पुराणांवर चर्चा करायची, तिथले गोडवे गाऊन छाती छप्पन करायची आणि वर्तमानासाठी मात्र ‘बाबा वाक्य प्रमाणंम’ हाच ‘उदारमतवादी’ दृष्टिकोन बाळगायचा हे समाजात वाढत आहे. त्यातही कोणी विरोधात बोलला, आजच्या समस्यांवर बोलला तर त्याला शिवीगाळ ‘आरती’सोबत शारीरिक ‘प्रसाद’ द्यायचा ही नीती ठरलेली आहे. तासंतास, दिवसेंदिवस पुराणांवर व त्यातील चमत्कारांवर, भाकड बातांवर चर्चा करण्यातून सवलत मिळताच आपला गेल्या दोनेक सहस्त्रकाळात झालेला ऱ्हास, आपल्यावरची आक्रमणे झाली नसती तर, आपले अणुबॉम्ब, ब्रह्मांडात ओमचा आवाज, इत्यादी इत्यादी आहेच!

सध्या वर्तमानाशी लढायला कोणीच शिल्लक नाही कारण, सगळे मुघलकालीन समस्यांशी झुंजत आहेत! त्यावर तोडगा शोधत आहेत, शोधोत बापडीचे! मात्र निदान त्यांनी हे वाचून स्वतःचं एकतरी मत ठोस बनवायला हवं असं मला वाटतंय. नाहीतर तासंतास व्हाट्सअपवरचा कचरा कवटीत कालवून चावायचा व चर्चेतला अघोरी योगीबाबा बनायचं यात मजा नाही, शहामृगी आनंद जरूर आहे मात्र फायदा – शून्य. हल्ली चर्चा म्हणलं की निम्मे चर्चेला अस्पृश्य मानल्यासारखं दूर धावतात (हे ढोंगी! कारण हे मनातून सद्यस्थितीचे पुरस्कर्ते असतात! अंध असतात!) आणि उरलेल्या निम्म्यांना ‘आपल्या' प्रकारची चर्चा हवी असते (हे भक्त असतात!) या दोहोंनी निदान जो वास्तव बोलतो आहे त्याचं तोंड तरी धरायला जाऊ नये!

‘बोलणाराचं तोंड कसं धरता येईल’ या म्हणीला या चर्चापटूंनी या काळात निकामी ठरवलंय इतकंच.

{fullwidth}

आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال