कोणत्याही चक्रव्यूहात एक अग्रणी गज असतो. पाठीमागच्या सैन्यावर येणारा हरेक वार आधी स्वतःवर झेलून रणात त्यांचं संरक्षण करणारा लढाऊ ‘ढालगज’. आमच्याकडेही असाच एक ढालगज होता, आहे . . .
तो असा कधी स्वस्थ बसायचा नाही
भल्या सकाळी गेलेला कधीमधी
कामावरून
आला की निघायचा
कोळाला लावलेल्या बैलासारखा
त्याची हातगाडी ढकलत
लांबच लांब
तो माघारी पोहचायचा तोवर झोपेत
आमची लाळ कानापर्यंत
सुकत असायची
तो असा कधी स्वस्थ बसायचा नाही
यात्राजत्रा
सणसमारंभ किंवा असणाऱ्या सुट्टीचं
निमित्त साधून त्याच्या नजरेनं हेरलं
हरेक
ठिकाण गर्दीत त्याची हातगाडी नामक चारचाकी
नेण्यासाठी भरमसाठ
सफरचंद खिसून कधी ज्यूस
कधी भेळ विकून चार बचतीचे पैसे जोडताना
उन्हाळ्यात
दिवसेंदिवस हायवेवर लस्सी विकणारा तो
बसला गाड्यांची गरागरा भिंगणारी
चक्रे बघत
तो असा कधी स्वस्थ बसायचा नाही
वेळ काढून तपासायचा
दप्तरातल्या चिट्या-चपाट्या
घरातल्या किडामुंगीझुरळासह त्याने
मारली
आमच्यातली बेशिस्त धुळीच्या लोटासह
घराबाहेर विकार घालवून केलं आम्हाला
निर्मळ
सायकलवर फिरला मागे तपासत आमचे
आहारविहारविचारसंगत आम्ही
रममाण
आत्ममग्न अंतराळात जगाच्या शर्यतीत धावण्यापायी
तो असा
कधी स्वस्थ बसायचा नाही
गॅससिलेंडर दूधपेपर अंडीमटण दवादारू
कपडेलत्ते
चायबिस्किट भुसारकिराणा आणत
झाला घराचा घरगडी घरासाठी आमच्या
चपला
शिवताशिवता तो खानदानी चांभार
आमची पावले नीट सरळवाटेने पडण्याकरीता
जाणीवांची
जाणीव हरपत आम्ही वाढत राहीलो आडवे
आम्हाला उभं वाढण्याचं त्याचं स्वप्न
विसरून
तो असा कधी स्वस्थ बसायचा नाही
रिकाम्या मनातल्या
सैतानाला किंवा घाबरून
जगाला पांघरली त्यागाची झूल त्याने
कारण कळू
न देता झुरत राहीला तो कायम आतल्याआत
आणि अशा या ढाण्या वाघाला त्याच्या
अस्वस्थेतचं
बक्षीस म्हणून आम्ही दिले बायपासचे सत्तावीस टाके
आता
कसंतरीच वाटतं त्याला एकदाचं स्वस्थ बघून
तो मात्र अजूनही स्वस्थ
बसत नाही
आम्ही दिलेला टाक्यांचा घाव चिलखतासारखा
मिरवून आम्हाला
लाजेच्या गर्तेत ढकलायचं सोडून
नुसतीच करत असतो तक्रार या कुशीवरून त्या
कुशीवर
आता तो आमच्या खांद्यावरचं जिवंत मढं असल्याची
एवढ्याच
कारणाने मग त्याची चीड येते
{fullwidth}