गळकी छत्री


rough painting human gesture in leaking umbrellas
सरळ दांड्याची, काड्या मजबूत असणारी, हाताची मूठ सुस्थितीत असणारी आणि म्हणूनच लवकर उघडून आपल्याला सावरणारी छत्री असावी


गरूड फार मजेदार पक्षी आहे. जोरदार पाऊस येताच म्हणे तो ढगांच्या वरून उडून पावसावर मात करतो. मात्र इतर पक्षांना हे असं वागता येत नाही. पाऊस आल्यावर त्यांना कशाचातरी आडोसा शोधावा लागतो. तसा तर हत्तीही फार मजेदार प्राणी आहे. याचे दाखवायचे बहारदार दात वेगळे असतात आणि खायचे मात्र वेगळे. इतर प्राण्यांतील काही जणांना हे ओळखू येतं तर काही जणांना नाही. पण मग पाऊस येताच हत्ती काय करतो?


छत्रीचा मोठा आधार असतो. आधाराविना पाय रोवून उभं राहणं कठीण, त्यात संकटाशी झुंज देणंही कठीण आणि संकटात सापडलेलं असताना सुद्धा वाटचाल करणं तर त्याहून कठीण – अशावेळी आधार हवा.

पाऊस तसा बरा जोपर्यंत तो भयाण वेगानं कोसळून पूर बनून वाहत नाही तोपर्यंतच . . . थोडा-थोडा पाऊस तर सगळीकडंच असतो. एक काळ मात्र असा सुरू होतो की सपाटून पाऊस लागून राहतो. सतत बरसणाऱ्या पावसात चालणाऱ्याला वाटतं – आता ध्येय संपलं. तशात मागं फिरावं तरी पाऊस आणि पुढं तर जाणं अशक्य! अशा पावसात छत्रीचा आधार होतो.

मुसळधार, रौद्र पावसात तशी छत्री सुद्धा फारशी कामाची नाही. ज्याचा पाऊस त्यानंच झेलावा लागतो मात्र तरीही बुडत्यास काडीचा आधार म्हणून छत्री उरतेच.

समोरून येणार वारं पेललं नाही की आधाराची कोणतीही छत्री उलटतेच, हे जितकं खरं आहे तितकंच, पावसात भिजताना छत्री मिळाल्यास वापरणार नाही असाही निराळाच, हेही खरं आहे.

सरळ दांड्याची, काड्या मजबूत असणारी, हाताची मूठ सुस्थितीत असणारी आणि म्हणूनच लवकर उघडून आपल्याला सावरणारी छत्री असावी असं कोणास वाटू नये? पण काही छत्र्या या चांगल्या छत्र्यांत मालूमपणे मिसळलेल्या असतात.

जुन्या, अनुभवी, आपल्या चांगल्या परिचयातील म्हणून पाऊस आल्यावर माणूस जुन्या छत्र्यांचा आधार शोधतो. याचं जुन्या छत्र्या कोठूनतरी गळत असतात. कोणत्यातरी कारणाने किंवा नवीन असतानाचं काही छत्र्यांत लहान-लहान छिद्रे पडलेली असतात. वास्तविक पाहता ही छिद्रे भगदाडे नसल्यानं दुर्लक्षित राहतात व आपण पावसाशी लढण्यात ही छत्री डोक्यावर धरतो‌‌. रिपरिप येत असेल तर गळक्या छत्र्या चालूनही जातात; पण जेव्हा पाऊस जोर पकडतो तेव्हा या आधाराचं ढोंग करून नकळत आपल्याला भिजवतात आणि त्यामुळंच त्या वर्ज्य.


बाहेरचा पाऊस आपल्याला कितीही भिजवू देत – तो भिजवणार हे ठरलेलंच असतं – आपल्या विश्वासाला पडलेल्या छिद्रातून आपल्याच डोईवर टपकणाऱ्या या गद्दारीपासून मात्र आपण गाफील राहतो.





{fullwidth}

आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال