‘विलास घोगरे’ तसा फार उशीरा समजला. ‘एक कथा सुनो रे लोगो’ किंवा ‘जळतोय मराठवाडा’ व्यतिरिक्त या अफलातून शाहिराचं फारसं काही आता मिळत नाही. ‘रमाबाई काॅलनी हत्याकांड’ झाल्याच्या उद्विग्नतेतून विलास घोगरेने गळफास लावून घेतला. विलास घोगरेचा आत्मघात आणि रमाबाई काॅलनी हत्याकांड कळाल्यावर लिहिलेली ही काल्पनिक कथा. या कथेचं बीज ज्या वास्तवात आहे ते वर नमूद आहे. बाकी काल्पनिक . . .
बिनीला जर भविष्यात इतरांनी वर्तवलेली भाकीतं खरी ठरणार आहेत हे माहिती असतं तर तिनं पिऱ्याशी लग्नाचा हट्ट सोडला असता. वास्तविक पाहता असं फक्त ती म्हणते; पण त्यावेळच्या धुंदीत तिनं हा हट्ट कधीही सोडला नसता. गेल्या महिन्यापासून तिनं लावलेला तागादा पिऱ्यानं पुरा केला . . . मात्र तोही चुकीचाच. हे एकच कारण ऐन पहाटे तिची टकळी खोलायला पुरेसं होतं.
“आवं उठा की ही काय आणलंय त्ये बदलून आणा मोट्याभाईकडून.”
पिऱ्यानं काल रात्री सफेद रंगाचं म्हणून मोट्या भायबंदकडून घेतलेलं ते पातळ भल्या पहाटं अबोली रंगाचं निष्पन्न झालं. यात पिऱ्याचा दोष नाही हे बिनी जाणत होती. रात्रीच्या झगमगत्या दिव्यांनी पातळाचा रंग ओळखण्यात चूक होतेच; पण आता फक्त पिऱ्यानं लवकरात लवकर उठून ते पातळ बदलून आणावं म्हणून तिची सारी धडपड . . . आज १४ एप्रिल – महारवाड्याला जाग येत होती.
बायकोचं पातळ झिरझिरीत झालं की तिला माहेरी पाठवण्याची अस्सल मराठमोळी पद्धत महारवाड्यात लागू होत नाही. घरचं कोणीतरी कायमचं गेल्याविना तिथं माहेर दिसत नसतं. याला बरीच कारण असतात, ती असोत.
लग्न झाल्यापासूनच्या गेल्या दोनेक वर्षात बिनीनं आईनं दिलेल्या साड्या वापरल्या होत्या; पण त्या आता फाटून, विरून, नेस्तनाबूत होण्याच्या मार्गावर होत्या. १४ एप्रिलचा मुहूर्त गाठून बिनीनं पिऱ्याकडं नवी तीन पातळं मागितली होती. त्यातलं शुभ्रसफेद रंगाचं, निळी किनार असलेलं – बाबासाहेबासाठी.
दिवस जवळ येत गेले तरी पिऱ्याच्या हाताला काम नव्हतं. पैसे नव्हते म्हणून ही मागणी फक्त सफेद पातळावर येऊन थांबलेली. जी काल रात्री मोट्या भाईबंदकडून पिऱ्यानं पूर्ण केली होती – तीही चुकीची.
“सकाळसकाळी आपणाला कोण उभं करतंय तिथं? जरा वाईच दम काढ बिने, मंग जातो दोपारी.”
“मोट्या भाईबंद आज आपल्यासाठी मागच्या दारातनं माल देतोय, तवा जाऊन या. ह्यो आबोली रंग हाय.”
“नवं घेणं यगळं, जुनं बदलणं यगळं.”
“जाताय का म्या जाऊ?”
“निघालो.”
तोंडावर पाणी मारून पिऱ्या निघाला तेव्हा पूर्वेला जाग येत होती. महारवाड्याच्या एका दिशेतून पिऱ्या निघत होता दुसऱ्या दिशेला कोलाहल . . .
बिनीनं केलंच तर फक्त पिऱ्याशी लग्न करेन अशी अट टाकली नि घर पेटलं. पिर्याला नुसती आई होती तीही अधूनमधून कधीतरी वारली. त्यानंतर बापाजाद्यांच्या खोपटात पिऱ्याचा उगम झालेला. समस्त वस्ती पिऱ्याला भित्रा पिऱ्या म्हणायची. अधेमधे कधीतरी त्याच्यावर नामर्द असण्याचाही आळ यायचा.
‘आधीच भोळा त्यात पडला महार’ अशा द्विधा अवस्थेमुळं कायमचं शोषण झाल्यानं पिऱ्यात आत्मविश्वास नावाचा प्रकार नव्हता की धमक उरलेली नव्हती. मिळेल त्या ठिकाणी – म्हणजे शक्यतो संडाससफाई लाईनीत – मिळंल ते काम करायचं अन् जे मिळंल ते घ्यायचं यावर तो जगलेला. त्यानंच बिनीला फूस लावली असं समजून बिनीच्या चुलत्यानं पिऱ्याचा मारुती केलेला; पण बिनीनं मधी पडून आपणच याच्यावर भाळल्याचं इतरांना सांगितलं आणि तेव्हाच पिऱ्यालाही कळलं.
“कसाही भोळाबाबडा आसला तरी माणूस रूपानं राजबिंडा हाय तसाच मनानंबी राजा माणूस हाय.”
बिनी खोपटासमोर जमलेल्या गर्दीत मारुती झालेल्या पिऱ्याचं मनगट धरून – नक्की रागानं, त्वेषानं का मग निर्धारानं माहिती नाही पण कशीतरी – बोलली. तशी घरच्यांनी खेचकटत नेऊन घरी डांबली अन् दुसरीकडे लग्न ठरवलं. तशी ही रात्री अंगावरच्या कपड्यानिशी पिऱ्याच्या खोपटात . . . सकाळी लागलीच बिनी पिऱ्याखाली निजल्याची जाहिरात वस्तीत झाली मग पुढं त्यांचं लग्न. बिनीच्या चुलत्यानं लग्नात पिऱ्याला कळीचा लाडू भरवला.
तेव्हा, त्या दिवसापासून, पिर्याला बरकत आली.
खोपटाची खोली झाली तरी गरीबी होती तिथंच होती. पिऱ्या दररोज कामानं पिडून घरी पोहोचायचा त्यामानानं पैसं पोहोचायचं नाहीत. या असल्या बचतीतच बिनी खंगली. यंदाच्या १४ एप्रिलला सफेद साडी पाहिजेच हा हट्टही तिच्या, बचतीनं पिचलेल्या, मनाचा आक्रस्ताळेपणाच होता.
मोट्याभाईबंद पिऱ्याला दोन-चार शिव्या देऊन कट्ट्यावर बसला. त्या यानं ऐकल्या. आणखी चार-दोन दिल्या त्याही तशाच ऐकल्या. शेवटी मग मोट्यानं मागच्या शटर मधून अबोली पातळ ज्या वेगात आत फेकलं, त्याच वेगानं आतल्या पोरानं सफेद पातळ बाहेर भिरकावलं – निळी किनार असलेलं . . .
पातळ तपासून, मोट्याभाईबंदला हसून अभिवादन करत, पिऱ्या निघाला. गेल्या कित्येक महिन्यांत बिनीची चाललेली परवड त्यालाही समजत होती. बिनी त्याच्या वस्तीतली असली तरी तिच्या घरची आर्थिक स्थिती त्यामानानं बरी होती. सलोख्यात वाढलेली तेव्हाची सावळी बिनी अन् आताची रापलेली काळी बिनी . . . तिच्यासाठी आणखी राबायचा निर्धार केला अन् त्यानं पातळ काखेत मारलं. त्याच्याच्यानं इतकंच शक्य होतं.
महारवाड्याच्या दुसऱ्या टोकाचा कोलाहल वाढत निघालेला . . . लोक धावत होतं.
“ये बिने अगं बाहेर यी की इकडं बघ कसा म्होतूर लागलाय . . .”
बिनी धावत घराबाहेर, मग बाईच्या मागोमाग, महारवाड्याच्या दुसऱ्या टोकाला.
१४ एप्रिल गाठून कुणीतरी वस्ती बाहेरनं रात्री बाबासाहेबाच्या पुतळ्यावर दगडांची बारिश केलेली . . . सोडा वाॅटरच्या बाटल्या, दगड, धोंडे, पत्थर, चपला, सडके टमाटर नि काय काय. त्यातच बाबासाहेबाच्या पुतळ्याचा डावा हात जायबंदी झाला. याची बातमी सगळ्या महारवाड्याला कळायच्या आतच पोलिसांना कळाली.
पोलिसांच्या गाड्या भनाना वस्तीत घुसल्या. कुणाला खबर होण्याआधीचं गोळीबार. धाड . . . धाड . . . धाड . . . तुफान.
महारवाडा बाबासाहेबाची विटंबना झाली म्हणून दंगल करणार हे पोलिसांना आकाशवाणीतून कळल्याप्रमाणं झालेल्या अंदाधुंद गोळीबारात दहा मुंडकी गपगार.
“अओ बिने तुहा पिऱ्या भित्रा न्हाई ओ . . .” गर्दीतून आवाज बोलत होता. पोलिसांच्या लाठ्या जमाव माघारी वस्तीत ढकलत होत्या. तरी बिनी स्तब्ध. “. . . गोळीबार झाल्यावर समदी वस्ती पळाली पर ह्यो तुझा पिऱ्या तिकडून यीवून गोलीनं खाली पडलेल्याला यकटा उचलत होताय, यकटा लढत व्हता, म्हणून त्याच्या पाठीत . . .” आवाज थंड.
उतान्या पडलेल्या पिऱ्याच्या पाठीतल्या पाठीत बिनी बेरीज करत होती. एक, दोन, चार, सहा, सात गोळ्या . . . अनंत गोळ्या. पिऱ्याचा हात पोटाखाली काहीतरी दडवत असल्यासारखा गुंडाळलेला.
तेवढ्यांत एका पोलिसानं तो मेल्याची खात्री करण्यासाठी त्याच्या पोटात दांडू खुपसून त्याला सरळ केला तर हातात पांढरं पातळ . . . लाल भडक झालेलं.
गालावरच्या ओघळत्या पाण्याकडं दुर्लक्ष करत बिनीनं ते लाल भिजाक पातळ उचललं, हातावर पसरलं अन् ते अंगावर घेण्यासाठी आधीचं लुगडं मोकळं करायला सुरुवात केली . . . पोलिस पाहत होते . . . वस्ती बघत होती . . . निर्जीवाला सजीव डोळे फुटलेले . . . बाबासाहेबाचं उजवं बोट मात्र पूर्वेकडं . . . जिथून उजेड निघतो तिकडं कुठंतरी . . . स्तब्ध.
{fullwidth}