वाॅकमन


retro sony walkman radio and cassette player
पुन्हा अनाकलनीय भाषा . . . मुंग्या आणि मग अचानक सुरू झालं एक आर्जव कुठंतरी बोलावणारं, कुठं माहिती नाही; पण मनाच्या गाभाऱ्यातून बोलावणारं


पुन्हा पाण्याच्या टाकीवर, इकडे-तिकडे, कोपऱ्यात, जाळीवर, जिन्यावर, भिंतीवर. दुरून कुणी मला पहात असेल तर माझे माकडचाळे आणि हातवारे पाहून त्याला ‘मी वेडा झालो आहे’ याशिवाय कोणताच अर्थ लागत नसणार.


केळ्या, तुझ्यामते सुखाची व्याख्या काय? मला पैसेबिसै तसलं भडंग काही सांगू नको, नेमकं सुख बोल.

म्हणजे?

म्हणजे सुखाची व्याख्या माणसानुसार बदलते, परिस्थितीनुसार बदलते. आज आपल्या हिशोबाने जे सुख आहे ते उद्या असेलंच असं नाही. मला या घडीला तुझ्यामते असणारं सुख सांग. आयुष्यातली स्वप्नं नको सांगू. स्वप्न म्हणजे काय सुख नाही! कोणती गोष्ट तुला दररोज करायला मिळाली तर तू सुखी झालास असं तुला वाटतं ते बोल.

दापोडीच्या पुलावर आमची भंकसगिरी चालू होती. या पुलावर न पिणारे आम्ही दोघेच. संध्याकाळी शाळा-बिळा प्रकरणांतून मोकळं झाल्यावर आम्ही दोघं नित्यनेमानं दापोडीच्या जुन्या पुलाला तोंड दाखवत असू.

दररोज दहावाला एक संपूर्ण ‘पारले’ एकट्याला खायला मिळाला तर मी सुखी असेन! या जगातला सर्वात सुखी!

केळ्याच्या या उत्तरावर आम्ही दोघे भरपेट हसलो.


संगीतातलं आपल्याला काहीएक काहीच कळत नाही. हे मान्य करूनच सुरुवात करतो. त्याचं असं आहे की आपल्याला कशातलं काहीच कळत नाही हे मान्य करताक्षणीच आपण आपला राग – आपल्याच शैलीत – आळवायला मोकळे! नंतर आपली ‘उत्तुंग’ झेप पाहून आपल्याला कोणी तोंडावर पाडू नये म्हणून याची सोय आधी करून मी संगीतावर माझी पाजळायला बसलेलो आहे.

तसं पाहता संगीताने कधी माझ्या डोळ्यांतून पाणी काढलेलं नाही अशातला भाग नाही. संगीत डोळ्यांतून कधी बरसतं? ते मनाला भिडतं तेव्हा! एकंदरीत संगीत मनाला भिडल्याचे प्रसंग घडलेले आहेत.

‘किशोर कुमार’ आणि ‘इम्रान हाश्मी’ हे पौगंडावस्थेतील माझे कायमचे दोन साथीदार बनून राहिलेले होते. किशोरचा आवाज हा माझ्याच गळ्यातून उमटलेला आवाज, अगदी आजही, वाटतो (हे खरडताना सुद्धा मागे किशोर ‘मेरे महबूब कयामत होगी’ गातो आहे).

इम्रान हाश्मी काही गाणी म्हणत नाही; पण तो ज्या गाण्यात असतो ते प्रत्येक गाणं ऐकण्यास (व पाहण्यासही!) निदान माझ्यासाठी तरी पर्वणी ठरत आलेलं आहे. अलीकडेच काही गझलांचा, चित्रविचित्र भाषांतील गाण्यांचा आणि आपल्याकडील अतिशय जुनाट गीतांचा माझ्या मेंदूवर झालेला एकंदरीत परिणाम पाहता संगीताने माझ्या डोळ्यांतून पाणी काढण्याचे प्रसंग वाढतच राहिलेत – लाज नाही. त्यात पुन्हा गुजरातेत असताना मध्ये कधीतरी ‘हॅन्स झिमर’ कानांना चिकटला तो कायमचाच. मात्र तेव्हाची ‘बात और’ होती.

मागील वर्षी कधीतरी मी ठरवून जुन्या बाजारात गेलो. निमित्त होतं ‘ऑडिओ प्लेअर’चं. आबांनी लहानपणी आणलेल्या ‘ऑडिओ रेकॉर्डर’वर ताईचे आणि माझे बालपणीचे आवाज साठवले होते. तो रेकॉर्डर-प्लेयर बंद पडला होता. त्याकाळी मी आयुष्यात कुठेतरी मला स्थिर करणारी, नैराश्यातून वर खेचणारी बाब शोधत होतो. पर्यायाने ही ‘कॅसेट’ मला ऐकणं भाग होतं. आमच्या आवाजाची कॅसेट ऐकण्यासाठी म्हणून मी प्लेयर शोधत होतो. कुठेच न मिळणारा प्लेअर जुन्या बाजारात मिळणारचं म्हणून मी मूळ पुण्यात शिरलो.

शेवटी एक ‘फिलिप्स प्लेयर’ पसंत पडला. मामू ओळखीचाच. त्याला नमाजला जायची घाई, मला घासाघीस करायची घाई.

ये चलता तो होईंगा ना मामू? डर लगता है, लेके गया और चलाई नही तो?

जुन्ना बाजार में आने का तो डर घरपे छोडके आने का! इधर डर का कोई काम नई है और जो डरता है उसका इधर कोई काम नई!

मामू इसके चलने का गॅरंटी नही है फिर भी ले जा रहां हूं और तुमको भी नमाज पढने को जाना रहेगा. कम करो थोडासा.

दे दो जो देनेका है . . .

असा मग शंभर रुपयांना प्लेअर आणला.

दमून-भागून घरी पोहोचल्यानंतर आल्याक्षणीच आबांनी विचारलं – याचा ‘साऊंड’ कुठंय?

आता प्लेअरला साऊंड तर नव्हताच – पंचाईत. थोडक्यात तो प्लेअर नव्हता – पुन्हा पंचाईत. वाटलं रेकॉर्डर असेल, तर तो रेकॉर्डरही नव्हता – पुन्हा पुन्हा पंचाईत. बराच वेळाने शेजारी हेडफोन बसवण्याची जागा पाहिली, कॅसेट प्लेयर आणि एफएम-एएम ट्यूनिंगची बटणे पाहिली, तेव्हा साक्षात्कार झाला की हा तर फिलिप्सचा ‘वॉकमन’ आहे!


वाॅकमनला वाॅकमन का म्हणत असावेत? हे मला सांगता येणार नाही (तरी मी सांगणार आहे हा भाग वेगळा!) पण हे वाॅकमन खरोखरीच ‘मोठेलाट’ असतात. वाॅकमन हातात असेल तर जणूकाही कोण्या ‘मन’(माणूस)सोबत आपण ‘वाॅक’ करत(चालत)आहोत असं वाटण्याइतपत भव्य असतात. म्हणून त्यांचं नाव ‘वाॅक-मन’ (पुण्यात राहत नसतो तर हे असंच आहे हे चुकीचं ठामपणे सांगण्याएवढा आत्मविश्वास मला मिळाला नसता)!

सहजासहजी खिशात न मावणारा वाॅकमन माझ्या खिशात मावतो. कारण, आपण ‘पॅररल बाॅटम फॉर्मल पॅन्ट’ घालणारा माणूस आहे! कॅसेट तर ऐकून झाली; पण नैराश्य जैसे थे. ते काही हटलं नाही की कमी झालं नाही. मात्र एक फायदा झाला हा वाॅकमन पायजम्याच्या खिशात टाकल्यापासून मग माझ्या आयुष्याचा वेगळाच अध्याय सुरू झाला.


हल्ली अधून-मधून न्यूनगंडाचे झटके फार येतात. अशाच कोणत्याही संध्याकाळी मी खिशात वाॅकमन टाकून बाहेर निघतो.

गर्दीने गजबजलेलं शहर – चकाचौंध, झगमगाट. कृत्रिम प्रकाशाचं भांडार. हरेक माणसाला भुलवेल अशी रंगसंगती. माणसांच्या गर्दीतला हरेक जण गर्दीत एकटा. कपडे बाजार, मोबाईल बाजार, मासळी बाजार, भाजी बाजार. रिक्षा नाका, बस स्थानक. हरियाणी जिलबीवाला, चौपाट्या, भेळच्या गाड्या, चहापाणी, सूरनळ्या. दाबेली, वडापाव, पावभाजी, चायनीज, मंचुरियन, पॅपरात्झी. आजूबाजूला कुठेतरी स्वस्तात कपडे विकणारा, गाॅगल-पट्टा-घड्याळ विकणारा. गाडी पंचर झालेला इसम गाडी ढकलत गर्दी चिरत चाललाय. कुठंतरी सायकलची घंटी. किराणा मालाच्या दुकानावर गर्दी आहे, गरीबाच्या पोरीबाळी ‘ज्वेलर्स’ दुकानाच्या काचांतून आतमध्ये काहीतरी पाहण्याचा प्रयत्न करताहेत आणि असं बरंच काही. कुठेतरी खुरडत निघालेली भिकारीण, धुराडा फिरवत निघालेला फकीर असंही बरंच काही. चौखूर लोकांची जिवंत बडबड आणि दोन्ही हात खिशात घालून वाॅकमनसह निघालेलो मी . . .

चित्रपट तरळला का नाही डोळ्यांसमोर आणि माझा उगम एकदम धुरातून निघालेल्या नटासारखा!

मी गाण्यांनी – थोडक्यात संगीताने – झपाटून गेल्याची उदाहरणे भरपूर आहेत. बॉलीवूड ही सुद्धा काल-परवापर्यंत आपली एक संगीत संस्कृतीच होती हे मान्य करायला घाबरणाऱ्यांपैकी मी नाही. तर या संगीताने मला मुर्खात काढल्याच्या काही चंद घटना – ज्या चटकन आठवतील त्या – सांगतो.


माझी हरेक मैत्रीण मी अंगातल्या खाजीने गमावलेली आहे. अशी एक मैत्रीण खाजीने गमावल्यानंतरच्या सकाळी पठ्ठ्या दात घासत होता. कानात हेडफोन होते. अचानक ‘चुपके चुपके रात-दिन’ लागली मग तोंडासोबत डोळे खंगाळून पठ्ठ्या मोरीतून बाहेर! त्यावेळी मोरीला दरवाजा असल्याने पठ्ठ्या बचावला.


दहावीत असताना मला वाचनालयात बसण्याची सवय लागली होती. बऱ्याच म्हाताऱ्या, पेन्शनर, एकाकी आणि तरीही दुर्लक्षित लोकांच्या घोळक्यात मी सगळ्यात तरुण. असंच एकदा कोण्या प्रौढ दोस्ताने मला ‘फैज अहमद फैज’च्या ‘हम देखेंगे’ वरचा लेख वाचायला दिला. त्यात ‘इकबाल बानो’वर वाचलं आणि मी हेडफोन घेऊन दादाच्या सायबरमध्ये पोहचलो.

पूर्वी इंटरनेटचा कक्ष वरच्या माळ्यावर होता. सायबरमध्ये फक्त तिथेच नेट आणि तो सगळा ‘बीएफ’ विभाग.

दादाला म्हणलं नेटवर बसायचंय नेट सोड.

काय सिंघम आज अचानक वर? दादा मस्करीत म्हणाला.

कारण, मी खरोखरीच तिथे पहिल्यांदा निघालेलो होतो.

काम आहे दादा, मी म्हणालो, हेडफोनवर गाणं ऐकायचंय.

इथून जाताना सगळ्यांचं ‘तेच’ काम असतं! तो हसला.

वर जाताना दबकत दबकत गेलो. तिथे आजूबाजूच्या पीसीच्या स्क्रीन पाहून बराच अवघडलो होतो. अचानक तुमच्या चारी दिशांनी बीएफ दिसतात ती स्थिती भयानक असते; पण मी ओशाळलो ते इकबाल बानो मंचावर येईपर्यंत. नंतर मग फक्त इकबाल बानो, मी आणि हम देखेंगे . .


आबांना दवाखान्यात भरती करायच्या आदल्या रात्री मला नव्यानेच ‘एएम’चा शोध लागला होता. ‘एफएम’पेक्षा एएमवर वेगळे चॅनेल सापडतात. एफएम आणि एएममध्ये फारसा फरक नाही. या दोन्ही रेडीओ लहरींच्या वारंवारता (फ्रिक्वेंसी) आहेत. एफएम लहरी जवळपासच्या भागासाठी वापरल्या जातात. कारण, या लहरी जास्त लांब प्रवास करत नाहीत, मात्र आवाजाचा दर्जा अतिशय उत्तम. याउलट एएम लहरी खूपच खूप दूरपर्यंत जातात मात्र त्यांच्या आवाजाचा दर्जा अतिशय खराब. एएम लहरींत जास्त करून मुंग्याच ऐकाव्या लागतात. या दोन्हींची ताकद वेगळी, दोन्हींचा उपयोग वेगळा.

त्या रात्रीची परिस्थिती एकदम विपरीत. मी मुद्दाम आबांच्या शेजारी झोपलो. उद्याची शाश्वती नाही. शेजारी आबा होते आणि येणारी पहाट नकोशी झाली होती. कित्येक वर्षांत त्यांना घट्ट धरून झोपण्याची तीव्र इच्छा झाली होती आणि त्यांची झोपमोड होईल म्हणून मी ती टाळत होतो.

वाॅकमनवर मला संगीत सुरू असलेला कुठलातरी एएम चॅनेल सापडला. सुरुवातीला वाटलं हे संगीत आपल्या भावनांशी किती जुळतंय नंतर कळालं की आपल्या भावना या संगीतातून जन्म घेताहेत, संगीतानुसार बदलताहेत.

वाॅकमन, झिरो बल्ब, थंड रात्र, न संपणारं – कुठून वाजतंय हेही माहिती नसणारं अमोघ संगीत . . . मानेवरून ओघळत मणक्यांत उतरणारं, झरझर वाहणारं पाणी, डोळ्यातलं पाणी.


पंढरपुरात असताना माझा ‘जखमी दिल’ दोस्त बाप्या आणि मी, गाढवाला लाजवेल अशा थाटात, ‘तेरा मेरा प्यार अमर’ रेकायचो तेव्हा किंवा वेल्डिंगची नाईट मारताना किंवा गुजरातेत चांदीच्या भट्टीवर काम करताना किंवा ॲल्युमिनियमच्या कामावर नाईट मारताना किंवा उदास असताना मी बाजूला मुद्दाम – सगळ्या प्रकारची, सगळ्या युगातली; पण खासकरून जुनी – गाणी लावायचो तेव्हा दरवेळी संगीताने माझ्यावर बरेवाईट आघात केलेले आहेत.

आठवणी चिक्कार आहेत. या आठवणींवर लेख नसल्याने आवरतं घेतो.


तशीच तिची प्रकरणे. महाविद्यालयात ‘आम्ही’ फुटलो. यातला ‘फुटलो’ हा शब्द गैर आहे. फुटण्यासाठी आधी एकत्र असावं लागते ही फुटण्यासाठीची मुळात पहिली अट!

तिच्या महाविद्यालयातून तिच्या प्रकरणांचं वारं माझ्या महाविद्यालयात यायचं. आधीप्रमाणेच संपर्क अस्तित्वात नव्हता. मी मेंदूने अजूनच तिचा गुलाम होत निघालेलो. एकदा मित्राच्या घरी रात्री झोपायला गेल्यावर तिथूनच मग पुण्यात पाच मानाचे गणपती बघायला. येताना तुफान पाऊस.

आल्यावर चड्डी-बनियानवर वेगवेगळ्या चर्चा, उखाळ्या-पाखाळ्या, असंच काहीसं. माझं एकाकीपण. तशा बोचऱ्या थंडीत सगळे झोपले पण मी जागाच. शेवटी मित्राच्या डबड्या लॅपटॉपमध्ये ‘राहत फतेह अली खान’चं एक गाणं होतं, बाकी काहीच नाही. पहाटे दोन ते सकाळी सहापर्यंत मी हेडफोनवर ‘तेरी आखो के दरिया का’ इत्यादी इत्यादी ऐकत होतो.


कधीतरी कडाक्याच्या थंडीचा मोसम, खासकरून गुलाबी थंडी. जिथे माझं कोवळं बालपण केलं अशा धायरीच्या आत्याच्या घरी सुट्टीत मी राहायला गेलो होतो. साधारण साडेसातला सगळे उठून तयार झालेले, मी एकटाच अजून खाटावर – जुन्या पद्धतीची, जी खिडकी उघडायला लोखंडाची छिद्रांची कांबी असायची तशातल्या – खिडकीसमोर पडलेलो. बाहेर मला पेरूचं झाड दिसतंय आणि लहानसं तुळशी वृंदावन दिसतंय, लाल रंगाचं. त्याच्या मागून ताई लहानपणी हळूच डोकावून पहायची अशी आबांनी सांगितलेली आठवण आठवतीये. तिथे बाजूलाच तिने त्याकाळी खडी कालवलेला मोठा माठ आहे. अगदी पहिल्या मजल्यापर्यंत वाढलेला जास्वंद आहे. तसा अक्राळ जास्वंद नंतर कधीच पाहण्यात नाही. दोन-तीन डेरेदार आंबे आहेत आणि तात्यांनी जुन्या पद्धतीचा रेडिओ लावला आहे.

शोधीसी मानवा राउळी मंदिरी . . . विशेषतः ‘रफी’चा आवाज.

सकाळ रफी, पेरू रफी, तुळस रफी, माठ रफी, जास्वंद रफी, थंडी रफी, आंबा रफी, खिडकी रफी, सकाळ रफी . . .

त्याकाळी आमचा क्लास संध्याकाळी असायचा. दुपारी बिनघोर झोपलेल्या मला नंतर गुंगीत घड्याळाकडे पाहत पाहत अर्धा-पाऊण तास उशीर व्हायचा. प्रचंड मानसिक शक्ती खर्चून तऱ्हेतऱ्हेच्या नामी शकला लढवूनही जैसे थे. पण एकदा कधीतरी सुर गवसला – शब्दश:. त्याचं झालं असं की दूरदर्शनवर सायंकाळच्या बातम्या लागण्याआधी दोन-पाच मिनिटे सतार किंवा विणा (फरक कळत नाही) वाजते हे असकस्मित कळालं. ती सुरावट इतकी खास की ती वाजत असताना आपण झोपत रहावं ही नामुष्कीच खरी! अशातऱ्हेने दररोज त्या वेळी टीव्ही चालू करण्याचं काम आईला मिळालं आणि वेळेत उठण्याचं मला कारण . . .


आजही मी असाच अळम-डळम अवस्थेत वाॅकमन काढलेला, संध्याकाळची वेळ. यापूर्वीही त्याचवेळी कोणत्यातरी एएम स्टेशनवर मला फक्त उर्दू गजलांचा कार्यक्रम सापडला होता. ज्यातील फक्त मुंग्या माझ्या लक्षात आहेत! आणि दुसऱ्या वेळी ‘दरद’भऱ्या गीतांचा सलग कार्यक्रम सापडला. तेव्हाही मी पुराचं पाणी बघत असल्याने फारसं लक्षात नाही. आज मात्र गच्चीवर जाऊन कोणतंही एएम स्टेशन तपासत बसलो तर आधी मुंग्या . . . मग जागतिक बातम्या . . . जपानमध्ये काहीतरी . . . त्यावर बायडनची प्रतिक्रिया . . . अफगाणिस्तानमध्ये काहीतरी त्यावरून तालिबानचं भुमिका स्पष्ट करणारं निवेदन . . . अफ्रीका आणि भरपूर काही . . . नंतर कन्नडमधून प्रादेशिक बातम्या (मला कन्नड कळत नाही तरी ते गाणं नव्हतं म्हणजे बातम्याच असणारं!) . . . पुन्हा अनाकलनीय भाषा . . . मुंग्या आणि मग अचानक सुरू झालं एक आर्जव कुठंतरी बोलावणारं, कुठं माहिती नाही; पण मनाच्या गाभाऱ्यातून बोलावणारं . . .


केसरिया बालम आवोनी, पधारो म्हारे देश जी
पियाँ प्यारी रा ढोला, आवोनी, पधारो म्हारे देश।

‘नताशा ॲटलास’चा शोध मला लागला तो सुद्धा माझ्या एका व्यसनातून – ‘गेमिंग’चं व्यसन. एका गेममध्ये मी नताशाचं गाणं ऐकलं आणि ते पुन्हा-पुन्हा ऐकण्यासाठी पुन्हा-पुन्हा गेम खेळलो (व्यसनाचा पुरस्कार करावा तर असा)! शेवटी मी त्या गाण्याचा बडा मुश्किलीने शोध घेतला. नताशाचा ‘किड्डा’मधील आवाज ऐकून माझ्या कानातला किडा खवळला होता इतके सुंदर त्याचे बोल, संगीत व गायन. नंतर मग नताशा ॲटलास झाली फेवरेट. तिच्यावरही कधीतरी लिहिणे आहेच. तसंच तिचं ‘गफसा’ तसंच तिचं ‘हबीबी’. आपल्या राजकुमाराला साद घालणाऱ्या प्रेयसीचं ते स्वगत आहे. थेट अरेबियन नाईट्स मध्ये नेऊन पोहचवणारं, काळजातून काळजात प्रवास करणारं स्वगत . ‌. .


आवण जावण कह गया, तो कर गया मोल अणेर
गिणताँ गिणताँ घिस गई, म्हारे आंगलियाँ री रेख
केसरिया बालम आवोनी, पधारो म्हारे देश।

वाॅकमनवरच्या गायिकेचा आवाज ऐकताना मध्येच मला ‘दिल का दिया’ मधली लता मंगेशकर आठवते. लता मंगेशकरच्या मी ऐकलेल्या आतापर्यंतच्या गाण्यातील सर्वात मधुर आवाज या गाण्यात आहे. बाकी काही गाण्यात तर तो नुसताच नाकातून आलेला धादांत खोटा, बळजबरीने काढलेला आवाज वाटतो हेही तितकंच खरं आहे. तरुणपणातील नवखा आवाज एकीकडे आणि पोक्त अनुभवी आवाज दुसरीकडे. मात्र मी सध्या वाॅकमनवर जे ऐकत होतो तो ‘पोक्तपणाचा नवखा’ आवाज होता! जणूकाही लता मंगेशकरने वयाच्या नव्वदाव्या वर्षी ‘दिल का दिया’ आळवावं असं काहीसं. . . . परत मुंग्या.


साजन साजन मैं करूँ, तो साजन जीवजड़ी
साजन फूल गुलाब रो, सुंघुँ घडी घडी
केसरिया बालम आवोनी, पधारो म्हारे देश।

मी वाॅकमन हवेत गरागरा फिरवतो. कधी गच्चीवरच्या अँटेनाजवळ नेऊन पाहतो – होय संपूर्ण वस्तीत फक्त आमच्याच गच्चीवर अँटेना दिसेल!

मग पुन्हा पाण्याच्या टाकीवर, इकडे-तिकडे, कोपऱ्यात, जाळीवर, जिन्यावर, भिंतीवर. दुरून कुणी मला पहात असेल तर माझे माकडचाळे आणि हातवारे पाहून त्याला ‘मी वेडा झालो आहे’ याशिवाय कोणताच अर्थ लागत नसणार. आवाजाने मला वेड लावलेलं असतं. धावपळीत शेवटी मी वाॅकमन डोक्यावर स्थिर ठेवतो. तिथे सुर गवसतात. मी दोन्ही हातांची घडी घालून कानात प्राण आणतो.


मारू थारा देश में , निपजे तीन रत्न
इक ढोला इक मरवण,तीजो कसुमल रंग
केसरिया बालम आवोनी, पधारो म्हारे देश।

हे गाणं मुळात युद्धावर गेलेल्या क्षत्रिय योद्ध्याच्या विरहात जायबंदी झालेली त्याची पत्नी त्याला माघारी बोलावण्यासाठी म्हणत आहे, असा संदर्भ हरेक ठिकाणी सापडतो. यात काही मजा नाही. लोकगीत किंवा संगीत कोणत्या एका ठराविक वर्गाची मक्तेदारी – निदान आत्ताच्या काळात तरी – नाही, नसावीच. कोणत्याही विरहव्याकुळ व्यक्तीचं हे मौनगीत म्हणलं तर ठरू शकतं किंवा म्हणलं तर ठरू शकत नाही, दोन्हीही.

या गीताचा गीतकार कोणालाच माहिती नाही. तो जो कोणी असेल ही संपूर्ण रचना त्याचीच आहे का हेही माहिती नाही. मौखिक पद्धतीने चालत आलेल्या लोकगीतात पडते तशी भर यात पडलेली असू शकते – तक्रार नाही. या गीताच्या भरपूर वेगवेगळ्या रचना सापडतात – वाद नाही. पण मी सध्या जे ऐकत होतो त्याला तोड कुठे सापडणार नव्हती – दुमत नाही.


सुपना तू सोभागियो, उत्तम थारी जात
सो कोसा साजन बसै, आन मिलै परभात
केसरिया बालम आवोनी, पधारो म्हारे देश जी।

गाण्याच्या शेवटच्या कडव्याला मी डोळे झाकून ऐकू लागतो. कारण, वाढलेल्या मुंग्यातून मला गायिकेचं नाव ऐकायचं असतं. हे गाणं कुठून आलंय ते ऐकायचं असतं. अगदी शेवटी ते ऐकू येतं.

‘जयपुर रेडिओ स्टेशन’. आणि गायिकेचं नाव ‘छोटी बाला’ किंवा ‘छोटी बालान’.

ज्या ‘रेश्मा’च्या आर्त, कातर मात्र तरीही तीक्ष्ण आवाजावर आपली काही वर्षे तनहाईमय होऊन निघाली त्या रेश्माच्या मायभूमीतून माझ्यापर्यंत आलेला हा अनोळखी आवाज.

त्यानंतर झपाट्याने खाली येऊन मी इंटरनेटवर छोटी बाला नावाने हे लोकगीत शोधलं – परिणाम शून्य. गाण्याचे भरपूर गायकांनी वेगवेगळ्या रागांतून गायलेले प्रकार ऐकले – परिणाम शून्य. आंतरजालावर काथ्याकूट केला – परिणाम शून्य.

‘अल्ला जिलाई’ बाईचं गायलेलं ‘केसरिया’ सर्वोत्कृष्ट मानलं जातं, तसं ते आहेही; पण वाॅकमनवर मी ‘बालम’ या दरशब्दागणिक लागणार ‘बालमिंया’ हा जो खर्ज ऐकला होता त्याचा कैफ काही वेगळा होता‌. तसा तो जिलाई बाईच्या गाण्यात नाही. सोबतच त्यांच्या पोक्त आवाजात नवखापणा नाही. जो वाॅकमनवर ऐकलेल्या आवाजात होता. थोडक्यात सांगायचं तर आता हे गीत मी इतरांना ऐकवणं तर दूरचं मात्र स्वतःही नंतर कधी ऐकू शकणार नाही. तो आयुष्यातील एकमेवाद्वितीय अनुभव होता, जो संपला.

हे गीत काही चित्रपटांतून वापरलं गेलं ते फार अलीकडचं. हे गीत राजस्थानचं पर्यटक ‘ब्रीदगीत’ म्हणून वापरलं गेलं तेही फार अलीकडचं. त्यापूर्वीच्या कैक पिढ्यांपासून हे लोकगीत राजस्थानात मुरलेलं आहे. वाॅकमनवर ऐकलेला पिढ्यानपिढ्या मुरलेला तो आवाज होता.

‘माझ्या राजसा, परतून ये घरटी’ अशा काहीशा भावाचं हे गीत. राजस्थानचं वाळवंट, आभाळ, रंगसंगती, वातावरण यावर पहिलं कडवं संपतं. दुसरं कडवं हे मायभूमीच्या प्रेमाची कबुली देणारं, तर तिसरं कडवं सरळ-सरळ घरी असणाऱ्या एकट्या प्रियेची आणि रणात सोबत असणाऱ्या तलवारीची तुलना करणारं. ही माहिती नंतरची. वाॅकमनवर ऐकताना मला यातील काहीच माहिती नव्हतं. गाण्याचा अर्थ माहिती नसताना, कळत नसताना गाणं ऐकण्याची आपली खुमारी आहे. शब्द आकळत नाहीत तेव्हा संगीत हे संगीत म्हणून अनुभवायला मिळतं!


कोणत्यातरी जीवन समरसून पाहिलेल्या ज्येष्ठ प्रादेशिक गायिकेनं गायलेलं हे गीत त्यावेळी फक्त मीच ऐकलं अशातला भाग नाही.

जयपुरमधील कित्येक चावड्यांवर, चहाच्या टपऱ्यांवर, ढाब्यांवर, चुलींसमोर, कोणाच्या घरात, कोणाच्या दारात, पाणी उपसत असताना, रानात काम करत असताना, जेवताना, चालताना, सायकल चालवताना, ज्याच्या प्रेमात कैद आहोत त्याची आठवण काढताना किंवा एकट्यानेच बाजावर बसलेल्या कोण्या म्हाताऱ्याकडून ऐकलं गेलं असेल. युट्यूबवर, नेटवर कुठेच न भेटणारं हे गीत फक्त आता आमच्या सगळ्यांच्या मेंदूत आहे.


तुझं सुख सांग? हसून दमलेला केळ्या बोलला.

त्याकाळी मला रेडिओ ऐकायला आवडायचा. त्यातच (तेेव्हा कंठ फुटला नसल्याने) आपण ‘युनूस खान’सारखं रेडिओ समालोचक वगैरे बनू शकतो असं वाटायचं. रात्री साडेआठला असेल ते जेवलो की निळ्या-जांभळ्या झिरोबलच्या प्रकाशात निवांत रेडिओवर विविधभारती लावून जुनी गाणी ऐकत पडायचो. साडेआठला ‘हवामहल’, नऊला ‘छायागीत’, ‘आज के फनकार’ नंतर ‘आपकी फर्माईश’, ‘बेला के फूल’ नंतर मुंग्या . . . पण मुंग्या येण्याआधी मी झोपलेलो असायचो. दुसऱ्या सकाळी रेडिओ रात्रभर चालू राहिला म्हणून घरच्यांच्या शिव्या खायच्या – संध्याकाळी पुन्हा तेच!

आयुष्यात कितीही धावपळ झाली, उलथापालथ झाली तरी मला असंच येणार्‍या दर अंधाऱ्या थंड रात्री मंद आवाजात लागलेलं विविधभारती ऐकत झोपायचंय . . .

मग केळ्या आणि मी बराच वेळ नदीवर उठणाऱ्या लहरी बघत बसलो, घरी परतेपर्यंत.

{fullwidth}

आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال