उन्हाने रडलेला माणूस


spray paiting of old man portrait art
नशीब योगायोगाची मालिका जेव्हा चांगल्या प्रसंगी सुरू करतं तेव्हा फार अविश्वसनीय वाटतं. अगदी तसंच अविश्वसनीय वाईट प्रसंगांची मालिका सुरू झाल्यावर देखील वाटतं


माणसं भली मजबूत खरी; पण तरीही कधीकधी त्यांना रडावं लागतं. डोळ्यांतून लवण धावण्याची रासायनिक प्रक्रिया शरीराच्या मानाने साधी-सरळ-सोपी आणि आवश्यक भासत असली तरीही मनासाठी ही अत्यंत क्लिष्ट आणि त्रासदायक. आपण आनंदात आहोत हे दाखवण्याचे खटाटोप प्रत्यक्षात आपण त्रासात नाही हे दर्शवण्यासाठी असतात. आणि अश्रू म्हणजे तर दु:ख! तर या अश्रूंच्या भाकडकथा रचण्यासाठी माणूस कितपत थापाड्या होऊ शकेल?


सकाळही दुपार भासावी असा दिवस सुरू होता तेव्हाची ही घटना आहे. इथं अडचण आहे ती अशी की जे काही घडलं त्याला घटना म्हणता येणार नाही. कारण, दखलपात्र काहीतरी घडलं किंवा मग शक्यतो त्या घटीताचे परिणाम हे वाईटाकडे झुकणारे असतील तर ते घटित ‘घटना’ म्हणवून घेण्यास पात्र ठरेल. मी इथे मांडतोय तो तर एक साधासा प्रसंग आहे. त्या दिवशी घडलेला. इथं पुन्हा माझ्यासोबत घडलेला असंही म्हणता येणार नाही. कारण, मी या प्रसंगात अनासायासे गोवलो गेलो होतो. प्रसंग भूतकाळात लिहीत असलो तरी तो फारसा जुना अजिबात नाही. नुकत्याच काही बोटांवर मोजण्याइतक्या दिवसांपूर्वीचा आहे. सकाळही दुपार भासावी असा तो दिवस होता . . .


मी दररोज प्रमाणे सकाळी उठून, आवरून नाष्टा पोटात ढकलला मग साडेनऊची एसटी पकडण्यासाठी घरातून निघालो. साडेनऊची एसटी पकडायची तर घरातून निघावे लागतं नऊ वाजता. टंगळ-मंगळ करत मी मध्यात पोहोचलो तेव्हा लक्षात आलं मी आवडता पेन विसरलोय, पुन्हा माघारी घर. मी स्थानकावर पोहोचलो तोवर एसटी सुटलेली होती, दुसरी एसटी होती साडेदहाला. पुढचा पाऊण तास मी तिथल्याच एका कट्ट्यावर – वर्तमानपत्रात डोकं बुडवून – घालवला.

एसटीत बसलो तेव्हा तर उन्हाचा तडाखा आणखी वाढला. मी एकदाची एसटी सुरू होण्याची वाट पाहू लागली. एसटी सुटण्याआधीची दोन-पाच मिनिटं. आजोबा, त्यांच्यामागे अपंग असणारी, बहुधा त्यांची मुलगी असणारी, एक मध्यवयीन स्त्री आणि मागून, बहुधा त्यांची मंडळी असणारी, आजी असे तिघे एसटीत चढले. त्यांच्या मुलीकडे लक्ष गेलं नाही तोवर मी बाकड्यावरून उठून त्यांना बसायला जागा देण्याच अगत्य केलं नाही. पण मी तसा उठलो तेव्हाही त्यांनी हसून हातानंच मला बसायला लावलं. ते पुढच्या बाकावर बसले. तेव्हा मला आठवलं तो शनिवार होता. म्हणूनच एसटीत शाळेच्या विद्यार्थ्यांची गर्दी ठासून भरलेली नव्हती.

कंडक्टर आला तेव्हा या दोघा म्हातारा-म्हातारीची त्रेधातिरपीट उडाली. मी वर्तमानपत्रातून वर पाहिलं तर तिकिटाचे पैसे कनवटीच्या पिशवीतून – ज्याला गावाकडे पसा म्हणतात – काढून देताना दोघांचा गोंधळ होत होता, त्यांच्या मुलीनं मध्यस्थी करून हा गोंधळ मिटवला. तिनंच तिकीटं काढली. त्यानंतर ते आपापसात या गोंधळावर चर्चा करत राहिले.

सव्वा अकराला एसटीनं शेवटचा थांबा गाठला. वर्तमानपत्र दप्तरात कोंबलं, टोपी घातली आणि मी माझा रस्ता जवळ गेला. शेवटची वीस मिनिटं हा तडाखा झेलायचा होता. वीस मिनिटात एकदा का वर्गात पोहचलो की पंख्याखाली जीव थंडावणार होता, झालं देखील तसंच. मला मात्र त्यादिवशी महाविद्यालयात उगाचच फेरी मारल्यासारखं झालं. मुळात मित्र आले नव्हते, त्याहून वाईट म्हणजे दोन शिक्षकही गैरहजर. कधी एकदा तिथून निघेन असं झालेलं. त्या दिवशी जास्तीचा वेळ थांबून करावे लागणारे प्रयोगाचे तास नव्हते, जेव्हा दोन वाजता तिथून सुटलो तेव्हा, मी तसाच चालत थांब्यावर आलो तर तिथेही एसटी अवघ्या पाच मिनिटाच्या उशीराने हुकलेली!

नशीब योगायोगाची मालिका जेव्हा चांगल्या प्रसंगी सुरू करतं तेव्हा फार अविश्वसनीय वाटतं. अगदी तसंच अविश्वसनीय वाईट प्रसंगांची मालिका सुरू झाल्यावर देखील वाटतं; पण एकीकडच्या अविश्वसनीयतेत आनंद असतो तर दुसरीकडे पराकोटीचं दुःख. भर दुपारी अडीच वाजता अजून वीस-तीस मिनिटे पाय तोडून मी पुढच्या एसटी थांब्यावर पोहचलो. तिथे चार चौकातील एसट्या थांबतात मात्र शेड नाहीये. उन्हात तिथं रस्त्यावर उभं राहून एसटीची वाट पाहण्यात काही मजा नाही हे मला, उशिराच, कळून चुकलं. तिथून रिक्षात बसून घर गाठावं हा एकमेव पर्याय होता. मानसिकता बिघडत होती. कोणावर माहिती नाही परंतु, राग उफाळून येत होता. बाटलीतलं पाणी कोमट झालं होतं तरीही ढोसलं. रिक्षा आली. रिक्षात केवळ मी आणि आणखी दुसरा प्रवासी आम्ही दोघेच असल्याने थोडं ऐसपैस बसलो. तेवढ्यात तिथेच माझ्या मागे एका दुकानाच्या सावलीत रिक्षाची वाट पाहत बसलेले सकाळचे आजोबा उठले. त्यांनी रिक्षाला हात करून रिक्षा थांबवली. ते तिघंही मिळून, म्हातारा-म्हातारी आणि ती अपंग मुलगी, जवळ आले तेव्हा मी उठून रिक्षावाल्याच्या शेजारी बसलो.

जिथं तीन माणसं कशीबशी बसतात तिथं – दरवेळी असतात अगदी तशीच – या वेळी रिक्षात मागं चार माणसं होती. पण या वेळी त्या चौघात एक अपंग व्यक्तीही होती. ग्रामीण भागात रिक्षावाले असेच सहा-सात प्रवासी आरामात मिरवतात. तक्रार कोणी करत नाही. कारण, तक्रार करणाऱ्यास रिक्षात प्रवेश नसतो.

घामानं डबडबलेली आणि उन्हाच्या तडाख्याने हैराण झालेली ती मुलगी तशी तर मध्यवयीन स्त्रीच वाटत होती. अगदी चाळिशीतही अविवाहित अपंग पाहिलेले असल्याने मला तिच्याकडं पाहून काही वेगळं भासलं नाही. कमरेतून तिचा डावा पाय वाकला होता, हातात कुबड्या नव्हत्या मात्र चालताना तिची अवस्था कुबड्यांवर चालणाऱ्यांहून वाईट होत होती. दुपारची वेळ, उन्हाचा तडाखा, रिक्षात उकडा, आत येणार्‍या गरम हवेच्या झळा आणि आरशातून मला दिसणारे होरपळलेले तीन चेहरे . . .

चौथा प्रवासी लवकरच उतरला तरी मी उठून मागे बसायला गेलो नाही. तेवढंच त्या तिघांना ऐसपैस बसता येईल, बाकी काय? शेवटी माझ्या थांब्याच्या आधीच त्या तिघांचा थांबा आला.

“इथून थोडसं आत घे रे बाबा.” म्हातारीचा मलूल आवाज.

“कुठे आत?” रिक्षावाल्याने चौकशी केली.

“या इथे . . . ” म्हाताऱ्यानं मूळ रस्त्यावरून आत वळणाऱ्या एका कच्च्या रस्त्याकडं हात केला.

“आत जात नाही.” रिक्षावाला.

म्हातारीनं विचारलं. “का रे बाबा?” आणि पुन्हा एकदा पदरानं कपाळावरचा घाम पुसला.

रिक्षावाल्याने रस्त्याच्या कोपऱ्यावर रिक्षा थांबवली.

“दहा रुपये होतील जास्तीचे.”

“येथे जवळंच आहे.”

म्हातारीची आर्जवे सुरूच होती. रिक्षावाला मानत नव्हता.

“अपंग आहे सोबत . . . ” म्हाताऱ्याचं वाक्य पूर्ण होण्याआधीच दोघांच्या मध्ये बसलेली ती मुलगी झटक्यात उठून, चिंचोळ्या जागेतून कशीबशी प्रयत्न करून, रिक्षातून बाहेर निघाली. आणि या दोघांच्या पुढे चालू लागली. तसे हे दोघंही उतरले, ती तिच्या मागे धावू लागली त्यानं रिक्षावाल्याला तीस रुपये देऊन वेगानं पुढं गेलेल्या कुटुंबाचा पाठलाग सुरू केला.

मी उठून मागच्या बाकावर पोहोचलो आणि रिक्षा निघाली.

वीसेक मीटर जात नाही तोवरच “दहा रुपये जास्त द्यायला नको आणि घरापर्यंत रिक्षा पाहिजे.” रिक्षावाला आरशातून माझ्याकडे पाहत म्हणाला. जणू काही त्याच्या या कृतीसाठी त्याला माझं अनुमोदन हवं होतं. त्यानं आधीच माझं मस्तक उठवलं होतं.

“थांबव रिक्षा इथंच सोड मला.” त्याने रिक्षा थांबवेपर्यंत मी उतरलो आणि पैसे त्याच्या हातात ठेवले.

तिथून मला आणखी दीड-दोन किलोमीटर चालत जावं लागणार होतं. कारण, माझ्याकडे पैसे शिल्लक नव्हते. पण पुढं जाण्याऐवजी मी मागं फिरलो. माणूस आयुष्यात कधी कधी काय करतो त्याचं त्यालाच कळत नाही. मी पळत जाऊन त्या म्हाताऱ्याला गाठलं तसा तो दचकला.

त्यानं विचारलं. “का काय झालं? काही राहिलं का आमचं रिक्षात?”

“नाही.”

“मग मागून असा का पळत आलास?”

“काही नाही.” आता माझ्या स्वभावातील भिडस्तपणा जागू लागला.

मग मी चालू लागलो तसं ते आजोबाही माझ्यासोबत चालू लागले. आजी आणि तिची लेक खूप पुढं पोहचले होते.

“रिक्षावाल्याचं वागणं आवडलं नाही मला. मग मी त्याला म्हणालो, मला सोड इथेच मी जाईन चालत. आणि तुमच्याशी बोलायला आलो.” मी शेवटी सांगितलंच. आजोबांनी फक्त मान हलवली. “कुठे गेला होतात?” मी विचारलं.

“कुठे नाही . . . त्या पोरीच्या नावावर सरकारचे पैसे आलेत ते आणायला पोस्टात गेलो होतो.” त्यांनी सांगितलं.

“मिळाले का मग?” मी विचारलं आणि त्या आजोबाने हातातला रुमाल डोळ्यांना लावला. “काय झालं बाबा?”

“काही नाही.” ते म्हणाले, “उन्हामुळे पाणी आलं डोळ्यांतून!” उन्हामुळे डोळ्यांतून पाणी येत नाही हे मला कळत असूनही मी शांत राहिलो. “ते अधिकारी म्हणतात पैसे मिळतील; पण आधी दाखला आणा अपंग असल्याचा. दाखला दिला तर दुसरं खुसपट काढून म्हणाले आधी गावच्या तलाठ्याला भेटा आणि मग तो दाखला योग्य आहे का नाही हे तपासलं जाईल.” त्यांच्या बोलण्यात निराशा झळकली.

“म्हणजे?” मी आजोबांना विचारलं.

“हेच मी पण त्याला विचारलं.” आजोबा सांगू लागले. “ते म्हणतात ‘मुलगी खरंच अपंग आहे का मग बोगस अपंग हे तलाठ्याला एकदा बघू द्या. मग तो मुलगी अपंग असल्याचा शिक्का देईल दाखल्यावर तो शिक्का घेऊन या माघरी. मग पैसे मिळतील.’ तेव्हा मी त्यांना म्हणालो ही मुलगी अपंग दिसत नाही का तुम्हाला तिला दाखला कशाला पाहिजे? ‘सगळं नियमानुसार व्हायला हवं. आता आमच्या हातात काही नसतं आधीसारखं.’ असं उत्तर दिलं त्यानं आणि पिटाळलं.”

तेव्हा मला सकाळी एसटीत, दुपारी दुसऱ्या थांब्यावर आणि आता एकटी वेगानं समोर गेलेली ती स्त्री आठवली.

“असला महागाईचा काळ आहे, म्हणलं, दोन पैसे आलेत बरं होईल . . . तर आता उद्या तलाठ्याकडे आणि परवा पुन्हा पोस्टात . . . किती फेऱ्या मारायच्या दोन हजारांसाठी? पण पर्याय नाही नाविलाज आहे.”

मी खिशातला रुमाल काढला. कपाळावरचा घाम पुसला, रुमाल तोंड-चष्मा-डोळ्यांवर फिरवला.

“का काय झालं?” मी अचानक बोलायचो बंद झाल्यानं विचारलं असेल.

“काही नाही. हे ऊन पण ना . . . ”

{fullwidth}

आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال