पुढारी


politician in press conference satire article
अमूल्य मतस्वातंत्र्य बहाल केल्या गेलेल्या जनतेला ह्या मताचा अर्थदेखील कळू नये . . . यामुळे मी पुरताच हतबल झालो आहे


प्रत्येकाची कथा असते तशी पुढाऱ्यांची(ही) व्यथा असते आणि प्रत्येक कथेला साचा असतो तसा पुढाऱ्याच्या व्यथेलाही ढाचा असतो! शेवटी कितीही झालं तरी पुढारी शेवटी माणूसच फक्त याच्यात समस्त मानवजातीप्रती कळवळा ठासून भरलेला असतो; पण या पुढारी जनांतही कोणीतरी आदर्शवत असायचेच! अशाच एका ‘ढाचेबद्ध’ महामानवाच्या ‘ठसठसत्या’ साच्याढाच्यावर बेतलेला ‘गोळीबंद’ आदर्श आढावा!


एक पुढारी होता. आणि त्याची किनई एक आटपाट नगरी होती. या आटपाट नगरीचा हा पुढारी बापडा तसा चांगला होता. पण त्याच्यामागे म्हणजे अनेक ‘काळज्या’ नि कटकटी होत्या. तेराशे वीस जबाबदाऱ्यांच्या ठिगळांची एक वाकळ त्याला शिवायची होती. रात्रभर त्याला बायकोवर प्रेम करावे लागे आणि सकाळी उठून पुन्हा देशावर! आता उठसूट असे रात्रंदिवस प्रेमच करीत सुटल्यावर, एखाद्याकडचे प्रेम नाही का संपुष्टात येणार? तर संपत-संपत पुढाऱ्याजवळ आता फक्त साडेबावीस कॅरेट प्रेम शिल्लक राहिले होते! हे प्रेम त्याने अगोदर एका कागदाच्या पुडीत व्यवस्थित बांधले, आणि जपून तपकिरीच्या डबीत भरून ठेवले – हरवू नये म्हणून! एकीकडे त्याला या प्रेम भरलेल्या तपकिरीच्या डबीची काळजी वहावी लागे आणि दुसरीकडे देशाची . . . बरे, देशाची काळजी करायची म्हणजे नुसताच आपला भकास चेहरा करून बसल्याने भागत नसे.

जनता म्हणे, ‘विकासयोजना आखा! धरणे बांधा!’ मग पुढाऱ्याला धरणे बांधावी लागत आणि कराच्या रूपाने जनतेकडून जमविलेले अश्रूचे बांध त्यात तुंबवून त्यावर वीज तयार करावी लागे. कालवे खोदून तेच पाणी शेतीला पुरवावे लागे. परिणामी, एकाच वेळी सत्तेचाळीस पोरींवर प्रेम करणाऱ्या हिंदी सिनेमातल्या नायकासारखा पुढारी हैराण झाला होता.

तेव्हा त्याने राज्यातल्या एकजात सगळया शहाण्यांना उंटावरून हाकून आणले. त्यातल्या अठ्याहत्तर जणांचे एक मंत्रिमंडळ स्थापन केले. आणि समाजवादाच्या शुद्ध पायावर आपल्या तमाम ‘काळज्या’ नि कटकटी त्यांच्यात समप्रमाणात वाटून दिल्या. पुढाऱ्याच्या खोपडीवरचा अर्धा बोजा उतरला.

मग पुढे त्याला आणखी एक शक्कल सुचली. त्याने पुष्कळसे कागदाचे कपटे गोळा केले आणि प्रत्येकाला एकेक असे सगळया जनतेत वाटले; पण जनता बुद्धीमान निघाली. तिला वाटले, आपल्याला खायला पुरेसे अन्न नाही, ल्यायला कपडा नाही, म्हणून पुढाऱ्याने बहुदा खाण्यासाठी किवा लेण्यासाठी ही काहीतरी वस्तू आपल्याला दिली असावी.

पुढाऱ्याला तेव्हा कोकलून सांगावे लागले की, ‘जन हो! हे जे कागदाचे कपटे मी तुम्हाला दिले आहेत, ते खायला किंवा ल्यायला ती काही अन्न-वस्त्राइतकी शूद्र बाब नाही. तिचे मोल याहून अमूल्य आहे! या नगरीत प्रत्येकाला आपले मत स्वातंत्र्य आहे.’

जनता वेंधळी. बुचकळ्यात पडली. म्हणाली, ‘ही मते म्हणजे आपली काय असते बुवा?’

शुद्ध, थंड लोण्यात फासलेले एक एरंडाचे पान पुढाऱ्याने अगोदर आपल्या टाळल्यावर थापले, आणि मगच तो पुन्हा बोलू लागला.

‘अमूल्य मतस्वातंत्र्य बहाल केल्या गेलेल्या जनतेला ह्या मताचा अर्थदेखील कळू नये . . . यामुळे मी पुरताच हतबल झालो आहे!’ पण बोलून चालून तो राजकीय नेता. त्यामुळे त्याने दूरदर्शीपणा आणि मुत्सद्देगिरी दाखविली. तो म्हणाला, ‘माझ्या प्रिय प्रजाजन हो, बैलाला जशी दोन शिंगे असतात, गाढवाला जसे दोन कान असतात आणि माकडाला जशी शेपूट असते, तशीच जनतेला देखील स्वतःची अशी आपली मते असतात. ती मते म्हणजेच हे कागदाचे कपटे! हे कागदाचे कपटे हातात घेऊन रांग करून उभे रहायचे आणि मी दाखवीन त्या बंद लोखंडी पेटीत टाकायचे.’

‘त्यामुळे काय होईल?’

‘नंतर मतमोजणी होईल. मी व माझे सहकारी मंत्री निवडून येऊ – तिला म्हणतात लोकशाही! लोकशाहीत कुणी राजा नसतो नि कुणी प्रजा. हक्क आणि जबाबदारी समान असते!’

मग जनतेने मते दिली. मंत्रिमंडळ निवडून आले. लोकशाही राज्यकारभार सुरू झाला. आणि पुढाऱ्यांचे बरे फावले! उरलेली सगळी जबाबदाऱ्यांची ठिगळे त्याने लोकशाही पद्धतीने सगळया जनतेत वाटली. हक्क स्वतःकडे घेतले. आणि सुटकेचा शेवटचा निःश्वास सोडला.

जनतेला पुढाऱ्याच्या लोकशाहीचे कौतुक वाटले. आणि पुढाऱ्याला जनतेच्या ‘बिनडोक’शाहीचे! पण एवढ्याने सुटू म्हटले तरी पुढारी सुटला नाही. जनतेने त्याला पुरते घेरून टाकले. मेजवान्या, सत्कारसमारंभ, उद्घाटने आणि निरनिराळे दगड बसविण्याच्या कार्यक्रमात त्यांनी त्याला पार डोक्यापर्यंत बुचकळून टाकला!

मग बासुंदी-पुरीने अजीर्ण झाले असल्यावरही, उपाशी अर्धपोटी जनतेविषयी, त्याला कळवळून बोलणे भाग पडू लागले. महापुरात सापडून दैना उडालेल्या जनतेची आणि ढोरांची विमानातून पहाणी केल्यावर, तो दुःखाची छापील पत्रके काढू लागला. संप नि मोर्चे काढणाऱ्यांना प्रथम लाठीमार आणि नंतर पोटभर आश्वासने देऊ लागला. परकीयांचा हल्ला नि आक्रमण झाल्यावर, दिवाळीतले फटाके, भुईनळे नि चंद्रज्योती उडवून त्याने त्यांना प्रत्यूतरे दिली. निषेध पत्रांची तर तो रोज किलो-दोन किलो भरेल इतकी रद्दी शत्रूच्या वकालतीकडे नियमितपणे पाठवू लागला.

मुलांनी मडकी रंगवून पक्षाच्या नेत्यांची काल्पनिक चिड काढली. मुलींनी आणीबाणीच्या परिस्थितीवर छान-छान नाच बसवले. महिला मंडळांनी परिसंवाद ठेवले. ‘फॅन्सी ड्रेसेस’च्या स्पर्धा जाहीर केल्या. रांगोळ्यांची प्रदर्शने भरविली. कॉलेजच्या सुकुमार तलम कन्यकांनी, त्याहूनही तलम अशी वेषभूषा करून बावळट लोकांकडून संरक्षण-निधी उकळला. एकूण दागदागिन्यांनी मढून आणि साजशृंगार करून, स्वतःला मिरवण्याची ही नामी संधी एरवी भोळसट पण चतूर स्त्रीजातीने मुळीच वाया जाऊ दिली नाही!

संरक्षणाची आघाडी अधिक मजबूत करण्यासाठी सिनेमातल्या नट-नट्यांनी देखील आपली लोकप्रियता पणाला लावली. सप्तरंगी डांबराचा गिलावा मारलेले त्यांचे आयुकमापक चेहरे थेटरचे पडदे सोडून, असे उघड्या मैदानावर आले, आणि कुंभमेळयाला प्रत्यक्ष देवाच्या दर्शनाला जमणार नाही असल्या भाविकांच्या अलोट गर्दीने मैदान फुलून निघाले. अक्षरश: लक्षावधी रुपये मोलाचे त्यांचे उन्नत उरोज, पेंटिंग केलेले नितंब आज केवळ देशसेवेच्या उदात्त हेतूने खुल्या मैदानात हलू लागले! तिरक्या नजरेचे इशारे, प्रेम-मोहब्बतीची गाणी, आणि केवळ कमरेखाली विजेसारखी लवलवणारी दोन देहांची लागट बेछूट नृत्ये . . . आणीबाणीच्या परिस्थितीत त्याला आज राष्ट्रीय मोल प्राप्त झाले. एका कैफात चढत गेलेली स्फूर्तीची बेहोषी जनतेला मुळीच आवरली नाही. राष्ट्राच्या, राष्ट्रनेत्याच्या स्वातंत्र्याच्या नि सिनेमातल्या नट-नट्यांच्या जयजयकाराने दाहीदिशा निनादून उठल्या!

पुढे ह्या सर्व कार्यक्रमामुळे पुढाऱ्याला अनेक बहुमान प्राप्त झाले (की त्याने स्वतःलाच बहाल केले).

आणि पुढे दुसरे काय होणार? जे चार-चौघा सामान्य माणसाचे होते, तेच त्या पुढाऱ्याचे झाले. स्पष्टपणे सांगायचे म्हणजे पुढारी गेला. गेला म्हणजे अगदी पार वरतीच गेला!


काळा गाऊन चढवलेल्या तीन कावळयांनी चष्मे सावरीत मोठचा गंभीरपणाचा आव आणून, ही अत्यंत दुःखद बातमी राष्ट्रीय दूरदर्शनवरून साऱ्या जगाला निवेदित केली. ‘देढ मिनिट तक’ उभे राहून, साऱ्या जगाने त्याच्यासाठी मूक श्रद्धांजली वाहिली. आठवडाभर दुखवटा जाहीर झाला.

प्रत्यक्ष पुढाऱ्याच्या त्या आटपाट नगरीला तर त्याच्या मृत्यूच्या वार्तेने इतके दु:ख झाले, इतके दुःख झाले की, त्या दिवशी नगरीत चालू असलेले शोकांतकारी चित्रपट सगळेच्या सगळे हाऊसफुल्ल झाले!





{fullwidth}

आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال