चंदूच्या उदास आयुष्यात दिवसेंदिवस भर पडत होती. एकीकडे बेरोजगारी सतावत होती तर दुसरीकडे एकाकी. हळूहळू लग्नात गुंतून एकेक मैत्रीण कमी होत निघाली होती – तशीच लीलीही कमी झाली. ‘दादाचा सल्ला’ सदरातून हातखर्च निघत असताना विदेशाची स्वप्ने दाखवणारा पालेकर गल्फला जाताच अनोळखी झाला. आणि त्यात पुन्हा काॅलेजातल्याच मानसची लगट. हा मानस सुद्धा स्वतःत बरीच रहस्यं दडवून आहे.
मानसच्या आणि चंदूच्या मैत्रीत एकच समान धागा होता. दोघेही देव न मानणारे होते. ‘एथिस्ट सेंटर’ची कल्पना मानससमोर चंद्रहासने मांडली.
“सध्या आपल्याकडे वेळ आहे. ताकद आहे. आपण केंद्र चालवू शकतो. भाविकांसाठी देवळं असतात. देव न मानणाऱ्यांसाठी एखादं केंद्र का नसावं? आपल्यासारखे इतर निरीश्वरवादी तिथं चर्चा करायला जमतील. एक सपोर्ट ग्रुप तयार करू. इंटरनेट आहेच त्यासाठी!”
मानसला हे पटलं आणि दोघेही त्या तयारीला लागले. हल्लीच प्रकाशित झालेलं ‘श्रद्धा विसर्जन’ हे पुस्तकही मानसने मुद्दाम मागवलं. पहिल्याच छोट्या सभेला जिल्ह्यातून सात-आठ जण आले. गणपत तर अगदी छोट्या गावातला कलिंगडांची बाग सांभाळणारा बागायतदार, पण तोही हजर होता.
तो म्हणाला, “आपल्या या केंद्राबद्दल बातम्या आल्या तर त्रास होऊ शकतो.”
तर चंदूच्या मते, “नास्तिकता आपल्यापुरती जपण्यात बेकायदेशीर काहीच नाही. मग टरकायचं कशाला? जे आधीपासून नास्तिकच आहेत, त्यांना आपण बोलावतोय, गप्पा करतोय, पाठिंबा देतोय. हे काही नास्तिक बनवण्याचं, नास्तिकता शिकवण्यायचं केंद्र नाही.”
चंदूच्या घरच्या मंडळींना नास्तिकांच्या केंद्राची, अशा मंडळाची कल्पना आवडली नाही. स्थानिक दैनिकात असं मंडळ सुरू झाल्याची बातमी आल्यावर एक छोटा संदेशही आला.
‘धर्मबुडव्यांनो, तुम्हाला धडा शिकवायला एक दिवस पुरेसा आहे.’
मानस त्याच्या स्त्रैण वृत्तीमुळे थोडा घाबरला. चंदू मात्र बिनधास्त होता.
मानसची आई म्हणाली, “या उद्योगांपेक्षा पास हो नीट. के.टी. मिळालीये. त्याची लाज आहे का नाही?”
मानसला चंद्रहासने आणखी एक महत्त्वाचं सांगितलं. तो म्हणाला, “तू स्वत:ला एकटा, वेगळा समजू नकोस. तुझी तृतीयपंथी ओळख जरा बाजूला ठेव. इट इज युवर कप ऑफ टी. करियर महत्त्वाचं असतं. ते सोडू नकोस. आपण सगळी माणसं आहोत. माणसाचे म्हणून प्रश्न असतात. ते सोडवायचे आहेत आपल्याला. मूळ मुद्दा कळला ना?”
मानस चंदूकडे एकटक बघत होता. त्याला वाटले, चंद्रहास आपल्यातलाच एक असता, तर त्यालाच जीवनसाथी म्हणून निवडले असते. त्याचे आणि माझे विचार जुळतात. त्याचं अस्तित्व, त्याची सोबत हा एक मोठा दिलासा आहे, पण भविष्य घडवण्यासाठी मराठी माध्यमात शिकलेल्या मुलांसाठी अशा किती आणि कोणत्या संधी आहेत? कसे करणार आम्ही करियर? बेकारीचा नाग समोर फणा काढून उभा आहे, असा आभास मानसला झाला.
‘लिंगलंबक’ या कवितेबद्दलचा दीडशे रुपये मानधनाचा चेक मानसला आला होता. बाहेरचा चेक असल्याने त्यातही पुन्हा पैसे कट होणार होते. अशा आर्थिक दु:स्थितीत कवी जगत असतो. कोण साहित्याकडे वळेल? उपासमार घडवणारा उद्योग असेच सगळे म्हणणार. वृद्ध साहित्यिकांना सरकारकडून मिळणाऱ्या दयादानाचा आकडा ऐकून तर त्याने कपाळावर हातच मारला होता. भाषा, साहित्य, कला हे खास मानवी प्रज्ञा-प्रतिभेचे आविष्कार आहेत. त्यांना इतके किमान महत्त्व देणारा हा देश-प्रदेश शेतकऱ्यासारखंच साहित्यिकालाही पूर्णवेळ आत्महत्येलाच प्रवृत्त करेल, असेही मानसच्या मनात आले. घरी निघालेल्या चंद्रहासच्या आकृतीकडे मानस बघत राहिला. जाणवणारी अंगातली कणकण मानसिक आहे की, खरोखर आपल्याला बारीक बारीक ताप येतो ते मानसला अजून ठरवता आलं नव्हतं. अंगात थोडी कसर होतीच, पण आपल्यामुळे खर्च नको. म्हणून तो डॉक्टरकडे न जाता काटकसर करत होता.
प्राचीने निरोप पाठवून का बोलावलं ते कळलं नाही. तशी ती आता तिच्या कामातून मुक्तच झाली होती. नक्षत्रसुंदर रूपामुळे सावरीसारख्या छोट्या गावात ती उठून दिसायची. चंदू दिसला की, खूप जुनी ओळख असल्यागत हसायची. भरपूर पैसा राखून होती. मुख्य म्हणजे मुंबईतल्या मीडियाची सारखी नसलेली पाच बोटं तिला नीट ठाऊक होती. पहिल्या निरोपाला चंद्रहास गेलाच नाही. एकटी राहणारी बाई, तिच्याकडे जायचं तो टाळत होता. पुन्हा निरोप आला. चंद्रहास जरा नाराज मनानेच निघाला. एक बाई म्हणून प्राची खूपच आकर्षक, नखरेल होती. चंद्रहासला तिची तरबेज नजर तपासत राहिली. त्यालाच संकोच वाटला.
“काही खास काम होतं का माझ्याकडे?” त्याने विचारलं.
त्याच्यावर खिळलेली नजर हटवत, सौम्य होत प्राची म्हणाली, “अरे, एक नोकरी आहे. तू मीडियाचा कोर्स केलास ना? तुझ्यासाठीच आहे. नेहमी तू दिसतोस. रिकामाच असतोस म्हणून तुला बोलावलं.”
“पण नोकरी कसली?”
“मी टेलिव्हिजन केला, सिनेमात होते. रेडिओ सांभाळला; पण लिखाण नाही जमत मला. माझे अनुभव, आठवणी सगळं आकर्षक भाषेत लिहून काढायचंय. आवडेल का तुला? मी स्वत:च ते पुस्तक प्रकाशित करणार आहे. तू शब्दांकन करायचं! मानधन मी स्वत: देईन तुला. अॅडव्हान्ससुद्धा देईन, पण रोज तू जे काही लिहून आणशील, ते मला दाखवायचं. तपासून घ्यायचं. तू हे काम सुरू केलंस याचा गाजावाजा करायचा नाही. पुस्तक प्रकाशित करताना पत्रकारांना बोलावू आपण. माझं मुंबईचं फिल्मी मित्रमंडळही येईल.”
प्राचीचं बोलणं अडवून चंद्रहासने विचारलं, “हे . . . म्हणजे असं आत्मकथनात्मक लिहिणं, मला सांगणं जरा लवकर होत नाहीये का? पन्नाशीनंतर वगैरे . . .”
“तेवढा वेळ नाही माझ्याकडे! मी इथं कोकणात का आले असं वाटतं तुला? आय वॉज सफरिंग फ्रॉम कॅन्सर. कॅन्सर आहे मला. सध्या काही त्रास नाहीये, पण या रोगाचा नेम नाही. पुन्हा उद्भवला तर? मला जे सांगायचंय, म्हणायचंय, जे खदखदतंय, जे मी उधळत आलेय, जे मी गमावलंय, जे जे कमावलंय, सगळी बेरीज-वजाबाकी मला मांडायचीये.”
“किती मानधन मिळेल त्यातून?” किंचित घाबरत चंद्रहासने विचारलं.
“तुला तसं नाव नसलं, तरी तुझे लेख आवडतात मला. तुला दहा हजार रुपये मानधन देऊ शकते मी आणि हे काम नीट केलंस तर मुंबईत माझ्या ओळखीवर मीडियात नोकरीही देईन!” या आश्वासनामुळे चंद्रहासला अचानक तरतरी आली.
“तसं असेल तर हे काम मी नक्की करीन.”
तो चटकन उत्साहात बोलून गेला. ती हसली. अधिकचं मोहक दिसली. ते तिचं होऊन गेलेलं दुखणं गोऱ्यापान देहावर कुठे जाणवत नव्हतं. श्रीमंत बायका स्वत:ला छान सांभाळतात, ‘मेंटेन’ करतात हे चंदूला ठाऊक होतं.
एक अनुभवी बाई तिचं चकाकलेलं प्रकाशित आयुष्य त्याच्यासमोर मांडत जाणार होती . . . आणि अंधारातले काही स्वप्निल क्षणही हळूवारपणे त्याच्या ओंजळीत देणार होती. तिच्या आयुष्यात येऊन गेलेले उनाड, उथळ पुरुषही नाही म्हटलं तरी उघडे पडणार होते.
“नावं बदलू आपण! सेफ करू त्यांना . . . पण ओळखणारे ओळखतील.” असंही नंतरच्या भेटीत प्राची म्हणाली. हे सगळं आव्हान चंद्रहासच्या अजून कोवळेपण न हरवलेल्या मनाला जरा अवघडच वाटत होतं, पण दहा हजार एका बेरोजगार पोरासाठी बरी रक्कम होती. शिवाय, मुंबईत तिच्या ओळखीवर नोकरी मिळण्याची आशा छान फुलू लागली होती.
तो निघण्याच्या बेतात असताना प्राची अचानक बोलून गेली, “तू बोल्ड आहेस. वाचकांना सल्ला देणारं सदर सांभाळतोस. तुझ्यापासून मी काही लपवणार नाही. तुझ्यासारख्या तरुण मुलांच्या सहवासात मी पुन्हा कॉलेज कुमारीच बनते . . . मनाने!”
‘बाई’चं पुन्हा अवखळ मुलगी होणं, अल्लड बनणं हे बरोबर की चूक? की फार सुंदर असलेल्या बाईला सगळंच क्षम्य असतं? घरी परतताना चंद्रहासचं नीट काही ठरेना. तो गोंधळला होता, पण घाबरला नव्हता. ‘दहा हजाराची कमाई होणार आहे,’ हे त्याने ऐटीत घरी सांगून टाकलं.
मानसला मात्र त्याने प्राचीकडे रोज जावं हे अजिबात आवडलं नाही. “मीपण येऊ का तुझ्याबरोबर रोज? नुसतं ऐकत जाईन ती काय बोलते ते.” मानसने विचारलं. त्याला दुखावणं चंद्रहासला नको वाटलं.
तो इतकंच म्हणाला, “मॅडमना विचारावं लागेल; मला वाटत नाही त्या हो म्हणतील.”
“तुला एकट्याला रोज भेटण्यात आणखी काही वेगळा हेतू नाही ना रे तिचा?” मानसने कपाळाला आठ्या घालत विचारलं. त्याचा हा प्रश्न चंदूला आवडला नाही.
“असे प्रश्न पोरी विचारतात. तू मित्र आहेस माझा. मित्रासारखा रहा. संशयी बायकोसारखं काही करू नकोस.”
चंद्रहासच्या बोलण्यात थोडी जरब आली. मानस वरमला. नंतर त्याचं त्यालाच वाटलं, कोणत्या हक्काने आपण चंदूला ‘तो’ प्रश्न विचारला? चुकलंच आपलं. शेवटी ती एक नटी आहे. नक्की कसं वागेल, काय करेल सांगता येत नाही. माझ्या या मित्राचीच निवड तिने का केली? इतके नामवंत लेखक आहेत. पुण्यातून वगैरे एखादा नामवंत लेखक मिळाला असता की! चंद्या तिला भलत्या बाबतीत साथ देईल असं वाटत नाही; पण काय सांगावं? शेवटी तो तरुण आहे. पुरुष आहे. ती वयाने जरा मोठी असली, तरी तशी वाटत नाही.. आणि मुख्य म्हणजे एक ‘बाई’ आहे! मी अस्वस्थ का होतोय? चंदूने रोज एखादी नोकरी करावी तसं त्या बाईकडे जाणं मला का इतकं खटकतंय? मी चंद्रहासवर हक्क सांगू लागलोय? चंदू माझा जिवलग जोडीदार बनू शकत नाही हे मी का स्वीकारत नाही? मानस स्वत:वरच चिडला, चरफडला आणि अधिकच निराश झाला. चंदूबद्दलची आपली ही भावना आपल्याला आवरता आली नाही तर? आहे ती मैत्रीही तुटेल या भावनेने मानस अस्वस्थ होत गेला. रात्री झोप लागेना. त्या नटीबद्दल चंदू खूप उत्तेजित होऊन बोलतो याचा विलक्षण संताप आता त्याला येऊ लागला होता.
मी कुणासाठी आणि कशासाठी जगतो आहे? माझ्यासारखी ‘गे’ माणसं मुळात जन्माला तरी कशाला येतात? आणि तशी ती येणारच असतील, तर त्यांची काही कायदेशीर, नीट सोय लावायला नको? कोणत्या बेटावर, कुठल्या ग्रहावर वस्ती करायची त्यांनी?
ठणकणारे अनेक विचार मानसच्या एकाकी मनाला यातना देत राहिले. ताप त्या रात्रीही होताच मध्यरात्रीनंतर त्याला विलक्षण तहान लागली. ताप वाढला असावा आणि मग पहाटे त्या ज्वराच्या गुंगीतच कधी झोप लागली ते कळलंच नाही.
{fullwidth}