झुंजार - अंजली कुल्थे

[वाचनकाल : २ मिनिटे] 

अंजली कुल्थे, anjali kulthe
त्या भीषण रात्री या गणवेशावर असलेल्या जबाबदारीची मला जाणीव झाली आणि त्यामुळेच मी हे धाडस करू शकले, असं अंजलीचं म्हणणं होतं.

२६/११ हरेकाच्या मनातील थरार जागा ठेवणारी घटना. या घटनेनंतर निरनिराळ्या क्षेत्रात बरेच पडसाद उमटले. वेगवेगळ्या सामाजिक भावना प्रकट झाल्या, चौफेर चर्चांची पुस्तकं छापली गेली आणि यातून त्यावेळी ‘कोणी काय करायला हवे होते’ याचा आराखडा तयार झाला. परीक्षा संपल्यावर उत्तरे देण्यात काय हशील? खरी कसोटी तर आणीबाणीत प्रसंगावधान राखून कृती करण्यात आहे . . .

१५ वर्षांपूर्वीची तारीख – २६.११.२००८
त्या रात्री नराधम अतिरेकी अजमल कसाब त्याच्या एका सहकाऱ्यासोबत ‘कामा हॉस्पिटल’च्या आवारात शिरला आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरु केला. दवाखान्याचे दोन्ही सुरक्षारक्षक जागीच ठार झाले. ते दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले होते तिथेच जरा पुढे एक परिचारिका (नर्स) जखमी अवस्थेत पडली होती . . . कसाब व त्याचा साथीदार व्हरांडा ओलांडून पहिल्या मजल्याचा जिना वेगानं चढत होते.
‘अंजली कुल्थे’ नावाची ५० वर्षांची परिचारिका हे भयानक दृश्य पहिल्या मजल्यावरून पहात होती. प्रसूती कक्षाची ‘इन-चार्ज’ असणारी अंजली २६/११ ला ती रात्रपाळीला होती. तिच्या वाॅर्डात २० गर्भवती महिला होत्या. हातात बंदूका घेतलेले दोन अतिरेकी जिन्यावरून आपल्याच वॉर्डच्या दिशेनं येतायत हे पाहून अंजली जिवाच्या करारानिशी पुढे सरसावली. आणि तिनं तिच्या वॉर्डाचे दोन जाडजूड दरवाजे कसेबसे बंद केले.
सर्व २० महिलांना आणि त्यांच्या काही नातेवाईकांना तिनं त्या मजल्याच्या टोकाला असलेल्या छोट्या ‘पॅन्ट्री’च्या खोलीत हलवलं. वीस गर्भवती महिलांना अशा आणीबाणीच्या वेळी शिफ्ट करणं ही किती नाजूक आणि जोखमीची गोष्ट होती! कसाब व त्याचा साथीदार हॉस्पिटलच्या गच्चीवर गेले होते व तिथून खाली जमलेल्या पोलिसांवर गोळया झाडत होते. हातगोळे टाकत होते. ते पाहून अंजलीनं, बाहेर येऊन, जखमी होऊन पडलेल्या परिचारिकेला ‘कॅज्युअल्टी’ मध्ये नेलं आणि तिच्यावर योग्य उपचार सुरु झाले.
इतक्यात वीस पैकी एका महिलेला प्रसववेदना सुरु झाल्या! अंजलीनं तिला हाताला धरून, भिंतीला चिकटून चालत-चालत प्रसूती कक्षात नेलं आणि तिथल्या डॉक्टरांच्या साहाय्यानं प्रसूती सुखरूप पार पाडली.

हल्ल्याचा हा थरार संपल्यावर अनेक दिवस अंजली झोपेतून घाबरून उठत असे. एका महिन्याने तिला पोलिसांनी बोलावलं कसाबची ओळख पटवण्यासाठी. नंतर त्याच्या खटल्यात तिला साक्षीला बोलावण्यात आलं. तिनं कोर्टाला एक विनंती केली – ‘माझा ‘युनिफॉर्म’ घालून येण्याची परवानगी मिळावी!’ कारण, त्या भीषण रात्री या गणवेशावर असलेल्या जबाबदारीची मला जाणीव झाली आणि त्यामुळेच मी हे धाडस करू शकले, असं तिचं म्हणणं होतं.
अंजली कुल्थे यांनी त्या रात्री फक्त वीस महिलांचेच नव्हे तर, हे जग पाहण्याआधीच मृत्युच्या जबड्यात पोहोचलेल्या वीस बालकांचेही प्राण वाचवले. आज ही मुलं पंधरा वर्षांची असतील. त्यांना कदाचित ठाऊकही नसेल की त्यांच्या ‘दोन जन्मदात्री’ आहेत! त्यांना नऊ महिने पोटात वाढवून  प्रत्यक्ष जन्म देणारी एक आई आणि अंजली कुल्थे – जन्माआधीच जीवदान देणारी दुसरी आई!

अंजलीताई तुमच्या अतुलनीय धैर्याला आणि प्रसंगावधनाला सविनय प्रणाम!


{fullWidth}

आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال