चिमुकल्या डॉल्फिनचे पत्र

[वाचनकाल : ४ मिनिटे] 
 
स्मितहास्य करणारा डॉल्फिन, dolphin smiling
तुम्हाला माहितीय, मी मासाबिसा नाही काही! अगदी तुमच्यासारखा सस्तन प्राणी आहे आणि त्या अगडबंब व्हेलसारखा शिष्ट तर मुळीच नाही!

या निसर्गातील प्रत्येक गोष्ट कोणत्यातरी मार्गाने आपल्याशी संवाद साधत असते. काही वेळा निसर्गाची हाक ऐकायला आपण कमी पडतो तर कधी हाक ऐकू येताच त्याकडे दुर्लक्ष करतो. ही हाक आपण ऐकावी म्हणून आपल्याशी बोलू पाहतोय लहानगा बुद्धीवान जलचर. जलदिनाचे निमित्त साधून पर्यावरणाची प्रेमळ साद घालणाऱ्या छोट्या दोस्ताचे आपल्याला पत्र . . .

काय चाललय मानव मित्रांनो? तुम्ही खूप बदललात बरं का.
भेदरलेल्या अवस्थेतच लिहिलंय हे पत्र आणि त्याला कारणही तसंच आहे. १९७३-७४ला यूपीच्या चामोली जिल्ह्यात गौरादेवीनं अलकनंदा नदीखोऱ्यातल्या झाडांवर आणि त्यांच्यावर आधारलेल्या रोजगारावर कुऱ्हाड मारून मिळणाऱ्या विकासाला नकार दिला. चंडी प्रसाद भट्ट यांनी असंख्य याचिका फेटाळल्या गेल्यावर अहिंसक विवेकवादाची ‘चिपको मूव्हमेंट’ सुरू केली नि सुंदरलाल बहुगुणा यांनी ती सर्वदूर नेत वृक्षतोड करणाऱ्या कंपनीचा परवाना रद्द करण्याकरता सरकारला नमवलं. तिथं २ वर्षांपूर्वी काय झालं माहितीये? त्याच यूपीत प्रतापगडच्या रहिवाशांनी फक्त गमतीखातर माझ्या एका भाईबंदाला काठीनं ठेचून ठेचून मारलं बघा. त्याचा व्हिडिओपण तुमच्या त्या नेटवर ‘व्हायरल’ झालाय. अरे माणसासारखी माणसं ना तुम्ही? मग एखाद्या जलपरीसारख्या दिसणाऱ्या आम्हा गोंडस जीवांचा तुम्ही असा खेळ मांडता, ते तुमच्या नैतिकतेला शोभतं का? आमचा काय बरं गुन्हा?
आता तुम्ही म्हणाल, हे गोजिरवाणे डॉल्फिन्स केव्हापासून इतकी तिखट भाषा बोलू लागले? तर आत्ताच सांगून ठेवतो की हेसुद्धा आम्ही तुमच्याकडूनच शिकलोय! तुमच्यातली ती बारकी कार्यकर्ती ग्रेटा थर्नबर्ग बघा, पर्यावरणाबद्दल कशी आस्थेनं बोलते नि बोलू लागली की ट्रम्पपासून पुतिनपर्यंत सर्वांना निरुत्तर करते. तर मग अगदीच छोटुकला असलो म्हणून काय बिघडलं? मी पण गंगा नदीतला डॉल्फिन आहे! भाविक ‘गंगा की गाय’ म्हणतात मला नि शास्त्रज्ञ ‘प्लाटानिस्टा गंगेटिका’!
हे काय-काय फेकत असता तुम्ही आमच्या पवित्र अधिवासात? प्लास्टिकच्या पिशव्यांपासून मच्छीमारांनी तशाच फेकून दिलेल्या घोस्ट नेट्सपर्यंत, बड्या उद्योगधंद्यांच्या उकळत्या सांडपाण्यापासून ते ऐन महामारीतल्या हिडीस मृतदेहांपर्यंत? कशाकशापासून जीव मुठीत धरून पळायचं मी? मांस, मेद आणि यकृतातील तेलासाठी तर थेट जीवे मारताच; पण ढीगभर धरणं, कालव्यांनी आमचे अधिवासही विस्कळीत करून सोडता. कधी अवैध वाळूमाफियांनी उपसलेल्या गाळानं तर कधी हवामानबदलापायी घटत्या पाणीपातळीनं जीव कोंडतो आमचा इथं! अहो, जलीय अन्नसाखळीतील अग्रणी असणारा मी जलचर जीव. छोटे-मोठे मासे खाऊन नि प्रवाह स्वच्छ ठेवून जीवावरण उत्तमरीत्या जोपासतो. म्हणूनच तर नदीचं आरोग्य संतुलित आहे की नाही ते सांगणारी ‘इंडिकेटर’ प्रजाती म्हणतात ना मला! तुमच्या त्या राज्यघटनेच्या कलम २१ (राईट टू लाईफ) अंतर्गत जलस्त्रोतांनाही वैधानिक अस्तित्व आहे आणि पर्यायाने माझ्याही श्वासाला काही किंमत आहे, हे जरा ध्यानात घ्या ना.
बाकी तुमचा बिष्णोई समाज, तुमचं नर्मदा बचाव, सायलेंट व्हॅली, तुमचं तेहरी डॅम, आरे कॉलनी बरंच काही ऐकून आहे मी. ‘बिल्ड बॅक बेटर’चा नारा देत तुम्ही मानव अशक्य ते शक्य करता म्हणे. म्हणजे तुम्ही माणसं तशी अगदीच काही वाईट नाही बरं.

तसा मी पाकिस्तान, नेपाळ आणि बांग्लादेशमध्येही सापडतो; पण त्यातल्या त्यात ‘वसुधैव कुटुम्बकम’ म्हणणाऱ्या तुम्हा भारतीयांचं मला विशेष कौतुक वाटतं. म्हणूनच तर तुमच्या गंगा नदीला मी आपलं घर मानलंय. आता हेच बघा ना, नुकताच तुम्ही ‘प्रोजेक्ट डॉल्फिन’ सुरू केलायत. बिहारच्या भागलपूर जिल्ह्यात १९९१पासून देशातली एकमेव ‘विक्रमशीला डॉल्फिन सॅन्क्चुरी’ पण उभारलीयेत. तुमचं ते ‘माय गंगा माय डॉल्फिन’ अभियान म्हणे बिजनोर ते नरोरा या अडीचशे किलोमीटरच्या पट्ट्यात आमची लोकसंख्या मोजणार आहे.
पण तुमच्या ‘नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा’मुळे आता देशभरात सहा ठिकाणी ‘डॉल्फिन जलज सफारी’ सुरू झालीये म्हटल्यावर आधी माझ्या नाजूक निळसर राखाडी अंगावर कसला काटा आला म्हणून सांगू? मला तर वाटलं, की तुम्ही नेहमीप्रमाणे कुडमुडे पर्यटक बनून बोटीतून आम्हाला बघत हिंडणार आणि दिडकीभर तिकिटात खंडीभर कचरा पाण्यात भिरकावून आम्हाला धास्तावून सोडणार . . . त्याचं काय आहे-आधीच आम्हाला दिसतं कमी, त्यात तुमच्या त्या बोटींना धडकून आमचं ‘इकोलोकेशन’ जाम होतं ना! मात्र इथं तसं नाही. तुमचे ते प्रशिक्षित ‘जलप्रहरी’ तरुण हळुवारपणे होडीमधून आमच्याकडे बोटं दाखवतात आणि तुम्हाला आमचं महत्त्व पटवून सांगतात, तेव्हा ऐटीने पाण्यात उसळी मारावीशी वाटते हं!

सध्या मी भागलपूरला भारतातल्या पहिल्या चाळीस फूट उंच ‘डॉल्फिन ऑब्झर्व्हेटरी’मधून बोलतोय. गंगेवर पुल बांधून आणि नदीप्रवाहात जराही खंड न पाडता तुम्ही इतकी नितळ-पारदर्शक इमारत बांधलीयेत, की तिच्यातून पोहत-पोहत मी सहज काचेला नाक चिकटून मोठमोठाल्या डोळ्यांनी मला बघणाऱ्या तुमच्यातल्या काही छोट्या मानव मित्रांना पाहू शकतो!
तसा मीही पृथ्वीतलावरचा बऱ्यापैकी बुद्धिमान जीव आहे हं. शास्त्रज्ञांनी मेहनत घेतली तर निरनिराळे शब्दसुद्धा लीलया शिकू शकतो. पण माणुसकीची भाषा मला जास्त आवडते, जी तुम्ही हळूहळू विसरत चाललाय. कधीतरी या ना असंच भेटायला. पण तोपर्यंत मी जिवंत असेन का हो . . . अजून माझे बरेच नातेवाईक जगण्याचा संघर्ष करत आहेत बाहेर! तुमचा वन्यजीव संरक्षण कायदा-पर्यावरण संवर्धन कायदा, जल-वायू प्रदूषणरोधन कायदा असे कागद तर बक्कळ आहेत; पण ते वाचून त्यातली कलमं पाळण्याची मानसिकता हवी ना मुळात? जिथं नरभक्षक असो वा नसो, वाघिणी गोळ्यांनी गप्पगार केल्या जातात आणि हत्तींच्या तोंडात सुतळीबॉम्ब कोंबून त्यांच्या चिंधड्या उडवण्याचा ‘गेम’ खेळला जातो, तिथं मी एक छोटासा जीव . . . माझा काय तो टिकाव लागणार?
तुम्हाला माहितीय, मी मासाबिसा नाही काही! अगदी तुमच्यासारखा सस्तन प्राणी आहे आणि त्या अगडबंब व्हेलसारखा शिष्ट तर मुळीच नाही! माणूस बुडताना दिसला की हमखास वाचवायला सरसावतो मी. चार-पाच मिनिटांतून एकदा नदीच्या पृष्ठभागावर श्वास घ्यायला यावंच लागतं मला. तर मग गाववालाच जसा गाववाल्याच्या मदतीला धावून जातो तसं तुम्ही नको का माझ्या बचावमोहिमेत हिरीरीने पुढे यायला? लक्षात घ्या, आता आम्ही जेमतेम साडेतीन हजार जण उरलोय. फार काळ तग नाही धरू शकणार. जपा. स्वतःला आणि शक्य झाल्यास आम्हालाही.
कळावे-लोभ असावा.

- तुमचाच एक लहानगा मित्र
डॉल्फिन.

{fullWidth}


आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال