झुंजार ‘ती’


power to her symbolic feminism art
स्वतःच्या स्वाभिमानासाठी घेतलेली ठाम भूमिकाही केवळ आवाज उठवल्यानेच साध्य होऊ शकलीय


कितीही आई-बहीण-मुलगी-बायको बनून सगळी पात्रे काटेकोरपणे निभावली, जीवन इतरांसाठी झिजवले, मनाचा कोंडमारा करून दिवस ढकलले तरी शेवटी कुठेतरी प्रत्येक तिचं ‘ती’त्व असे काहीतरी मागे उरतेच. या ‘ती’त्वाचे प्रकटीकरण म्हणजे प्रत्यक्षात तिचे ‘जगणे’ असते. या प्रकटीकरणाचे खरे कारण आहे मानसिक बळ – जे मिळते इतरांचे लकाकते ‘ती’त्व जाणून घेतल्यानेच! प्रत्येकीस हे ‘ती’त्व प्रकट करण्याचे मानसिक व शारीरिक बळ मिळावे यासाठी अशाच लकाकत्या ‘ती’त्वांची ओळख म्हणजे ‘झुंजार ती’ लेखमाला.


नमस्कार.

आज एका वेगळ्या मुद्यावर बोलावेसे वाटतेय.

आपण एक स्त्री आहोत, तेव्हा आपल्यावर घरात आणि बाहेरही अन्याय होता कामा नये किंवा आपण कुठे बळी पडता कामा नये, या आणि अशा बऱ्याच गोष्टी आपण रोजंच ऐकतो. कधी वृत्तपत्र, प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमे अगदी सगळीकडेच. पण ही सगळी ‘क्षमता’ जी आपल्या अंगी आहे, हे इतरांनी सांगण्याची गरज का पडावी? पुरूष आपल्याला ‘स्वतःला ओळखा’ असे सांगतील व नंतर आपण स्वतःला ओळखायचे?

मुळात अशा टेकूंची आपल्याला गरजच का पडावी?

याचे कारण एकच आहे की, आपण स्वतःच स्वतःला ओळखत नाही. स्वतःच्या हक्कांची व आवाजाची आपल्याला जाणीवच नाही! आपल्याला चुकीचे घडलेल्यास चूक म्हणता येत नाही!

कोणीही यावे आणि आपल्यावर वाटेल तसे लिहावे, बोलावे आणि आपण एक तर ते वाचून सोडून द्यावे, कोणीतरी बोलेलं म्हणून दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून निघून जावे किंवा समोरची व्यक्ती कोणत्या ना कोणत्या प्रकारे वरीष्ठ आहे म्हणून गप्प बसावे नाहीतर त्याचे अंधसमर्थन करावे . . . इतकेच जमेल का आपल्याला?

अशाने तर आपण स्वतःच दुसऱ्यांनी आपल्यावर अन्याय करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करतोय! असे केल्याने ‘आमच्यावर अन्याय झालाय, आम्हाला न्याय हवाय’ हे बोलण्याचा तरी अधिकार राहील का आपल्याला?

आज आपल्यापैकी सगळ्याच उच्चशिक्षित होऊन कोणी नोकरी करत आहे, कोणी व्यवसाय, कोणी मोठ्या पदावर कार्यरत आहे, कोणी शिक्षणक्षेत्रात विद्यार्थी घडवताहेत तर कोणी संपूर्ण घराची जबाबदारी सक्षमपणे पेलत संसार चालवत आहेत.. परंतु हे सगळं नंतर झालंय!

सर्वात आधी आपण – जी स्वतः एक दुसरा जीव निर्माण करण्याची अद्वितीय क्षमता जोपासते त्या – स्त्रीचा जन्म घेतलाय हे विसरता कामा नये. उलट त्याचा अभिमान बाळगावा!

इतर आपला सन्मान करतील तेव्हा करतील, आधी आपण स्वतःचा आणि संपूर्ण स्त्रीवर्गाचा सन्मान करायला हवाय! अगदी कशालाही न घाबरता, कोणी व्यक्ती काही चुकीचे लिहितेय, बोलतेय त्याला ‘हे साफ चूक आहे’ असे ठामपणे सांगायला हवंय! असे नाही करू शकलो, तर काही अर्थ उरेल का आपल्या शिक्षणाला?

एका कुठल्याशा जुन्या मराठी सिनेमातला प्रसंग, ज्यात ती मुलगी ‘काॅलगर्ल’ असते. सकाळी जेव्हा ती दुकानात जाते तेव्हा एक इसम तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करीत म्हणतो, “रात्र काय आणि सकाळ काय . . . तुला कसला आलाय सन्मान?” तेव्हा ती बाणेदारपणे उत्तर देते, “मी रात्री काॅलगर्ल असेन, पण सकाळी एक सामान्य स्त्री आहे. तेव्हा कोणी माझ्या वाटेला गेलं तरी मी त्याची वाट लावीन!”

जुन्या काळातील राजकुमारी अथवा राण्या स्वतःच्या संरक्षणासाठी, आत्मसन्मान जपण्यासाठी, हक्कासाठी व चुकीच्या गोष्टींसाठी पेटून उठत, लढाया करत. अकबराशी विवाह करण्यापुर्वी जोधाबाईने, ‘विवाह झाल्यानंतर धर्मपरीवर्तन करणार नाही, आपल्या देवाची पुजा करणे सोडणार नाही!’ ही स्वतःच्या स्वाभिमानासाठी घेतलेली ठाम भूमिकाही केवळ आवाज उठवल्यानेच साध्य होऊ शकलीय.

विदेशातही अशा घटना घडत असतात. एके वर्षी इंग्लंडमधील एका कार्यालयात काम करणार्‍या ‘निकोला थोर्प’ हिला अचानक कामावरून काढून टाकण्यात आले . . . कारण काय तर ‘उंच टाचेच्या सँडल वापरल्याने तिला त्रास व्हायचा म्हणून तिने ते वापरणे बंद केले’ हे! या अन्यायाविरोधात आवाज उठवत तिने ‘डियर सर वेअर हिल्स’ म्हणजे ऑफिसमधील पुरूषांनी एक दिवस तरी अशा हिल्स वापरून सबंध दिवस काढून दाखवावा अशी मोहीम सुरू केली.

काहीच दिवसांत त्याला एका मोठ्या आंदोलनाचे स्वरूप प्राप्त झाले आणि दिड लाख लोक तिच्या समर्थनात उभे झाले. हे सगळे केवळ चुकीच्या गोष्टींचे, प्रथांचे समर्थन न करता किंवा शांत राहून त्याच्या वाढीस कारणीभूत न ठरता वेळेत आवाज उठवल्यामुळे घडलेय आहे.

आपण अशा घटनांमधून दिसणारा किंवा मालिका व चित्रपटांत दाखवला जाणारा हा करारी बाणेदारपणा, नीडरपणा कधी अंगीकारणार आहोत? की फक्त त्यातील फॅशन, साड्या, दागदागिने इतकेच अनुकरण करण्यात अडकून पडणार आहोत? स्वतःला सन्मान मिळावा यासाठी स्वतःच धडपड करावी लागते हे कधी विसरू नये.

आज जसे प्रत्येक क्षेत्रात सक्षम नेतृत्व करण्यासाठी समृद्ध आहोत, त्याचप्रमाणे चुकीला खंबीरपणे विरोध करायला व परखडपणे व्यक्त व्हायला हवे. एकमेकींचे पाय न खेचता महिलांनी महिलांकडे असूयेने बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा. आपल्याला एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, ते जपले तर आपण पुरूषांचीही ढाल बनू शकतो हे लक्षात ठेवावे. त्यानेच आपले ‘स्वत्व’ खऱ्या अर्थाने उजळून निघेल.

जिजाऊ, सावित्रीबाईंचा वारसा घेऊन चालतोय तेव्हा कर्वे, फुले यांनी आपल्यासाठी त्यांचे संपूर्ण जीवन खर्ची पाडलेय हे आपण का विसरतोय?

‘A woman is attitude and woman is gratitude’ हे कधी उमजेल आपले आपल्यालाच?


‘झुंजार ती’ या लेखमालेत अशाच जगभरातील महिलांनी समाजाच्या प्रवाहाच्या विरोधात जाऊन केलेल्या कामगिरींची माहिती देण्याचा प्रयत्न राहील.





{fullwidth}

आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال