[वाचनकाल : ७ मिनिटे]
किंवा
किंवा
तुकारामांच्या ठायी वाट्याला आलेल्या प्रारब्धाची गती स्वीकारण्याची परिस्थितीशरण मनोवृत्ती नाहीच. प्रयत्नवादाची कास धरून झटण्याचा निष्काम कर्मयोग त्यांनी ठिकठिकाणी मांडला आहे. |
बेभान होऊन नाचणाऱ्या तुकारामात एक जादू आहे, एक वलय आहे, पण चमत्कार मात्र नाही. जगाच्या चालीरीती साध्या मात्र प्रचंड ताकदवान तर्कांनी मोडीत काढणाऱ्या सामान्य माणसात कसला आलाय चमत्कार? तुकारामाला दैवी परिमाण मिळालं ते जीवनभर या कवीला छळलेल्या कंपूकडूनच! मनात असलेल्या आश्चर्यकारक विद्रोहाने तुकारामाला असामान्य बनवलं. हा विद्रोह, ही बंडखोरी आज या आद्यकवीच्या पाऊलावर पाऊल ठेवतो असा दावा करणाऱ्या किती जणांत आहे? . . .
सगळ्यात आधी हे कबूल केलं पाहिजे, की तुकाराम बीज हा दिवस तसा हटकून लक्षात ठेवणाऱ्यांपैकी मी नव्हे. पण तुकाराम बोल्होजी अम्बिले म्हणजे आपले प्रिय! झाडून साऱ्या संतांच्या मांदियाळीत एकदम आपलेसे वाटणारे. संग्रही आहे ती त्यांची गाथा उघडून आज वाचली आणि काही मस्त चरण गुणगुणत प्रसन्न मनानं बस पकडली.
हौसेनं मुखोद्गत केलेले त्यांचे अभंग, भजनं, झिम्माफुगडीगीतं, दळणकांडणगीतं, ओव्या, खेळगीतं यांमधून आवडते चरण शोधताना नाकी नऊ येतील. एखादीच ओळ उचलायची म्हणजे इतर सोन्यासारख्या रचनांवर अन्याय! पण म्हणूनच तर तुकाराममहाराज आपले परममित्र. उभी रात्र टक्क जागून काढल्यावर दुसरा दिवस हसत अंगावर घ्यायला जबरदस्त उमेद देऊन जातील. एखाद्या संध्याकाळी मायेनं फुंकर घालून थकल्याभागल्या मनाला जोजवतील.
संसारातल्या विरक्तीचा महामेरू संत तुकारामांना आणि परतत्त्वाचा स्पर्श झालेल्या त्यांच्या परखड नि साध्या शब्दकळेला, सादर प्रणाम करावेत तितके कमीच.
‘सुख पाहता जवापाडे । दुःख पर्वताएवढे ॥’
‘शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी ॥’
‘तुका म्हणे जे जे भेटे । ते ते वाटे मी ऐसे ॥’
‘तीर्थी धोंडा पाणी । देव रोकडा सज्जनी ॥’
‘चित्त समाधानें । तरी विष वाटे सोने ॥’
अशा कित्येक विचारमौक्तिकांतून नेमकं काय वेचावं ते कठीण; कारण मुळात इतक्या मोजक्या अल्पाक्षरी शब्दरचनेतून इतका निखळ माणुसकीचा प्रभावी उपदेश फक्त तुकारामांच्याच वाणीतून पाझरतो. कदाचित म्हणूनच, जितक्यांदा वाचावे तितक्यांदा तुकाराम नव्यानं समजतात आणि खोलवर भिनत जातात.
‘नाठाळाचे माथी सोटा’ हाणणारे तुकोबा हातात धरून वाचू लागताक्षणी विलक्षण आदरयुक्त दरारा निर्माण करतात. वडिलधाऱ्या आपुलकीच्या चिवट धाग्यानं तुमच्या नकळत तुम्हाला त्यांच्याशी बांधून घेतात. ‘तुका म्हणे अवघे फिके भावाविण । मीठ नाही अन्न तेणे न्याये ॥’ ही खऱ्या ईश्वरभक्तीची शिकवण सर्वसामान्यांच्या गळी उतरवण्यासाठी प्रसंगी ‘घरी रांडा पोरे मरती उपवासी । सांगे लोकापासी थोरपण ॥’ असे अस्सल प्राकृतातील फटके लगावण्यासही त्यांनी मागेपुढे पाहिलेलं नाही.
तुकारामांच्या अभंगवाणीतून प्रसवलेल्या सुरेख कल्पनाशक्तीला, नादमधुर शब्दरचनेला आणि स्वाभाविक विचारसौंदर्याला नेहमीच मनापासून सलाम करावासा वाटत आलाय. त्यांनी परमेश्वराला मुक्तकंठानं अर्पण केलेल्या स्तुतिसुमनांमध्ये, बघता बघता सावळा सुंदर विठ्ठल डोळ्यांसमोर साकारणारी चित्रदर्शी वर्णनशैली जातायेता सहज दिसून येते.
सुंदर तें ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां ॥
तुळसीचे हार गळां कासे पीतांबर । आवडे निरंतर तें चि रूप ॥
मकरकुंडलें तळपती श्रवणीं । कंठीं कौस्तुभमणि विराजित ॥
तुका म्हणे माझें हेंचि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीनें ॥
किंवा
मुगुट माथां कोटि सूर्यांचा झळाळ । कौस्तुभ निर्मळ शोभे कंठीं ॥
ओतींव श्रीमुख सुखाचें सकळ । वामांगीं वेल्हाळ रखुमादेवी ॥
उद्धव अक्रूर उभे दोहींकडे । वर्णिती पवाडे सनकादिक ॥
तुका म्हणे नव्हे आणिकांसारिखा । तोचि माझा सखा पांडुरंग ॥
जागोजागी विखुरलेले हे आणि असे मंगलाचरण म्हणजे तुकोबांच्या तरल भावावस्थेचा आरसाच. ‘सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरिया ॥’ किंवा ‘कस्तुरीमळवट चंदनाची उटी । रुळे माळ कंठीं वैजयंती ॥’ अशा ओळींमध्ये त्यांच्या हळुवार कविमनाचं प्रतिबिंब पडलेलं दिसेल.
वारकरी संप्रदायाच्या अभंगांचा अविभाज्य भाग म्हणजे सृष्टीनिर्मात्याला उद्देशून रचलेल्या विराण्या. एरवी कठोर आसूड ओढणाऱ्या तुकारामांच्या लेखणीतून उतरलेल्या या विराण्या म्हणजे एखाद्या मनस्वी चित्रकाराच्या कुंचल्यातून झरझर रेखाटले जाणारे मृदू, ऋजूभावी विरहिणीचे डोळेच. उत्कट प्रतीक्षेच्या अग्नीत पळापळानं होरपळत्या आशेनं भरून वाहणारे.
झुरोनी पांजरा होऊं पाहें आतां । येईं पंढरीनाथा भेटावया ॥
तुका म्हणे माझी पुरवावी आस । विनंती उदास करूं नये ॥
ह्या पंक्तींमध्ये वारकरी संप्रदायाच्या नसानसांत वाहणारी ‘मधुराभक्ती’ ओतप्रोत भरलेली आहे.
सांडिला लौकिक लाज भय चिंता । रातलें अनंता चित्त माझें ॥,
मज आतां कोणी आळवाल झणी । तुका म्हणे कानीं बहिरी जालें ॥
‘तुका म्हणे आम्ही जिवाच्या उदारा । जालों प्रीतिकरा गोविंदासी ॥’ असं हे परमेश्वर-भक्ताचं द्वैत बेचैन करून सोडणारं आहे.
नारायणा आम्हां नाहीं वेगळीक । पुरविली हे भाक सांभाळिली ॥
तुका म्हणे जालें सायासाचें फळ । सरली ते वेळ काळ दोन्ही ॥
अशा जीवनाच्या साक्षात्कारी क्षणांना प्रेयस मानून अलवार शब्दांत टिपणाऱ्या तुकारामांच्या ओळी निव्वळ अप्रतिम. परमेश्वराला प्रियकर मानून त्याच्या एका भेटीसाठी आसुसलेली हीच भक्ती पुढं कबीरपंथी नि सूफी संतांच्या रचनांचंही ठळक अंग बनलेली आहे.
इतर भक्तिसंप्रदायी संतकवी आणि संत तुकाराम महाराज यांच्या लेखनशैलीत एक धारदार फरक आहे. तो म्हणजे तुकारामांच्या अभंगांमधून अखंड, अविरत खदखदणारा जळजळीत विद्रोह! हरेक कोरड्या कर्मकांडास त्यांच्या तर्काधिष्ठित लेखणीनं झिडकारलेलं आहे. त्यांचे काही मोजके आणि प्रक्षिप्त/मागाहून घुसडल्यासारखे वाटणारे अभंग एकादशीसारखी व्रतवैकल्यं, तुळशीवृंदावनमहिमा, विष्णूअवतारकल्पना किंवा विठोबाचं नामसंकीर्तन यांची नुसती आंधळी भलावण करतात की काय असं वरकरणी पाहता भासतं. पण मग झाकोळलेल्या आभाळातून मध्येच डोकावणारा एखादाच तेजस्वी किरण जसा आसमंत लख्ख उजळून निघण्याकरता पुरेसा ठरतो, तशा विजेसारख्या चमकून जाणाऱ्या तुकोबांच्या काही ओळी अनंत काळाकरता मनात घर करून बसतात;
अंतरींची घेतो गोडी । पाहे जोडी भावाची ॥
देव सोयरा देव सोयरा । देव सोयरा दीनाचा ॥
इथं परमेश्वर म्हणजे नक्की काय याबाबत तुकारामांची संकल्पना किती उदात्त आहे हे जाणवून हात नकळत छातीशी जोडले जातात.
‘हरि नाहीं आम्हां विष्णुदासां जगीं । नारायण अंगीं विसावला ॥’ म्हणून गेलेल्या तुकारामांच्या नजरेला परमेश्वराचं अस्तित्व माणुसकीच्या धाग्यात दिसतं. त्यांना जगन्नियंता हा सगुण साकारापेक्षा निर्गुण निराकार रूपात जास्त भावला आहे जणू . . .
परउपकार पुण्य त्या वावडें । विषाचें तें कीडें दुग्धीं मरे ॥
तुका म्हणे विटाळाचीच तो मूर्ति । दया क्षमा शांति नातळे त्या ॥
किंवा
दुराचारी तो चांडाळ । पाप सांगातें विटाळ ॥
तुका म्हणे खळ । म्हणोनियां निषद्धि तो ॥
ह्या ओळी जातिभेदाच्या जन्मजात उतरंडीला नकार देणारी वेदपुराणांहून संपूर्णतः भिन्न ‘विटाळ’कल्पना आपल्यासमोर ठेवतात. ‘अवघियां पुरतें वोसंडलें पात्र । अधिकार सर्वत्र आहे येथें ॥’ या वाक्यातही ‘आत्मज्ञानाचा अधिकार ही मूठभरांची मक्तेदारी नाही’ हे त्यांनी निक्षून सांगितलं आहे.
इच्छादानी येथें वळला समर्थ । अवघेंचि आर्त पुरवितो ॥
महारासि सिवे । कोपे ब्राम्हण तो नव्हे ॥
हा तर तुकोबांनी स्पृश्यास्पृश्यतेवर सपकन् हाणलेला चाबूक! तुकाराम महाराजांचं अध्यात्म म्हणजे पुरोगामी आणि परिवर्तनवादी विचारांची परिभाषाच. ‘निंदा हिंसा नाहीं कपट देहबुद्धि । निर्मळ स्फटिक जैसा ॥’ अशा शब्दांत तुकारामांनी सच्च्या ईश्वरभक्ताची प्रतिमा मांडली आहे. काळाच्या खूप पुढे जात एक आगळीवेगळी ‘मोक्ष’कल्पना प्रस्थापित करताना त्यांनी तीर्थाटन-देवदर्शन-सोवळ्या-ओवळ्यावर कसा घणाघाती प्रहार केला आहे पाहा;
मोक्षाचें तीर्थ न लगे वाराणसी । येती तयापासीं अवघीं जनें॥
तीर्थांसी तीर्थ जाला तोचि एक । मोक्ष तेणें दर्शनें ॥
‘खेळ मांडियेला वाळवंटीं घाई । नाचती वैष्णव भाई रे ।’ या सुरेख अभंगात ‘वैष्णवांचा मेळ’ घालणाऱ्या समरसतेचा पुरस्कार करत तुकाराममहाराज म्हणतात;
वर्णाभिमान विसरली याति । एकएकां लोटांगणीं जाती ॥
निर्मळ चित्तें जालीं नवनीतें । पाषाणा पाझर सुटती रे ॥
होतो जयजयकार गर्जत अंबर । मातले हे वैष्णव वीर रे ॥
तुका म्हणे सोपी केली पायवाट । उतरावया भवसागर रे॥
या खेळगीतातही ‘साही अठरा चारी घालुनियां घाई । नाचती फेरी टाळशुद्ध रे ॥’ हे अठरापगड जातींचं खरंखुरं सख्य त्यांना अपेक्षित आहे. ‘घाबरियांच्या मोडा काड्या । धाडा भाड्यां वळतियां ॥’ हे वचन आंतरजातीय विवाहांना नाक मुरडत धुडकावून लावणाऱ्या सुशिक्षित महाभागांना आज २१व्या शतकात तरी पचेल काय? ‘तुका म्हणे देवापाशीं । विटाळशी नसावी ॥’ हे वचन या विज्ञानयुगात घरच्या देवघरात जायला मज्जाव असणाऱ्या नि दारच्या मंदिरप्रवेशाकरता झगडावं लागणाऱ्या रजस्वला स्त्रियांच्या संघर्षाला ‘आततायी’ म्हणून मोडीत काढणाऱ्या बुरसटलेल्या ‘सश्रद्ध’ मंडळींना रूचेल काय? १७व्या शतकातच ही निर्लेप मानवता, हा सहृदय विज्ञानवाद आणि ही नीरक्षीरविवेकी आस्तिकता मांडणारे निरक्षर तुकाराम ‘अशांकरता’ नाहीतच हे उघड आहे.
मुळात तुकारामांच्या ठायी वाट्याला आलेल्या प्रारब्धाची गती स्वीकारण्याची परिस्थितीशरण मनोवृत्ती नाहीच. प्रयत्नवादाची कास धरून झटण्याचा निष्काम कर्मयोग त्यांनी ठिकठिकाणी मांडला आहे. उदाहरणार्थ, अभंग क्रमांक २५६ आणि २५७ मध्ये तर सरळ सरळ ‘गंधर्व अग्नि सोम भोगिती कुमारी । कोठें चराचरीं त्याग केला ॥’ आणि ‘गायत्री स्वमुखें भक्षीतसे मळ । मिळाल्या वाहाळ गंगाओघ ॥’ तसेच ‘आणिकांच्या कापिती माना । निष्ठपणा पार नाहीं ॥’ अशा तीक्ष्ण भाषेत अंध पोथिनिष्ठतेवर, खोट्या जात्याभिमानावर आणि अश्रद्ध पशुबळीप्रथेवर तर्कशुध्दतेचं हत्यार चालवलं आहे.
करिती बेटे उसणवारी । यमपुरी भोगावया ॥
सेंदराचें दैवत केलें । नवस बोले तयासि ॥
तुका म्हणे नाचति पोरें । खोडितां येरें अंग दुखे ॥
या शब्दांत फुकाच्या नवससायास-यज्ञयागांची रेवडी उडवली आहे. तुकोबांच्या लेखणीची ठळक, व्यवच्छेदक छटा म्हणजे त्यांचे व्यासंगी आणि मन:स्पर्शी दृष्टान्त अलंकार. सदाचारी नलराजा, दयार्द्र शिबीराजा, दानशूर कर्ण, निग्रही रावण अशा पौराणिक दाखल्यांपासून ते दैनंदिन जीवनात आढळणाऱ्या लहानसहान घटितांपर्यंत विविधांगी उदाहरणांनी त्यांचे अभंग नटलेले आढळून येतात. उदाहरणार्थ,
परिमळ म्हणूनी चोळूं नये फूल । खाऊं नये मूल आवडतें ॥
मोतियाचें पाणी चाखूं नये स्वाद । यंत्र भेदुनि नाद पाहूं नये ॥
कर्मफळ म्हणुनी इच्छूं नये काम । तुका म्हणे वर्म दावूं लोकां ॥
अशा छोट्या छोट्या साध्यासोप्या दृष्टान्तांचा आधार घेत त्यांनी ‘नातिचरामि’ अर्थात् ‘अति तिथे माती’ सारखा गहन अर्थ उलगडून दाखवला आहे.
सोनियाचें ताट क्षीरीनें भरिलें । भक्षावया दिलें श्वाना लागीं ॥
मुक्ताफळहार खरासि घातला । कस्तुरी सुकराला चोजविली ॥
वेदपरायण बधिरा सांगे ज्ञान । तयाची ते खुण काय जाणे ॥
तुका म्हणे ज्याचें तो चि एक जाणे । भक्तीचें महिमान साधु जाणे ॥
अशा शब्दांत ‘गाढवाला गुळाची काय चव, तेथे पाहिजे जातीचे!’ ही शिकवण देत गुणग्राहकतेचं महत्त्व ठसवलं आहे. पण आज मात्र डोळे उघडून पाहता वस्तुस्थिती काय आहे? ‘तुका म्हणे मद्यपानाचें मिष्टान्न । तैसा तो दुर्जन शिवों नये ॥’ अशी ‘दुर्जनांची लक्षणे’ सांगून जाणारे तुकाराम आज गायछाप चघळत फिरणाऱ्या नि गळ्यातली माळ कनवटीला लावून दारू पिणाऱ्या किती माळकऱ्यांना आठवतात? ‘आपण आपली स्तुती करी तो एक मूर्ख’ असं मार्मिक भाष्य करत त्यांनी विशद केलेली ‘मूर्खाची लक्षणे’ नुसताच विव्दत्तेचा आव आणत रूक्ष, समाजविन्मुख बडबड करणाऱ्या किती मराठमोळ्या वाचाळवीरांना उमजतात?
अवघ्या साधनांचे सार । न लगे फार शोधावे ॥
तुका म्हणे लटिके पाहे । सांडी देह अभिमान ॥
या अभंगात तुकोबांनी अहंकार त्यागून आत्मज्ञानाकडे जाणारा मार्गच श्रेष्ठ, म्हणून त्यास ‘अवघ्या साधनांचे सार’ या दृष्टीने पाहिलंय. आजच्या काळालाही लागू पडेल असं वास्तवी अध्यात्म मांडणारा हा आद्य महाकवी . . . सांप्रत लंगोटीला मोत्याची झालर लावून फिरणारे, प्रसिद्धीला हपापलेले, अफूबाज, बलात्कारी, चमत्कारी बाबा-बुवा-महाराजांचा सुकाळ आहे. अशा अवलियांची पायधूळ चाटण्याकरता त्यांची जामीनावर सुटका करवून घेण्यास्तव ‘अंधश्रद्धा निर्मूलन कायदा रद्द करा!’ म्हणत रस्त्यावर उतरून भांडणारे भाबडे पुरूष आणि ते तुरूंगाबाहेर येताक्षणी त्यांना पंचारतीच्या ताटानं ओवाळणाऱ्या निर्बुद्ध बायका पाहिल्यावर, ‘सांडी देह अभिमान’ यांना सांगणार कोण हा प्रश्न पडतो!
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदाभेद भ्रम अमंगळ ॥
अइका जी तुम्ही भक्त भागवत। कराल ते हित सत्य करा ॥
कोणाही जिवाचा न घडो मत्सर। वर्म सर्वेश्वरपूजनाचे ॥
तुका म्हणे एका देहाचे अवयव । सुखदुःख जीव भोग पावे ॥
या अभंगात या विद्रोही माणसानं सत्यधर्म स्मरून नि श्रेष्ठ तुच्छभेदाचे बुद्धिभ्रम टराटरा फाडून फेकून देऊन सर्व माणसांनी एका देहाचे अवयव ज्याप्रमाणे परस्परांचा द्वेष न करता एकजुटीने काम करतात त्याप्रमाणे एकवटून समाजाला भरीव योगदान देण्याचा विचार मांडलाय. वाईट अशाचं वाटतं की, ‘भेदाभेद भ्रम अमंगळ’ या कालातीत ओळी कागदावरच राहिल्या; प्रत्यक्षात मात्र ‘सैराट’ हेच वास्तव आहे!
‘फॅन्ड्री’ चित्रपटातील शेवटचा प्रसंग पाहताना का कोण जाणे पण तुकारामांच्या या ओळी एकदम अंगावर येतात. आधुनिक मंबाजींच्या भाऊगर्दीत ‘माणूस’ म्हणून आपलं खुजेपण वाकुल्या दाखवत राहतं. आणि हातातली गाथा अंधारात थरथरत शिलगावलेल्या मेणबत्तीप्रमाणे गच्च आवळून पुढं जात राहण्याची गरज मनोमन पटत राहते.
✒ लेखन - सायली
✆ मेल
संदर्भ :
१) तुकारामांची गाथा
२) छायाचित्र : टाकबोरू
वाचत रहा :
१) मानवतेचा पहिला बळी (विद्रोह)
२) बंडू गुरुजींचे संवादकौशल्य (लेख)
३) झुंजार - अंजली कुल्थे
{fullWidth}
✆ मेल
संदर्भ :
१) तुकारामांची गाथा
२) छायाचित्र : टाकबोरू
वाचत रहा :
१) मानवतेचा पहिला बळी (विद्रोह)
२) बंडू गुरुजींचे संवादकौशल्य (लेख)
३) झुंजार - अंजली कुल्थे