कथा

[वाचनकाल : १ मिनिट]
genie lamp symbolical magical stories

कथा – सत्तरीच्या दशकात कादंबरीला मराठी साहित्यविश्वातून हद्दपार करणारे माध्यम. पण कथेकडून असे का घडले याचा विचार केला तर कथेची मजबूत बांधणी पुढे येते. कमीत कमी काळात, कमीत कमी पात्रांच्या सहाय्याने आणि कमी स्थळांत जास्तीत जास्त परिणामकारकता दाखवून वाचकांच्या मेंदूची चिरफाड करून त्यास अक्षरशः चितपट करण्याची ताकद कथेमध्ये आहे. अर्थात नंतर मासिक कथांच्या पुराने कथेच्या मूळ ताकतीला डागणी लागली ती लागलीच. याच्या पुढे नायक नायिकांच्या पुळचट कथांचे पर्व सुरू झाले.

आता तर काही ठराविक समाजमाध्यमांवरील कथा म्हणजे कोणासही कोठेही बसून वाचता येणारे कामसूत्र! समाजमाध्यमांवरच्या कथांतून सामाजिक किडीला, कल्पनात्मक रगंवून, वाईटातील वाईट संदेश सजवून वाचकांच्या डोळ्यांपुढे मांडणे व प्रसिद्धी कमावणे हेच धंदे सर्वत्र सुरू आहेत.

कथा मनोरंजनात्मक असाव्या यात वादच नाही मात्र त्या मनोरंजनात सुद्धा कुठेतरी भाषेचे भान कथाकाराने राखले पाहिजे. लेखनशैली आणि महत्त्वाचे म्हणजे कथानक मजबूत असायला हवे. ‘टाकबोरू’वर साध्या छोट्या, फक्त अवांतर वाचनासाठी ते लघुकथा, दीर्घकथा, सत्यकथा, विनोदी कथा, ग्रामीण कथा, सामाजिक कथा सर्व प्रकारच्या कथा सापडतील. सवंगता आणि शृंगार यातील फरक समजून घेऊनच या कथा येथे अवतरतील. प्रत्येक भाषाशैली समान तोलणाऱ्या सर्वांगीण कथा असतील. प्रेमकथा, भयकथा, रहस्यकथा यात मात्र काहीतरी वेगळेपण असावे. यापैकी काहीच नसणाऱ्या कथा निदान वाचनीय तरी असाव्यात.

व्याकरणाचा खून करणाऱ्या किंवा भाषिक अस्मितेचा बट्ट्याबोळ वाजवणाऱ्या कथा किंवा दूरदर्शन मालिकांप्रमाणे रडवेल्या, पारिवारिक, दीर्घ नातेसंबंध कथामाला येथे प्रकाशित नसल्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत.


{fullWidth}

نموذج الاتصال