साधारण सातवी-आठवीच्या आसपास पाच-सहा पानांत मावला, ‘आनंदवन’चा तितकाच प्रवास जाणून आम्ही भविष्याकडे चालते झालो. ‘आनंदवन’च्या निर्मात्यास तर त्यात दोन पानभरही जागा मिळाली नसल्याचे आठवते आहे. प्रत्यक्षात मात्र बंडखोर व्यक्तिमत्त्वाला साजेसे वादळी आयुष्य जगलेल्या या ध्येयवादी तरूणाचा प्रवास – पुस्तकांची, मुलाखतींची पारायणे करूनही आकळत नाही. ‘बाबा आमटे’ नामक या माणुसकीच्या सूर्याला जाणण्याचा हा छोटासा प्रयत्न . . .
समोरच्या बर्थवरच्या तरूणानं हमालानं आदळलेली ट्रंक उघडून आपली वकिलीची पुस्तकं एकदा तपासून पाहिली आणि तो स्वस्थ बसला. अधूनमधून त्याची नजरानजर नववधूच्या लाल साडीत जीव लपेटून, खिडकीचे गज गच्च धरून कावऱ्याबावऱ्या डोळ्यांनी मदतीची याचना करणाऱ्या त्या सौंदर्यवतीशी होत होती. वरोड्याला आसमंत हादरवत दौडत चाललेल्या त्या रेल्वेतल्या त्या कुंकुमधारी नवविवाहितेनं आता घुंगट हनुवटीवर ओढून घेतला आणि भेदरून अक्षरशः थरथरू लागली. इतका वेळ अर्वाच्य भाषेत छेड काढत, अश्लील इशारे करत खिदळणाऱ्या तरूण इंग्रज शिपायांचा घोळका तिला कोणत्याही क्षणी घसटण्याच्या बेतात होता. स्टेशन सोडताना चुलत सासूच्या पाया पडायचं राहिलं म्हणून तिच्यावर करवादणारा नवरा गेला अर्धा तास चक्क रेल्वे स्वच्छतागृहात दडी मारून बसला होता. फर्स्ट क्लासचे सारे प्रवासी चिडीचूप बसून होते. १९४२ चे धगधगते दिवस होते ते. इंग्रजांनी दडपशाहीचं सत्र आरंभलं होतं. क्षीणसर विरोधही पायतळी निर्दयतेनं साफ चिरडला जात होता. बॅरिस्टर तरूणानं आपला दुखरा खांदा जरासा चोळला.
सात वर्षांपूर्वी क्वेट्टा शहरात भूकंप पुनर्वसनाच्या कामी जाताना रेल्वे एका वळणावर गचकन् तिरकी झाल्याचा दिवस त्याला जसाच्या तसा आठवू लागला. समोरच्या बर्थवर निजलेल्या जोडप्यावर कोसळणारी अवजड ट्रंक त्यांना चिरडून मोकळी होणार इतक्यात वरच्यावर स्वतःच्या अंगावर तोलल्यानं त्याच्या खांद्याचा भुगा होता होता राहिला होता.
‘हात खांद्यापासून कापावा लागेल!’ असं उत्तर दिलं होतं डॉक्टरांनी. हा सल्ला न मानता त्यानं गावातल्या वैदूकडून तुटलेली हाडं मसाज करून कशीबशी जुळवून घेतली होती. अधूनमधून तो खांदा अतिशय ठणकून आपल्या शाबूत असण्याची जाणीव करून देई. कोणत्याही हिरोगिरीचा हे गोरे बंदुकधारी खरपूस समाचार घ्यायला आणि दुसऱ्या खांद्याचंही भुसकट पाडायला समर्थ होते यात त्यालाही शंका नव्हती.
‘स्टॉप आय से!’
म्हणत हा युवक झटक्यात नवविवाहितेच्या पुढ्यातल्या इंग्रज शिपायासमोर ढालीसारखा उभा राहिला. शिपायाच्या आश्चर्यातिरेकाची जागा रासवट संतापानं घेतली. वकिलाचा इशारा गुर्मीत धुडकावून तो घमेंडखोर गोरा तसाच हात जोडून खाली पाहणाऱ्या त्या मुलीच्या दिशेनं एकेक पाऊल पुढं टाकू लागला आणि पुढच्याच क्षणी वकीलसाहेबांनी त्याची कॉलर खेचत त्याच्या बथ्थड नाकावर लागोपाठ तीन-चार ठोसे लगावले! चवताळलेल्या शिपायानं तिरीमिरीनं उभं राहत आरोळी ठोकली. भांबावलेल्या शिपायांच्या घोळक्यानं तरुणाला तुडवायला सुरुवात केली. बंदुकीच्या दस्त्याने त्याच्या शरीरावर बघता बघता लालसर रक्ताचे ओघळ जमले. आगगाडी वर्धा स्टेशनला थांबली. इतका वेळ शांतपणे मार खाणारा तो वकील इंजिनासमोर जाऊन ट्रॅकवर उभा राहिला आणि ओरडला;
‘आता चालवा ट्रेन!’
बघता बघता जमाव गोळा झाला, त्या सैनिकांच्या तुकडीचा कमांडिंग ऑफिसर तिथे उगवला आणि तापलेल्या गर्दीचा रागरंग बघून प्रकरणाची चौकशी करण्याचं वचन देत शिपायांच्या घोळक्यासह त्याने काढता पाय घेतला! ही घटना वाऱ्याच्या वेगाने गांधीजींना समजली, तेव्हा त्यांनी तोंडून उद्गार काढले,
न्याय के लिए इस हदतक लडनेवाला ऐसा निर्भय योध्दा शायदही कोई होता है। मेरी नजरमें यह ‘अभय साधक’ है। मै इसे इसी नाम से जानूंगा . . .!
आणि मग त्या अमर साधकानं न्यायाच्या लढाईसाठी आयुष्याच्या कित्येक तपांचा होम केला!
वास्तविक महाराष्ट्रातल्या वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाटच्या जमीनदार कुटुंबात आपल्या सात भावंडांसह मुरलीधरचं बालपण मखमली सुखातच गेलं. छोट्या मुरलीचं वाड्यातल्या कामवाल्या बायकांच्या गलिच्छ पोरांसोरांसह खेळणंबागडणं महसूल प्रशासनात मानाच्या हुद्द्यावरच्या देवीदास आमटे यांना पळभरही खपत नसे. आपल्या दर्जाचे जमीनदार – पंतसाहेब यांच्या श्रीमंत मुलांशी खेळण्याची सक्त ताकीद देऊनही मुरली त्या धाकदपटशाहीकडे साफ दुर्लक्ष करतो याची त्यांना प्रचंड चीड यायची. विचारसरणीच्या संघर्षाची पहिली ठिणगी ही अशी घरातच पडली. मुरलीनं बंडखोर वयाच्या टप्प्यात पाऊल टाकताच हा संघर्ष उत्तरोत्तर पेटत गेला.
देवीदासांचं कुलीन, मृदुभाषी, औपचारिकतेच्या मुशीत घडलेलं, कृत्रिमता कोळून प्यायलेलं व्यक्तिमत्व आणि शाळेची पायरी न चढलेल्या, बालिश उत्साहाने सळसळणाऱ्या, करूणेनं चटकन द्रवणाऱ्या, नवऱ्याच्या विरोधाची पर्वा न करता रंजल्यागांजल्यांच्या मदतीला परोपरी धावणाऱ्या लक्ष्मीबाई यांच्यात कित्येक योजनांचं अंतर होतं. कळत्या वयापासून मुरली ही न संपणारी दरी उघड्या डोळ्यांनी पाहत आला होता. हीच सांस्कृतिक, वैचारिक, मानसिक दरी आईला निराशेच्या खाईत घेऊन गेली. दोनदा मनोरूग्णालयात दाखल करावं लागलेल्या, वेडाच्या झटक्यांत मनाचा तोल ढासळलेल्या आईला फक्त मुरलीच आवरू शके. आपल्या ‘असंबद्ध’ आईची स्पंदनं त्याच्याइतकी कुणीच जाणू शकत नव्हतं. याच मानसिक आंदोलनांतून आईची ‘अव्यवहारी’ करूणाच आपली प्रेरणा बनल्याचं मांडणारा ‘द मॅडनेस ऑफ माय मदर’ हा हळुवार लेख पुढं मुरलीच्या हातून लिहिला गेला.
मुरलीधर मोठा झाला, तसा नागपूरच्या मिशनरी शाळेत जाऊ लागला. इंग्रजी तत्त्वज्ञानाच्या प्रभावातून त्याच्या लिखित भाषेचा बाज रूक्ष समाजसुधारकी न बनता एखाद्या प्रोफेसरसारखा काव्यात्मक बनला. वयाच्या चौदाव्या वर्षी मित्रांसह जवळपासच्या घनदाट जंगलांच्या सफरीत मुरलीधरला पाषाणयुगीन काळाप्रमाणे कीटक, सरपटणारे प्राणी आणि पानं खाऊन गुजराण करणारे माडिया-गोंड आदिवासी दिसले. त्यांनी कधी चाक पाहिलेलं नव्हतं. ‘भारत’ हा शब्दही त्यांच्या ऐकिवात नव्हता. त्यांच्या बायाबापड्यांच्या अंगावर धड कपडेही नव्हते. मुरलीधरला या साध्या माणसांचं सच्चेपण भावलं. अस्पृश्यांच्या व्यथायातनांनी त्याचं मन हादरलं.
कॉलेजला नागपुरात स्वतंत्र खोलीत नोकरचाकरांचा ताफा, उत्कृष्ट टेलरकडून शिवलेले रेशमी कपडे अंगावर चढून पांढऱ्याशुभ्र चकचकीत मडगार्ड नि आसनांना बिबट्याच्या कातड्यांचे अभ्रे जडवलेल्या लफ्फेबाज स्पोर्ट्स कार्स चालवणं, तासिका बुडवून सिनेमाची चक्क तीन तिकिटं काढून पिक्चरला पाय पसरवून मस्त ताणून देणं, ‘पिक्चर गोअर’ या मासिकात चित्रपटांची समीक्षणं लिहिणं हे खास जमीनदारी शौक मुरलीधरलाही होते. नॉर्मा शिअरर आणि ग्रेटा गार्बो या हॉलिवूड तारकांचा चाहता असलेल्या उमद्या देखण्या मुरलीधरानं त्यांना लिहिलेल्या पत्रांची आलेली उत्तरं उशाखाली जपली होती. पण मग एका क्षणी गडगंज वैभवाच्या या पसाऱ्याचाच त्याला मनस्वी वीट आला. तीन महिने विजनवास घेतला नि तडक नोबेलविजेत्या रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनचा रस्ता धरला. तिथल्या विश्वभारती विद्यापीठात बंगाली आणि टागोरांचे तत्त्वज्ञान यांचा सखोल अभ्यास केला.
मात्र स्वतःतल्या अंतर्विरोधांशी न संपणारी लढाई सुरू झाली. त्यांची ही अवाढव्य इस्टेट शतकानुशतकं शेतमजुरांच्या क्रूर शोषणावरच फोफावली होती. वडिलांनी इभ्रतीखातर धोशा लावला म्हणून नागपूर विद्यापीठातून एलएलबी करताना संपूर्ण काळ त्यांचं मन धावत होतं ते डॉक्टरकीत. बॅरिस्टर झाल्यावरही श्रीमंतांच्या गुन्हेगारी धेंडांना अलगद सोडवण्यासाठी कायद्याची पुस्तकं हातात धरायची नि कलमं बडबडायची हा वेदनेचा अध्याय गिरवावा लागत होता. परिणामतः जो लाव्हारस आत जन्मत होता, त्याचा उद्रेक त्याच्या अंतर्मनावर झाला अन् बाह्य रूपावरही.
अजागळ कपडे, दाढीचं खुंट, डोक्यावर जटा या अवतारात तो दलितांसह उच्चवर्णीयांच्या झगमगीत पार्ट्यांना जाऊ लागला तशी अशा उच्चभ्रू पार्ट्यांची निमंत्रणं बंद झाली. पिढीजात इस्टेट सोडून मुस्लिम स्मशानभूमीजवळच्या साध्या प्लॉटवर राहू लागला तसा लोकांच्या नजरेत ‘वेड्या आईचा वेडा मुलगा’ ठरला तो.
वरोऱ्यात वकिली करणाऱ्या आपल्या मुलानं ४२ च्या उठावात धरपकड झालेल्या कुडमुड्या क्रांतिकारकांचे मोफत खटले चालवणं, परदेशी कपड्यांच्या होळीत सहभागी होणं, रस्त्यावर उतरून ‘वंदे मातरम्’ म्हणत पोलिसांचा लाठीमार खाणं आणि आठवडे-आठवडे तुरूंगवास भोगणं देवीदासांना बिलकुल परवडणारं नव्हतं. पण ध्येयानं पेटलेल्या मुरलीधरनं स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतलीच.
त्यात भर म्हणून नगराध्यक्षपदाच्या पाटीवर ‘मुरलीधर देवीदास आमटे’ हे नाव चढून बसलं, तसं एक दिवस आक्रीत कोसळलं.
‘खुर्चीत बसून तुमचा साहेबराव झाला. कोणे एके काळी आम्हा मैलामजदुरांसोबत युनियन काढून भाषणं ठोकणारे तुम्हीच होतात वकीलसाहेब आणि तुम्हीच म्हणताय आमचे पगार वाढवायला शहरात विकासनिधीच नाही? फक्त एक दिवस मुसळधार पावसात डोक्यावर मैला वाहून न्यायला आमच्यात या सर आणि मग ठरवा!’
हे आव्हान स्वीकारत मुरलीधरनं ४० मैलावाहिन्या साफ करण्याचं वचन दिलं. रोज रात्री शहरातल्या घरांच्या परसाकडे जात मैला टोपलीत भरून मैलावाहिनीकडे डोक्यावर वाहून आणताना नगराध्यक्षांना शोषितांचा दबला हुंकार समजू लागला, मैलाकामगारांचा प्रश्न धसाला लावत पगारवाढ झाली आणि त्यानंतरही हा रात्रीचा परिपाठ सुरूच राहिला!
१९४६ साली वयाच्या बत्तीशीत मुरलीधरचं वैराग्य संपायचं काही कारण नव्हतं; पण त्याच सुमारास दूरच्या नातेवाईकाच्या अंतिम संस्काराला जावं लागलं, तशी त्या घरातल्या वृध्द नोकराला कपडे उचलताना मायेनं मदतीला धावणारी इंदू दिसली आणि त्यानं डायरीत लिहून ठेवलं,
मला त्याच क्षणी तिची-माझी लग्नगाठ बांधली गेलीय असं वाटलं . . .
वडील निवर्तलेल्या ६ मुली मागं उरलेल्या घरात मुलीकडच्यांना तक्रारीला वाव नव्हता, पण नवरदेव १२ वर्षांनी मोठा आणि पंचक्रोशीत विक्षिप्त म्हणून लौकिक पावलेला. नेहमी पहिल्या वर्गात येणाऱ्या इंदूसारख्या रूपवतीला स्थळांचा तुटवडा नसणार होता. तरीही मुरलीधरच्या त्यागी स्वभावाच्या प्रेमात पडून इंदूनं होकार भरला. लग्नाच्या बेडीत अडकल्याक्षणी मुरलीधरनं तिला मिठीत भरत आपली ध्येयवेडी स्वप्नं सांगत म्हटलं,
‘बैराग्याला कष्टानं साधलीस, तू आजपासून माझी ‘साधना’ आहेस!’
लग्नानंतर हे नवपरिणित जोडपं मुस्लिम स्मशानभूमीजवळच्या प्लॉटवर ‘श्रम आश्रम’ वसवून राहू लागलं. १९४७ नंतर एक संपूर्ण दशकच भारावलेल्या स्वतंत्र भारतीय मनांचं होतं. मुरलीधरनं सहभोजनाचे भरपूर कार्यक्रम घेतले. डोक्यावर मैला वाहून नेणारा मुरलीधर आता शोषितांचा ‘बाबा’ म्हणून ओळखला जाऊ लागला.
एका रात्री डोक्यावर मैला वाहून नेत असताना बाबांना फुटपाथवर अंगावरच्या जखमांमध्ये कृमी वळवळत असलेला एक विद्रुप महारोगी तडफडताना दिसला. भारतासारख्या देशात चार दशलक्ष महारोगी असेच खितपत विखुरलेत हे बाबांना माहीत होतं. दररोज मैला उचलून घृणेबाबत बोथट झालेलं बाबांचं मन त्या दृश्यानं हादरलं. घाईघाईत त्यांनी त्या महारोग्याच्या अंगावर एक कपडा टाकला आणि गांधीजींचा ‘अभय साधक’ तिकडून त्वरेनं निघून गेला! रात्रंदिवस फुटपाथवर महारोग्याऐवजी माझीच पत्नीमुलं असती तर मी काय केलं असतं हा विचार त्यांचं मन पोखरत राहिला. विनोबा भावेंपाशी त्यांनी महारोगांसाठी जीवन समर्पित करण्याचा आपला विचार बोलून दाखवला. भाव्यांचा सल्ला मानून वर्ध्याजवळ दत्तापूरला महारोग्यांची वसाहत उभारणाऱ्या मनोहर दिवाण यांची कार्यपद्धत समजून घेतली. ६ महिन्यात अल्सर साफ करणं, इंजेक्शन देणं, सडलेली हाडं बाजूला काढणं ही कामं शिकून घेतली. हवाई बेटांवर कुष्ठरोग्यांच्या जखमा भरता भरता कुष्ठरोगानं मरण पावलेल्या सेंट डेमियनचा त्यांच्यावर खोलवर प्रभाव पडला. १९४९-५० या कालावधीत जवाहरलाल नेहरूंच्या शिफारसीमुळे फक्त डॉक्टरांना करता येणारा कुष्ठरोग निदानावरचा अभ्यासक्रम ‘कलकत्ता स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन’ मधून पूर्ण केला. ‘चॅरिटी डिस्ट्रॉईज्, वर्क बिल्ड्स’ या तत्त्वावर सरकारकडून महारोगी सेवा समितीसाठी भाडेतत्त्वावर मिळालेल्या नि सापबिबट्यांनी भरलेल्या २० हेक्टर खडकाळ जंगलाला आमटे परिवारानं ‘फॉरेस्ट ऑफ ब्लिस्’ मानलं.
६ कुष्ठरोगी, एक गाय आणि १४ रूपये या भांडवलावर १९५२ला ‘आनंदवन’ची स्थापना केली!
खडकाला पाझर फोडून तहान भागवण्याकरता पाण्याची नुसती विहीर खोदतानाच ७ आठवडे लागले, तर २ वर्षांनंतर कसंबसं पहिलं पीक तरारून वर आलं. साधनाताईंना दिवसाला शेकडो विंचू मारावे लागत. बिबट्यांच्या हल्ल्यांची टांगती तलवार कायम डोक्यावर होती. पण आनंदवन पाहून भारावलेल्या ‘सर्व्हिस सिव्हिल इंटरनॅशनल’ या जागतिक सेवाभावी संस्थेनं आनंदवनाचं रूपडं बदलण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नांचं चीज झालं आणि तिथला त्या गोऱ्यांचा असा मुक्त वावर बघून आनंदवनात पिकलेली भाजीही विकत न घेणारी शेजारी गावांतली माणसं हरखून-शरमून गेली. म्हणता म्हणता आनंदनिकेतन कॉलेजसह उभारल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधांचा पसारा १८० हेक्टरपर्यंत वाढून २ हजारांहून जास्त लोकवस्तीच्या आनंदवनाला ग्रामपंचायतीचा दर्जा मिळाला. मैला, कचरा, सांडपाणी सर्व जिरवून सुपीक झालेल्या जमिनीत कपाशीचं पीक पंचक्रोशीच्या सरासरीहून दुप्पट झालं. हाच व्याप वाढल्याने नागपुरात २० हेक्टर जागेवर १९५७ ला ‘फॉरेस्ट डिवाइड ऑफ सॉरो’ अर्थात् ‘अशोकवन’ची स्थापना झाली. १९६०ला स्वित्झर्लंडच्या आर्थिक मदतीच्या बळावर ‘टिन कॅन प्रोजेक्ट’ची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यानंतर दोनच वर्षांत ‘मुक्तिसदन’ ही कुष्ठरोग्यांची नवी वसाहत उभी राहिली. ‘युवक प्रगती सहयोग’ हे शाळकरी मुलांचं भव्य शिबिर भरलं. नातलगांनी झिडकारलेल्या कुष्ठरोग्यांचं ते कमावू लागल्यामुळे त्यांच्या घरीदारी पश्चात्तापानं ओशाळून पुन्हा स्वागत होऊ लागलं आणि लाखो कुष्ठरोग्यांचे संसार फुलू लागले.
कॅलिडोस्कोपमधल्या रंगीबेरंगी चित्राकृती नजरेसमोर झपाट्याने झळकत जाव्यात तसे बाबांच्या व्यक्तिमत्त्वाचे बहुरंगी पैलू समोर येत गेले. त्यांची नजर होती द्रष्ट्या शिक्षणतज्ज्ञाची, धडपड्या कृषितंत्रज्ञाची आणि संवेदनशील समाजसेवकाची. मग १९६६ साली कुष्ठरोग बरा झालेल्या एका मुख्याध्यापकासह संपूर्णतः अंध शिक्षकांची ‘प्रकाशाची शाळा’ बांधली गेली. १९६७ ला १ हजार एकर जमिनीवर नवोन्मेषशाली शेती प्रकल्प निर्माण झाला. १९६८ ला पहिली श्रमसंस्कार छावणी उभारली गेली. आनंदवनातल्या वृध्दालयाला ‘व्हिसडम बँक’ ह्या संकल्पनेतून घडवलं गेलं. नुसत्याच कलमकसाई कारकुनांच्या कारखान्यांपेक्षा कलम आणि जमीन दोन्ही सारख्याच जिद्दीनं कसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘सोमनाथ विद्यापीठा’ची संकल्पना मांडली गेली.
कोणतीही एक विचारसरणी ‘हाऊ टू बिल्ड अ मॅन?’ या मूलभूत प्रश्नाचं उत्तर द्यायला असमर्थ असते हे बाबांनी भांडवलशाही नि साम्यवादी शोषणाचे किस्से वाचून ओळखलं होतं. आध्यात्मिक किंवा राजकीय संस्था चालवत नसल्याने, भारतातल्या मोठमोठ्या उद्योगपतींनी त्यांना देणग्या द्यायचा संबंध नव्हता. देशभरातल्या जनतेकडून मात्र नेहमीच आमट्यांच्या कार्यात खारीचा वाटा उचलला जात राहिला. बाबांनी मेधा पाटकर यांच्यासह नर्मदा बचाव आंदोलनासोबतच गोदावरी नि इंद्रावती नद्यांच्या अस्तित्वाचा प्रश्नही ऐरणीवर आणला. ‘ग्रीड विल अल्टिमेटली विन . . .’ हे हताश उद्गार काढताना त्यांनी चंडीप्रसाद भट यांच्या चिपको आंदोलनाचा आदर्श समोर ठेवण्याचा सल्ला दिला. हजारो हेक्टर गिळणाऱ्या मोठ्या प्रकल्पांच्या विरोधात शोषणमूलक विकासाच्या संकल्पनांना परखड आत्मपरीक्षणाची आवश्यकता असल्याचं प्रतिपादन केलं.
‘भारत जोडो’ ही संकल्पनाच मुळात प्रकाशात आणली ती बाबा आमट्यांनी. तुम्ही वयाच्या बाहत्तराव्या वर्षी पाठीचे मणके झिजल्यानं काढून टाकावे लागले असता तीव्र वेदना चेहऱ्यावर दिसू न देता व्हॅनमधून सायकलयात्रींसह सलग १०७ दिवस देश पिंजून काढू शकता का? त्या अवस्थेत, १९८४ मध्ये भारत जोडण्याच्या ध्येयानं पेटून त्यांनी ‘क्विट इंडिया’च्या धर्तीवर ‘निट इंडिया’(Knit India)चा नारा दिला होता. पंजाबच्या उग्रवादानं व्यथित होऊन प्रत्यक्ष दंगलीच्या भागांत तीनदा दौरे करून आवाहन केलं होतं.
त्यांनी आपल्या समाजकार्यात मदर तेरेसापासून जमनालाल बजाजांपर्यंत सर्वांचीच एकत्र मोट बांधली. राष्ट्रीय एकात्मता परिषदेत सदस्य म्हणून ते वर्षानुवर्ष देशाच्या एकतेसाठी अथक योगदान देत राहिले. ‘ज्वाला आणि फुले’, ‘उज्ज्वल उद्यासाठी’, ‘माती जागवील त्याला मत’ यांसारख्या युगप्रवर्तक विचारसुमनांची पुस्तकं लिहीत राहिले.
बाबांच्या ह्या निष्ठेला परिवाराची साथ लाभत गेली आणि समाजात ‘घराणेशाही’ चांगलीही असू शकते हा सुंदर वस्तुपाठ निर्माण झाला. १९७३ पासून विकासनं बाबांच्या साऱ्या संस्थांची प्रशासकीय घडी बांधली, तर १९७४ ला स्थापलेल्या लोकबिरादरी प्रकल्प आणि हेमलकसाची धुरा प्रकाशनं सांभाळली. नुसती मुलं–सुना(विकास–भारती, प्रकाश–मंदाकिनी)च नव्हेत, तर नातवंडं दिगंत, अनिकेत, आरती आणि अगदी पणती रूमानी या साऱ्यांमध्येच बाबांचा डीएनए जणू काही अखंड वाहत आहे!
या अवलियाच्या जीवनाचे कंगोरे उलगडण्याच्या ध्यासात वसंत कानिटकरांनी ‘वादळ माणसाळतंय!’ नाटक लिहिलं, तर विलास मनोहर यांनी ‘मला (न) कळलेले बाबा आमटे’ हा ग्रंथ. बाळू दुगडुमवार यांना ‘बाबा आमटे यांची गीते : आकलन आणि आस्वाद’ या ग्रंथासाठी महाराष्ट्र शासनाचा साहित्य पुरस्कार मिळाला. तारा धर्माधिकारी, भ.ग. बापट अशांसारख्या कित्येक लेखकांनी त्यांच्यावरची चरित्रं लिहिली. ‘विस्डम सॉंग : द लाईफ ऑफ बाबा आमटे’ या निशा मीरचंदानी लिखित प्रचंड गाजलेल्या चरित्राचा लीला सोहनी यांनी मराठीत अनुवाद आणला.
बाबांनी पद्मश्रीचा मान उंचावला ते साल होतं १९७१. वैचारिक घुसळणीचं एक अस्वस्थ दशक सुरू झालं होतं. मग पद्मविभूषणाचा मान लाभला. त्यानंतर रॅमन मॅगसेसे, टेम्पल्टन प्राईझ् आणि गांधी पीस प्राईझ् अशा पुरस्कारांची रीघ लागली. काऊन्ट आर्थर टॅमॉस्की यांनी ‘द अनबीटन ट्रॅक’ आणि ग्राहम टर्नर यांनी ‘मोअर दॅन कॉन्करर्स’ या ग्रंथात त्यांचा भरभरून गौरव केला. दिल्लीच्या ‘इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया’ मध्ये ‘क्वेश्चन ऑफ सर्व्हायवल’ या लेखात त्यांच्या संघर्षाला सलाम केला गेला, तर केरळच्या ‘द वीक’ मध्ये ‘प्रोफेट ऑफ न्यू इंडिया’ म्हणून आदरांजली वाहिली गेली. इंडिया टुडेसारख्या मासिकानं त्यांच्या कार्याला ‘द हीलिंग टच’ या शब्दांत, तर विजय पणशीकरांसारख्या लेखकांनी ‘फेलोशिप ऑफ पेन’ या शब्दांत गौरवलं.
मला थोर नेता वगैरे व्हायचं नाही. मला फक्त उपेक्षितांच्या जखमांवर तेल चोपडू शकणारा साधा मेकॅनिक व्हायचंय. टू मी द मॅन व्हू डझ् दॅट इज ग्रेटर दॅन एनी होली मॅन इन् सॅफरॉन कलर्ड रोब्ज्. ‘द मेकॅनिक विथ ॲन ऑईल कॅन’ . . . दॅट इज् माय आयडियल इन् लाईफ!
म्हणणाऱ्या बाबांना माणसापेक्षा कर्मकांड पुजणाऱ्या कोणत्याही धर्माला कडाडून विरोध होता.
‘जो धर्म माणसामाणसांत ऋणानुबंध प्रस्थापित करू शकत नाही, तो माणूस आणि देव यांच्यात कसला धागा जोडू शकणार?’ हा त्यांचा सवाल असे.
‘मनशांतीचा आंतरिक शोध म्हणजे अध्यात्म. हाच शोध बाहेरच्या दिशेला वळला की त्यालाच म्हणायचं विज्ञान! दोहोंचीही निर्मिती मनुष्यजन्माच्या उन्नतीसाठी!’
आजही २० वर्षांपासून पाठीच्या स्पॉडिलोसिसनं बिछान्यावर खिळलेल्या अवस्थेत पत्रकारांनी घेतलेल्या त्यांच्या सुरेख मुलाखती तुम्हाला सापडतील. ते ऐकणं म्हणजे एक सुंदर ध्यानधारणा आहे. ओंगळ समाजाचा दाह आपल्या मनावर उमटतो तेव्हा, काळाच्या पडद्याआड गेलेल्या त्यांना नव्यानं पाहण्या-ऐकण्याची नितांत गरज भासते.
तुम्हाला त्वचेवरचे बधीर चट्टे-डाग भयानक भासतात; पण नॉर्मल समाजातलं दारिद्र्य-विषमता हिडीस वाटत नाही? सायकॉलॉजिकल ॲनिस्थेशिया हा मानसिक कुष्ठरोगच.
हे ऐकता ऐकता धारदार नाकामागचे त्यांचे भेदक डोळे क्षणात लहान मुलासारखे निरागस भासतात आणि त्यातून एकसलग माणुसकीचा शाश्वत सूर्य वाहू लागतो.
• संदर्भ :• वाचत रहा :