
क्रोधभाव, लोभभाव, दंभभाव, मत्सरभाव, कामभाव असं वाचलंय कधी? यांना म्हणायचं रिपू मात्र प्रेमाला अन् मैत्रीला जोडायचा भाव – प्रेमभाव, मैत्रीभाव. असं का? या दोन भावनांत असं काय गौडबंगाल? त्यातही समोरील व्यक्ति भिन्नलिंगी असेल तर मैत्री आधी होते का प्रेम आधी जन्मतं यावर ‘पुढचा’ त्रास अवलंबून! त्या आल्हाददायक त्रासाबद्दल थोडंसं . . .
कोणत्याही भावनांची सरमिसळ करून माणूस नाती जोडतो. त्यातील मैत्री आणि प्रेम या दोन्ही भावना मानवी मेंदूतील इतर कोणत्याही भावनांपेक्षा थोड्याशा वरचढ किंवा वेगळ्या ठरतात. बव्हंशी नात्यात या दोन्ही भावना अंतर्भूत असतातचं. जिथे जिव्हाळा असतो तिथे एकतर मैत्री असते किंवा असतं प्रेम! उत्क्रांतीत या दोन्ही भावनांची इतकी उलथापालथ आपल्यात झालीये की आता त्या मानवी स्वभावाचा अविभाज्य घटक बनलेल्या आहेत – प्रेमभाव आणि मैत्रीभाव!
सामान्य दैनंदिन जीवनात जगत असणाऱ्या माणसाचं आयुष्य या दोन भावांभोवतीच घिरट्या घालत असतं. मैत्रीभाव व प्रेमभाव, एकमेकांवर अवलंबून आहेत. बाकीच्या भावना स्वावलंबी. उदाहरणार्थ घरातून निघाल्यावर अचानक एक सायकल (सायकलवाल्यासकट) येऊन तुम्हाला धडकते किंवा पावसाळ्यात तुम्ही मुलाखत द्यायला निघाला आहात आणि कोणीतरी तुमच्यावर वास्तविक चिखल उडवतो (आणि तुम्ही त्याच्यावर शाब्दिक) किंवा तातडीच्या कामासाठी निघाला आहात तेव्हा रस्त्यात उगाच कोणीतरी तुम्हाला शिवी देतो (तुम्ही तिथे मराठीस नवे अपशब्द घडवून देता) किंवा आपली जुनी ‘मांजर’ नव्या बोक्यासोबत आडवी जाते किंवा कोणीतरी पदपथ गुटख्याने सुशोभित केलाय, यासारख्या प्रसंगात राग, द्वेष, हिंसा, मत्सर, किळस आपोआप आणि एकेकट्या जन्म घेतात.
मैत्रीत/प्रेमात असं घडत नाही हे माझं निरीक्षण आहे. मैत्रीतून प्रेम पाझरेल अथवा प्रेमातून मैत्री जन्म घेईल. यातील एकाविना दुसरी भावना आपल्याला पछाडेल याची शक्यता फार कमी असते. ज्या मैत्रीत प्रेम नाही ती मैत्री आहे का? किंवा ज्या प्रेमात मैत्री नाही त्याला प्रेम म्हणता येईल का? निश्चितच नाही. या दोघी भावना कायम सोबत. परिणाम – जिव्हाळा, ममता, कनव, आपुलकी, माणुसकी हे आपल्याला मनाच्या मोठेपणाकडे नेणारे प्रतिसाद यांच्या मिलाफातून उगवतात.
प्रेमभाव आणि मैत्रीभाव यातील अतिमहत्त्वाचं काय ते कधी ठरवता येत नाही. या दोघांचा आपल्या जीवनावर असणारा प्रभाव तुलनात्मकरित्या रेखाटता येत नाही. या दोन्ही बाबी व्यक्तिपरत्वे बदलणाऱ्या. जणू मैत्री, प्रेम या दोन नद्या आहेत आणि आपण संगमातून पोहत आहोत; पण या दोहोंचा समन्वय जरूर काढता येईल, मधला मार्ग जरूर शोधता येईल. या लेखात मी ते ‘दोन’ मधले मार्ग (कोणते ते पुढे पाहू) भिन्न लिंगांसाठीच पडताळेन. कारण, माझे निष्कर्ष काढण्याचा तोच एक मार्ग आहे. तर मैत्रीण असणाऱ्या मित्रांनो आणि मित्र असणाऱ्या मैत्रिणींनो चला मूळ मुद्द्यात उतरूयात.
तुमची-माझी आला दिवस जगण्याची/रेटण्याची तत्त्वं असतात, गणितं असतात, मूल्यं असतात. माणसाची मूल्यं असावीत हे आपलं माझं मत (ज्याची बॅट त्याची बॅटींग!). तत्व असतानाच दगडी. ते हरेक ठिकाणी समान लागू करावं लागतं, त्यात लवचिकता कमी. याउलट गणितात वैश्विक एकता आली. ते इतिहासावर आधारित रितीने अचूक सोडवावं लागतं, त्यातले आडाखे योग्य असावे लागतात. गणित फक्त अनेक प्रकारे सोडवता येतं, अनेक दृष्टिकोनातून पाहता येतं एवढंच. प्रेम आणि मैत्रीवर सुरू केलेला लेख कुठे भरकटतोय असं वाटू शकतं मात्र विश्वास ठेवा आपण रुळावर आहोत. मूल्यं मात्र अनुभवावर आधारित असतात. ‘इथून पुढे एखादी गोष्ट अशी करायची/अशी करायची नाही’ ही समज म्हणजे जगण्याचं एक मूल्य. या बाबी तर आपण चुकांनंतरच ठरवतो ना? मग हे सर्व तुमचं, माझं, त्यांचं, हरेकाचं सारखं असेल तरी कसं!
आणि चुका – होत राहतात. चु-का हो-त रा-ह-ता-त . . . किती पुराणे, धर्मग्रंथ, उपनिषदं, वेद आले म्हणून माणूस चुकायचा थोडीच थांबलाय? शेवटी अनुभव हाच सर्वात मोठा ज्ञानस्त्रोत आणि म्हणून स्वाभाविक सवयी ही ज्ञान निर्मितीची साधने. स्वभाव तुमचा-माझा वेगळा, चुका याच्या-त्याच्या वेगळ्या, मूल्यं हरेकची वेगळी – मूल्यं नसली तरी माणसाचं काही अडत नाही पण जर असतील तर अतिउत्तम – मग हा प्रेम-मैत्रीचा गुंता तुमचा, माझा, त्यांचा, हरेकाचा सारखा असेल तरी कसा?
‘समन्वय’ जीवन जगण्याच्या काही ठळक मूल्यांपैकी एक आहे. प्रेम व मैत्री हे दोन्ही भाव तत्त्वांप्रमाणे अढळ नाहीत आणि गणिताप्रमाणे अचूक नाहीत त्यामुळे पाहिजे समन्वय, मधला मार्ग. यांचा समन्वय जीवनात समरसता आणतो जो झाल्यानंतर ‘मैत्रीप्रेम’ आणि ‘प्रेममैत्री’ असे दोन पर्याय निघतात.
मैत्रीप्रेम
आधी मैत्रीच्या स्वरूपात जन्मून भविष्यात प्रेमात बदललेला भाव. एकदा का मैत्रीप्रेम जडलं की मैत्रीचे काही बंध पुढे प्रेमाकडे झेपावताना मागे खेचत राहतात. तर आधीसारखी फक्त मैत्री ठेवणं नवं प्रेम शक्य होऊ देत नाही! मैत्रीप्रेमात फरफट होते खरी; पण त्यातून जे जीवन मिळतं त्याची परिभाषा वेगळी. एकीकडे भीती आणि दुसरीकडे निडरतेला सोबत घेऊन चालतो तो समन्वय – मैत्रीप्रेम.
प्रेममैत्री
हा थोडासा क्लिष्ट समन्वय. हा वाट्याला यावा अशी अपेक्षा कोणीच ठेवत नाही. मात्र तरीही आयुष्यात कधीकधी प्रेमाला काही अडचणींनंतर मैत्रीच्या नजरेतून पहावं लागतं. मैत्रीला पुढे (front foot) आणून प्रेमाला दूर (back foot) सारावं लागतं. मैत्रीतून प्रेमाचा प्रवास होणं सोपं असतं आणि हवहवसं. मात्र प्रेमाकडून प्रवास मैत्रीकडे व्हावा हे, त्यामानानं, अवघड आणि नकोनकोसं. यातही ओढाताण होतेच. दुःखाला एकीकडे आणि दुसरीकडे अपार सुखाला सोबत घेऊन चालतो तो समन्वय – प्रेममैत्री.
चुकीच्या पद्धतीने हाताळत गेलो तर पहिला समन्वय कुतरओढ आणतो आणि दुसरा नैराश्य. याउलट हे समन्वय जुळून आले तर माया, तमा, काळजी, आदर, विश्वास, कृतार्थता अशा काही सुंदर कल्पना वास्तवात जन्म घेतात! त्यामुळे प्रेम महत्त्वाचे की मैत्री या फंदात न पडता यांचा समन्वय शिकून घेणे महत्त्वाचे.
पण, परंतु, मात्र; सरळ सोपं मधल्या मार्गावर जगेल तो माणूस म्हणावा तरी कसा (आणि का)? जिथं मैत्री मिळतीये तिथं त्याला प्रेम हवं असतं जिथं प्रेमाचा वर्षाव होत असतो तिथं मैत्रीचा हट्ट. मग जिथं प्रेम द्यायचं तिथं माणूस मैत्री देऊन बसतो आणि जिथं मैत्रीस अबाधित ठेवायचं तिथे प्रेम देऊन पस्तावतो. तेव्हा काय? कधी कधी चूक सोसावीशी वाटते, कधी कधी वाटतं खरं काय ते मनातलं बोलून एका घावात कांडका पाडावा – खरं काय ते विचारून/सांगून एकदाचं मोकळं तरी व्हावं! काहीही केलं तरी नात्याला पैलू पडण्याची आशा असते तशी चरे पडण्याची भीतीही असते.
अडकित्त्यात अडकलेल्यांनो, काय निवडायचं हे तुम्ही ठरवायचं. चुकांतून. का मग प्रेममैत्री/मैत्रीप्रेम सुरू ठेवायचं, झुरत रहायचं, तुम्ही ठरवायचं. अनुभवांतून. मी फक्त या प्रेममैत्री आणि मैत्रीप्रेमात चार बोटांचं अंतर आहे हे वाचताना तुम्हाला व लिहिताना मला स्पष्ट व्हावं म्हणून कागद पेन जवळ केला. इतकंच. थांबतो.
[ ता. क. – लेख वरच्या वाक्यालाच संपलेला आहे. हे स्वत:शी किंवा माझ्याशी संवाद साधण्यासाठी तुम्हाला काही प्रश्न. तुम्ही पूर्वीच्या चुकांतून काय शिकलात? आता तुम्ही प्रेममैत्रीच्या त्रासातून जात आहात की मैत्रीप्रेमाच्या? तुमच्यासाठी महत्वाचं काय प्रेम की मैत्री? ]
{fullwidth}
मस्त 👍
उत्तर द्याहटवाधन्यवाद. वाचत रहा, आवडेल ते साहित्य आपल्या मित्रमैत्रिणींना, समविचारी व्यक्तिंना पाठवत रहा.
हटवा