लोकहितवादी

[वाचनकाल : १० मिनिटे] 
लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, lokhitwadi gopal hari deshmukh
किती एक लोकहितवादीची मतें विपरीत व हिंदुधर्मास विरुद्ध भासतील, परन्तु हा त्यांचा मिथ्या भास आहे; कारण की, त्यांत हिंदुधर्मास कांही विपरीत नाही. फक्त मूर्खपणास मात्र विपरीत आहे.


काळाच्या पुढे झेप घेणाऱ्या द्रष्ट्यांपैकी एक ‘गोपाळ हरी देशमुख’ म्हणजेच शतपत्रे लिहिणारे ‘लोकहितवादी’. आज त्यांचा २००वा जन्मदिन! त्यानिमित्त ‘शतपत्रे’चा हा आजच्या घडीतला आढावा. पुरोगामी विचारांचा प्रवाह खुला करत असताना आपल्या लेखणीतून अनिष्ट रूढींवर कठोर प्रहार करणारे लोकहितवादी आजही टीकेचे बळी का ठरत असावेत . . .
 
माझी सर्व जनांस एवढीच विनंती आहे की, तुम्ही सर्व जण विचार करण्यास लागा, वाचावयास लागा, नवीन ग्रंथ व वर्तमानपत्रे वाचा व तुमचे शेजारी काय होत आहे याचा विचार करा. इंग्रजांमध्ये किती एक चांगले गुण आहेत व ते तुम्हास प्राप्त व्हावे म्हणून ईश्वराने त्यांची तुमची संगत घातली आहे हे लक्षात आणा. सारासार पहा, परंपरा आंधळ्याची माळ लावली म्हणून तीच चालवू नका, धर्मशील ईश्वरतत्पर व्हा. या गुणांवाचून सर्व व्यर्थ आहे. सत्य बोला, दुष्ट वासना सोडा, धर्मसुधारणा करा, म्हणजे टाकू नका. परंतु त्याचा अर्थ घ्यावयाचा तसा काळ पाहून घ्या. ईश्वरासंबंधी व जगासंबंधी ज्ञान सर्व लोकांस वृद्धिगत करा. आळस सोडा, तुमच्यामध्ये वास्तविक बुद्धिमान असेल त्यास पुढारी करा. त्याचे अनुमताने चाला. सर्व लोकांची जूट असू द्या, आपसांत फूट नसावी हे ध्यानांत वागवा. विद्या अधिक होऊन तुमचें पाऊल पुढे पडू द्या. सर्व देशाची काळजी प्रत्येक जणाने करावी. राज्य कसें चाललें आहे व राजा कोण त्याची वर्तणूक कशी हें पहात जा. माहीतगार व्हा.
 
हे कळकळीचे शब्द आहेत लोकहितवादींनी लिहिलेल्या शंभराव्या पत्रातील. वर्तमानपत्रात लिहिलेल्या शतपत्रांचा इत्यर्थया मथळ्याच्या १००व्या पत्रात त्यांनी आपल्या सुधारक विचारांच्या लेखनाचा हेतू स्पष्ट केला आहे. गोपाळ हरी देशमुखयांनी लोक काय म्हणतीलयाचा यत्किंचितही विचार न करता लोकहितवादीया टोपणनावाने स्वकीयांना उद्देशून १०८ पत्रे प्रभाकरया साप्ताहिकात १८४८-१८५० मध्ये लिहिली. लोकहिताचा विवेकपरखडपणे मांडणाऱ्या ह्या पत्रांना आपण शतपत्रेम्हणून ओळखतो.
तत्कालीन ब्रिटिश अधिपत्याखाली असणाऱ्या भारताच्या भौतिक, सामाजिक आणि धार्मिक अधोगतीची कठोर मीमांसा त्यांनी या शतपत्रांतून केली आहे; अनेक सामाजिक विषयांवर परिणामकारक चर्चा केली आहे. मुळात संख्येने १०० असलेल्या या पत्रांत त्यांनी संस्कृतविद्या’, ‘पुनर्विवाह’, ‘पंडितांची योग्यता’, ‘खरा धर्म निर्माण करण्याची गरज’, ‘पुनर्विवाह आदी सुधारणाही पाच आणि अधिक तीन अशा आठ निबंधांची भर घातली. लोकहितवादींनी समाजहिताला प्राधान्य देऊन सर्वांगीण सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठीचा आग्रह धरला होता. आपल्या समाजातील दोषांवर त्यांनी टीका केली. जवळजवळ १७० वर्षांपूर्वी लिहिलेल्या या शतपत्रांमध्ये त्यांनी ज्या दूरदृष्टीने आपली निरीक्षणे नोंदविलेली आहेत, ती थक्क करणारी आहेत. आजही समाजापुढे असलेल्या प्रमुख समस्यांवरचे उपाय यात दडलेले आहेत. लोकहितवादींनी सुचविलेले हे उपाय आज, १७० वर्षांनंतरही कालसुसंगत असणे हे एकाच वेळी विस्मयकारकही आहे आणि काहीसे क्लेशदायकही!
लोकहितवादींनी सामाजिक परिवर्तनाचा विचार बुद्धिवादी भूमिकेतून मांडला. शब्दप्रामाण्यापेक्षा बुद्धिप्रामाण्यावर भर दिला. ज्या स्मृतिकारांच्या वचनांना पायाभूत मानून पंडित व पुरोहित वर्गाने समाजरचना संवर्धित केली त्या स्मृतिकारांबद्दल लोकहितवादींनी रोखठोक शब्दांत लिहिले,

मनूचे वचन असो, याज्ञवल्क्याचे असो; ‘बुद्धिरेव बलीयसीअसे आहे. शास्त्रास एकीकडे ठेवा, आपली बुद्धी चालवा. विचार करून पाहा. घातक वचनांवर हरताळ लावा.

पत्र क्रमांक १५ मध्ये लोकहितवादी लिहितात,

मनूने असें ठरविलें आहे की, ब्राह्मणाच्या स्त्रीने एक वेळ नवरा मेला तर पुनरपि लग्न करूं नये, तिणे आयुष्य तसेच घालवावें किंवा आपल्यास जाळून घ्यावे; परंतु मनु हा जर ईश्वरांश होता, तर त्याने अशीही सत्ता पृथ्वीवर कां प्रगट केली नाही की, जर आपण असे शास्त्र केलें तर असेही करूं की कोणी एकेही ब्राह्मणाचे स्त्रीचा नवरा मरणार नाही? प्रथम स्त्री मरावी, नंतर नवरा मरावा असा क्रम जर पृथ्वीवर घातला असता तर मी म्हटले असते की, मनू हा ईश्वर होता व ब्राह्मण हें ठीक करितात. आणि मनू हा ईश्वरअंश असे मी समजलों असतों. परंतु ज्यापेक्षा तसें नाही, मरावयाचे ते मरतात व जगावयाचे ते जगतात, त्याचा बंदोबस्त मनूच्याने कांही होत नाही; शास्त्रे करून त्यास लोकांस सांगावयास मात्र येतें, घात चुकत नाही, असे आहे, तर मग त्यास फिरविण्यास काय चिंता आहे?
 
सर्वांनी असा कट करावा की जे आपल्या देशांत पिकेल तेंच नेसू, तेच वापरू कसेंहि असो. कापूस विकणारांनी असा बेत करावा कीं इंग्रजांस इकडे तयार केलेली कापडे द्यावीं, परंतु कापूस देऊ नये. येणेकरून हे लोक सुखी होतील. कांच, कापड, सुरी, कात्री, लाकडी सामान, घड्याळे ही सर्व आपले लोकांनी करावयास शिकावें. इंग्रजांचे देशचे सामान बंद करावें; किंबहुना आपलें सामान त्यांस द्यावे, परंतु त्यांचे आपण घेऊ नये. जो इकडे उत्पन्न होईल तितका माल घ्यावा. विलायती कापड घेऊ नये. यास्तव आपणांस जाडीं, मोठी कापडे नेसावयास लागली तर काय चिंता आहे?

अशा प्रकारे स्वदेशी व बहिष्कारया जोडगोळीचा मंत्र लोकहितवादींनी लोकांना शिकविला. इकडे उद्योगधंदे वाढवा, परदेशी जिनसा घेऊ नका’, असा त्यांनी आग्रह धरला आणि हे सर्व सन १८४८-४९ मध्ये! न्या. रानड्यांनी स्वदेशीवरील पहिले व्याख्यान देण्यापूर्वी जवळजवळ दोन तपे आधी! म्हणजे लोकहितवादींची शिकवण अकाली व अस्थानी नव्हती.
स्वदेश, स्वधर्म आणि स्वजाती याबद्दल लोकहितवादींना प्रेम वाटत होते. इंग्रजी राज्य, त्यांच्या विद्या याबद्दलचा त्यांचा आदरभाव आणि गौरव हा कालोचित होता. बदललेल्या परिस्थितीचा अधिकाधिक फायदा आपल्या समाज-बांधवांनी घ्यावा, त्यांनी नैतिक, आर्थिक, सामाजिक प्रगती करावी अशी त्यांची उत्कट इच्छा होती. विधिनिषेधरूप धर्माचे मूळ, ‘जातीविषयी विचार’, ‘नीतिप्रशंसा’, ‘धर्मसुधारणाआदी पत्रांतून आपला धर्मसुधारणाविषयक विचार त्यांनी मांडला आहे.
पत्र क्रं. ६४ - धर्मसुधारणाया पत्रात त्यांनी धर्मसुधारणेची सोळा कलमे सुचवली. त्यांपैकी ही काही कलमे.

प्रत्येकास आपले विचाराप्रमाणे आचार करण्याची व बोलण्या लिहिण्याची मोकळीक असावी. त्यास प्रतिबंध असू नये’, ‘स्त्रीपुरुषांचे अधिकार धर्मसंबंधी कामांत व संसारांत एकसारखे असावे’, ‘मनुष्यमात्रास तुच्छ मानू नये. जातिअभिमान नसावा’, ‘आचारापेक्षा नीति प्रमुख मानावी’, ‘स्वदेशाची प्रीति व त्याचें कल्याण मनात वागवावें’, ‘ज्यास जो पाहिजे तो त्याने रोजगार करावा’, ‘सरकाराहून प्रजेचे अधिकार अधिक उत्तम असावे, म्हणजे जे जे रयतेच्या हिताचे कायदे आहेत, ते सरकारशी भांडून घेत जावे’, ‘विद्यावृद्धीकरिता सर्वांनी मेहनत करावी. दुःखितास सुख, रोग्यास औषध, मूर्खास ज्ञान व दरिद्रयास द्रव्य शक्तीनुसार देण्यास अंतर करूं नये’, ‘सत्याने सर्वांनी चालावें, सत्याचे विरूद्ध वर्तणूक करू नये’, ‘विद्या व ज्ञान संपादन करण्यास सर्व सारखे, अशी मोकळीक असावी’.


ज्ञान ह्या विषयासंबंधीचे लोकहितवादींचे चिंतन शिक्षणक्षेत्रातील आजच्या सर्वच धुरिणांनी अभ्यासण्यासारखे आहे. पाठ म्हणणें ही विद्या केली कोणीं? यांत फळ काय?’ असा प्रश्न विचारत लोकहितवादी म्हणतात,


गुजराथी लोकांत मजूरदारांकरवून शोक करवितात, तद्वत हे भट अक्षरें मात्र म्हणतात. यांचे अंतःकरणास कांही भेद होत नाही. परकी करून रडतात, ते रडणें कोणी मायेचें म्हणेल काय? तद्वत पाठ यास कोणी देवांची स्तुती करतात, असे म्हणावें कीं काय?’

म्हणजेच, राजस्थानातील उच्चवर्गीयांत शोकप्रसंगी शोक करण्यासाठी पैसे देऊन रुदालींना रडण्यासाठी घरी बोलाविले जात असे, त्यांच्यात आणि विविध विधीसमयी धर्मग्रंथांतील विविध मुखोद्गत वचने बोलून दाखवणार्‍या पौराहित्य वर्गात फारसा फरक नाही असे ते पाठ करण्याची चालया आपल्या ७७व्या पत्रात लिहितात. इंग्रजांनी त्यांची केलेली भौतिक प्रगती ते पाहत होते, त्यामुळे समाजाने फक्त तोंडाचीमजुरी करण्याऐवजी विविध नवनवीन पुस्तके वाचून व भौतिक विद्या आत्मसात करून बौद्धिक मजुरी करणे कधीही उत्तम, असे ते ठामपणे मांडतात.
 ‘भारतीयांत असलेला वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभावयाविषयी ते इंग्लिश समाजाचे उदाहरण देऊन खूपच मार्मिक टिप्पणी करतात. ते असा मुद्दा मांडतात की,

इंग्रजांना आकाशातील ग्रहतार्‍यांविषयी वा झाडावरून खाली पडणार्‍या फळाविषयी कसलेही आश्चर्य वाटत नाही. कारण तेथील लोकांनी या सृष्टिनियमांची शास्त्रीय कारणमीमांसा शोधून काढलेली आहे. याउलट आपण ह्या निसर्ग-घटना पाहून आश्चर्यमूढ होतो. आणि त्यातूनच आपण हतबल होऊन कर्मकांडाच्या खोल गर्तेत अधिकच अडकून पडतो.

लोकहितवादींचे हे निरीक्षण आजही आपणा भारतीयांना चपखल बसते. प्राचीन काळी भारतात संस्कृतमध्ये संशोधनात्मक ग्रंथनिर्मिती झाली खरी, पण त्या संशोधनात पुढे सातत्य न राखले गेल्याने साचलेपण आले. व्यासांचे पाच हजारांपूर्वीचे निरीक्षण हे त्या काळातील जरी उत्तम संशोधन असले, तरी ते आपण काळाच्या कसोटीवर तपासून घेण्यास कचरतो’, हेही ते नमूद करतात.
पत्र क्र. २२ मध्ये लोकहितवादींनी मांडलेली जातिभेदांविषयीची मते अगदी स्पष्ट आहेत. पंडित, शिपाई, सावकार आणि चाकर असे भेद भारतासह इतर देशांतही आहेत. पण इतर देशांत ते वर्ण-वंशपरंपरेने मिळत नाहीत. वाण्याचा मुलगा बुद्धिमान असेल तर त्याला पंडितांत स्वीकारला गेले पाहिजे आणि पंडिताच्या मुलास पांडित्यात आवड नसेल तर त्याचे पोट भरण्यासाठी त्याला चाकरी करता आली पाहिजे.  त्यांच्याच शब्दांत सांगायचे झाले तर, ‘कर्में करून जातीचा आणि वर्णाचा निश्चय असावा’.
पत्र क्रं ५४ - इंग्लिश राज्यापासून फळमध्ये लोकहितवादी म्हणतात,

हिंदुस्थानचे लोक हे फार मूर्ख व धर्मकर्म सोडून अनाचारास प्रवर्तले. ते असे की, सती जाण्याची चाल, मुलें मारावयाची चाल, तीन वर्णांची नीच स्थिति, ब्राह्मणांचे माहात्म्य, विद्या क्षणिक, अतिशय गर्व, संपूर्ण देशाचे लोक आम्हांपुढे तुच्छ व आम्ही श्रेष्ठ. तेव्हा हा भाव हिंदू लोंकांचा मोडण्यास व त्यांस ताळ्यावर आणण्यास परदेशांतील सुधारलेले लोक यांची व त्यांची गांठ घालून देण्यापेक्षा उत्तम उपाय दुसरा काही आहे, असे वाटत नाही. यास्तव या देशात ईश्वराने इंग्रजांची प्रेरणा केली आहे.

इथे लोकहितवादींनी इंग्रजांची व इंग्रजी राज्याची तरफदारी करण्यात कोणतीही देशद्रोही भावना व्यक्त झालेली नाही. त्यांनी व्यक्त केलेले सुधारणावादी विचार हे समाजविघातक होते असे म्हणता येणार नाही. फक्त त्यांनी तत्कालीन ब्राह्मणवर्ग व प्रामुख्याने भट-भिक्षुकांचा वर्ग यांच्या समाजघातकी व परंपराप्रिय विचारसरणीवर प्रखर आघात केले एवढेच! याच पत्रात पुढे लोकहितवादी म्हणतात,

लोकांच्या पायांतील शृंखला सुटतील. हे चहों देशांत जाऊन व्यापार करूं लागतील, विद्वान् होतील व आपले देशांत कापड जिन्नस तयार करावयास शिकतील. तेव्हा सुखी होतील. शहाणे झाले, म्हणजे हळूच इंग्रजांजवळ म्हणतील की, आम्हांस तुमच्या देशांत आहे तसे पार्लमेंट द्या. नंतर आपले लोक त्यामध्ये बसूं लागले म्हणजे हळूच म्हणतील की, तुम्हासारखे आम्ही शहाणे आहों, मग आम्हास आधिकार कां नसावे? लोकांचें बहुत मत असे पडलें, म्हणजे सरकारास देणे अगत्य आहे. इकडील लोक राज्याचे कारभार वगैरे चांगले करू लागले, लाच खावयाचे सोडून दिलें, म्हणजे बहुतकरून मोठाली कामे गव्हर्नरांचीसुद्धा यांचे हाती येतील आणि मग अर्थातच इंग्रज फक्त व्यापार मात्र करून राहतील आणि आपले लोक पार्लमेंट व राज्य भोगतील. राज्यकारभारांत व व्यापारांत त्यांस महत्त्व प्राप्त होईल आणि मग परदेशांशीदेखील व्यापार करतील.

इथे त्यांना असे सुचवायचे होते की, इंग्रजांसारखे शिक्षण येथील भारतीय जनतेस मिळाले तर त्यांच्या पायांतील विविध शृंखला तुटून ती सुज्ञ होईल, नव्या व्यापारात, नव्या विद्येत ती निपुण होईल आणि मग स्वतःहून इथली जनता इंग्रजांना सांगेल की, तुम्ही आपल्या देशास परत जावे. आपले गुरूत्व आम्हाला नको. तुम्ही व्यापारापुरते इथे येऊ शकता. स्वातंत्र्य चळवळ सुरू होण्याआधीच्या शंभर वर्षे त्यांनी केलेले हे भाकीत पुढे अगदी खरे ठरले! क्रांतिकारकांनी, नेत्यांनी इथल्या इंग्रजांना चले जावअसे सुनावून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. पुढे नव्वदच्या दशकात इतर देशांना व्यवसायांसाठी भारताची दारे खुली करून मुक्त आर्थिक उदारीकरणाचे धोरणही इथे राबवले गेले.
आर्थिक बाबतीतही त्यांची मते अभ्यासू आहेत. लोकहितवादींच्या काळात  इंग्रजांच्या वैभवाने व कर्तृत्वाने बहुसंख्य भारतीय दिपून गेले होते; पण इंग्रजांच्या व्यवसायवृद्धीमागील भांडवलसंचयाची व कारखानदारी व्यवहाराची कसलीही कल्पना येथील लोकांस नव्हती. इंग्रज येथे आल्याने भारतीय मजुरांना काम मिळू लागले व त्यांना चार पैसे मिळू लागले, त्यामुळे त्यांची प्रगती होत आहे’, चक्क असा विचार बंगालमधील बर्‍याच पुढार्‍यांनी तेव्हा मांडला होता. लोकहितवादींनी मात्र खरे तर भारत निर्धन व बेकार होत आहेअसे अचूक अर्थशास्त्रीय विश्लेषण करून स्वदेशीचा पुरस्कार केला. येथील भारतीयांनी कारकुनी सोडावी, नवनवीन विद्या शिकून विविध मालाचे उत्पादन करावे व इंग्रजांनी बळकावलेल्या आपल्या मोठ्या बाजारपेठेचा पुरेपूर वापर करावा असा त्यांनी तेव्हा दिलेला उपदेश काळाच्या किती पुढे होता याची प्रचिती आजही आपल्याला येते आहे. उद्योगनिर्मितीवरच न थांबता, कमीअधिक प्रमाणात कमावलेल्या संपत्तीचा विनियोग कसा करावा याविषयीही ते काही उपाय सुचवितात.
इतरही बर्‍याच सामाजिक प्रश्नांवर त्यांनी आपल्या अफाट प्रज्ञेने विस्तृत लिहिले आहे. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन स्वतःची उन्नती साधावी. अंधश्रद्धा, भोळ्या समजुती व संकुचित विचार यांचा त्याग करावा, असे ते सांगत. भारतीय समाजातील जातीव्यवस्था ही समाजाच्या अधोगतीला कारणीभूत झालेली आहे असे त्यांचे मत होते. म्हणून त्यांचा जातीव्यवस्था, वर्णभेद याला विरोध होता. उच्चवर्णीयांनी आपल्या वर्णश्रेष्ठत्वाच्या कल्पनांचा त्याग करून देशहितासाठी नव्या आचारविचारांचा अंगीकार करावा असे त्यांनी म्हटले होते. लोकहितवादींनी बालविवाह, हुंडा, बहुपत्नीत्वाची पद्धती अशा अनिष्ट प्रथांवर टीका केली. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने अधिकार मिळाले पाहिजेत. त्यांना शिक्षण व विवाह याबाबत स्वातंत्र्य असावे, विधवांना पुनर्विवाह करण्याचा अधिकार असावा असे विचार त्यांनी स्पष्टपणे मांडले होते.
सुधारणावादाचा विचार मांडणारे आणि स्वकीयांवर प्रखर टीका करत त्यांचे दोष त्यांच्या लक्षात आणून देणारे तत्कालीन सुधारकांमधील हे महत्त्वाचे सुधारक होते. विज्ञान, तंत्रज्ञान, तत्त्वज्ञान, भूगोल, व्यापार, कायदा, अर्थ, आरोग्य अशा विविध विषयांवरील ज्ञानभांडार असलेली भाषा आत्मसात करून भारतीयांनी आपली आर्थिक, शारीरिक, सामाजिक भरभराट करावी असा अगदी स्पष्ट व्यवहारी संदेश ते देतात.
हे सर्व त्या काळात त्यांनी त्यांच्या वयाच्या अवघ्या २५व्या वर्षी लिहिले, यावर आजच्या काळात विश्वास बसणे कठीण आहे. पाश्चात्त्य आणि भारतीय समाजातील सूक्ष्म फरक आणि त्यावरील उपाययोजना त्यांनी ज्या पोटतिडकीने ह्या शतपत्रांत मांडली आहे ते वाचून आपण विस्मयचकित होतो. विविध विषयांवर अभ्यास करून त्यावरील चिंतनाद्वारे जे हाती लागले ते समाजापुढे कोणाचीही भीडभाड न बाळगता, निर्भयपणे मांडणे हे प्रमुख वैशिष्ट्य शतपत्रे वाचताना आपल्याला पानोपानी जाणवते. लोकहितवादींचे विशीतले तरूण, बंडखोर वय आणि विषयांची स्फोटकता पाहता त्यांनी वापर केलेल्या फटकळ भाषेतून त्यांची कळकळच जाणवते. अर्थात, तेव्हाच्या रूढीप्रिय आणि कर्मठ समाजाला लक्ष्य करून सडेतोडपणे लिहिल्याने त्यांच्यावर त्याही काळात बरीच टीकाही झाली. इथल्या समाजाचे दोष अधोरेखित करण्यासाठी इंग्रज समाजाची जरा जास्तच स्तुती केल्याने त्यांना समकालीनांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
 ‘शतपत्रेह्या प्रमुख लिखाणाबरोबरच समकालीन ज्योतिराव फुलेयांना त्यांच्या शाळेच्या कामात मदत करणे असो किंवा पंढरपूर येथे अनाथाश्रम सुरू करणे असो किंवा मुंबई-पुणे-अहमदाबाद येथे विविध वृत्तपत्रे स्थापन करणे असो, लोकहितवादींनी त्यांत सक्रीय सहभाग नोंदविला होता. लहानमोठी ४० पुस्तकेही त्यांनी लिहिली. समाजपरिवर्तनाच्या प्रक्रियेला चालना देण्याचे कार्य लोकहितवादींनी आपल्या लेखनातून केले. शतपत्रेहा त्या लेखनाचा एक अंश होय. तरीही खऱ्या अर्थाने स्वतंत्र आणि बुद्धिवादावर आधारित लेखन शतपत्रांतूनच झाले आहे, असे मला वाटते. सामाजिक सुधारणा हा त्याचा केंद्रबिंदू आहे. आपल्या लोकांची धार्मिक रूढीग्रस्त परंपरेतून मुक्ती, त्यांना आत्मपरीक्षण करण्यास प्रवृत्त करावे ही तळमळ ही त्यांच्या सुधारणाविषयक लेखनाची प्रेरणा दिसते. ब्राह्मणवर्गातील वर्णश्रेष्ठत्वाची भावना आणि समाजातील जातिभेद दूर करण्यासाठी, स्त्रियांच्या परिस्थितीत सुधारणा घडून यावी म्हणून त्यांनी लेखणी उचलली. समाजनिरीक्षण करून तो सुधारण्याचे त्यांनी सुचविलेले मार्ग आजमितीसही रास्त वाटतील.
वर्तमानपत्रात लिहिलेल्या शतपत्रांचा इत्यर्थया मथळ्याच्या १००व्या पत्रात त्यांनी आपल्या सुधारक विचारांच्या लेखनाचा हेतू स्पष्ट केला आहे. या पत्रात ते असंही लिहितात,

हें लिखित शतक कोणी बाळबोध अथवा मोडी छापून मुलांस लिखितासारखें वाचनास दिले तर बहुत नफा होईल. यास्तव या ग्रंथावर लोकहितवादी आपली सत्ता ठेवीत नाही. पाहिजे त्यांनी हीं पत्रें छापून प्रगट करावी. किती एक प्राचीन काळचे लोकांस किती एक लोकहितवादीची मतें विपरीत व हिंदुधर्मास विरुद्ध भासतील, परन्तु हा त्यांचा मिथ्या भास आहे; कारण की, त्यांत हिंदुधर्मास कांही विपरीत नाही. फक्त मूर्खपणास मात्र विपरीत आहे.

समाजात कोणतीही क्रांती होण्याअगोदर समाजाची वैचारिक मशागत होऊन त्यासाठी बहुतांशी जनमत अनुकूल होणेहा एक फार महत्त्वाचा टप्पा असतो. लेखकाची भूमिका त्यात महत्त्वाची असते. समाजाच्या हितासाठी एका तरूणाने तळमळीने लिहिलेली ही कालातीत शतपत्रे महाराष्ट्राच्या चिकित्सक परंपरेला शोभतील अशा एखाद्या लेण्यांप्रमाणे आहेत. अशा ह्या निर्भीड विचारवंताचे आज, त्यांच्या २०० व्या जन्मदिनी अभीष्टचिंतन!
 
 
  लेखन – जान्हवी
  मेल
 
 
संदर्भ :
१) शतपत्रे (लोकहितवादी)
२) छायाचित्र टाकबोरू
 
वाचत रहा :


आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال