काव्य

[वाचनकाल : १ मिनिट]
chirping birds and blooming flowers

कवी आणि त्यांच्या कविता यांचे साहित्यिक क्षेत्रातील स्थान अबाधित राखण्याचा आमचा पहिला प्रयत्न असेल. केवळ काही चंद शब्दांत मानवी मनाची विण उसवून त्यात उतरणाऱ्या ‘कविता’ या साहित्य प्रकाराची होणारी परवड ही साहित्य क्षेत्रास पोषक नाही. कविता म्हणजे शब्द आलटून-पालटून लिहिलेल्या ओळींची यमकाने झालेली सांगता नाही, कविता तर कल्पनाशक्तीत रमलेल्या मनाच्या उत्तुंग भरारीचे पंख किंवा कठोर लयबद्ध वास्तव.

कवितांना बळकटी देणारे ठिकाण बनवण्याचे ध्येय आम्ही बाळगून आहोत. दोन ओळींच्या कविता, चारोळी यांसारखे नव्यानेच रुजू पाहणारे अथवा गझल आणि शेरशायरी सारखे भाषेच्या सौंदर्यात भर पाडणारे साहित्य प्रकार, लघु आणि दीर्घ कविता, एखाद्या छंद वा गणवृत्तास वाहिलेलं काव्य, मुक्तक आणि बरंच काही!

कवितेस जी हास्यास्पद, हेटाळणी युक्त जागा आज वाचकवर्गात मिळाली आहे ती सुद्धा स्वतःला ‘नवकवी’ सारखी बिरुदे उगाचच चिटकवलेल्यांमुळेच. वैयक्तिक या मंडळीवर ‘टाकबोरू’चा रोष असण्याचे संभवत नाही मात्र दिवसातून शिंक किंवा बेडका आल्यासारखा वारंवार ‘होतात’ म्हणून कविता करणाऱ्यांचे हे स्थळ नाही. कविता हा झटपट प्रकार नाही, आठवेल तेव्हा ‘करण्याचा’ प्रकार नाही. तर कवितेतील एकेका शब्दासाठी झगडावे लागते, संघर्ष करावा लागतो. तुकारामांसारखा आद्यकवी जिथे होऊन गेला त्या मातीतील कवितेची ही दयनीय अवस्था अर्थातच आम्हास मंजूर नाही, मंजूर नसेल.

इथे बळजबरी यमकात किंवा गणिती पद्धतीने जुळवलेल्या कवितांचा सुमार, त्यामानाने, कमी असेल. कविता ही वाचताना डोळ्यांना जितकी भावली पाहिजे तितकेच मनात उतरून तिने एक नवा दृष्टिकोन पेरायला हवा, एक परिवर्तन घडवून आणायला हवे तरंच तिला काहीतरी अर्थ आहे. अन्यथा, मुळात विनोदी नसतानाही, त्या श्रेणीत मोडणाऱ्या कवितांचा पूर येतोच आहे. स्वयंघोषित ‘काव्यसम्राट’ किंवा ‘काव्यसम्राज्ञी’ वगैरे इथे सापडण्याची शक्यता तीळमात्र. कारण, इथे कवितेवर जीवापाड प्रेम करून त्यांना जोजवणाऱ्या लेखण्यांची टोळी आहे. मन-मेंदूला बऱ्यावाईट भावनांचा तडाखा देणाऱ्या कविता इथे सापडतील.

कवितेच्या शब्दा-शब्दातून विद्रोह झिरपला पाहिजे, करुणा नितळली पाहिजे, प्रेम उतरले पाहिजे, विनोद किंवा वास्तव उमटले पाहिजे तरच ती कविता. अशा दर्जेदार, भावस्पर्शी, ‘फटाकेदार’, सुरस नवरसातील काव्य येथे सापडेल. कविता बदलून ‘काव्य’ हे नाव स्वीकारणे इथून या बदलाची सुरुवात असेल.


{fullWidth}

نموذج الاتصال