
कोसळत होता तो माणूस गेलं वर्षभर. पण म्हणालो, मीच कोसळतोय, बाबा तू थांब जरा. कौटुंबिक कारणे असोत की इतरही तो कोसळत गेला. भावनिक कारणं की इतरही असोत मी कोसळत गेलो. झालं काय? वर्षभरानंतर मी पाय गाडून उभाय. तो कोसळला की नाही सांगता येणार नाही कारण करकरत कोसळल्याचा आवाजच झाला नाही. त्याच्या जंगलात जाऊन सत्य तपासता येईलही मात्र ते धाडस कोणात उरलंय? पण झाडाची उपमा कमावलेला माणूस आमच्या सावलीचा आधारस्तंभ असणार बहुदा . . .
आणाभाकाशपथा
गाढवाच्या अवयवांसाठी
राखून जगणारा मी
तरी तुझ्या लग्नाची बातमी
वर्षभरानंतर धडकल्यावर हादरलोच
दु:ख वैगेरे काही नाही पण
निदान कळवलं असतंस कदाचित
तुझी आईही अद्याप मेली असावी
काय माहीत
तू सुखी झालीस व्हावीस
असंही नाही मनात
तू कोण
तरी या हादऱ्यात कविताबीविता लिहायचो
म्हणून भल्या सकाळी आपल्या
सर्व एकत्रित मित्रांना फोन करून
बाहेर काढायला लावल्या त्यांच्या रिश्टर स्केल
चिंधीवरही लिहिणाऱ्या मी
मुद्दाम कागद शोधण्यात
वेळ घालवला
निवांत दात घासले
संडासवरून आलो
कपडे धुतले
पेन शोधला
शेवटी काहीच उरलं नाही
तेव्हा उरलेल्या एकमेव मैत्रिणीला
मेसेज केला
तुझ्या दोस्तीनीचं लग्न झालंय कदाचित
तुझंही झालं असेल
पण ते कळेलंच पुढच्या वर्षी
असं करा तुम्ही खंदा मोठ्ठा खोल खड्डा
आणि मिळून गाडा मला त्यात
कारण मी असणं
तुम्हाला सलत राहणारच
कितीही लग्नं केलीत तरी
परिणाम साधला गेला
या सर्वाने
खदखदून येणार होती जी कविता
तुझ्यासाठी
राहिली
{fullwidth}