
१ मे १९६०. मराठी भाषिकांच्या प्रांतवार रचनेतून ‘महाराष्ट्र’ राज्याचा उदय, ही ऐतिहासिक घटना. मात्र त्यासाठी कित्येक वर्षे दिला गेलेला लढा त्यातील चढउतार याविषयी जनमानसांत आजही तितकीच आत्मीयता (आणि स्थान) आहे, जितकी शालेय शिक्षणात मराठीला! दैनंदिन वापरातही हल्ली मराठीवर आलेलं सावट आणि मुळची मराठीबाबतची अराजकीय (हा शब्द महत्वाचा) अनास्था दूर करण्यास थोडा हातभार लावावा या दृष्टीने भाषेवर प्रचंड प्रेम आणि भाषेतील तितकीच ज्ञानसंपदा यांचा सुवर्णमेळ असणाऱ्या डॉ. ताराबाई यांची ट्विटर सांस्कृतिक मंडळाने ‘स्पेस’ आयोजित केलेली होती . . .
[इथे फक्त माहिती देत आहे. व्याख्यान ऐकण्यासाठी ‘स्क्रोल’ करा ↓]
डॉ. ताराबाई यांच्या पुणे विद्यापीठातून प्राप्त झालेल्या पीएचडीचा विषय होता ‘मराठी पौराणिक नाटकांची जडणघडण’ (प्रारंभ ते १९२०), सोबतच संतसाहित्य, लोककला, भाषा हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय. पूर्वी शिक्षिका असणाऱ्या ताराबाई आत्मीयतेने श्रोत्यांसमोर (म्हणजे विद्यार्थ्यांसमोर) मराठी भाषेची वीण उलगडताना ही स्पेस घडत गेली. भाषा नामक हिमनगाचे शिखर पाहणेच फक्त तासादोनतासांत शक्य आहे आणि याचाच प्रत्यय ही चर्चा ऐकताना आपणासही येणार आहे. हे व्याख्यान जास्तीत जास्त भाषाप्रेमींपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी तुमची!
या स्पेसमध्ये बऱ्याच मुद्द्यांवर आशयघन चर्चा घडली. ती प्रत्येक बुद्धिवंताने संपूर्ण ऐकावी अशीच आहे. टाकबोरूच्या नव्या यूट्यूब चॅनलला भेट देऊन ती चर्चा आपण ऐकणार यात शंका नाही तरी तिचे ढोबळ स्वरूप खाली देत आहोत.
चर्चेतील प्रश्न आणि उत्तरादाखल त्यात आलेले मुद्दे;
प्रश्न १: मराठी भाषेचा उगम साधारणत: कधीचा?
‘मराठी’ उगमाचा पुराव्यांतून मागोवा आणि त्यासोबत एकंदरीत निसर्गतः होणारी प्राकृतिक (प्राकृत) भाषानिर्मिती, शब्दोच्चारामागील शारीरिक प्रक्रिया, ध्वनीनिर्मितीमागील विज्ञान, भाषेतील विरामचिन्हे, खुणा, संकेत यातून जन्मणाऱ्या अर्थबोधावर थोडंस.
प्रश्न २: मराठी लोककलांचा उगम कोठून झाला? लोककलांतून झाला का?
शिक्षणापुढे जाऊन भाषिक व्यवहारातून झालेली साहित्यनिर्मिती, अभिनय/भावनिर्मिती त्यातून पुढे नाट्यनिर्मिती, वाद्यनिर्मिती, संगीतनिर्मिती यावर आणि शारीरिक श्रमांतून लय, ताल, चाल, हुंकार यांचा अविष्कार आणि त्यायोगे झालेली संस्कृतीची जडणघडण यावर. लोकपरंपरा प्रसाराच्या साधनांवर. (लोककला, जात्यावरील ओव्या, कांडणगीते, गोंधळी गीते, संतसाहित्य, गवळणी, अभंग, भारुडे, अंगाई, पाळणागीते, कापणीगीते, कोळीगीते, पहाडी गीते, पर्जन्यनृत्य, संगीतवाद्ये, कातकरी नृत्य, इत्यादी).
प्रश्न ३: इतक्या निरनिराळ्या बोलीभाषांतून, त्यांच्या प्रकारांतून प्रमाणभाषेची सांगड कशी घातली गेली?
भाषाशास्त्रानुसार भाषा आणि बोली (language and dialect) यातील अंतरावर, भौगोलिक स्थळ, काळ यांचा भाषेवर पडणाऱ्या प्रभावावर, भाषेचे कार्य आणि कार्यपूर्ती यावर. बोलीभाषांतील अर्थच्छटेची काही उदाहरणे. प्राकृत मराठी ते सद्यकालीन/समकालीन (प्रमाण) मराठीत घडत गेलेली स्थित्यंतरे, बोलीभाषेतून संतपरंपरेत होत आलेली ज्ञाननिर्मिती आणि संतपरंपरेतील कन्नड आणि मराठी भाषिकांच्या संस्कृतीतील दुवे यावर.
प्रश्न ४: मराठी शाळांची घटत जाणारी संख्या पाहता भविष्यात मराठी ही केवळ एक अभ्यासक्रमातील भाषा उरेल का? आणि हे संकट कसं पेलता येईल?
हा प्रश्न वेळेअभावी अनुत्तरीत.
प्रश्न ५: महाराष्ट्र नवनिर्माणावेळी भाषावार प्रांतरचना नक्की कशी केली गेली आणि ती कशी यशस्वी झाली?
चर्चीलेले मुद्दे: भाषावार प्रांतरचना ही भाषिक बाहुल्यातून जन्मलेली राजकीय संकल्पना. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे उगमस्थान आणि शालेय जीवनातील संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या आठवणी. आर्य-द्रविड भाषिकांचा मेळ. बेळगाव सीमावाद. भाषिक सीमानिर्मिती पुढील सांस्कृतिक आव्हाने.
प्रश्न ६: नव्या शैक्षणिक धोरणात पहिलीपासून हिंदी समाविष्ट करण्याच्या विरोधात जी समकालीन चळवळ उभारणी होतेय यावर आपलं मत काय?
देशभरात संस्कृतीचा संगम असला तरी मातृभाषेला वाव का असावा यावर स्वानुभवातून प्रकाश. बालमनांची जडणघडणघडण प्रक्रिया, त्यात मातृभाषेचे योगदान आणि मातृभाषेची गरज, आपली भाषा मुलांवर कानवळणी, तोंडवळणी आणि अंगवळणी पडण्यासाठी जावा लागणारा काळ याचा सर्वांगीण विचार त्रिभाषा सूत्र घेवून आलेल्या नव्या शैक्षणिक धोरणात होतोय का? यावर ठोस भूमिका.
प्रश्न ७: कालानुरूप मोडी लिपी सोडून देवनागरी स्विकारली म्हणून ही भाषेची पडझड/इतर भाषांचा वाढता प्रभाव या बाबी आपल्या वाट्यास आल्या का?
मोडी लिपी म्हणजे नक्की काय? तिचा वापर कोणत्या स्तरातून झाला? मग देवनागरीचा शिरकाव कधीचा? तंजावूरच्या ग्रंथालयातील पुरावे काय सांगतात? लिपी आणि भाषा यांचा अंतरसंबंध काय? लिपी आणि उच्चारण यांचा अंतरसंबंध काय? इंटरनॅशनल अल्फाबेट्स फेनॉटिक मॉडल आणि त्यांचे प्रयत्न?
श्रोत्यांचे प्रश्न;
प्रश्न १: अनुवादित बालसाहित्य लहान मुलांच्या वाट्यास येण्याचं प्रमाण घसरलं याचा भाषेत गोडी निर्माण होण्यावर काही परिणाम झाला आहे का?
शिकवण्यातील तांत्रिकता घालवून ताललयबद्धता (रिथॅमॅटिक) आणता येईल का? बालसाहित्य अनुवादित साहित्य भाषेत आणण्यासाठी बहुभाषिकतेची गरज. स्वातंत्र्यपूर्व काळातील आंतरभारती सारख्या कल्पना आणि शाळाबाह्य भाषा शिक्षणाचे झालेले पूर्वप्रयत्न आणि त्यातून भविष्यात करता येण्याजोगी तरतूद.
प्रश्न २: दिल्लीतील संमेलनात दिलेल्या अध्यक्षीय भाषणातील विठ्ठल वर्णन मांडताना, मराठी भाषेचा जन्म मांडताना आपल्या भावना काय होत्या? आणि वाद-विवादाशिवाय पार पडलेल्या अध्यक्षीय निवडणूकीवर काय सांगाल?
आयुष्याच्या उत्तरार्धात अपघातात्मकरित्या मिळालेले हे अध्यक्षपद. संपूर्णत: उस्फुर्ततेतून आलेलं भाषण आणि माझे भाषण हा सर्व मराठी भाषिकांचा आवाज. संतपरंपरेतून आलेलं विठ्ठलवर्णन.
जोडप्रश्न: भाषा इतिहासात वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी आपण श्रोत्यांना कोणती पुस्तके सुचवाल?
शिक्षणावर, नाटकांवर, समुहमनातून परत जन्म घेणाऱ्या फॅशनवर, खाद्यसंस्कृतीवर आणि वाटचालीत कामी आलेल्या पुस्तकांवर.
डॉ. तारा भवाळकर यांनी वरील चर्चासत्रात सुचवलेली पुस्तके:
- लोकायत – देवीप्रसाद चट्टोपाध्याय
- लज्जागौरी – रा. चि. ढेरे
- द गोल्डन बॉफ़ – सर जेम्स जॉर्ज फ्रेजर
- लोकसाहित्याची रूपरेखा – दुर्गा भागवत
- भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास – वि. का. राजवाडे
- पुराणकथा आणि वास्तवता (Myth and Reality) – दामोदर धर्मानंद कोसंबी
- सीतायन – डॉ. तारा भवाळकर
[ टीप : मुलाखतीच्या कोपऱ्यात दिसणारा ‘Watch on youtube’ हा पर्याय निवडून यूट्यूबला भेट द्या, कारण तिथे सारांशात प्रश्नानुसार वेगवेगळे भाग केलेले आहेत. धन्यवाद. ]
{fullwidth}