घरातल्यांचा ‘डिग्री मिळवलीस आणि तरी घरी बसून आहेस,’ असा तक्रारीचा सूर चंदूमागे होता. स्थानिक दैनिक त्याला दरमहा चार हजार रुपयांवर बोलवत होतं; पण चंदूने ते नाकारलं शेवटी हातखर्चाला पैसे सुटावेत म्हणून चंदू ‘दादाचा सल्ला’ हे सदर तयार करून पुरवू लागला. चहा पाण्याची सोय झाली खरी मात्र तरीही जिथे मोठ्या विचारवंतांचे खून झालतेत त्या महाराष्ट्रात आता कशासाठी राहायचं? हा प्रश्न त्याला सतावत होता.
पाऊस न पाडणारे ढग सरकत जावेत तसा कोरडा, बेकार काळ चंद्रहास अनुभवत होता. त्यातच लीलाचं लग्न ठरलं. तो शेतकी विषयातला प्राध्यापक होता. साठ हजार रुपये मासिक वेतन म्हणजे सुखच सुख!
लीला एकदाच रस्त्यात भेटली. म्हणाली, “चंद्या, तुला डी.जे. आवडत नाही हे ठाऊक आहे मला. वरातीत येऊ नकोस, पण दुपारी जेवायला तरी ये ना! उगाच भाव नको खाऊस.” पण चंद्रहास गेला नाही. उत्साहच नव्हता.
आपलं एकेक माणूस कायमचं दूर जातंय. लीलासुद्धा आता परकी झाली ही जाणीव चंद्रहासच्या मनावरचा दबाव वाढवू लागली. त्याने वर्तमानपत्र चाळताना त्याच्या राशीचं त्या दिवशीचं भविष्य वाचलं. ‘भरभराट होईल!’ असं छापलेलं होतं. चंदू जोरात हसला.
“एक दिवस वेडा होशील हो! स्वत:शीच हसतोय मेला!” आई करवादून बडबडली. घरच्या माणसांपासूनही आपण मनाने दूर सरकतोय याची जाणीव चंद्रहासला हल्ली वारंवार होऊ लागली.
लग्न करून, आपल्यासारखं दिसणारं, ‘बघा, बघा, मी बाप झालो, मी ‘पुरुष’ आहे हो’ असा अप्रत्यक्ष गाजावाजा करायला लावणारं मूल जन्माला घालून आपण काय साधतो? लीलासारखी हुशार पोरगीही घरातच सासरी चेपली जाणार ना, असं काय काय मनात उसळत राहायचं. नदीकाठचा एकांत बरा वाटायचा. पण मूलबाळ नसलेली हिरू तिथे येऊन नको तेवढं लगट गोड बोलणं करू लागली, तेव्हा चंदू सावध झाला. तिचा नवरा भलताच भांडग्या, तापट तात्या होता. त्यामुळे हिरगी नदीवर जायची, ती वेळ चंदू टाळू लागला. एखाद्या सैल, उनाड बाईला आपलं शरीर वापरू देणं हे त्याला कमीपणाचं वाटत होतं. त्याचा एखादा वर्गमित्र त्याच्या जागी असता, तर त्याला मोठेपणा वाटला असता. संसार करणाऱ्या कोकणातल्या बायका काही सरसकट गैरवर्तनी नसतात, पण अपवाद होतेच! ते असतातच!
“बायकांची लैंगिक उपासमार आपण लक्षातच घेत नाही. कधीकधी तर त्यांचं लग्नही मनाविरुद्ध झालेलं असतं.”
चंद्रहास योगेनकडे बोलून गेला. योगेन पालेकर आखाती देशात जायला निघाला होता. ‘मोबाइल टॉवर्स’ बांधण्याची कंत्राटं घेणाऱ्या कंपनीत त्याला त्याच्या काकांच्या ओळखीवर चांगली नोकरी मिळाली होती. पालेकर तसा ‘रफटफ’, पण देश सोडताना हळवा झाला. म्हणाला, “चंदू, मी नीट सेट झालो की, तुलाही बोलावतो आमच्या कंपनीत. मराठी माणसाने मराठी माणसाला हात दिला पाहिजे यार! आपण भांडत बसतो. भेदभाव करतो. हा कोकणी, तो घाटी असले फरक मराठी माणसातच करतो. चुकीचं आहे हे. माझ्या संपर्कात रहा. गल्फला जातोय म्हणजे काही चंद्रावर नाय जात. मी तुमचाच आहे!”
पालेकर परदेशी गेल्यावर मात्र त्याचा कोणताही संपर्क चंदूशी राहिला नाही. नव्या व्यवसायात तोच कदाचित अडचणीत असेल, असं मनाचं समाधान चंद्रहासने करून घेतलं. दिपोली हे चंदू राहायचा ते तालुक्याचं गाव. त्याला मात्र सावरी गाव अधिक आवडायचं. खरं कोकण वाटायचं ते. हिरवी-पोपटी निसर्गसृष्टी एकेका नैसर्गिक रोपवाटिकेच्या रूपात तिथं उभी होती. त्या रोपवाटिकांच्या संगतीत चंदूला वाटायचं, आपणही एक मिशीवालं फुलपाखरू आहोत! आपल्या मनाला पंख फुटले आहेत. पूर्वी सुचत नव्हत्या अशा कल्पना आपल्याला हल्ली सुचताहेत. ही कल्पकता बातम्यांसाठी उपयोगी नाही. आपण सावरी गावात भटकताना जे सौंदर्य अनुभवतो, ते ललित लेखनासाठीच उपयोगी आहे. मग मानकरांना त्याने सदर लिहिण्याबद्दल विचारलं. ते ढग गडगडावेत तसे पुन्हा हसले.
“आमचे ‘सदर’ लेखक ठरलेले आहेत. त्यांच्यात तुला कसं घेणार? तुझ्या नावावर एखादं गाजलेलं पुस्तक आहे का?”
हे ऐकल्यावर चंद्रहास हिरमुसला. ‘आम्हाला संधी तर द्या!’ हे म्हणणं त्याच्या मनातच राहिलं. मानकरांनी त्याला प्रेसजवळच्या गुऱ्हाळात उसाचा रस पाजला. बाकी कसलंही आश्वासन दिलं नाही. तेवढ्यात मानस दिसला. उन्हात लालबुंद झाला होता. त्याला तृतीय वर्षाला ‘के.टी.’ बसली होती. शिवाय त्याची शाखा वेगळी होती; पण तो नेहमी चंदूशी बोलायचा. आग्रह करून करून त्याने चंद्रहासला आपल्या घरी नेलं.
“चांदोबा, तू खूप छान आहेस रे. आवडतोस मला.” असं मानस म्हणाला. तेंव्हा चंदू थोडा गोंधळला. एखादी प्रेमळ मुलगीच आपल्याशी बोलतेय असं त्याला वाटलं. मानसचं घर म्हणजे भाड्याच्या दोन खोल्या होत्या पण बंगल्यातल्या होत्या. अभ्यासाला एकांत चांगला होता.
“इथे नीट अभ्यास होऊ शकतो, मग तुला के.टी. कशी?”
“माझं शिक्षणात लक्ष लागत नाही रे. आपलं कुणी आहे असं वाटतंच नाही.”
“म्हणजे? मी समजलो नाही.”
“आमच्यासारख्या पोरांची बाजू घेणारं कोण आहे या देशात? आणि पालकर गेला तसं परदेशातही जाता येणार नाही मला. अर्थात तो आमच्यातला नव्हताच.”
“म्हणजे? जातीबद्दल बोलतो आहेस का तू . . . ते थांबव. मी जातपात मानत नाही.”
“मी तरी कुठं मानतो? पण आमची ‘कम्युनिटी’च वेगळी आहे चंद्या.”
चंद्रहासच्या डोक्यात आता हळूहळू प्रकाश पडू लागला. ‘एलजीबीटी’चा विषय अभ्यासक्रमातच होता. कलम ३७७ वर टीपही लिहायला आली होती. म्हणजे हा मानस ‘गे’ तर नसेल? तसं चंदूने थेट विचारलं. त्याने जराही अस्वस्थ न होता होकार दिला. मानसच्या मुलीसारख्या वागण्याचा, बोलण्याचा, प्रेमळ दृष्टीचा, मुलांबद्दल ओढ वाटण्याचा एकेक संदर्भ आता लागू लागला.
{fullwidth}