टिक-टिक वाजते डोक्यात!

 [वाचनकाल : ४ मिनिटे]
हसणाऱ्या मेंदूचे कार्टून, cartoon of smiling brain

आपल्यासोबत दररोज फार नवनवीन गोष्टी घडतात. या घडणाऱ्या गोष्टी सोप्या वाटत असल्या तरी त्यामागे खूप रंजक कारणे लपलेली असतात. आपण जेव्हा या एकेका गोष्टीचे निरिक्षण करतो, माहिती मिळवतो तेव्हा आपल्याला आनंद मिळतो, आपल्या ज्ञानात भर पडते‌ असेच कधी डोक्यात आपोआप वाजणारे टिकटिक गाणे तू ऐकले आहेस का? जर वाजत असेल तर ते का वाजते याचा विचार केला आहेस का?

सकाळी झोपेतून उठल्यानंतर, रात्री झोपताना, खेळताना, उगाच बसलेले असताना नाहीतर दिवसात कधीही तुझ्याही डोक्यात आपोआप गाण्याची टिकटिक वाजते का?
     म्हणजे बऱ्याच वेळा बघ, तू झोपेतून उठल्यानंतर कधी तुझ्या डोक्यात अचानक गाणे वाजलेले तू अनुभवले आहेस का? म्हणजे बघ की आजूबाजूला टिव्ही चालू नाही. रेडिओ चालू नाही. कोणी मोबाईलवर गाणे लावलेले नाही. तुझ्या शेजारी कोणी गाणे लावलेले नाही आणि कोणी गाणे म्हणत सुद्धा नाही. मग तुला गाणे ऐकू येते ते कसे? व कोठून? ही तर गंमतच आहे!
     जे गाणे तू अलीकडे कधीतरी, कुठेतरी ऐकलेले असते तेच तुला आता ऐकू येत असते; पण कसे काय? काही वेळेस ते गाणे तू फार आधी ऐकलेले सुद्धा असू शकते. असे गाणे का ऐकू येत असेल? याचा तू कधी विचार केला आहेस का? हा डोक्यात गाणे वाजण्याचा जो प्रकार आहे तो सर्वांसोबत घडतो का हा विचार तू केला आहेस का? आधी मला सांग तुला अशी अचानक गाणी ऐकू येतात याचे तू निरीक्षण केले आहेस का?
     निरीक्षण म्हणजे आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या छोट्या-छोट्या गोष्टींकडे काळजीपूर्वक लक्ष देणे. त्या गोष्टी जाणून घेणे. अशा निरीक्षणातून आपल्याला प्रश्न पडतात. मग त्या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घ्यायचा असतो. कारण उत्तरे शोधताना आपले ज्ञान वाढते. आपण हुशार होतो.
     अशा छोट्या-छोट्या निरीक्षणातून काही प्रश्न शास्त्रज्ञांना पडतात मग ते काय करतात? तर शोध घेतात. म्हणजेच निरीक्षणातून पडलेल्या प्रश्नांचा शोध घेता-घेता शास्त्रज्ञ तयार होतात! हे शास्त्रज्ञ लोक कायम नवीन शोध लावत असतात. अशा एका निरीक्षणामुळे सापडलेल्या शोधावर मी आज तुला सांगणार आहे.

भरपूर वेळा आजूबाजूला कुठेही जाताना-येताना आपण एखादे गाणे ऐकतो. मग ते गाणे टिव्हीवर, रेडिओवर (आता तर रेडिओ खूपच कमी बघायला मिळतात, तुमच्याकडे रेडिओ आहे का?) मोबाईलवर गाणे ऐकायला मिळते. हा खूप जोरात वाजणाऱ्या गाण्यांचा जमाना आहे. गाणे छान असेल की पटकन पाय नाचू लागतात! त्या गाण्यातील संगीत नाहीतर शब्द आपल्या मेंदूत साठून राहतात. मग मेंदू हे गाणे पुन्हा-पुन्हा का ऐकवत असेल?
     मेंदूने पुन्हा-पुन्हा गाणे ऐकवण्याच्या या प्रकारला इंग्रजीत फार आगळेवेगळे नाव आहे ते म्हणजे ‘इअरवर्म’! इअर (Ear) म्हणजे कान आणि वर्म (worm) म्हणजे किडा किंवा अळी. म्हणजे तुला वारंवार गाणे ऐकू येते त्या प्रकारला म्हणतात ‘कानातला किडा’! मराठीत मात्र जर कोणी ‘कानात किडे पडलेत’ असे म्हणाले तर त्याचा अर्थ फार वेगळा असतो बरं!

या प्रकाराला काय म्हणतात हे तर आता कळाले; पण हा डोक्यामध्ये गाणे वाजण्याचा प्रकार कधी घडतो? का घडतो? हे प्रश्न सुद्धा तुला पडले असतील.

‘इअरवर्म’ फक्त गाण्यासंगेच घडेल असे नाही. सुंदर संगीत असेल तरी हे घडते. तबल्यासारखे एखादे वाद्य किंवा बासरीची धून सुद्धा पुन्हा-पुन्हा ऐकू येत राहते. शाळेत ऐकलेली, चाल लावून म्हणलेली एखादी कविता कानात वाजत राहते. निसर्गाच्या आवाजांनीही असे होते. निसर्गाचे आवाज म्हणजे वाऱ्याचा आवाज, पावसाचा नाहीतर मग धबधब्याचा आवाज. हा प्रकार फक्त गीतांनी‌ व निसर्गाच्या आवाजांनी घडत नाही तर एखादे भांडे जोरात पडल्याचा आवाज सुद्धा ऐकू येत राहतो. किंवा पातेले पडण्याचा आवाज आणि कप फुटण्याचा आवाज सुद्धा वारंवार ऐकू येऊ शकतो. आई घरी नसताना फुटलेला कप तर फारच ऐकू येतो की नाही?
     ‘इअरवर्म’ घडणे आपल्या मेंदूच्या चेतासंस्थेशी निगडित आहे. चेतासंस्था म्हणजे आपल्या पूर्ण शरीराचे कामकाज पाहणारी यंत्रणा म्हणजे सिस्टीम.
     आपला मेंदू हा अतिशय गुंतागुंतीचा अवयव आहे. या अवयवात घडणारा ‘इअरवर्म’ हा प्रकार खूप सारे शोध लागले तरी अजूनपर्यंत संपूर्ण समजून घेता आलेला नाही. बरेच शास्त्रज्ञ लोक सांगतात त्याप्रमाणे;
     जेव्हा आपण एखादे सुंदर गीत ऐकतो, गाणे ऐकतो तेव्हा हा प्रकार घडतो. म्हणजे होते कसे की एकदम नाचवणारे गीत-संगीत असेल तर . . . एकदम सोप्या भाषेत सांगायचे तर ते गाणे सुंदर असेल तर मग मेंदूला वाटते की ते लक्षात ठेवावे! म्हणून तो ते आठवून देत राहतो, वारंवार वाजवत राहतो. आणि जेवढ्या वेळेसाठी तो गाणे वाजवतो तेवढे ते आणखी जोरात वाजू लागते! आहे की नाही गंमत? आणि हे गाणे कधीच पूर्ण वाजत नाही. ठराविक ओळीच आपल्याला ऐकू येतात. गाण्याचा अर्थ सोपा असेल तर हे फार वेळा घडतेे. कधी हा ‘इअरवर्म’ काही मिनिटे टिकतो तर कधी भरपूर तास!

‘इअरवर्म’ कधी घडते?

हा प्रकार एकतर सकाळी उठल्यावर घडतो नाहीतर मग रात्री झोपताना घडतो. मेंदू दमलेला असताना घडतो. तर कधी मेंदू कल्पनेत रमलेला असताना घडते. जास्त ताण घेतला तरीही असे होते!
     काही जणांना हा अनुभव इतरांंपेक्षा जास्त प्रमाणात येत असतो. जे स्वप्नाळू आहेत त्यांना तर खूप गाणी ऐकू येतात. तुझ्याही डोक्यात दररोज अशी टिकटिक फार वेळा वाजत असेल तर? तर घाबरण्याचे कारण नाही. ‘इअरवर्म’ मेंदू बळकट असण्याचे लक्षण आहे. म्हणजे तुझी कल्पनाशक्ती खूप जास्त आहे. आणि फार कल्पक काम करताना‌ हा अनुभव जास्त जाणवतो.
     हे सर्व चांगलेच असले तरीही एक वाईट गोष्ट सुद्धा आहे. या ‘इअरवर्म’मुळे कधीकधी कामावरून लक्ष उडते. आपली एकाग्रता कमी होते.

डोक्यात वाजणारे हे संगीत बंद करण्यासाठी कोणता उपाय आहे का?

याच्यावर खरे सांगायचे तर कोणताच उपाय नाही कारण हा आजार नाही म्हणून याच्यावर उपाय नाही! (अशा प्रकारचा एक आजारही ज्यात माणसाला वेगवेगळ्या आवाजांचे भास होत असतात.) मात्र जर आपण या वाजणाऱ्या गीताकडे लक्ष दिले नाही तर ते वाजायचे बंद होते!
     त्यामुळे पुन्हा जर दिवसा कधी डोक्यात गाणे वाजू लागले तर एखादा पदार्थ ३२ वेळा चावून खाऊन पहा! नाहीतर शब्दकोडे सोडवून पहा. किंवा एखादे अवघड काम – जसे की अभ्यास कर! यात लक्ष गुंतवशील तर ‘टिकटिक वाजते डोक्यात’ बंदच होईल बघ!


• संदर्भ :

• वाचत रहा:
१) नमस्कार मी रंगारी

 

आपली समीक्षा ‘टाकबोरू’पर्यंत यशस्वीरित्या पोहचेल. व लवकरच ‘टाकबोरू’ आपली समीक्षा तपासून ती संकेतस्थळावर अद्ययावत करेल.

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال