[वाचनकाल : ४ मिनिटे]
समाजात पसरणारी हिंसा माणसाला नवी नाही. किंबहुना मानवी मनात हिंसेचाच जन्म आधी झाला. हिंसा ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे. मग तिच्यावर थोडेबहुत चिंतन करण्याइतपत बुद्धी निपजली तेव्हा अहिंसेचा जन्म झाला. पण तरीही खोलवर कुठेतरी हिंसा बळावत राहीली. औद्योगिक क्रांती(?) नंतरच्या जागतिक पातळीवर घडलेल्या भयाणक हिंसेच्या जगात अहिंसा कुठे आहे? आणि अहिंसेचे पुरस्कर्ते गांधी कुठे आहेत?
मानवी इर्षा-सत्तालालसा, धर्म-वर्ण-वंश वर्चस्वाचा अभिनिवेश पहाता ‘मानवी अमानुषतेचा’ अंदाज येण्यासाठी गेल्या शतकभराचा इतिहास पुरेसा आहे.
२८ जुलै १९१४ ते ११ नोव्हेंबर १९१८ या पहिल्या महायुद्धाच्या काळात १६० लाख सैनिक आणि सर्वसामान्य नागरिक मारले गेले. काही लाखांचा हेतुपूर्वक झालेला नरसंहार वेगळा. या मानवी संहाराचं समर्थन करणारा ‘सर्व युद्धांचा शेवट करणारं युद्ध!’ हा युद्धखोरांचा युक्तिवाद मृतांच्याबरोबरच गाडला गेला . . . दोन दशकांनंतर दुसरं महायुद्ध सुरू झालं!
१ सप्टेंबर १९३९ ते २ सप्टेंबर १९४५, या दुसऱ्या महायुद्धाच्या काळात मानवी इतिहासात प्रथमच अण्वस्त्रांचा उपयोग झाला. जपानच्या हिरोशिमा-नागासाकी शहरांवर अमेरिकेनं केलेल्या अणुबॉम्ब वर्षावामुळे शहरं-खेडी उद्ध्वस्त होऊन साडेतीन लाखांवर नरसंहार झाल्यावर युद्ध थंडावलं. नंतरही उत्सर्जनामुळे माणसं खंगत मरत राहिली. जन्मलेली नवीन प्रजा मज्जासंस्थेचे विकार, मतिमंदत्व, अपंगत्व घेऊन जन्माला आली. हे सारे उत्सर्जनामुळे पसरलेले अण्वस्त्रविकार! युद्धादरम्यान जर्मनीच्या ‘नाझी’ छळछावण्या म्हणजे कॉन्सनट्रेशन कॅम्प्स, गॅस चेम्बर्समधून ६० लाखांवर ज्यूंचा नरसंहार झाला. एकूण ७०० ते ८०० लाखांचा नरसंहार होऊन हे युद्ध समाप्त झालं.
१ नोव्हेंबर १९५५ ते २ सप्टेंबर १९७५ या वीसेक वर्षांच्या अमेरिका पुरस्कृत व्हिएतनाम युद्धाच्या काळात ५० ते ६० लाखांचा नरसंहार झाला. दक्षिणपूर्व आशियावर लाखो बॉम्ब्सचा वर्षाव झाला. एकट्या लाओसमध्ये लाखो बॉम्ब फुटले न जाता सर्वत्र विखुरले गेले, ज्यामुळे कुठलीही जमीन शेतीयोग्य राहिली नाही. जमिनीत गाडल्या गेलेल्या बॉम्ब्सचा शोध घ्यायला काही शतकं जातील, अशी भीषण अवस्था.
२२ सप्टेंबर १९८० ते २० ऑगस्ट १९८८ पर्यंतच्या इराण-इराक युद्धात सामान्य नागरिकांसह १० लाखांवर मानवी हत्या झाली. विसाव्या शतकातल्या मुख्य युद्धांतील नरसंहाराच्या आकड्यांवर विश्वास बसू नये असा थोडक्यात इतिहास!
अशा अमानुष युद्धांसंदर्भात कालांतराने संबंधित राष्ट्रांच्याकडून दुःख, क्वचित पश्चातापही व्यक्त होतो. ‘नोबेल शांतता पुरस्कार’ सन्मानित जर्मन चान्सेलर (१९६९-७४) विली ब्रेंट यांनी इस्त्राएलकडे नाझींच्या अमानुष कृत्याबद्दल क्षमा मागितली. त्या भीषण घटनेच्या काळात रोमन कॅथलिक चर्च निर्विकार राहिल्याबद्दल १९९८ मध्ये व्हेटिकन चर्चने पश्चाताप व्यक्त केला. अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिटन यांनी पूर्वी झालेल्या गुलामगिरीच्या अत्याचारांबद्दल आफ्रिकन राष्ट्रांची क्षमा मागितली, मात्र असं अपवादानेच घडतं.
भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळात १३ एप्रिल १९१९ या बैसाखीच्या दिवशी जालियनवाला बागेत ‘रौलट ॲक्ट’ विरुद्ध शांततापूर्ण निषेध व्यक्त करण्यासाठी लोक जमले असताना जनरल डायरच्या हुकूमावरून झालेल्या अमानुष गोळीबारात ३५० हून अधिक लोक मारले गेले, कित्येकांनी तिथल्या विहिरीत स्वतःला झोकून दिल्यामुळे (एकूण जवळपास १५००) मरण पावले. विरोध मोडून काढण्यासाठी झालेलं हे एकतर्फी युद्धच. या घटनेवर तेव्हा ब्रिटनच्या युद्ध खात्याचे सचिव असलेल्या विन्स्टन चर्चिल अथवा नंतर पंतप्रधान झालेले त्यांचे समकालीन, स्टेनले बॉल्डविन यांनी क्षमायाचना अथवा पश्चातापाची भावना कधी व्यक्त केली नाही.
चर्चिल म्हणाले, ‘प्रश्न सोडवण्याची ही ब्रिटीश पद्धत नाही. अशा घटनेचा विसर पडता कामा नये.’ बस्स!
भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवासाठी १९९७ ला आलेल्या एलिझाबेथ राणीनं जालियनवाला स्मारकावर पुष्पचक्र वाहताना ‘एक दुःखद घटना’ एवढीच प्रतिक्रिया दिली.
२०१३ साली ब्रिटीश पंतप्रधान डेव्हिड केमेरून यांनी, ‘ब्रिटीश इतिहासातील लाजिरवाणी घटना’ एवढाच उल्लेख केला.
‘An eye to eye only ends up making the whole world blind!’ हे उद्गार गांधीजींनी जालियनवाला बागेच्या हत्याकांडानंतर ब्रिटीश अधिकाऱ्यांशी बोलताना काढल्याचं म्हटलं जातं. अखेरपर्यंत अहिंसेसाठी आयुष्य वेचणाऱ्या गांधी नामक ‘नंग्या फकिरा’चा (चर्चिलचा तुच्छतादर्शक शब्द) फुकट सल्ला कुणालाच नको होता. युद्धांच्या धुमश्चक्रीतल्या कोट्यवधींच्या नरसंहारात हा अहिंसेचा आवाज कोण ऐकणार ?
१९४६-४७ साली स्वातंत्र्याच्या वाटाघाटीच्या काळात भारतीय नेत्यांनीदेखील अहिंसेचा आवाज ऐकला नाही. फाळणीमुळे होणाऱ्या धार्मिक दंगली, नरसंहार टाळण्यासाठी गांधीजींनी फाळणीला विरोध करताना, मुस्लिम लीगच्या जिनांना पंतप्रधान पद देण्याची तयारी दर्शवली होती. त्याचा तत्कालीन भारतीय नेत्यांकडून विपर्यास झाला . . . आणि फाळणी झालीच. सहा लाखांवर नरसंहार झाला, अगणित स्त्रियांवर अत्याचार झाले, लाखो विस्थापित स्थलांतरित झाले. हे कुठल्याही राष्ट्राविरुद्ध युद्ध नव्हतं, तर फाळणीमुळे झालेल्या असंतोषाचा, आपसातला युद्धसदृश धार्मिक उद्रेक होता.
अशा उद्रेकावस्थेत ३१ जुलै १९४० ला लंडन येथे फाशी जाणाऱ्या शहीद उधम सिंगने धार्मिक एकोपा दर्शविणारं ‘राम मोहम्मद सिंग’ हे नाव धारण केल्याचा साऱ्यांनाच विसर पडला. नंतर फाळणी करारानुसार ५५ कोटी पाकिस्तानला देण्याविषयी गांधीजींनी धरलेल्या आग्रहाचाही विपर्यास होऊन त्यांना पाकिस्तानधार्जिणं ठरवलं गेलं. परिणाम . . . ३० जानेवारी १९४८ ला प्रार्थनास्थळी जात असताना अहिंसेसाठी निःशस्त्र लढणाऱ्या ७८ वर्षांच्या वृद्धाचा, रिव्हॉल्वरच्या तीन गोळ्यांनी बळी घेतला. हिरोशिमा-नागासाकी शहरांवर अणुबॉम्बचा वर्षाव करून लाखो नागरिकांचा नरसंहार करणाऱ्या कृत्यामागची पाशवी मनोवृत्ती वेगळी नव्हतीच.
‘The weak can never forgive. Forgiveness is the attribute of the strong!’ (क्षमा करणं
ही दुर्बलांची नव्हे तर सबलांची प्रकृती असते!) असं सांगणारे गांधीजी आज असते तर त्यांनी या ‘विकृती’ला नक्कीच क्षमा केली असती. पुनर्जन्म झाला तरी गांधीजींचं प्राक्तन वेगळं कसं असेल?
मकरंद आर. परांजपे त्यांच्या ‘द डेथ अॅण्ड आफ्टरलाइफ ऑफ महात्मा गांधी’ या पुस्तकात म्हणतात,
महात्म्याचे हौतात्म्य हा महाप्रचंड आणि प्रतापी असा लव्ह-जिहाद होता. विद्वेष आणि रक्तपात थांबविण्यासाठी त्याने मृत्यू पत्करला. आपण एकमेकांचा जीव घेणे थांबवावे म्हणून त्याने आपल्याला जीवन दिले.
गांधीजी जगातील साऱ्याच विकृती दूर करू इच्छित होते. कोणताच धर्म हिंसेची शिकवण देत नाही, असा त्यांचा ठाम विश्वास होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा महात्मा मानवातील पशुत्वाला त्याच्यातील माणुसकीवर मात करू देऊ इच्छित नव्हता. धर्म, वंश, भाषा, भौगोलिक परिस्थिती विभिन्न असतानाही माणूस, माणूस म्हणून एकत्र राहू शकतो, हे साऱ्या जगाला पटवून देण्याचा ध्यास त्यांनी घेतला होता. कारण, साऱ्या जगाच्या विनाशाची मुळे धर्म आणि वंशाच्या लढाईत सामावली आहेत, हे त्या द्रष्ट्या महात्म्याने ओळखले होते. ज्यांचे हितसंबंध धर्माच्या नावे निर्माण केल्या गेलेल्या विषम सामाजिक व्यवस्थेत गुंतले होते, जे समताविरोधी होते, त्यांना ही विचारसरणी परवडणारी नव्हती.
सारी भारतीय जनता गांधीजींच्या स्वातंत्र्यलढ्यात आपल्या उत्थानाचे स्वप्न पाहात होती. त्यामुळे तथाकथित देशप्रेमी हिंदुत्ववाद्यांना माणसाचे माणूसपण जपणाऱ्या गांधी विचारसरणीचा आणि पर्यायाने गांधींचा द्वेष करण्याखेरीज अन्य पर्याय नव्हता. या लोकांनी गांधींना मुस्लीमधार्जिणे ठरविले आणि आयुष्यभर त्यांची निंदानालस्ती करण्याचे कार्य केले.
एकविसाव्या शतकात २० फेब्रुवारी २०१४ पासून सौम्य प्रमाणात चालू असलेलं रशिया-युक्रेन युद्ध, फेब्रुवारी २०२२ मध्ये ‘पूर्णतः सैनिकी आक्रमण’ होऊन प्रचंड प्रमाणावर सुरू झालं. ४० हजारांवर मृत्यू, १ कोटी ४० लाखांचं स्थलांतर, १ लाख ४० हजार इमारतींचा विध्वंस, हे ताजं वर्तमान. एकीकडे अण्वस्त्रबंदी करार होत असताना, भविष्यात तथाकथित महासत्ता बनण्यासाठी रासायनिक आणि जैविक युद्धशास्त्राच्या मार्गाने आता जग निघाले आहे. एका क्लिकमध्ये शहरं बेचिराख करण्याचं सामर्थ्य आलं आहे. सायबर-अस्त्रांमुळे ‘व्हायरसांचा’ आता मुक्त संचार होणार आहे. क्वांटम-टेक्नोलॉजी अर्थात ‘पुंज-तंत्रज्ञाना’ बरोबर कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभाव वाढणार आहे. या वैज्ञानिक शब्दांचे अर्थ एकवेळ समजून घेता येतील परंतु, त्यांच्यापासून होणारा बुद्धीपलीकडचा अनर्थ कसा टळावा?
थोडक्यात एकविसाव्या वैज्ञानिक शतकात मानवी अमानुषतेला आता सीमा नाही. ज्या वेगाने विज्ञानाने माणसाचा ताबा घेतला आहे, त्या भोवंडून टाकणाऱ्या वेगापुढे मानवी समाजाचं भवितव्य काय असेल? विस्मृतीत गेलेली अहिंसा सध्या कुठे असेल?
• संदर्भ :• वाचत रहा: