एव्हाना ज्या काही गोष्टी घडायच्या होत्या त्या घडून गेल्या होत्या. हिरू समोर असताना नैतिकता उत्पन्न करणारा चंद्रहास चंदेरी दुनियेतील प्राचीकडे खेचला गेला होता. आणि हिच ‘प्राची’ नामक पहिली ठिणगी त्याच्या आणि मानसच्या मैत्रीत पडली होती. आता कदाचित इथून पुढे ज्या गोष्टी घडायला नकोत त्यांचे पर्व सुरू होईल? जे घडेल त्याला चंद्रू प्रतिसाद देईल? मानसची या बाबतीत प्रतिक्रिया काय असेल?
कापूसकोंड नावाचा एक अगदी निर्जन भाग सावरी गावात होता. तिथं चंदू एकटाच जाऊन बसायचा. स्वत:शी काही क्षण बोललं पाहिजे, मनातल्या लाटांची गाज ऐकली पाहिजे असं त्याला प्रामाणिकपणे वाटायचं. ही प्रगल्भता आणि त्या जोडीला रसिकता आपल्याला आणि आपल्यासारख्या काही जणांनाच कुणी दिली? या एकूण विश्वयंत्रणेचा कुणी पालनकर्ता असेल आणि त्याला खऱ्या कार्यकर्त्यांप्रमाणे अज्ञात अदृश्यच राहायचं असेल तर? इतक्या प्रेरणा, अशा भावना, पुष्कळसे विचार, तितकेच विकार ही सगळी निर्मिती, हा खळखळाट, झरे, नद्या आणि समुद्र . . . यामागे नैतिक अशी योजना तर दिसत नाही, पण मग इतकी सुसंगती, नकाशा भरावा तसं नियोजन, प्रत्येकाची पाहिलेली सोय, एकमेकांवर अवलंबून असणं हे सारं कसं काय?
‘ये कौन चित्रकार है ? ये कौन चित्रकार?’ गाणं शिकवणाऱ्या शिगवण सरांची चंदूला अचानक खूप आठवण आली. ते आता या जगात नव्हते. फार छान गायचे. त्यांची कला जगाला कधी कळलीच नाही. कोकणातले कितीतरी कलाकार वेगळं काही पोटापाण्यासाठी करत राहतात. कलावंत म्हणून पुढे येत नाहीत. चित्रकलेचा हात असलेल्या मुलांना तरी कोण हात देतं? संगीत कलेचंही तेच!
कापूसकोंडाच्या निर्मळ एकांतात चंद्रहासने हे सगळं लिहून ठेवलं. ‘देव नाही या सत्यावर मी ठाम आहे. पण देव असायला हवा होता. देवाची गरज आहे. आजकालचा धर्म म्हणजे फक्त राजकारण वाटतं. खरा देवधर्म वेगळाच असतो’ असंही त्याच्या हातून लिहून झालं. खट्याळ वाऱ्याने लिखाणाचे काही कागद इकडे-तिकडे उडवले. ते त्याने मित्राला द्याव्या तशा प्रेमळ शिव्या वाऱ्याला घालत गोळा केले. माणूस आयुष्यभर काही ना काही गोळा करतो आणि अचानक बंद पडतो. मग त्या संग्रहाचं काय करायचं, हा प्रश्नच असतो. प्राध्यापक लोक इतकी पुस्तकं जमवतात. कपाटात छान रचून ठेवतात. त्या विषयात विशेषत: वाङ्मयात त्यांच्या घरच्या लोकांना, विज्ञानवाल्या मुलांना रस नसतो. पुस्तकं वाळवीकडे सोपवली जातात. परतीच्या वाटेवर बऱ्याच लहरी लाटा चंद्याच्या मनात फुटत राहिल्या.
‘मनातला हा समुद्र मावत नाही, त्याला कुणाचं भय नाही की, बंधन नाही.’ असं तो स्वत:शी म्हणत असतानाच मानसने त्याला हाक मारली. तो टवटवीत, उत्तेजित दिसत होता. ‘गे प्राइड मार्च’ला जाऊन आला होता. न विचारता तेच सगळं सांगत सुटला. खूप उत्साहात बोलत होता. मनातला सागर हा पोरगा गढूळ बनवतोय का? समलैंगिकता हे नैतिक प्रदूषण मानायचं का? पण नीती म्हणजे भीती असेल, तर आपण ‘त्यातले’च नाही ना हे भय तर समलिंगी लोकांचा तिरस्कार करण्यामागे नसेल, असंही चंदूने रात्री डायरीत लिहून ठेवलं.
मानस म्हणाला होता, “गे प्राइड मार्चला हजारो लोक जमले होते. मीडियावाले तर होतेच. पण ते फक्त शूट करत होते. आमच्या बाइट्स घेत होते. चंदू, आम्ही पण मतदार आहोत. आम्हाला नकाराधिकार का वापरायला लावता? आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. नुसतं कलम ३७७ हटवून चालणार नाही. समाजाने आमचा स्वीकार करायला हवा. तूही कधीकधी ‘आमचा’ तिरस करतोस.” असं म्हणत मानसने अचानक चंदूचा हात हातात घेतला. मानसचा स्पर्श मुलीसारखा वाटतोय. आकर्षणाचा कोणताही धागा घर्षणातून बांधला जाऊ नये म्हणून चटका बसल्यावर करतात तसं चंद्रहासने हात काढून घेत मानसला पुन्हा नाराज केलं. अंगचटीला जाणारे पुरुष त्याला कधीच आवडले नाहीत. पुरुषाने बाईचा कितीही आव आणला तरी बाई ती बाईच असं त्याचं सरळसोट मत होतं. तरीही माणुसकीने सगळ्यांशी वागलं पाहिजे. सर्वांना मनासारखं जगण्याचा हक्क आहे, याबद्दल तो ठाम होता.
“काय म्हणतेय तुझी मॅडम?” या मानसच्या प्रश्नाचा मात्र चंदूला राग आला.
“ते तुझ्या काहीच कामाचं नाही.”
“तिच्या पैशाच्या जोरावर तू काही धंदा-बिंदा थाटणार आहेस का? मला पण ठेव तुझ्या दुकानात केर काढायला! नाही तरी आमच्या कम्युनिटीला कचराच समजता तुम्ही तथाकथित पुढारलेले लोक!” मानसचं मन तापलं होतं. वाफ जाणवत होती.
“मानस, माझ्या डोक्यात जाऊ नकोस. तुझ्या हद्दीत राहा!” चंदू खेकसला.
“माणूस कधी चिडतो? शेपटीवर पाय पडला तर! मनालाही एक शेपूट असते.” असं म्हणत मानस हसू लागला. भांडण खवळता खवळता निवळले.
पुरुष डोक्यात राख घालतो तेव्हा बाई असंच करते का हे मनात आणतानाच ‘बाई’ची प्रचंड ओढ आपल्या तहानलेल्या मनाला लागलीय ही तीव्र जाणीव चंदूला झाली. मनाला लागलेली ती कळ त्याच्यासाठी तरसणाऱ्या मानसला चंद्रहास सांगू शकला नव्हता. दुधाची तहान मानसने पुढे केलेल्या ताकाच्या भांड्यावर भागवण्यात त्याला काही रस नव्हता. पण अशा लोकांचंही काही लैंगिक व्यवस्थापन आता व्हायला हवं, हे मात्र चंदूला पटत होतं. ‘तुझं त्या बाईमुळे नास्तिक केंद्राकडे लक्ष नाहीय’ हे मानसचं मतही चंदूला मान्य होते. पण प्राची ही विजेसारखी सळसळणारी चमक घेऊन वावरत होती. तिच्या आकाशवारुळात चंदूला आता वाव होता. वावर तर रोजचा होताच. विजेवर स्वार होणारा ओलाचिंब ढग संभवतो का घनदाट उपभोगासाठी?
आणि एका उष्ण, ढगाळ रात्री प्राची म्हणाली, “घरी जा तू आत्ता; पण उशीर होईल एवढं तरी कळव. तुझ्या मनात काय आहे ते मी ओळखलंय! माझं मन मी आधीच मोकळं केलंय. माझं पुस्तक आता तूच आहेस. माझं पुस्तक मला अगदी उराशी कवटाळायचं आहे. आपल्याला कोण अडवणार आहे ? इथं आपण दोघंच तर आहोत. तू इतकं घाबरतोस कशाला?”
नरुला, ललितला, ओंकारला कितीतरी जणांना तिने असंच खेळवलं, लोळवलं असेल; पण त्या क्षणी तिच्या आधीच्या दोस्तांचा विचार करण्याइतपत वेळ चंदूकडे नव्हता. तो आपोआप प्राचीच्या ताब्यात गेला. त्या रात्री जो खेळ रंगला, भोगाचा जो झुला झुलला, त्याची वर्णनं कागदोपत्री करावी किंवा चकाट्या, बढाया म्हणून कुणाला सांगावी असं मात्र चंद्रहासला वाटत नव्हतं. कामजीवनालाही काही गुणवत्ता देता आली पाहिजे. नाजूक गुंत्यालाही एक दर्जा असला पाहिजे असं त्याचं प्रांजळ मत होतं. त्याचं राजबिंडं रूप, त्याचं राजस व्यक्तिमत्त्व प्राचीने अंगात भिनवून, रुतवून घेतलं. या सगळ्या खेळीत खेळीमेळीच होती. दोघंही निसर्गधर्मच पाळत होते. लाडीगोडी, गोडीगुलाबी ही पहिली पायरी असते. शय्यासोबत आणि नंतरची तरल गुंगी अनुभवताना चंदूला वाटलं, स्वर्गसुख हा शब्दही अपुरा पडतोय!
समुद्र संपणारा नव्हता. एखादी यक्षलाट आपल्याला गुदमरवून बुडवणार तर नाही, असंही मनात आलं. प्राचीने समग्र पुरुष खूप सूक्ष्मपणे अभ्यासला होता. पुरुषाचं एक उत्तेजना केंद्र कानाच्या पाळीशी असतं. हलका चिमणचावा घेतला तर नराला तेही भावतं हे वास्तवात त्यांनीच चंदूला सांगितलं.
“मॅडम, तुम्ही या पुस्तकाचं लेखन स्वत: केलं असतं, तर तुम्हाला जमलं असतं.” असं चंद्रहास त्यांना म्हणाला.
त्या किणकिणत हसल्या आणि हळुवारपणे म्हणाल्या, “मग हे मिशीवालं फुलपाखरू या फुलराणीपाशी कसं आलं असतं?”
त्या फुलाची प्रत्येक पाकळी चंदूला आवडली होती. पुरुषाला मनापासून आवडणारी स्त्री ही अशीच रूपसुंदर, स्वप्नगंधा असते. तो व्यवहारात बायकोचा स्वीकार करतो. पण त्याच्या मनात दुसरी एखादी सुरेख स्त्री प्रतिमा असतेच. कधी दुरून, कधी संधी मिळाली तर जवळून तो तिच्यावर भाळतो, पाघळतो. मग त्यातून कामलळीत घडत जातं. रात्रीचा दिवसही केला जातो. प्रणयात घामाचीही फुलं होतात. समभोग दवात भिजतो. पावसाचा सौरभ मातीला मिळतो. नंतर आठवण झाली तरी मदनमस्त तंद्री लागते.
– क्रमशः
• संदर्भ :• वाचत रहा :